पत्नीशी प्रेमसंबंध ठेवले म्हणून मित्राची हत्या करून पोलिसांच्या मदतीचं नाटक

अहमदाबाद क्राइम ब्रँचने मायकलच्या हत्येप्रकरणी सुलतान आणि त्याची पत्नी रिझवाना यांना अटक केली.

फोटो स्रोत, भार्गव पारिख

फोटो कॅप्शन, अहमदाबाद क्राइम ब्रँचने मायकलच्या हत्येप्रकरणी सुलतान आणि त्याची पत्नी रिझवाना यांना अटक केली.
    • Author, भार्गव पारिख
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

"जेव्हा आम्ही पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो तेव्हा एका कोपऱ्यात एक बाई विणकाम करत बसलेली आम्हाला दिसली. शेजारी तिची मुलगी देखील विणकाम करत होती.

एका कोपऱ्यात एक अतिशय रुक्ष दिसणारा माणूस खोकलताना आणि काही तरी खाताना दिसला. म्हणजे त्या खोलीत गेल्यावर असं वाटलंच नाही की ती महिला आणि तो पुरुष यांनी एका जणाची हत्या केली असेल आणि आपला गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी त्याच्या मृतदेहाचे आठ तुकडे केले असतील."

"आम्ही त्या घराची झडती घेतली तर रक्ताचे डाग असलेली एक तलवार मिळाली. घरातील भिंतीच्या कोपऱ्यात सुकलेल्या रक्ताचे डाग आढळले. मग आमच्या संशयाचे रूपांतर खात्रीत झाले अन् कळलं की याच छोट्याशा खोलीत तो खून झाला असावा."

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

हे शब्द आहेत अहमदाबादाबादमधील बापूनगर पोलीस स्टेशनचे प्रमुख ए. डी. परमार यांचे. परमार यांच्या टीमने 30 मार्च रोजी मोहम्मद उर्फ मायकलच्या हत्या प्रकरणात इम्रान उर्फ सुलतान आणि त्याची पत्नी रिझवाना यांना अटक केली.

अटक केल्यानंतर आपल्या कबुलीजबाबात सुलतानने मायकलची हत्या कशी केली याचा घटनाक्रम उलगडून दाखवला.

धक्कादायक बाब म्हणजे मायकल दोन महिन्यांपूर्वी हरवला म्हणून पोलीस त्याचा तपास करत होते. त्या तपासात सुलतानने पोलिसांचं सहकार्य केलं. म्हणजे ज्या व्यक्तीची हत्या केली त्याच व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तो पोलिसांची मदत करत असल्याचं नाटक देखील करत होता.

पोलिसांनी सांगितले की दोन महिन्यांपूर्वी मायकल बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी आमच्याकडे केली. तो एक सराईत गुंड होता आणि तो जामिनावर बाहेर आलेला होता.

त्याच्यावर खुनाचा आरोप होता. त्यामुळे तो सापडणं महत्त्वाचं होतं असं पोलिसांना वाटलं. म्हणून पोलिसांनी त्याचा कसून शोध घ्यायचं ठरवलं.

पण त्याचा कुठलाच थांगपत्ता लागला नाही त्यामुळे त्यांनी खबऱ्यांकडून माहिती घ्यायचे ठरवलं. त्यात पोलिसांना कळलं की 35 वर्षांचा मायकल आणि 21 वर्षांच्या सुलतानची मैत्री होती.

आठ बाय दहाच्या खोलीत सुलतान आपली 22 वर्षीय पत्नी रिझवाना आणि चार वर्षांची मुलगी यांच्यासह राहत होता. पोलिसांनी सांगितले की ते दोघेही दारू आणि गांजाचे शौकीन होते त्यामुळे त्यांची गट्टी जमली.

सुलतान एका दुकानात वेल्डरचं काम करत होता. त्याचं उत्पन्न तुटपुंजं होतं. त्यामुळे त्याला पैशांची सतत गरज पडायची. त्याच्या सगळ्या गरजा मायकल पूर्ण करत होता.

इतकंच नाही तर तो त्याची पत्नी आणि मुलीच्या गरजा पूर्ण करत होता. मुलीला कपडे, खाऊ-खेळणी इत्यादी भेटवस्तू तो आणायचा. रिझवानासाठी देखील तो भेटवस्तू आणू लागला होता.

गुन्हेगार

फोटो स्रोत, भार्गव पारीख

पोलीस सांगतात की रिझवानाला चित्रपट पाहणे आवडत असे, बाहेर फिरणे, खाणे इत्यादी गोष्टींची तिला आवड होती त्याने तिची सर्व आवड पूर्ण केली.

सुलतान एका दुकानात वेल्डिंग कारागीर म्हणून काम करत असे, त्याचं उत्पन्न फारसं नव्हतं, त्याचा सर्व खर्च मायकेलने केला होता. त्याचबरोबर सुलतानची पत्नी रिझवाना आणि मुलीच्या सर्व गरजाही तो पूर्ण करत असे.

त्यातूनच रिझवाना आणि मायकल यांचे प्रेमसंबंध झाले असावेत असं पोलिसांनी सांगितलं. सुलतान जेव्हा पूर्णपणे नशेत होता तेव्हा मायकेल आणि रिझवानाने संधीचा फायदा घेतला, पण ही गोष्ट सुलतानच्या नंतर लक्षात आली होती.

मृत मोहम्मद मिराज उर्फ ​​मायकल

फोटो स्रोत, भार्गव पारिख

फोटो कॅप्शन, मृत मोहम्मद मिराज उर्फ ​​मायकल

हा घटनाक्रम अनेक दिवस चालला. पुढे मायकल खुनाच्या आरोपात तुरुंगात गेला आणि जेव्हा तो बाहेर आला तेव्हा आपल्या नशिबात काय लिहून ठेवले आहे याची त्याला कल्पना नव्हती.

सुलतानने त्याच्या खुनाचा कट रचलेला होता तो फक्त एका संधीच्याच शोधात होता.

पी. एस. आय. पी. एच. जडेजा

फोटो स्रोत, भार्गव पारीख

फोटो कॅप्शन, पीएसआय पी. एच. जडेजा

'बेपत्ता मित्राला शोधण्यासाठी ज्याने पोलिसांना मदत केली तोच मारेकरी निघाला'

मायकल बेपत्ता झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास करणारे पीआयआय पी. एच. जाडेजा सांगतात की या प्रकरणाचा तपास करणं हे आमच्यासाठी अतिशय कठीण होतं. आमच्या डोळ्यासमोर काळोखच होता.

तरी आम्ही जे काही समोर असेल त्यावरुन एक एक गोष्टी शोधत गेलो. मायकलचा तपास करण्यासाठी आम्हाला सुलतानने मदत केली. त्यामुळे त्याच्यावर कुठलाही संशय येण्याची शक्यातच नव्हती.

पण पहिल्यांदा सुलतानवर केव्हा संशय आला असं विचारलं असता जाडेजा सांगतात, "आम्हाला खबऱ्यांकडून माहिती मिळाली की सुलताननेच त्याची हत्या केली असावी आणि त्यानेच मायकल पळून गेला असा कांगावा केला. सुरुवातीला आमचा विश्वास बसला नाही, पण जसा जसा तपास पुढे गेला आणि त्याच्या बोलण्यात विसंगती आढळू लागल्या तेव्हा मात्र त्याच्यावर संशय आला."

त्या दिवशी काय घडलं?

त्या दिवसाच्या घटनाक्रमाबद्दल जाडेजा सांगतात की सुलतान ज्या गल्लीत राहत होता ती चिंचोळी असल्यामुळे रस्त्यावर असलेले सीसीटीव्ही या ठिकाणी कामाचे नव्हते. पण आम्ही आजूबाजूच्या लोकांना विचारलं तर त्यातून कळलं की एकेदिवशी रिझवाना आणि छोटी मुलगी आपल्या घराबाहेर पाच तास उभे होते. त्याने मुलीसाठी दूध आणि बिस्किटं देखील बाहेरच दिली.

नंतर हे देखील कळलं की सुलतानने जवळच्याच दुकानातून पाच बाटल्या फिनाइल घेतलं. यानंतर त्याने मायकलची हत्या केली असावी असं आमच्या लक्षात आलं.

एका रिक्षाचालकाशी बोलल्यावर असं कळलं की कचरा टाकण्यासाठी सुलतानने रिक्षाची मागणी केली होती. पण त्या पिशवीवर रक्ताचे डाग दिसल्यानंतर मी ते भाडे नाकारलं, असं रिक्षाचालकाने सांगितल्याचं जाडेजांनी सांगितलं.

असे पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसाच्या पथकाने त्याच्या घरावर छापा टाकला आणि तेथून तलवार जप्त केली.

'रिझवाना नात्याला कंटाळली होती'

रिझवाना ही मायकलसोबत असलेल्या संबंधांना कंटाळली होती तिलाही यातून सुटका हवी होती आणि बायकोशी त्याचे संबंध आहेत याचा राग सुलतानच्या मनात होता. म्हणून या जोडप्याने त्याला ठार करण्याचा निर्णय घेतल्याचं पोलीस सांगतात.

पोलीस

फोटो स्रोत, भार्गव पारीख

फोटो कॅप्शन, पोलीस अधिकारी

21 जानेवारी रोजी रिझवानाने त्याला फोन करून बोलवलं आणि तुला एक सरप्राइज द्यायचे आहे असे तिने सांगितलं. मायकल घरी आल्यावर तिने प्रेमाचं नाटक करत त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि सरप्राईज आहे असं म्हटलं. हीच संधी साधून सुलतानने त्याच्या पोटात तलवार खुपसली.

मायकल हा देखील अंगापिंडाने मजबूत होता आणि त्याच्याकडे देखील एक चाकू होता. त्याने त्या चाकूने सुलतानवर वार केला. सुलतान सावध झाला आणि त्याने त्याच्या हातून चाकू हिसकावून मायकलच्या मानेवर वार केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी गिली.

पोलिसांनी सांगितले की या जोडप्याने मायकलचे आठ तुकडे केले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. पोलिसांनी नंतर तपासात ते अवशेष हस्तगत केले आणि त्यांनी फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवले.

त्यात ते अवशेष एका पुरुषाचं असल्याची खात्री पटली. पुढील तपासासाठी ते अवशेष डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आले.

गुन्ह्याची कबुली

अहमदाबाद सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात या दोघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

रिझवानाने पोलिसांना सांगितले की "तो तिचे सर्व लाड पूर्ण करत असे त्यामुळे ती त्याच्या प्रेमात कधी पडली हे कळलेच नाही. पण तो खूप हट्टी होता आणि शेजारी पाजारी कुणी आहे, माझी छोटी मुलगी जागी आहे या गोष्टीशी त्याला काही घेणं देणं नसायचं. तो फक्त शारीरिक सुखाची मागणी करायचा. या गोष्टीचा मला कंटाळा आला."

"तो दारू प्यायला नंतर पूर्णपणे अनियंत्रित होऊन जात असे त्याची देखील भीती वाटयाची आणि त्यातून मी नवऱ्याला सांगितले की मायकलपासून मला सुटका हवी आहे."

सुलतानला याबाबत आधीच माहीत होतं. त्यानंतर दोघांनी मिळून कट केला आणि त्याची मायकलची हत्या केली.

आपल्या कबुलीजबाबात सुलतानने सांगितले, "मायकल बेपत्ता झाला म्हणून जेव्हा पोलीस चौकशीसाठी आले तेव्हा मी त्यांना असं दाखवलं की मी सहकार्य करत आहे. त्यामुळे त्यांचा माझ्यावर संशय गेला नाही पण नंतर ते समोर आलंच."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)