रामजी नगर गँग : लक्ष विचलित करून चोऱ्या, अनेक भाषा अवगत, खटल्यांसाठी वकिलांची फौज

चोरी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रमिला कृष्णन्
    • Role, बीबीसी तामिळ

तामिळनाडूत गेल्या काही दिवसांत महिलांनी कारच्या खिडक्या फोडून वेगवेगळ्या प्रकारच्या पिन वापरून चोरी केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

या सर्व प्रकरणांमध्ये तामिळनाडूतील रामजी नगर गँग सक्रिय असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

याबाबत अधिक तपास केला असता या गँगने तामिळनाडूतच नव्हे तर देशभरातील इतर भागातही अनेक दरोडे टाकण्याचं काम केलेलं आहे, असं पोलिसांना आढळून आलं आहे.

दोन महिन्यांच्या तपासानंतर चेन्नईच्या तेनमपेट पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरू येथून एका गँग सदस्याला अटक केली.

सबरी असं संशयिताचं नाव असून तो 33 वर्षांचा आहे.

त्याचा संबंध रामजी नगर गँगशी असून त्याच्यामार्फत इतर आरोपींची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

चोरी

फोटो स्रोत, Getty Images

रामजी नगरचे दरोडेखोर कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय?

रामजी नगर गँग तिरूचिरापल्ली (त्रिची) शहरानजीकच्या रामजी नगर नामक छोट्या गावात राहते.

गुजरातमधून आलेल्या रामजी मोले यांनी या परिसरात 1990 साली एक सूतगिरणी सुरू केली होती.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यावेळी, गुजरातसह आंध्र प्रदेश आणि इतर भागातून आलेले स्थलांतरित मजूर या मिलमध्ये प्रामुख्याने कामास होते.

रामजी यांची सूतगिरणी असलेल्या या परिसराचं नाव नंतर रामजी नगर म्हणून प्रचलित झालं. ही सूतगिरणी 1990 ते 2007 पर्यंत चालली.

पण, सूतगिरणी 2007 मध्ये बंद पडल्यानंतर बहुतांश कामगारांनी रामजी नगरमध्येच राहणं पसंत केलं. हे मजूर उत्तरेतील भाषांसह दाक्षिणात्य भाषाही अस्खलितपणे बोलण्यास शिकले.

रामजी नगरमध्ये अशा प्रकारे मजूरांची दोन हजारांहून अधिक कुटुंबे वास्तव्याला असल्याची माहिती आहे.

पण, याच मजूर कुटुंबांमधील काही मंडळी गुन्हेगारीकडे वळाल्याचं दिसून येतं.

आजघडीला भारतातील शेकडो पोलिस ठाण्यांमध्ये रामजी नगर चोरट्यांविरुद्ध हजारो चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

महाराष्ट्रासह तेलंगण, आंध्रप्रदेश, कर्नाटक, पंजाब, दिल्ली आणि इतर राज्यांचे पोलीस रामजी नगर गँगमधील दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

1990 पासून आजपर्यंत रामजी नगर गँगमधील दरोडेखोरांच्या टोळीने बँक दरोड्यांपासून ते दागिन्यांची दुकाने, एटीएममधून रोख रकमेची चोरी, सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्यांमधून वस्तूंची चोरी, गर्दीच्या ठिकाणी लोकांचे दागिने, पाकिटे लंपास करण्यापर्यंत मजल मारली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पिन

फोटो स्रोत, Getty Images

रामजी नगर गँगची चोरीची शैली

बीबीसीने रामजी नगर दरोडेखोरांच्या टोळीला पकडणाऱ्या काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

सारंगन हे त्यांच्यापैकीच एक. सारंगन यांनी तिरुचिरापल्लीचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेलं आहे.

ते सांगतात, “रामजी नगर गँगमधील चोरांना ओळखण्यासाठी आम्ही त्यांचे फोटो आणि पत्ता यांच्यासह डेटाबेस तयार केलेला आहे.

रामजी नगरचे दरोडेखोर कोणावरही हल्ला करत नाहीत. कोणालाही मारत नाही. पण लोकांचं लक्ष विचलित करून चोरी करणे, यामध्ये ते पारंगत आहेत, असं सारंगन यांनी सांगितलं.

उदाहरणार्थ, दहा रुपयांची नोट रस्त्यावर ठेवली जाते आणि ती कोणीतरी पाहिली की ती उचलण्यासाठी खाली वाकते तेव्हा ते त्यांचे पाकीट हिसकावून पळून जातात.

एखाद्या ठिकाणी दोन व्यक्ती विनाकारण भांडू लागतात. अचानक गर्दी जमवून दागिने परिधान केलेल्या व्यक्तीला त्यामध्ये ढकललं जातं. यानंतर गँगमधील तिसराच एखादा व्यक्ती येऊन दागिने चोरून पळून जातो.

ते गाड्यांच्या काचा फोडण्यासाठी विशिष्ट अशी पद्धत वापरतात. त्यामुळे काचा फुटण्याचा आवाजही मोठ्याने होत नाही.

ही गँग गटागटाने एखाद्या स्टोअरमध्ये प्रवेश करते. एक गट जाणून बुजून काही कृत्य करून चोरी संशय निर्माण करतो. कर्मचाऱ्यांचं लक्ष विचलित करतो. त्याचवेळी दुसरा गट चोरीचं काम पूर्ण करतो.

सबरी

फोटो स्रोत, CHENNAI POLICE

फोटो कॅप्शन, सबरी

गटागटाने चोरी करण्याचं कारण काय?

रामजी नगर गँगमधील सदस्य हे पंजाबी, मराठी, भोजपुरी, हिंदी, गुजराती अशा अनेक भाषा बोलतात. विशेषतः हे सदस्य बाहेर राज्यात जाऊन बँका लुटतात.

रामजी नगर गँगचे सदस्य एखाद्या घटनास्थळावर एखाद्या व्यक्तीला जाणुनबुजून अटक होऊ देतात.

पोलिसांचं लक्ष त्यामध्ये गुंतलेलं असताना त्यांची दुसरी टोळी दुसऱ्याच ठिकाणी चोरी करते, अशा प्रकारच्या अनेक घटना पोलिसांच्या निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

अटक झालेल्या व्यक्तीला सोडवण्यासाठी रामजी नगर गँग सदस्यांकडे वकिलांची एक फौजही आहे.

पैसे चोरी केल्यानंतर त्यांचं वाटप करताना काही भाग हा खटल्यात बाजू मांडणाऱ्या वकिलांसाठी बाजूला ठेवला जातो.

रामजी नगर गँगचा शोध घेत रामजी नगरमध्ये गेलेल्या पोलिसांच्या हातीही फारसं काही लागत नाही. तिथे जाऊन अटक करून एखाद्या व्यक्तीला नेल्याची घटनाही दुर्मीळ अशी म्हणावी लागेल.

रामजी नगर गँगची चर्चा का?

गेल्या अनेक वर्षांपासून तामिळनाडूसह देशभरात सक्रिय असलेली रामजी नगर गँग चेन्नईमधील काही चोऱ्यांच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं दिसून आलं आहे.

येथील डी. नगर, बांदिबाजार, तेनमपेट आदी भागात त्यांनी कारमधून लॅपटॉपसारख्या अनेक मौल्यवान वस्तूंची चोरी केली.

यानंतर गँगला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केलं आहे.

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं, “आम्ही सध्या सबरी नावाच्या व्यक्तीची चौकशी करत आहोत. हा रामजी नगर गँगशी संबंधित आहे. त्याने गिरी रोड परिसरातून लॅपटॉपची चोरी केली होती.

“याशिवाय आम्ही रामजी नगर गँगने इतर राज्यांमध्ये केलेल्या चोऱ्यांचीही माहिती घेत आहोत. चेन्नई शहरातील विविध भागांतून जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे खऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचा आणि अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत.

“आतापर्यंत सहा लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच त्यांनी किती वस्तू चोरल्या आणि कुठे नेल्या याचा शोध घेऊ,” असे ते म्हणाले.

सबरी हा पूर्वी चेन्नईमध्ये वास्तव्यास होता. नंतर तो बंगळुरूमध्ये राहण्यासाठी गेला होता. तो दिल्लीला निघण्याची तयारी करत असल्याचं समजताच पोलिसांनी त्याला अटक केली.

पैसा

फोटो स्रोत, Getty Images

रामजी नगर गँगच्या चोऱ्या

आतापर्यंतच्या घटना पाहता लोकांचं लक्ष विचलित करून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी चोऱ्या केल्याचं दिसून येतं.

एटीएम मशीनमधली रोख रक्कम, मोबाईल फोन, लॅपटॉप, हातगाडी, पाकीटे चोरायचं ते काम करतात.

पोलिसांच्या माहितीनुसार, हजारो दरोडे टाकले असले तरी त्यांनी कधीही कुणावर हल्ला केल्याचं ऐकिवात नाही.

2019मध्ये हैदराबादमधील एटीएम केंद्रात पैसे भरण्यासाठी आलेल्या एका बँक अधिकाऱ्याचं लक्ष विचलित करून त्यांनी 58 लाख रुपये चोरले होते.

बंगळुरूमधील एका व्यस्त रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमधून सुमारे 2 लाख रुपयांच्या वस्तू, एक लॅपटॉप आणि 30 हजार रुपये किमतीचे पाकीट चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केवळ एक पिन वापरून ते कारच्या खिडकीची काच फोडतात.

चंदीगडमध्ये 2021 मध्ये अशीच चोरी झाली होती. दरोडेखोरांच्या या टोळीने तेल गळती होत असल्याचे सांगून पैसे घेऊन जाणाऱ्या गाडीचालकाचं लक्ष विचलित केलं होतं.

चालक वाहनातून बाहेर पडताच त्यांनी कारमधील 39 लाख रुपयांची पेटी पळवून नेली होती. ही लूट केल्यानंतर ते दोघे अनेक आठवडे तामिळनाडूत आलेही नव्हते.

काही आठवड्यांनंतर, जेव्हा ते तिरुचिरापल्ली येथे आले. तिथे पोलिसांना त्यांची ओळख पटवण्यात यश आलं.

एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, “तामिळनाडूतील रामजी नगर गँगचे सदस्य चोरीसाठी इतर राज्यात जातात. त्यांचा उदरनिर्वाह लुटलेल्या पैशावरच अवलंबून आहे.

1990 पासूनच रामजी नगर गँगची चर्चा आहे. पकडले गेले तर ते चोरीचा माल परत करतात. इतर राज्यांतील पोलीस अधिकारी वर्षानुवर्षे त्यांची माहिती घेण्यासाठी तामिळनाडूत येत असत.”

पूर्वी प्रामुख्याने इतर राज्यांमध्ये चोरी करणाऱ्या या गँगने आता तामिळनाडूतही चोरी सुरू केल्याचे स्पष्ट झालं आहे.

पण रामजी नगर भागातील अनेक नागरिकांना आता चांगलं सन्मानाचं जीवन जगायचं आहे.

पोलीस अधिकारी सांगतात, “एकेकाळी रामजी नगर परिसर चोरांचा वावर म्हणून ओळखला जायचा. तिरुचिरापल्लीपासून ते फक्त 10 किमी अंतरावर होते. आता तो शहराचा भाग आहे. अनेकजण आपल्या जमिनी चांगल्या दराने विकून एखादा व्यवसाय टाकून उदरनिर्वाह करत आहेत.”

“पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यापैकी काहींनी पुन्हा चोरी करण्यास सुरुवात केल्याचं आढळून येत आहे,” असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

चोरीपासून सावध कसं राहायचं?

चोरीपासून लोकांनी स्वत:चा बचाव कसा करावा, याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी काही सूचना दिल्या. त्या पुढीलप्रमाणे -

  • चोरटे लक्ष विचलित करत असल्याने सर्वसामान्यांनी आपलं सामान सुरक्षित ठिकाणी ठेवावं.
  • सार्वजनिक ठिकाणी दागिने, पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू बॅगमध्ये नेणे टाळा.
  • बँकेतून मोठ्या प्रमाणात रोकड काढताना किंवा दागिन्यांच्या दुकानातून कोणतीही वस्तू खरेदी करताना काळजी घ्या. तुम्हाला कोणी पाहत असेल तर लक्ष द्या.
  • गाडीत एखादी वस्तू घेऊन जात असतानाही ती बाहेरील व्यक्तींना दिसू नये.
  • गाडीवर लक्ष ठेवण्यासाठी एखादा व्यक्ती असेल, अशा सुरक्षित ठिकाणी गाडी पार्क करा.
  • रस्त्यावर पडलेले पैसे किंवा इतर वस्तू न उचलणंच नेहमी चांगले.
  • ओळख नसलेल्या लोकांशी बोलणं टाळा.
  • अनावश्यक वाद-भांडणांकडे दुर्लक्ष करा. रस्त्यावर भांडण सुरू असल्यास त्यामध्ये हस्तक्षेप न करणं हेच चांगलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)