भटके कुत्रे माणसांवर हल्ला का चढवतात? त्यांच्यापासून बचाव कसा करावा?

फोटो स्रोत, NURPHOTO
- Author, विनीत खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
हैद्राबादमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात एका चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या चार वर्षांच्या चिमुरड्यावर कुत्र्यांच्या टोळक्यानं हल्ला चढवला. त्यांनी मुलाचे अक्षरश: लचके तोडले. ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे.
मुलाचे वडील गार्डची नोकरी करतात. ते त्यांच्या दोन मुलांना कामाच्या ठिकाणी घेऊन गेले होते.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की, ते ड्युटीवर होते आणि बाजूलाच त्यांचा मुलगा खेळत होता. ते पाच मिनिटांत परत येतो असं सांगून बाहेर गेले.
ते परत येईपर्यंत धक्कादायक गोष्टी घडल्या होत्या. रविवारची सुट्टी असल्याने आजूबाजूलाही कोणीच नव्हतं. मुलांची आई घरीच होती. जखमी अवस्थेत असलेल्या मुलाला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेबाबत कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.
अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ आहे. ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉरपोरेशनच्या म्हणण्यानुसार, हैदराबादमध्ये सुमारे पावणे सहा लाख भटके कुत्रे आहेत.
यापूर्वी उत्तरप्रदेशातील सहारनपूर मध्येही अशीच घटना घडली होती.
भारतात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचा आलेख वाढताच आहे. एका आकडेवारीनुसार भारतात सहा कोटींहून जास्त भटके कुत्रे आहेत.
भारतात दरवर्षी सुमारे दोन कोटी लोकांना प्राणी चावतात. यातल्या 92 टक्के घटना तर कुत्र्यांनी चावा घेण्याच्या आहेत.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगात रेबीजने मृत्यूमुखी पडणाऱ्यांपैकी 36 टक्के मृत्यू हे भारतात होतात.
म्हणजेच दरवर्षी 18,000 ते 20,000 लोक रेबीजमुळे मरतात.
भारतात रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी 30 ते 60 टक्के मृत्यू हे 15 वर्षांखालील मुलांचे असतात.
लसीच्या मदतीने रेबीजपासून होणारा मृत्यू टाळता येऊ शकतो. ही लस सर्वत्र उपलब्ध आहे.

फोटो स्रोत, YAWAR NAZIR
2030 पर्यंत रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी राष्ट्रीय कृती योजना आखण्यात आली आहे.
दिल्ली, बंगळुरू, मेरठ, गुरुग्राम, पंजाब, नोएडा, मुंबई, पुणे, बिजनौर अशा अनेक शहरांमधून भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या बातम्या येत अहेत.
मागच्या वर्षी बिहारमधील बेगुसरायमध्ये भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केला होता. यात या महिलेचा मृत्यू झाला.
वृत्तानुसार, मीरा देवी शेतातून घराकडे परतत असताना कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती त्यांच्या पतीने दिली होती.
स्थानिक पत्रकार मारुती नंदन सांगतात की, या भागात कुत्र्यांचा एक झुंड तयार झाला होता. कुत्र्यांनी चढवलेल्या हल्ल्यात सुमारे नऊ जणांचा मृत्यू झाला.
नंतर कुत्र्यांच्या या टोळक्यावर वनविभागाने कारवाई केली.
2001 मधील एका कायद्यानुसार भारतात कुत्र्यांना ठार मारण्यास बंदी घालण्यात आली. आणि यामुळे देशात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली.
भटके कुत्रे हल्ला चढवतात कारण..
तसं बघायला गेलं तर माणूस आणि कुत्रा हे हजारो वर्षांपासून एकत्र राहत आलेत.
बऱ्याचदा कुत्रा आणि माणसाचं नातं हे मैत्रीपूर्ण असल्याचं दिसतं. पण भटक्या कुत्र्यांचा विषय थोडा वेगळा आहे.
त्यांना अन्नाच्या शोधात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. या खाण्याच्या स्पर्धेत त्यांचा स्वभाव बदलत राहतो.
ट्रॅफिकचा कर्णकर्कश आवाज, रस्त्यावर कचरा फेकण्याची सर्वसामान्यांची सवय रस्त्यावर चमकणारे दिवे याचा कुत्र्यांवर परिणाम होतो आणि ते आक्रमक होतात.
बऱ्याचदा हे भटके कुत्रे गटागटाने फिरत असतात आणि ते धोकादायक असू शकतात.
केरळ वेटनरी अँड अँनिमल सायंस युनिव्हर्सिटीचे डॉ. शिबू सायमन सांगतात की, कुत्र्याने हल्ला केलेल्या प्रत्येक घटनेमागे वेगवेगळी कारणं असू शकतात. पण जेव्हा हे कुत्रे कच्चं मांस खातात तेव्हा त्यांच्या जिभेवर याची चव रेंगाळत राहते आणि ते अनियंत्रित होतात.
ते सांगतात, "कधीकधी तर एखाद्याला घाबरवायचं म्हणून देखील कुत्रे आक्रमक होतात. त्यांच्यासाठी हा खेळ असतो. म्हणजे समजा एखादा व्यक्ती कुत्र्यांना बघून पळायला लागला तर कुत्र्यांना वाटतं की माणूस आपल्याला घाबरतोय. मग ते त्यांच्या मागे मागे पळतात, तरी कधी चावतात."
प्रसिद्ध वेटनरी डॉक्टर अजय सूद यांच्या मते, "बऱ्याचदा एखाद्या भागावर वर्चस्व मिळवणं आणि सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांमुळे कुत्रे माणसांवर हल्ला करतात."
ते सांगतात, "प्रत्येक कुत्रा आपली टेरीटरी (विभाग) ठरवून घेतो. एकीकडे माणसांची लोकसंख्या वाढते आहे तर दुसरीकडे कुत्र्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे त्यांची टेरीटरी लहान होत चालली आहे. आपल्या टेरीटरीचं संरक्षण करण्याच्या नादात कुत्र्यांना असुरक्षित वाटू लागतं. जेव्हा एखादा माणूस त्यांच्या टेरीटरीमध्ये येतो तेव्हा ते आक्रमक होतात आणि हल्ला चढवतात."
कोणती खबरदारी घ्याल?
डॉक्टर सायमन सांगतात की, लोकांनी सकाळी चालायला जाताना सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण एखाद्या भटक्या कुत्र्याने हल्ला केला तर इतरही त्यात सामील होऊ शकतात.
ते सांगतात की, भटक्या कुत्र्याची शक्यतो छेड काढू नका, किंवा तुम्ही त्याला बघून घाबरलाय असंही दाखवू नका.
डॉ. सायमन पुढे सांगतात की, "कुत्रा हा मनुष्यावर अवलंबून असलेला प्राणी आहे. त्यांना माणसांसोबत राहायचं आहे. आणि जर माणूस त्यांच्यासोबत राहिला तर ते चांगले वागतात. म्हणूनच माणूस कुत्र्यांना पाळतो."

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES
भारतात कुत्रे चावण्याच्या सर्वाधिक घटना घडू लागल्या आहेत. आणि यामुळे मृत्यूचं प्रमाण देखील वाढलंय. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करावा?
यावर एका बाजूचे लोक म्हणतात की, या भटक्या कुत्र्यांना रस्त्यावरून हटवलं पाहिजे, त्यांना मारलं पाहिजे. तर दुसऱ्या बाजूचे लोक म्हणतात की, त्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांना मारणं हा काही उपाय नाहीये.
त्यामुळे कित्येकदा हे प्रकरण न्यायालयात पोहोचलंय.
भटके कुत्रे आक्रमक होण्यामागे आणखीन एक कारण म्हणजे त्यांना खाऊपिऊ घालणाऱ्यांची सवय.
पण आपण ते करण्यापासून कोणालाही रोखू शकत नसल्याचं अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाचं म्हणणं आहे.
1960 मध्ये, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएलिटी टू अँनिमल्स (PCA) हा कायदा संमत करण्यात आला. प्राण्यांसोबत होणारी क्रूरता थांबवणे हा या कायद्याचा उद्देश होता.
ह्युमन फाऊंडेशन फॉर पीपल अँड अॅनिमल्सच्या मेघना उनियाल सांगतात, पीसीए आणि राज्य महानगरपालिका कायद्यांतर्गत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणांहून हटवता येतं किंवा त्यांना ठारही मारता येतं.
"स्थानिक अधिकारी अनावश्यक प्राण्यांना नष्ट करतील" ही खात्री करण्यासाठी बोर्डची निर्मिती करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली होती.
पण 2001 मध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारने अँनिमल बर्थ कंट्रोल रूल्स (एबीसी) आणले. यात भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण आदी गोष्टींची चर्चा करण्यात आली.

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES
त्याअंतर्गत या कुत्र्यांची जबाबदारी प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्था आणि स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आली.
पण कुत्र्यांनी चावलेल्या प्रकरणात वाढ होण्यासाठी हा कायदाच जबाबदार असल्याचं काही टीकाकारांना वाटतं.
या नियमांमध्ये असे कुत्रे मारण्याची तरतूद आहे जे कुत्रे आजारी आहेत, त्यांच्यावर उपचार करणं शक्य नाही किंवा ते जखमी आहेत आणि त्यांना बरं करणं शक्य नाही.
पण या कायद्यात कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करून त्यांना परत सोडण्याबद्दलची चर्चाही करण्यात आली होती.
अडचणी काय आहेत?
चित्रपट निर्माते रॉयन लोबो एका लेखात लिहितात की, जर एखादा कुत्रा ज्याला मालक नाहीये, तो जर एखाद्या लहान मुलाला चावला तर त्याला ईथनाइज्ड किंवा मारता येत नाही. त्याऐवजी त्याचं लसीकरण करून त्याला रस्त्यावर सोडून द्यावं लागतं.
जर याच कुत्र्याने एखाद्या जंगली प्राण्याला मारलं तरीही हीच प्रोसेस आहे. पण एखाद्या आदिवासी व्यक्तीने असं केलं तर मात्र त्याला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.
लोबो यांच्या मते, 2001 चे हे नियम मानव आणि प्राण्यांचे हक्क समान पातळीवर ठेवतात, जे अजिबात योग्य नाही.
ते म्हणतात की, "माझ्याकडेही कुत्रे आहेत. ते माझ्या कुटुंबातील सदस्यांसारखे आहेत. पण ते माणूस नाहीत आणि कोणताही देश कुत्र्यांचे हक्क आणि मानवांचे हक्क समान पातळीवर आणून ठेवत नाही. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांच्या उपस्थितीवर नियंत्रण आणण्याची गरज आहे."
रॉयन लोबो सांगतात की, फोटोग्राफर म्हणून काम करत असताना त्यांनी भटक्या कुत्र्यांनी हरण, चितळ यांची शिकार केलेली पाहिली आहे.
डॉ. शिबू सायमन यांनाही वाटतं की, एवढ्या मोठ्या देशासाठी एबीसी कार्यक्रम पुरेसा नाही.

फोटो स्रोत, YAWAR NAZIR
ते सांगतात की, "कुत्रे पकडणारे लोक साधे कुत्रे पकडतात. आणि कधीकधी तर एकाच भागातील सर्व कुत्रे पकडणं शक्य नसतं."
मात्र या कायद्याला समर्थन देणारे लोक भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचं सांगतात.
नेबरहूड वूफ संस्थेच्या आयशा क्रिस्टीना 2001 च्या कायद्याच्या समर्थक आहेत.
त्यांच्या मते, समस्या कायद्यात नसून, अंमलबजावणी आणि संसाधनांची कमतरता ही मुख्य कारणं आहेत.
त्या म्हणतात, "एबीसी केवळ स्थानिक अधिकारी किंवा प्राधिकरणाच्या भरवशावर सोडता येणार नाही. त्यामुळे इतरांनाही यात सहभागी व्हावं लागेल. स्वयंसेवी संस्थांना पुढाकार घ्यावा लागेल. जिल्हा स्तरावर, ब्लॉक स्तरावर नसबंदी केंद्र सुरू करावे लागतील. जुन्या बंद पडलेल्या शाळांचं एबीसी केंद्रांमध्ये रूपांतर करावं लागेल. मोबाईल क्लिनिकची सुरूवात करावी लागेल."
पण दोन्ही बाजूंच्या लोकांमधील दरी इतकी मोठी आहे की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आलंय. मेघना उनियाल यांच्या मते, न्यायालयात एबीसी नियमांच्या वैधतेवर सुनावणी सुरू आहे.
या न्यायालयीन खटल्यात मेघना देखील पक्षकार आहे.
डॉ. शिबू सायमन यांच्या मते, सर्वसामान्यांना आर्थिक प्रोत्साहन देऊन भटक्या कुत्र्यांना पाळण्यासाठी प्रवृत्त करता येऊ शकतं. यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होऊ शकते.
एखादी व्यक्ती कुत्र्याचं पिल्लू दत्तक घेऊ शकते, पण मोठ्या कुत्र्याला दत्तक घेताना आपल्या स्वतःच्या व्यावहारिक अडचणीही आहेत.
म्हातारपणात कुत्र्याला नवीन ठिकाणी स्थायिक होणं अवघड असतं. पण या सगळ्या वादात कुत्र्यांनी हल्ले करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








