पॅरासिटामॉलचा वापर करून साप का मारले जाताहेत?

फोटो स्रोत, Getty Images
ताप किंवा तत्सम आजारांनंतर पॅरासिटामॉलच्या गोळ्या घेतल्या जातात. पण अमेरिकेत साप मारण्यासाठी पॅरासिटमॉलच उपयोग होतो, असं सांगितल्यास तुम्हाला धक्का बसेल. पण हे खरं आहे.
अमेरिकेच्या ग्वॉम बेटावर ‘ब्राऊन ट्री स्नेक’ प्रजातीचे साप आढळतात. या सापांना मारण्यासाठी पॅरासिटामॉल औषधाचा वापर केला जातो.
यासाठी सुद्धा एक विशिष्ट पद्धत वापरली जाते. उंदरांना प्रत्येकी 80 मिलीग्रॅम पॅरासिटामॉलचं इंजेक्शन दिलं जातं.
त्यानंतर या उंदरांना कार्डबोर्डला चिकटवून पॅराशूटच्या सहाय्यानं ब्राऊन ट्री स्नेकचा वावर असलेल्या जंगलात सोडून दिलं जातं.
ब्राऊन ट्री स्नेकचा वावर हा झाडांवर अधिक असतो. त्यामुळे या जंगलात जेव्हा पॅराशूटच्या माध्यमातून उंदिर चिकटवलेले कार्डबोर्ड सोडले जातात, ते नेमके झाडांच्या फांद्यांवर अडकतात.
मग या कार्डबोर्डवरील उंदरांना सापांनी खाल्ल्यावर अवघ्या काही तासांतच हे साप मरून जातात.
पॅरासिटामॉल खाल्ल्यानेच सापांचा मृत्यू झाला आहे की नाही, हे पाहण्यासाठी अमेरिकेच्या कृषी विभागानं काही उंदरांमध्ये रेडिओ ट्रॅकर बसवले आहेत.
सापांविरुद्धचं अमेरिकन युद्ध
ब्राऊन ट्री स्नेक जवळपास तीन मीटर इतक्या लांबीचा असतो. या सापाशी जणू अमेरिकेनं युद्धच पुकारलं आहे. कारण या सापांना मारण्यासाठी दरवर्षी सुमारे 60 कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
जी अमेरिका वन्यजीवांच्या संरक्षणाच्या गोष्टी करते, ते ब्राऊन ट्री सापांना मारण्यासाठीही इतका मोठा खर्च का करतेय, असाही प्रश्न तुम्हाला पडू शकतो.
पण यावर अमेरिकेचं म्हणणं आहे की, या सापांमुळे अमेरिकेला मोठं नुकसान सहन करावं लागतंय.
ग्वॉम बेट नेमकं आहे कुठे?

फोटो स्रोत, Getty Images
प्रशांत महासागरात ग्वॉम नावाचं बेट आहे. हे प्रशांत महासागरात असलं तरी ते अमेरिकन बेट आहे. ‘आशियातील अमेरिका’ असंही संबोधलं जातं.
अमेरिकेच्या मुख्य भूमीपासून सुमारे 11 हजार किलोमीटर अंतरावर ग्वॉम बेट आहे.
ग्वॉम बेट फिलिपाईन्सपासून 2500 किलोमीटरवर, तर ऑस्ट्रेलियापासून 4500 किलोमीटरवर आहे.
ग्वॉम बेटावर ब्राऊन ट्री स्नेक सापांची संख्या झपाट्यानं वाढतेय.
अमेरिकेच्या माहितीनुसार, ग्वॉम बेटावर आजच्या घडीला जवळपास 30 लाखांहून अधिक ब्राऊन ट्री स्नेक आहेत.
अमेरिका या सापांना का मारू पाहतेय?
विशेष म्हणजे, ब्राऊन ट्री स्नेक इतर प्राण्यांच्या प्रजाती नष्ट करत असल्याचाही अमेरिकेचा दावा आहे.
ग्वॉममधील पक्षांच्या 11 प्रजाती नामशेष झाल्या असून, बेडूक आणि वटवाघळांच्या प्रजातीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
विजेचे खांब आणि तारांमध्ये हे साप अडकल्यानं अनेकदा वीज खंडीत होण्याचे प्रकारही इथे घडतात. वीज पुरवठ्याशी संबंधित उपकरणं खराब होतात.
ग्वॉम वीज प्राधिकरणाने वारंवार वीज खंडीत होण्यामुळे वर्षाला लाखोंचा खर्च होत असल्याचं म्हटलंय.
या सर्व कारणांमुळे अमेरिका ब्राऊन ट्री स्नेकची संख्या नियंत्रित करू पाहतेय.
पण प्राणीप्रेमींकडून अमेरिकेच्या या मोहिमेला विरोध केला जातोय. साप मारणं चुकीचं असल्याचं प्राणीप्रेमी म्हणतायेत.
ग्वॉम बेटावर हे साप आले कसे?
70 वर्षांपूर्वी ग्वॉम बेटावर ब्राऊन ट्री स्नेकचं आगमन झालं.
दुसर्या महायुद्धादरम्यान ग्वॉम बेट हे अमेरिकेसाठी लष्करी तळ होतं. हे बेट काही काळ जपानच्या ताब्यात होतं.
मालवाहू जहाजांच्या माध्यमातून ब्राऊन ट्री स्नेक या बेटावर पोहोचल्याचं मानलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि पपुआ न्यू गिनी यांसारख्या देशांमध्ये ब्राऊन ट्री स्नेकचा नैसर्गिक अधिवास आहे. ग्वॉम बेट हे या सापाचं खरंतर नैसर्गिक अधिवास नाहीय.
मोठ्या संख्येत वाढलेल्या ब्राऊन ट्री स्नेकनं इतर प्रजातींच्या सापांना खाऊन टाकण्यास सुरुवात केली आणि तिथल्या जैवविवधतेचं अतोनात नुकसान केलं आणि आजही करतायेत.
साप शोधण्यासाठी स्निफर डॉग तैनात
1950 च्या दशकात पहिल्यांदा ब्राऊन ट्री स्नेक आढळला. पण तेव्हा त्याला तितकसं गांभिर्यानं घेतलं गेलं नाही. मात्र, 1990 नंतर ब्राऊन ट्री स्नेक मोठी समस्या बनू लागली. तेव्हापासून अमेरिकनं या सापांच्या प्रजातीला नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या.
पॅरासिटामॉलचे इंजेक्शन हा या उपाययोजनांचाच भाग आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचं म्हणणं आहे की, या सापांना पूर्णपणे नष्ट करण्याचा आपला हेतू नसून, केवळ या सापांना ग्वॉम बेटापर्यंतच मर्यादित ठेवण्याचं आणि सापांची संख्या नियंत्रित ठेवण्याचं ध्येय आहे.
हे साप ग्वॉम बेटावरून इतरत्र ये-जा करणाऱ्या जहाजांमध्ये शिरू नये, याकडे अमेरिका मोठ्या बारकाईन लक्ष ठेवून आहे. कारण इतरत्र हे साप पोहोचल्यास धोका वाढू शकतो.
त्यामुळेच ग्वॉममधील विमानतळ आणि बंदराच्या आसपास असणारे सर्व ब्राऊन ट्री स्नेक पूर्णपणे केले जातायेत. हे साप शोधण्यासाठी खास प्रशिक्षित स्निफर कुत्रेही तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








