कुत्र्याचे डोळे तुमचं लक्ष का वेधून घेतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सीन काऊलान
- Role, बीबीसी न्यूज
कुत्रा किंवा कुत्र्याचे पिलू पाहिल्यावर त्याचे डोळे आपलं लक्ष का वेधून घेतात याचा विचार तुम्ही केलाय का? किंवा इंटरनेटवर तुम्ही कुत्र्याचे फोटो किंवा व्हीडिओ सर्वात जास्त संख्येने का पाहिले जातात याकडे तुमचे लक्ष गेलंय का? कुत्र्यांच्या डोळ्यांचं हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत.
माणसाचं लक्ष वेधून घेण्यासाठी ठराविक प्रकारचे हावभाव तयार व्हावेत यासाठी कुत्र्याच्या डोळ्यांजवळचे स्नायू विशिष्ट पद्धतीने विकसित झालेले असतात असं संशोधकांच्या लक्षात आलं आहे.
कुत्र्याच्या चेहऱ्यावरचे स्नायू बदलल्यामुळे त्याचा चेहरा एखाद्या लहान मुलासारखा होतो आणि त्यामुळे त्यांचे तात्काळ लाड केले जातात.
एकेकाळी रानटी असणारा कुत्रा पाळीव होण्यामागेही या डोळ्यांचा मोठा वाटा असल्याचं या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
कुत्र्यांचे हावभाव माणसाचं लक्ष वेधून घेऊ शकतात, असं पूर्वी अभ्यासातून लक्षात आलं होतं. परंतु अमेरिका आणि इंग्लंडमध्ये झालेल्या या नव्या अभ्यासात हे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याच्या डोळ्यांमध्ये खास बदल होतात असं लक्षात आलं आहे.
'बोलक्या भूवया'
माणसासारखा संवाद साधण्यासाठी होणाऱ्या या बदलांना संशोधकांनी 'बोलक्या भुवया' असं म्हणायला सुरुवात केली आहे. जेव्हा कुत्रा हालचाल करतो तेव्हा माणसानं आपल्याकडं पाहावं अशी त्याची धडपड असल्यासारखं वाटतं, असं पोर्ट्समाऊथ विद्यापीठातील संशोधक आणि या संशोधनाच्या सहलेखिका डॉ. ज्युलियन कामिन्स्की यांनी सांगितलं.
स्नायूंच्या हालचालींमुळे कुत्रा एखाद्या लहान मुलासारखा दिसू लागतो किंवा दुःख झाल्यावर माणसं जशी दिसतात तशी ती दिसू लागतात. यामुळेच मग त्यांना माणसांचे प्रेम मिळायला लागतं.

त्या म्हणतात की कुत्र्याच्या संरक्षणाला माणसाकडून नकळत जरा जास्तच प्राधान्य मिळालेले आहे. त्यामुळेच कुत्र्याच्या पुढच्या पिढ्या ते लक्ष मिळत राहाण्यासाठी उत्क्रांत होत गेल्या असं कामिन्स्की सांगतात.
"माणसाळल्यानंतर पाळीव झालेल्या कुत्र्यांच्या भुवया उंचावण्यासाठी स्नायू विकसित झाल्याचे पुरावे दिसून येतात," असं डॉ. कामिन्स्की सांगतात. त्यांचे संशोधन नॅशनल अकेडमी ऑफ सायन्सेस, अमेरिकेच्या कामकाजाच नोंदवले गेले आहे.
माणसाबरोबर हजारो वर्षे राहिलेल्या कुत्र्यांच्या चेहऱ्यात बदल झाल्याचे अमेरिका आणि इंग्लंडमधील शरीरचना आणि तुलनात्मक मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना दिसून आले आहे.
माणसं जेव्हा कुत्र्याकडे पाहतात तेव्हा कुत्रे आपला खास निरागस भाव चेहऱ्यावर आणतात हे आधीच्या अभ्यासांमध्येही दिसून आले आहे.
"उत्क्रांतीचा विचार केल्यास कुत्र्यांच्या डोळ्यांमध्ये झालेला बदल हा वेगानं झाला आहे आणि माणसाचा त्याच्याशी तात्काळ संवाद होऊ शकतो", असं प्राध्यापक अन बरोज यांनी सांगितले. बरोज या डाक्सीन विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्या शरीरचनाशास्त्राच्या अभ्यासक आणि या संशोधनात सहलेखिका म्हणून त्यांनी काम केले आहे.
"एखाद्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी चेहऱ्यावरील हावभाव किती महत्त्वाचे आहेत आणि सामाजिक संवादासाठी चेहऱ्यावरचे हावभाव किती उपयोगी पडतात," हे या अभ्यासातून स्पष्ट होतं असं पोर्ट्समाऊथ विद्यापीठातील प्राध्यापक ब्रिजेट वॉलर यांना सांगितले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








