खवल्या मांजर : चीनमध्ये तस्करी होणाऱ्या या प्राण्याला वाचवणाऱ्या कोकणातल्या गावाबद्दल माहितीये?

पैंगोलिन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्राजक्ता धुळप
    • Role, बीबीसी मराठी

चीन आणि व्हिएतनाममध्ये पँगोलिन किंवा खवले मांजराला मोठी मागणी आहे. आणि त्या मागणीला पुरवठा करण्यासाठी अगदी भारतातूनही या मांजराच्या तस्करीची प्रकरणं पुढे आली आहेत.

पण खवले मांजर, म्हणजेच खवल्या किंवा पँगोलिन हा दुर्मिळ प्राणी नामशेष होण्याच्या वाटेवर असताना त्याची इतकी तस्करी का होते? काय आहे खवले मांजर आणि चीनचा संबंध? आणि चीनमध्ये तस्करी होणाऱ्या भारतात खवले मांजराची आज काय परिस्थिती आहे?

या प्रश्नांची उत्तरं मिळववायला आपल्याला कोकणात जावं लागेल.

लाईन

कोकणात मे महिन्यात यंदाही चांगलाच उकाडा वाढलाय. आंबा, काजूच्या बागा बहरल्यात. पण कोकणात एरव्ही जशी उन्हाळ्यात कामांची लगबग असते ती कोरोनाच्या संकटामुळे काहीशी संथ झालीये. पण लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवांच्या बहाण्याने घडलेल्या मे महिन्यातल्या एका घटनेने पुन्हा एकदा वन्यजीव कार्यकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील ही घटना. दापोलीत करंजाणी गावात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका घरावर धाड टाकून खवले मांजरांची तस्करी करणाऱ्यांकडून 2 किलो 200 ग्रॅम खवलं आणि सहा नखं ताब्यात घेतली. कांदे-बटाटे विकण्याच्या बहाण्याने फेरीवाल्यांनी गावाजवळच्या जंगलातील प्राण्यांविषयी चौकशी करून खवले मांजराची शिकार केली होती.

कोकणात आणि राज्यात इतरत्र जंगल असणाऱ्या भागात या अशा घटना नवीन नाहीत. काही अलीकडची उदाहरणं पाहिली की शिकारीच्या प्रमाणाचा अंदाज बांधता येईल.

याच वर्षी जानेवारी महिन्यात कळंबोली पोलिसांनी खवले मांजराची तस्करी करताना सात जणांना अटक केली. अँब्युलन्समधून गुप्तपणे नेत असताना खवले मांजर बेशुद्ध पडलं होतं.

तर जानेवारीत पनवेल पोलिसांनी सात किलो 360 ग्राम वजनाच्या खवले मांजराची विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली. कणकवलीच्या कासार्डेमध्ये तस्करी करणाऱ्या टोळीकडून पाच किलो वजनाचं खवले मांजर अशाच पद्धतीने जप्त केलं गेलं.

तर अगदी ताजं उदाहरण, नागपूरमध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पात 18 मेला काही जणांनी खवले मांजराची शिकार केली, आणि त्याला उकळत्या पाण्यात घालून त्याचं मांस खाण्याची तयारी केली. पण हे काम फत्ते होण्याआधीच वन अधिकाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतलं.

या गावावर 'खवलूची माया'

खवले मांजराच्या अशा वाढत्या शिकारीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातल्या डुगवे गावाने खवले मांजराला वाचवण्यासाठी कंबर कसलीये. डुगवेचे गावकरी बाहेरून येणाऱ्या प्रत्येकावर कडी नजर ठेवून आहेत. गावाजवळच्या जंगलात जिथे खवले मांजराचा अधिवास आहे तिथे कोणाला फिरकू दिलं जात नाही.

गेली चार वर्षं सह्याद्री 'निसर्ग मित्र' या संस्थेच्या मदतीने डुगवे गावातल्या गावकऱ्यांनी खवले मांजराला अभय दिलंय. आणि म्हणूनच 15 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय पँगोलिन दिनाच्या निमित्ताने डुगवे गावाने खवलोत्सव भरवून खवले मांजराच्या नावाने उदो उदो केला.

'झोत रे झोत पाण्याचा झोत... खवल्या आमच्या गावाचा खोत!' ही घोषणा डुगवे गावात आणि जवळपासच्या जंगलात घुमली.

एवढंच नव्हे तर, खवल्याचे आपल्यावर मोठे ऋण आहे, हे सांगण्यासाठी या प्राण्याला खोताची (पूर्वीचे कोकणातील जमीनदार) उपमा दिलीये.

dugve village

फोटो स्रोत, Sahyadri Nisarga Mitra

फोटो कॅप्शन, डुगवे गावात खवलोत्सवासाठी खवल्या मांजराच्या प्रतिकृतीची पालखी काढण्यात आली

डुगवे गावातल्या गावकऱ्यांनी खवले मांजराची प्रतिकृती करून पारंपरिक पद्धतीने पालखी काढली. ही पालखी गावकरी जंगलातून वाजत-गाजत आणि नाचवत गावात घेऊन गेले. मग घराघरात औक्षण करून मग ती मंदिरात नेण्यात आली आणि तिथे पूजा केली गेली.

आपल्या साळूबाई, वाघजाई, मानाई आणि महालक्ष्मी या ग्रामदेवतांना लोकांनी एक गाऱ्हाणंही घातलं - 'गावदेवी आमच्या गावात खवले मांजर आहे. त्याचं रक्षण कर, त्यांची भरभराट होऊ दे. आमचा जसा सांभाळ करतेस तसा खवल्याचाही सांभाळ कर. तसंच तस्करी, चोरटा व्यापार यात अडकलेल्या लोकांना चांगली बुद्धी दे. जगातील खवले मांजर प्रजातीचं संरक्षण कर.' गावकऱ्यांनी खवले मांजराला वाचवण्याची शपथही घेतली.

डुगवे गावचे माजी सरपंच महेंद्र डुगवे आता खवलू ही गावकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं सांगतात. गावासाठी खवलू हे आता प्रेमाने ठेवलेलं नाव झालंय. गावातले तरुण, लहान मुलं, महिला आणि वृद्ध सारेजण या मोहिमेत सहभागी झालेत. म्हणूनच आपल्या खवलूसाठी त्यांनी कविता, गाणीही केलीयेत. 'साया रे साया डोंगरी साया, आमच्या गावावर खवलूची माया'. साया म्हणजे स्थानिक भाषेत सागाचं झाड.

"पूर्वी आमच्या गावातच नाही तर आजूबाजूला खवल्याच्या शिकारीविषयी ऐकायचो. तेव्हा लोक मांस खाण्यासाठी बंदुकीने शिकार करायचे. इथे रानात अनेक प्राण्यांचा अधिवास आहे. पट्टेरी वाघाबद्दल ऐकलंय, पण पाहिला नाही. पण बिबटे, साळींदर, रानडुक्कर आणि खवले मांजर यांचा वावर सतत असतो. पण आम्हाला जसजसं कळत गेलं तसं आम्ही गावकऱ्यांनी खवल्याच्या शिकारीवर बंदी आणली," ते सांगतात.

स्थानिक लोकांच्या सहभागाशिवाय खवले मांजराच्या संवर्धनाचं काम शक्य नाही, हा अनुभव सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संस्थापक भाऊ काटदरे यांच्या गाठीशी होता.

तस्करी करणारे लोक कोण?

खूप पूर्वी स्थानिक लोक आणि आदिवासी जंगली प्राण्यांची शिकार करून खायचे. पण पुढे त्यांना इतर पर्याय उपलब्ध झाल्याने आणि वन्यजीव संरक्षणाचा कायदा आल्याने यावर निर्बंध आले. खवल्या मांजराच्या बाबतीत साधारण वीस वर्षांपूर्वीपर्यंत कोकणात क्वचितच खाण्यासाठी खवले मांजराची शिकार व्हायची. पण गेल्या काही वर्षांमध्ये तस्करीच्या उद्देशाने भारतात खवल्या मांजराची शिकार वाढल्याचं दिसतं. ओडिशामध्येही या तस्करीत वाढ झाल्याची प्रकरणं समोर आलीयेत.

आंतरराष्ट्रीय तस्करीच्या बाजारात चिनी पँगोलिनची संख्या घटल्याने तस्करीचा मोर्चा भारतीय पँगोलिनकडे वळल्याचं काटदरे सांगतात. खवले मांजरांची बिळं शोधून त्यांना बाहेर काढलं जातं आणि त्याची खवलं काढण्यासाठी उकळत्या पाण्यात टाकलं जातं. हे काम करणारं रीतसर एक रॅकेट असल्याचं ते सांगतात.

save pangolin

फोटो स्रोत, Sahyadri Nisarg Mitra

फोटो कॅप्शन, रत्नागिरीच्या गावांमध्ये खवले मांजराच्या संरक्षणासाठी असे बोर्ड लावलेले दिसतात

गावात व्यापार करण्याच्या उद्देशाने फेरीवाले रानातल्या प्राण्यांची माहिती घेतात. काही हजार रुपयांच्या मोबदल्यात खवले मांजर पकडून दिले जातात. त्यांच्या खवल्यांची किंमत मात्री आंतरराष्ट्रीय तस्करीत लाखोंमध्ये असते. तस्करीत सहभागी होऊ नये म्हणून सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने गावकऱ्यांना उपजिविकेचा मार्ग म्हणून फायदेशीर शेती करायला मदत केली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये या तस्करीत वाढ झाल्याचं समोर येतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्करी होण्याऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये खवले मांजराचं प्रमाण अधिक असल्याचं WWF या संस्थेनेही म्हटलंय. चीन आणि व्हिएतनाममध्ये याला खूप मागणी आहे. मांस खाण्यासाठी तर खवलं पारंपरिक चीनी औषध आणि जडीबुटीमध्ये वापरली जातात. त्यात दमा आणि संधीवातावर उपचार करण्याचे गुणधर्म असल्याचा दावा केला जातो. WWFने वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या माहितीनुसार 2011 ते 2013 या तीन वर्षांमध्ये जगभरात 2 लाख 33 हजार 980 खवले मांजर मारले गेले.

खवले मांजर नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी या प्राण्याच्या व्यापाराचे मार्ग बंद करणं तसंच अवैध मार्गाने होणारी तस्करी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय कराराची घोषणा WWF आणि TRAFFIC या संस्थांनी 2016 साली केली. पुढे 2019 साली कडक निर्बंध असतानाही खवले मांजराची मोठ्या प्रमाणात तस्करी झाल्यावर चिंताही व्यक्त केली.

रत्नागिरी जिल्ह्यात खवले मांजराला संरक्षण

खवले मांजराचं संरक्षण करण्यासाठी सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने वनविभाग आणि पोलीस यांच्या मदतीने गेल्या चार वर्षांमध्ये रत्नागिरी जिल्हयाच्या प्रत्येक तालुक्यात मीटिंग घेतली. गावचे सरपंच, तंटामुक्त समिती, पोलीस पाटलांसह लोकांनाही सहभागी करून घेतलं गेलं. खवले मांजराविषयी लोकांनी पुढे येऊन माहिती द्यावी यासाठी सभा, सार्वजनिक कार्यक्रम करण्यासोबतच जागोजागी फलकही लावले गेले.

रात्रीच्या वेळी खवले मांजराची ट्रॅप कॅमेऱ्यात टिपलेली हालचाल

फोटो स्रोत, Sahyadri Nisarga Mitra

फोटो कॅप्शन, रात्रीच्या वेळी खवले मांजराची ट्रॅप कॅमेऱ्यात टिपलेली हालचाल

या जनजागृतीचा परिणाम असा झाला की लोकांनी खवले मांजराच्या अधिवासाविषयी माहिती द्यायला सुरुवात केली. "त्या माहितीच्या आधारे रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. त्यानुसार 50 ते 60 पँगोलिन्सच्या अॅक्टिव्हिटी आणि त्यांची बिळं यांचा डेटा गोळा करण्यात आला. संवर्धनाच्या दृष्टीने ही माहिती खूप महत्त्वाची ठरतेय."

या गावांमध्ये व्यवसाय किंवा व्यापाराच्या उद्देशाने बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती ग्रामपंचायतीत देणं बंधनकारक करण्यात आलंय. इतकंच नाही तर तसे फलकही लावण्यात आलेयत.

रत्नागिरीसोबतच आता सिंधुदुर्गमध्ये पुढल्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये काम सुरू करण्यात येणार असल्याचं काटदरे यांनी सांगतात.

खवले मांजर वाचवण्याची मोहीम

चिपळूणची 'सह्याद्री निसर्ग मित्र' ही संस्था 1992 सालापासून वन विभागाच्या मदतीने निसर्ग संवर्धनाचं काम करतेय. कासवं, गिधाडं, पांढऱ्या पोटाचं सागरी गरूड, भारतीय पाकोळ्या आणि खवले मांजर, या प्रजातीचं संरक्षण आणि संवर्धन करणारे प्रकल्प भाऊ काटदरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत. या सगळ्या कामांमध्ये गावकऱ्यांनी जबाबदारीची भूमिका बजावली. "संपूर्ण महाराष्ट्रात चौदा वर्षं कासव संरक्षणाचं काम यशस्वीरीत्या केल्यावर वनविभाग आणि स्थानिक लोकांना ती मोहीम सोपवली गेली. संस्था सागरी कासव संरक्षण मोहिमेतून बाहेर पडली, पण मदत लागेल तसा आता आधार देण्याचं काम करते," काटदरे यांनी बीबीसीला सांगितलं.

Bhau Katdare

फोटो स्रोत, Sahyadri Nisarg Mitra

फोटो कॅप्शन, गावकऱ्यांशी चर्चा करताना डावीकडे भाऊ काटदरे

कासव संवर्धनाच्या कामानंतर 2016 साली एकाच वर्षांत कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी खवले मांजराच्या तस्करी मोठ्या प्रमाणात झाल्याचं आढळलं, तिथूनच या प्रजातीसाठी काम करण्याचा निर्णय घेतल्याचं ते सांगतात.

आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने International Union for Conservation of Nature (IUCN) जाहीर केलेल्या रेड डेटा लिस्ट म्हणजेच धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या यादीत खवले मांजराचा समावेश करण्यात आलाय. IUCN स्पेसीज सर्व्हायव्हल कमिशनच्या खवले मांजर कमिटीचे भाऊ काटदरे सदस्य आहेत.

जगभरात पँगोलिन या सस्तन प्राण्याच्या आठ दुर्मिळ प्रजाती आढळतात. चार प्रजाती आफ्रिका खंडात तर इतर चार आशिया खंडात आढळतात. भारतीय खवले मांजर, फिलिपन खवले मांजर, सुंदा खवले मांजर आणि चीनी खवले मांजर या चार प्रजातींचा आशिया खंडात अधिवास आहे. खवले मांजराच्या या आठही प्रजातींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचं संरक्षण देण्यात आलंय. त्यातील दोन प्रजाती IUCNच्या अति धोक्याच्या यादीत आहेत.

भारतात भारतीय खवले मांजर आणि चिनी खवले मांजर या दोन प्रजाती आढळतात. खवले मांजर भारतात हिमालय आणि ईशान्येकडील भाग वगळता सगळीकडे आढळतं. साधारण पाच फूट लांब आणि मोठी शेपटी असलेल्या या प्राण्याला दात नसतात. खवले मांजर आपल्या एक फूट लांबीच्या चिकट जीभेने मुंग्या, वाळवी आणि डोंगळे खातं.

पेस्ट कंट्रोलचं नैसर्गिकपणे काम

निरुपद्रवी अशा या प्राण्याचं निसर्ग साखळीत महत्त्वाचं स्थान असल्याचं भाऊ काटदरे अधोरेखित करतात. "शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना खवले मांजर मदतच करत असतं. आपण घराला पेस्टिसाईड करण्यासाठी हजारो-लाखो रुपये खर्च करतो. गावात तेच नैसर्गिकरीत्या पेस्ट कंट्रोल करायचं काम हा प्राणी करतो. एका दिवसात वीसेक हजार वाळवीसारखे किटक खाऊन त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम केलं जातं."

डुगवे गावातल्या गावकऱ्यांनाही पेस्ट कंट्रोलचा हा नैसर्गिक उपाय कळल्यावर खवले मांजराचं महत्त्व पटू लागलं. कोकणातल्या लाल मातीत वाळवीचं प्रमाण खूप असल्याचं महेंद्र कदम सांगतात. "अशा परिस्थितीत कितीही किटकनाशकं वापरा त्याला मर्यादा येतात. पण खवले मांजरामुळे किटकनाशकाशिवाय काम साध्य होतं."

खवले मांजर

फोटो स्रोत, Sahyadri Nisarga Mitra

काटदरे सांगतात - "भारतीय खवले मांजर खारफुटी, डोंगर, कडे, पठार यासारख्या सगळ्या अधिवासात आढळतं. पण विकासाच्या नावाखाली जंगलांची वारेमाप तोड झाल्याने या अधिवासावर अतिक्रमण झाल्याचं दिसतं."

संपूर्ण शरीरावर खवले असतात त्यामुळे धोक्याची सूचना मिळाली की ते आपल्या शरिराचे वेटोळे करून घेते. हल्ला न करता स्वतःचं संरक्षण करण्याची वृत्ती निसर्गाने त्याला बहाल केलीये. पण हा प्राणी माणसापासून स्वतःचं संरक्षण करू शकला नाही. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत या खवले मांजराचा पहिल्या श्रेणीत समावेश करण्यात आलाय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)