कोरोना व्हायरसच्या संसर्गाबद्दल वटवाघळांना दोष देणं योग्य?

वटवाघूळ

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जाह्नवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

एखाद्या प्राण्याविषयी तुम्हाला भीती वाटते. पण तुमचं आयुष्य त्याच्यावरच अवलंबून असतं. त्या प्राण्यापासून तुम्हाला धोकाही असतो आणि खूप सारा फायदाही. माणूस आणि वटवाघळांचं नातं काहीसं असंच आहे.

हा आगळावेगळा प्राणी कोरोना विषाणूच्या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आला आहे. जगभरातील लोकांना घरात कोंडून ठेवणाऱ्या या विषाणूच्या साथीसाठी आता वटवाघळांना दोष देण्याची घाई काहीजण करत आहेत.

पण खरंच वटवाघळांना विषाणूच्या प्रसारासाठी जबाबदार ठरवणं योग्य आहे का? विषाणूविरुद्धच्या लढाईत वटवाघुळं निर्णायक भूमिका बजावू शकतात? असे प्रश्न पडतात.

उंच झाडांवर तर कडेकपारींमध्ये उलटं लटकणाऱ्या, सस्तन प्राणी असूनही उडू शकणाऱ्या आणि दिवसाऐवजी रात्री बाहेर पडणाऱ्या या जीवविषयी माणसाला कायमच कुतूहल आणि भीतीही वाटत आली आहे.

कोरोना
लाईन

म्हणूनच तर भूताखेतांच्या गोष्टींपासून ते बॅटमॅनसारख्या सुपर हीरोपर्यंत वटवाघळांविषयी दंतकथा जन्माला आल्या असाव्यात. त्या बॅटमॅनसारखेच वटवाघळांच्या कहाणीलाही दोन पैलू आहेत.

भारतीय वटवाघुळांमध्ये आढळलेले विषाणू

वटवाघळं आणि त्यांच्यात आढळून येणारे विषाणू पुन्हा नव्यानं चर्चेत आहेत कारण इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (IJMR) या नियतकालिकानं वचटवाघळांवरील संशोधनाचा नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

या संशोधनात इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तसंच पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (NIV) या संस्थांमधील तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या अहवालात भारतातील वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये ‘बॅट कोरोना व्हायरस’ आढळून आल्याचं म्हटलं आहे. भारतात हे विषाणू आढळून आल्याची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगितलं जातंय.

वटवाघूळ

फोटो स्रोत, Getty Images

पण या संशोधनातून समोर आलेले बॅट कोरोना व्हायरस आणि सध्या जगात थैमान घालणारा SARS COV-2 हे वेगवेगळे विषाणू आहेत, हे आधी लक्षात घ्यायला हवं.

बारामतीला राहणारे आणि गेली एकोणीस वर्ष वटवाघळांवर संशोधन करणारे डॉ. महेश गायकवाड हा फरक समजावून सांगतात.

“भारतात 123 जातींची वटवाघळं आढळून आली आहेत. त्यातल्या दोनच प्रजातींवर हे संशोधन झालं आहे. या बॅट कोरोना विषाणूमुळे माणसाला कुठलाही धोका नाही किंवा याविषयी अजून संशोधन झालेले नाही हे अतिशय महत्त्वाचे आहे.”

IJMR च्या या अहवालाचाच निष्कर्ष सांगतो, की “अशा नवीन विषाणूंचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचा माणसावर काय परिणाम होऊ शकतो, हे समजण्यासाठी अधिक संशोधन गरजेचं आहे.”

वटवाघळांचं विषाणूंशी नातं

तसं वटवाघुळांमध्ये विषाणू सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. सार्स, निपाह, मारबर्ग, इबोला असे अनेक विषाणू वटवाघळांमध्ये आढळून आले होते.

वटवाघळं ज्या अधिवासांमध्ये आणि ज्या परिस्थितीत राहतात, ते पाहता त्यांच्या शरीरात मोठ्या संख्येनं आणि वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू असणं स्वाभाविक आहे, असं इंग्लंडच्या नॉटिंगहॅम विद्यापीठाचे प्राध्यापक जोनाथन बॉल सांगतात.

त्यांच्या मते, “माणसाप्रमाणेच वटवाघूळ हा सस्तन प्राणी आहे. त्यामुळंच वटवाघळांमध्ये आढळून येणाऱ्या विषाणूंचा थेट किंवा इतर प्राण्यांमार्फत माणसाला संसर्ग होऊ शकतो. म्हणजे ते विषाणू माणसाच्या शरीरातही वाढू लागण्याची आणि शरीरावर हल्ला करण्याची शक्यता असते.”

वटवाघूळ

फोटो स्रोत, Getty Images

खरं तर वटवाघळंच नाही, तर अगदी पाळीव प्राण्यांच्या शरिरातही अनेक रोगजंतू असतात. पण हजारो वर्ष पाळीव प्राणी माणसांच्या सान्निध्यात असल्यानं त्यांच्यामधून आलेल्या रोगजंतूंचा सामना करण्यासाठी मानवी शरीरातली रोगप्रतिकार शक्तीही सज्ज असते.

तुलनेनं वन्य प्राणी किंवा उंदीर आणि वटवाघळं माणसाच्या थेट संपर्कात नसल्यानं त्यांच्यातून आलेल्या विषाणूंविरोधातले अँटीबॉडी म्हणजे प्रतिपिंडं मानवी शरीरात नसतात. त्यामुळे या विषाणूंपासून माणसाला आजाराचा धोका वाढतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

वटवाघळांचं मांस खाल्ल्यानं, त्यांनी अर्धवट खाऊन टाकलेली फळं खाल्ल्यानं काही विषाणूंचा प्रसार होतो. तर काही वेळा वटवाघळं दुसऱ्या प्राण्यांच्या संपर्कात येतात, आणि मग ते प्राणी माणसांच्या संपर्कात आल्यानं आजाराचा प्रसार होतो.

वटवाघळं मानवी वस्तीच्या जवळ राहतात, ती मोठ्या संख्येनं एकत्र असतात, लांबवर उडू शकतात. अंटार्क्टिकाचा अपवाद वगळला, तर जगातल्या प्रत्येक खंडामध्ये त्यांचं अस्तित्व आहे. हे वाचून एखाद्याला वटवाघळांची भीती वाटू लागेल. पण इथेच खरी मेख आहे.

वटवाघुळांकडे विषाणूंविरोधात ‘सुपर पॉवर’?

अनेक विषाणू शरीरात असतानाही वटवाघळांवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. ही गोष्ट लक्षणीय आहे आणि शास्त्रज्ञांचं लक्ष वेधून घेते आहे. वटवाघळांचा, विशेषतः त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकार क्षमतेचा अधिक अभ्यास होणं गरजेचं आहे, असं महेश गायकवाड यांना वाटतं.

याच संदर्भात चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये काही वर्षांपूर्वी संशोधन झालं होतं. त्यात वटवाघळांच्या शरीरातील जनुकीय यंत्रणेतच अशा विषाणूंचा सामना करण्यासाठीची क्षमता असल्याचं समोर आल होतं.

या विशिष्ट जनुकांमुळे शरिरात अनेक व्हायरस, अगदी इबोलासारखा विषाणू असतानाही वटवाघळं आजारी पडत नाहीत आणि ती जीवंत राहू शकतात.

वटवाघळांविषयी गैरसमज

खरं तर वटवाघुळांकडून माणसाला बरंच काही शिकायला मिळालं आहे. त्यांची उडण्याची क्षमता, त्यासाठी विकसित झालेले पंख आणि शरीररचना किंवा रात्रीच्या अंधारात आवाजाचा वेध घेत प्रवास करण्याची क्षमता अशा गोष्टी वटवाघळांना इतर प्राण्यांपेक्षा वेगळं बनवतात.

वटवाघूळ

फोटो स्रोत, Getty Images

पण वटवाघळं जितकी कौतुकाचा आणि कुतुहलाचा विषय आहेत, तसंच त्यांच्याविषयी अनेक गैरसमजही आहेत. जगभरातल्या बहुतेक सर्वच देशांत वटवाघुळांविषयी मिथकं लोककथांचा भाग बनली आहेत. त्यातल्या अनेक कथांमध्ये वटवाघळांचा मृत्यू, रोग आणि संकटाशी संबंध जोडला जातो.

महेश गायकवाड सांगतात, की पाणथळ जागी, जिथे झाडं आहेत अशा ठिकाणी अनेकदा वटवाघुळांची वस्ती असते. अशा ठिकाणीच अनेकदा स्मशानही असतं. वटवाघूळ हा अनेकांना किळसवाणा प्राणी वाटतो. तो शरीराला चिकटला की भूत लागतं, जी माणसं पाप करतात ती मेल्यावर उलटी टांगून राहतात, अशा अनेक गैरसमजुती आहेत. ज्या चुकीच्या आहेत.

अर्थात अशा समजुतींमुळे लोक वटवाघळांना लांब ठेवत आले आहेत आणि एकप्रकारे त्याचा फायदाही झाला आहे. “भारतीय जीवनशैलीत वन्यजीवांपासून लांब राहण्यावर भर असतो. पाळीव प्राणी सोडले, तर कुठल्या प्राण्यांना पकडायला जाऊ नये असं सांगितलं जातं. अशा प्राण्यांपासून रोग पसरू नये म्हणून त्यांना लांब ठेवण्याचा हा एक मार्ग असावा.”

वटवाघळं माणसाचे मित्र

वटवाघळं ही फक्त रोगाचे निमंत्रक नाहीत, तर निसर्गाच्या चक्रात त्यांचं विशेष योगदान आहे. वटवाघळांच्या दोन प्रजाती आहेत - कीटकभक्षी आणि फलाहारी. या दोन्ही प्रजातींचं प्रमाण कमी झालं तर निसर्गाचा समतोल बिघडू शकतो.

कीटकभक्षी वटवाघळं मोठ्या प्रमाणात कीडे आणि डासांचं सेवन करतात. एक वटवाघूळ एका रात्रीत एक ते दोन हजार डास खातं. शेतीला नुकसान करणारे अनेक कीटकही वटवाघळं फस्त करतात. फलाहारी वटवाघळी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातात, त्यातून परागीभवन आणि बियांचा प्रसार होतो. नवी झाडं रोप धरतात, जंगलाच्या वाढीला मदत होते. या कारणांमुळे वटवाघळं नष्ट होणं माणसाला परवडणारं नाही.

वटवाघूळ

फोटो स्रोत, Getty Images

पण नेमकं तेच होत असल्याचं महेश गायकवाड नमूद करतात. “शहरीकरणामुळे झाडं तोडली जातायत, वटवाघळांच्या वस्तीच्या जागा कमी होत आहेत. त्यामुळे वटवाघुळांची संख्या कमी होत जाते. जागतिक तापमानवाढीचा फटकाही वटवाघुळांना बसू लागला आहे. झाडावरची वटवाघूळं ४५ डिग्रीवरील तापमानात राहू शकत नाहीत.”

त्यांना आणखी एका गोष्टीची काळजी वाटते. वटवाघळांचा अधिवास असलेल्या ठिकाणी माणसाचा शिरकाव वाढला आहे आणि त्यातूनच रोगांचा प्रसार होण्याची भीतीही वाढते आहे. ते म्हणतात, “दोष वटवाघुळांचा नाही, माणसांचा आहेत. आपण सगळ्या जीवांचे अधिवास जपले पाहिजेत, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या अधिवासात त्रास न देता राहू दिलं पाहिजे. मग भविष्यात अशी साथींची संकटं टाळता येतील.”

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)