कोरोना व्हायरस माणसांच्या शरीरात नेमका कुठून आणि कसा आला?

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना व्हायरसमुळं मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 30 हजारांहून अधिक झालीये. मात्र, हा विषाणू नेमका कुठून आला, हे अद्याप कुठलाच शास्त्रज्ञ सांगू शकला नाही.
विषाणू कुठून आला, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. काहीजणांना वाटतं, की हा विषाणू चीनमधील ‘वेट मार्केट’मधून आला. चीनमध्ये अनेक जंगली प्राण्यांचा वापर खाण्यासाठी किंवा औषधांसाठी केला जातो. कोरोना व्हायरसचा संसर्ग तिथूनच माणसांमध्ये झाल्याचं बोललं जातं.
वटवाघूळ हाच कोरोना व्हायरसचा मूळ स्रोत असल्याचं मानलं जातं होतं. वुहान शहरातल्या प्राण्यांच्या बाजारातून हा विषाणू माणसांमध्ये शिरला आणि नंतर जगभरात पसरला, असा दावा केला गेला होता.
त्यानंतर एका संशोधनातून असाही दावा करण्यात आला, की कोरोना व्हायरस खवल्या मांजरातून माणसात आला.
हे संशोधन सध्या प्राथमिक स्तरावरच आहे. मात्र, संशोधकांनी हेही सांगितलंय, की खवल्या मांजरावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. जेणेकरून कोरोना व्हायरसमधील त्याची भूमिका आणि भविष्यात माणसांमध्ये संक्रमणाचा धोका याबाबत निश्चित निष्कर्षाला पोहोचता येईल.
कोरोना व्हायरस आता जगभरात पसरलाय. त्यामुळं काही लोक या व्हायरसला ‘चीनचं जैविक आक्रमण’ असंही म्हणत आहेत.

- वाचा - कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
- वाचा -आधी कोव्हिड-19ची किट बनवली, मग बाळाला जन्म दिला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तर आपल्या भाषणात अनेकदा कोरोना व्हायरसचा उल्लेख ‘चिनी व्हायरस’ आणि ‘वुहान व्हायरस’ असा केलाय. या कॉन्स्पिरसी थिअरीला सध्या अधिक बळ मिळू लागलंय. कारण जगभरातील बहुतांश देश लॉकडाऊन असताना, जिथून हा विषाणू पसरला त्या वुहान शहरावरील बंधनं हळूहळू हटवली जात आहेत.
सोशल मीडियावर तर चर्चा सुरू आहे की, आजच्या घडीला सर्वाधिक सुरक्षित शहर कोणतं असेल तर ते म्हणजे वुहान. याच वुहान शहरात दोन-अडीच महिन्यांपूर्वी कोरोना व्हायरसनं थैमान घातलं होतं.
मात्र, या 'कॉन्स्पिरसी थिअरी'लाही आव्हान देण्यात आलंय.
कॅलिफोर्नियात जेनेटिक सिक्वेंसेसबाबत एक अभ्यास करण्यात आला. त्यात या कॉन्स्पिरसी थिअरींना नाकारण्यात आलं. हा विषाणू प्रयोगशाळेत तयार केला जाऊ शकतो किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं तयार केला जाऊ शकतो, हे दावे या अभ्यासात फेटाळण्यात आलेत. त्यामुळं चीनबाबत ज्या कॉन्स्पिरसी थिअरी मांडण्यात येत आहेत, त्यांनाही एकप्रकारे या अभ्यासानं आव्हानंच दिलंय.
कोरोना व्हायरसबाबत एक गोष्ट स्पष्ट आहे, की सातत्यानं होणाऱ्या विकासाचा परिपाक म्हणजे हा विषाणू आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस प्राण्यांमधून माणसात आला, हे निश्चितपणे सांगता येत नाही.
शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला प्राणी माणसाच्या संपर्कात आला आणि त्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाली. त्यानंतर वाईल्ड लाईफ मार्केटमधील कामगारांमध्ये हा विषाणू पसरला आणि त्यातूनच पुढे जागतिक संसर्गाला सुरूवात झाली.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना व्हायरस प्राण्यांमधूनच माणसात आला, या दाव्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत. त्यासाठी काही घटना जोडून पाहिल्या जात असल्याचं प्राध्यापक अँड्र्यू कनिंगम सांगतात. प्रा. कनिंगम हे झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनशी संबंधित आहेत.
मात्र, प्रश्न असा आहे की, कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत आपल्याला किती माहिती आहे?
एखाद्या रुग्णाच्या शरीरात असणाऱ्या विषाणूबद्दल ज्यावेळी नेमकी माहिती शास्त्रज्ञांना मिळेल, तेव्हाच चीनमधील वटवाघूळ किंवा खवल्या मांजरांबाबत शंका दूर होईल.
प्राणी माणसाला आजारी पाडू शकतात?
गेल्या 50 वर्षांतील संसर्गजन्य रोगांची आकडेवारी पाहिल्यास लक्षात येईल, की प्राण्यांमधून माणसांमध्ये संक्रमणाची प्रकरणं वाढली आहेत.
1980 च्या दरम्यान आलेला HIV/AIDS, 2004-2007 दरम्यान पक्ष्यांपासून होणारा बर्ड फ्लू, 2009 साली डुकरांपासून आलेला स्वाईन फ्लू हे सर्व आजार प्राण्यांपासून माणसात आले.
गेल्या काही वर्षातील सर्वात भयंकर आजार म्हणजे ‘सार्स’कडे पाहिलं गेलं. सिव्हियर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे सार्स वटवाघूळ आणि उदमांजरातून माणसात आला होता. मात्र, वटवाघुळाबाबत बोलायचं झाल्यास इबोलाचं संकटही आपल्याला विसरता येणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
प्राण्यांमधून माणसात एखादा आजार येणं, यात नवीन काहीच नाही. नीट अभ्यास केल्यास लक्षात येईल की, नवीन संसर्गजन्य आजार किंवा रोग हे वन्यप्राण्यांमधूनच माणसात आले आहेत.
मात्र, पर्यावरणात होणाऱ्या वेगवान बदल या संक्रमाणाचा वेगही वाढवतोय. दिवसगाणिक वाढणारी शहरं आणि आंतरराष्ट्रीय प्रवास हे संक्रमण वाढवण्याचं कारण बनतंय.
एका प्रजातीचा आजार दुसऱ्या प्रजातीला कसा होतो?
अनेक प्राण्यांमध्ये सूक्ष्मजंतूंची एक साखळी असते. त्यांच्या शरीरातील विषाणू आणि जीवाणू आजारांचं कारण ठरतात.
सूक्ष्मजंतूचा सातत्यानं विकास होत राहणं आणि जिवंत राहण्याची क्षमता, हे ते ज्या प्राण्याच्या शरीरात प्रवेश करतात, यावर अवलंबून असतं. हा सर्व त्यांच्या विकासाचाच भाग आहे.
हे सूक्ष्मजंतू ज्यावेळी नव्या प्राण्याच्या शरीरात प्रवेश करतात, त्यावेळी त्या नव्या प्राण्याच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती त्या सूक्ष्मजंतूंना शरीरातून बाहेर घालवण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच, एखादा सूक्ष्मजंतू ज्यावेळी शरीरात जातो, त्यावेळी शरीरात ‘इव्हॉल्युशन गेम’ सुरू होतो. शरीर आणि सूक्ष्मजंतू एकमेकांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात.
उदाहरणादाखल आपण सार्सचं प्रकरण पाहू. 2003 साली ज्यावेळी सार्सची साथ पसरली, त्यावेळी संसर्ग झालेल्यांपैकी जवळपास 10 टक्के लोक मृत्यूमुखी पडले. त्याचवेळी नेहमीच्या साथींनी केवळ 0.1 टक्क्याहून कमी जणांचा बळी गेला होता.

फोटो स्रोत, Getty Images
पर्यावरणातील वेगवान बदलामुळं एकतर प्राण्याचं राहणं मुश्कील केलंय किंवा बदलून टाकलंय. त्यामुळं प्राण्यांची जगण्याची रीत बदललीय. खाण्या-पिण्याच्या पद्धती बदलल्यात. मात्र, हा बदल केवळ प्राण्यापर्यंत मर्यादित नाहीय.
माणसांच्या जगण्यातही खूप बदल होत आहे. जगातील 55 टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते. म्हणजेच गेल्या 50 वर्षात 35 टक्क्यांनी ही आकडेवारी वाढली.
या बदलामुळं वन्य प्राण्यांच्या राहण्यातही बदल होत जातोय. उंदीर, कोल्हे, पक्षी, गिधाड, माकड यांसारखे पशुपक्षी आता शहरांमधील पार्क आणि बागांमध्ये दिसू लागलेत. म्हणजेच, माणसांच्या सोबतच राहू लागलेत. माणसांनी टाकलेले अन्नधान्य हेच या पशुपक्ष्यांचं खाद्य बनतंय.
अशी अनेक उदाहरणं आहेत, जिथं वन्यजीव जंगलाच्या तुलनेत शहरी भागात उत्तमरित्या जगू शकत आहेत. याचं कारण म्हणजे शहरात सहजरित्या खाद्य मिळतंय. मात्र, यामुळेच नवनव्या आजारांचा जन्म होतोय.
सर्वाधिक धोका कुणाला आहे?
जेव्हा कुठलाही सूक्ष्मजंतू नव्या शरीरात प्रवेश करतो, त्यावेळी तो सर्वात जास्त धोकादायक असतो. म्हणूनच कुठलीही साथ, आजार, रोग सुरुवातीच्या टप्प्यात सर्वात धोकादायक असतात.
काही समूह तर या साथी किंवा आजारांच्या विळख्यात लवकर अडकतात. शहरांमध्ये साफसफाईची कामं करणारा वर्गात इतर समूहापेक्षा संक्रमणाची शक्यता अधिक असते.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचसोबत, रोजच्या जेवणात पौष्टिक पदार्थ नसल्यानं त्यांची रोगप्रतिकारशक्तीही कमी असते. शिवाय, अस्वच्छता, प्रदूषण, खराब पाणी या गोष्टींचाही फटका बसतो. गरिबीमुळं उपचाराचा खर्चही या वर्गाला परवडत नाही.
मोठ्या शहरात एखादी साथ पसरण्याच्या शक्यताही अधिक असतात. शहरात लोकसख्या खूप असते. स्वच्छ हवेची कमतरता असते. त्यात संसर्ग झालेल्या व्यक्तीमुळं दूषित झालेल्या जागेवरील हवा पोटात जाते.
जगातल्या अनेक भागात शहरी प्राणी खातात. एकतर हे लोक शहरात वाढणाऱ्या प्राण्यांना मारतात किंवा जवळून कुठून तरी पकडून आणलेले असतात.
आजारांमुळे आपले व्यवहार कसे बदलतात?
कोरोना व्हायरसमुळं अनेक देशांनी आपापल्या सीमा बंद केल्यात. हवाई वाहतुकीवरही निर्बंध लादलेत. लोक एकमेकांशी बोलणं आणि संपर्कात येणं टाळतायत. कारण संसर्ग होण्याची भीती आहे.
हे एकूणच भयंकर आणि भीतीदायक असंच वातावरण आहे.
2003 साली सार्सच्या साथीमुळं जगातिक अर्थव्यवस्थेवर सहा महिन्यांसाठी 40 अब्ज डॉलरचा भार पडला. यातला सर्वाधिक पैसा तर आरोग्य सुविधा पुरवण्यावरच खर्च झाला. लोकांचे कामधंदे बंद होते आणि त्यामुळं आर्थिक स्तरावर मोठा फटका सहन करावा लागला होता.
आपण काय करू शकतो?
कुठलाही देश संसर्गजन्य रोगांकडे एका नव्या संकटासारखा पाहतो आणि त्यावर उपचार करतो. मात्र, जग कसं बदलत चाललंय, याकडे दुर्लक्षच केलं जातं.
पर्यावरणाला आपण जेवढं बदलण्याचा प्रयत्न करू, तेवढं सृष्टीच्या चक्राला बाधा आणू. त्यामुळे आजारांच्या शक्यताही वाढतील.
आतापर्यंत जगभरात केवळ दहा टक्केच सूक्ष्मजंतूंची नोंद झालीये. त्यामुळं इतर सूक्ष्मजंतूंबद्दल माहिती मिळवणं, त्यांचे स्रोत तपासणं इत्यादी गोष्टींसाठी संशोधनाची आवश्यकता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आणखी एक महत्त्वाचं म्हणजे शहरातील अनेकजण वन्यजीवांना महत्त्व देतात. मात्र, काही वन्यजीवांना या शहरांचा त्रासही होतो.
त्याचवेळी, कुठला वन्यजीव नव्यानेच शहरात आलाय का, लोक कुठले नवे प्राणी खात आहेत, बाजारात नवे प्राणी कुठले विकले जात आहे, या सगळ्या गोष्टींवरही नजर ठेवली पाहिजे.
स्वच्छतेतून, कचऱ्याच्या व्यवस्थापनातून किंवा पेस्ट कंट्रोलच्या मदतीनं आजाराच्या साथी नियंत्रित केल्या जाऊ शकतात. मात्र, सर्वात महत्त्वाचं हे आहे की, आपण आपलं पर्यावरण बदलतोय आणि माणूस आपल्या गरजाही वाढवतोय.
भविष्यातही आरोग्य संकटाची शक्यता
ज्याप्रकारे वर्षागणिक नवनवे रोग समोर येत आहेत आणि महामारीचं रूप घेतायत. या सर्वामुळं आपणही अधिक कणखर बनत जात आहोत. पण अशा साथी पुढेही येत राहतील, ही शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही.
जवळपास 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूची लागण जगातील एक तृतीयांश लोकसंख्येला झाली होती आणि सुमारे पाच ते दहा कोटी लोकांचा बळी गेला होता.
मात्र, शास्त्रीय उपायांचा शोध लावून भविष्यात येऊ घातलेल्या साथींना वेळीच रोखता येईल.
आणि हो, एखादा धोका पुन्हा डोकं वर काढतो, तेव्हा तो धोका अधिक विध्वंसक असतो, जगाचा चेहरामोहरा बदलून टाकणारा असतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








