कोरोना: दक्षिण कोरियाचा आदर्श आपण घेणार का?

फोटो स्रोत, AFP
- Author, लौरा बिकर
- Role, बीबीसी न्यूज, सेऊल
दक्षिण कोरियाने कोरोनाचा बीमोड करण्यासाठी काय पावलं उचलली?
दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमधल्या एका हॉस्पिटलच्या मागे असलेल्या कार पार्किंगमधून कार बाहेर काढताना 45 वर्षांच्या रशेल किम गाडीची काच खाली करून जीभ दाखवतात आणि स्वतःची कोरोना चाचणी करून घेतात. त्या गेल्या आठवड्यात डैगूला गेल्या होत्या. डैगू दक्षिण कोरियाचा तो भाग आहे जिथे कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे.
तिथून आल्यापासून रशेल किम यांना खोकला आणि ताप होता. त्यामुळे आपल्यालाही कोरोनाची लागण तर झाली नाही ना, या शंकेचं निरसन करण्यासाठी त्यांनी चाचणी करण्याचा निर्णय घेतला.
दक्षिण कोरियात ज्यांना अशी काही लक्षणं दिसतात आणि ज्यांना आपली शंका दूर करायची आहे, अशा लोकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे तुम्ही आपल्या गाडीत बसल्या बसल्या स्वतःची कोरोना चाचणी करू शकता. अशी शेकडो केंद्रं दक्षिण कोरियात उभारण्यात आली आहेत.
या केंद्रांमध्ये आपादमस्तक पांढऱ्या सुरक्षा कवचात असलेले आरोग्य कर्मचारी उभे असतात. त्यांच्या हातात अत्याधुनिक ग्लोव्ज असतात. डोळ्यांवर चश्मे आणि तोंडावर सर्जिकल मास्क असतो.
अशाच एका सेंटरवर उभ्या असलेल्या दोघांपैकी एक जण रशेलजवळ येतो. तो रशेलला एक स्वॅब स्टिक देतो. स्वॅब स्टिक म्हणजे लाळेचा नमुना घेण्यासाठीची एक चपटी पट्टी. रशेल ती पट्टी तोंडाच्या आतल्या भागात ठेवते आणि लाळेचा तो नमुना एका टेस्ट ट्युबमध्ये व्यवस्थित ठेवत उभ्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला देते.
यानंतर एक अवघड चाचणी पार पडते.
दुसरी स्वॅब पट्टी त्या नाकात टाकतात. यात थोडा त्रास होतो. मात्र, ही सर्व प्रक्रिया एक ते दीड मिनिटात पूर्ण होते.
यानंतर रशेल गाडीची काच वर घेतात आणि गाडी काढत घरची वाट धरतात.
या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्यांना कॉल करून याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल आणि निगेटिव्ह आला तर केवळ मेसेज करून कळवण्यात येईल.
निगेटिव्ह प्रेशर रुम
दक्षिण कोरियात दररोज जवळपास 20 हजार लोकांची चाचणी होतेय. चाचणीची ही आकडेवारी जगातील इतर कुठल्याही राष्ट्रापेक्षा कितीतरी जास्त आहे.
रशेल पार्किंगमधून निघाल्यानंतर काही वेळातच त्यांचं सॅम्पल म्हणजे नमुना जवळच्या लॅबमध्ये पाठवण्यात येतो. दक्षिण कोरियात कोरोना विषाणूची चाचणी करणाऱ्या या लॅब अहोरात्र सुरू आहेत.

- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

दक्षिण कोरियाने कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी 96 सार्वजनिक आणि खाजगी लॅब उभारल्या आहेत.
अशा पद्धतीने लोकांचे प्राण वाचवता येतील, असं तिथले आरोग्य अधिकारी सांगतात. दक्षिण कोरियात कोरिया विषाणूच्या संसर्गाने झालेल्या मृत्यूचं प्रमाण 0.7% इतकं अल्प आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणीमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 3.4% असल्याचं म्हटलं आहे. त्या तुलनेत दक्षिण कोरियातलं मृत्यूचं प्रमाण बरंच कमी आहे.

यानंतर मी सेऊलच्या बाहेरील भागात असलेल्या ग्रीन क्रॉस लॅबमध्ये गेले. मी तिथे पोचले तेव्हा नमुन्यांचा नवा स्टॉक चाचणीसाठी नुकताच आला होता. डॉ. ओह येजिंग यांनी आम्हाला संपूर्ण लॅब दाखवली. मात्र, एका ठिकाणी पोचल्यावर त्या थांबल्या. तिथून पुढे जायला आम्हाला परवानगी नव्हती.
त्यांनी मला सांगितलं, "या निगेटिव्ह प्रेशर रुममध्ये चाचण्या होतात."
त्या खोलीत दोन डॉक्टर्स होते. त्यांनी फिकट पिवळ्या रंगाचे सुरक्षा कवच घातले होते. आम्हाला आसपासच्या मशीन्सचा आवाज येत होता. या मशीन्सही अहोरात्र सुरू होत्या. या मशीन पीसीआर (पॉलीमरेज चेन रिअॅक्शन) टेस्ट करत होत्या. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर कोणते नमुने पॉझिटिव्ह आहेत, हे त्या मशीनद्वारे तपासण्यात येत होतं.
टेस्ट ट्युबमध्ये नमुना घेण्यापासून ते चाचणीचा निकाल येईपर्यंत पाच ते सहा तास लागतात.
Mers विषाणूपासून घेतला धडा
प्रा. गो चियोल कोन लेबॉरेटरी मेडिसीन फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. ते सांगतात की एवढ्या जलद गतीने इतकी सगळी कामं करणं हे दक्षिण कोरियाच्या नागरिकांच्या रक्तातच आहे. ते याला कोरियाई 'बाली-बाली' जिन्स म्हणतात.
दक्षिण कोरियाने कोरोना विषाणूच्या चाचणीची किट तयार केली आणि संपूर्ण देशात लॅबचं एक नेटवर्कही बनवलं. इतकंच नाही तर हे नेटवर्क केवळ 17 दिवसात पूर्ण क्षमतेने सुरूही झालं. दक्षिण कोरियाने विक्रमी वेळेत हे सर्व करून दाखवलं आहे.
चियोल कोन म्हणतात, "आम्ही कुठल्याही नव्या संसर्गाचा सामना करायला शिकलो आहोत. 2015 साली आलेल्या मिडल-ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोमच्या (Mers) अनुभवातून आम्ही हा धडा घेतला."
दक्षिण कोरियात Mers मुळे 36 लोकांचा मृत्यू झाला होता.
36 लोकांच्या मृत्यूनेच या देशाला कुठल्याही संसर्गाविरोधात तात्काळ आणि उपयुक्त पावलं उचलण्याची प्रेरणा दिली. तसंच यामुळे दक्षिण कोरियाच्या दृष्टिकोनातही बदल झाला.
Mers च्या अनुभवातून धडा घेत दक्षिण कोरियातील सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने अशा प्रकराच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असलेला एक विभागच स्थापन केला.
आज कोरोना विषाणू जगभरातील अविकसित, विकसनशील आणि प्रगत राष्ट्रांनाही भांडावून सोडत असताना दक्षिण कोरियाने केलेल्या या पूर्वतयारीचा त्यांना मोठा फायदा होतोय.
प्रा. कोन म्हणतात, "माझ्या मते संसर्ग झालेल्या सुरुवातीच्या लोकांची ओळख पटवून, त्यांची चाचणी करून त्यानंतर त्यांना विलग करून मृत्यू दर रोखता येऊ शकतो आणि विषाणूच्या फैलावालाही आळा घालता येऊ शकतो."

ते म्हणतात, प्रत्येक अनुभवातून धडा घ्यायचा असतो आणि यंत्रणा आधीच सज्ज करून ठेवायची असते. कुठल्याही नव्या साथीचा सामना करण्याचा हाच उत्तम उपाय असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत ग्रीन क्रॉसच्या टिमसाठी परिस्थिती सामान्य होती. त्यानंतर एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला ही स्थानिक संक्रमणाची पहिली केस होती. त्या रुग्णाला दक्षिण कोरियात पेशंट-31 नावाने ओळखतात. त्या महिलेने परदेश दौरा केला नव्हता किंवा ती कोणत्याच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेली नव्हती.
त्या शिंचेओंजी चर्च ऑफ जीससशी संबंधित होत्या. दक्षिण कोरियात या धार्मिक समूहाचे जवळपास 2 लाख सदस्य आहेत. या एका मुद्द्याने या संकटाचं मूळ शोधून काढण्यात आणि त्याच्या फैलावाची प्राथमिक माहिती पुरवण्यात मदत केली.
दक्षिण कोरियात चाचणीसाठी लॅब तर सज्ज होत्याच. मात्र, कर्मचाऱ्यांचं सलग काम करणं आणि त्यामुळे त्यांना येणारा थकवा, एक महत्त्वाचा मुद्दा होता. मात्र, आता कर्मचारी शिफ्टमध्ये काम करतात.
जगासाठी रोल मॉडेल
दक्षिण कोरियात चाचणी किट्सची कमतरता नाही. चार कंपन्यांना डायग्नोस्टिक किट बनवण्याचे परवाने देण्यात आले आहेत. याचा अर्थ आठवडाभरात 1 लाख 40 हजार चाचण्या करण्याची दक्षिण कोरियाची क्षमता आहे.
प्रा. कोन सांगतात की दक्षिण कोरियात करण्यात येणाऱ्या चाचण्यांची सत्यता 98% आहे.
इतक्या मोठ्या संख्येने लोकांच्या चाचण्या घेण्याची क्षमता आणि योग्यता, यामुळे दक्षिण कोरिया आज जगासाठी एकर रोल मॉडेल ठरला आहे.
मात्र, सर्वच आलबेल आहे, असंही नाही. काही अडचणीही आल्या.
डैगू शहरात हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्याची वाट बघताना दोघांचा मृत्यू झाला. दक्षिण कोरियात सुरुवातीला जो कुणी पॉझिटिव्ह आढळायचा त्याला हॉस्पिटलमध्ये विलग करण्यात येत होतं.
मात्र, ज्यांना संसर्ग अत्यंत कमी आहे त्यांना त्यांच्या घरीच उपचार दिले जाऊ शकतात, हे आता डॉक्टरांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे जे गंभीर आजारी आहेत त्यांना आता हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार मिळू लागलेत.
कोरिया नॅशनल मेडिकल सेंटरच्या डॉ. किम योन जे सांगतात, "आम्ही प्रत्येकालाच क्वारेंटाईन करू शकत नाही आणि प्रत्येकावरच उपचारही करू शकत नाही. ज्यांना संसर्गाची लक्षणं किरकोळ आहेत त्यांनी घरीच थांबून उपचार घ्यावेत."
"मृत्यूदर वाढू नये, यासाठी परिस्थितीनुरूप रणनीती बदलली पाहिजे. उदाहरणार्थ इटलीत या संकटाने गंभीर रुप धारण केलं आहे. त्यामुळे इटलीने आपली रणनीतीही बदलायला हवी."
लवकरच लस तयार करण्याची आशा
दक्षिण कोरियातील वैज्ञानिकांनी एक युनिक प्रोटीन तयार केलं आहे. हे प्रोटीन अँटीबॉडीजचा शोध घेऊ शकतं. त्यामुळे भविष्यात यावर लस तयार करू, अशी आशा दक्षिण कोरियाला आहे.
ली (नाव बदललेलं आहे) दर आठवड्याला रक्ताची तपासणी करतात. डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान शहरात कोरोना विषाणुने डोकं वर काढलं त्यावेळी ली तिथेच होते. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या सरकारने त्यांना मायदेशी आणलं आणि त्यांची चाचणी घेण्यात आली. चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळले.

यामुळे त्यांच्या आई घाबरल्या होत्या. ली म्हणतात, "माझी आई खूपच घाबरली होती. पण खरंतर तिला घाबरण्याची गरज नव्हती. मी 28 वर्षांचा आहे आणि मला दिसणारी लक्षणंही मध्यम स्वरुपाची होती."
आपल्या प्रकृतीविषयी सांगताना ली म्हणतात, "माझी प्रकृती बरी होती. मला कुठलीच लक्षणंही दिसत नव्हती. फक्त थोडा कफ होता. माझ्या अनुभवावरून सांगायचं तर तुम्ही सतर्क रहायला हवं. मात्र, घाबरून जाऊ नये. किमान माझ्या बाबतीत तरी विषाणूची लक्षणं फार गंभीर नव्हती. वृद्धांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. मात्र जे तरुण आहेत आणि सुदृढ आहेत त्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही. केवळ सावधगिरी बाळगली पाहिजे."
माहिती असणं आवश्यक
कोरोना विषाणुच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी दक्षिण कोरियात जी काही पावलं उचलण्यात आली त्यात लॉकडाऊनचा समावेश नाही. म्हणजेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कुठलेच निर्बंध नाहीत की लोकांच्या फिरण्यावरही बंधन नाही.
या विषाणूचा सामना करण्यासाठी दक्षिण कोरियाचा एकच मंत्र आहे ओळख, चाचणी आणि उपचार.
जवळपास पाच कोटी लोकसंख्य असलेला हा देश या विषाणुचा सामना करण्यासाठी छोट्यातल्या छोटा गोष्टीलाही महत्त्व देण्यात येतंय. शाळा अजून बंद आहेत. लोकांना जास्तीत जास्त घरून काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रात जाऊ नका, असं आवाहनही जनतेला करण्यात आलं आहे.
सेऊलमधल्या रस्त्यांवर हळूहळू लोकांची गर्दी वाढतेय. बहुतांश लोक मास्क घालून आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या इमारतीबाहेर थर्मल टेस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्येक लिफ्टमध्ये हँड सॅनेटाईजर आहेत. ठिकठिकाणी स्वयंसेवक उभे आहेत आणि ते लोकांना वारंवार स्वच्छ हात धुण्याची आठवण करून देतात.
दक्षिण कोरियात या सवयी आता हळूहळू रुळायला सुरुवात झाली आहे. मात्र, आरोग्य अधिकारी अजूनही सतर्क आहेत. आता कुठल्याही प्रकारचा कामचुकारपणा किंवा बेजाबाबदारपणा घातक ठरू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. चर्च, ऑफिस, जिम, सोसायटीमध्ये एकानेही खबरदारी बाळगली नाही तर परिणाम गंभीर होऊ शकतात.
राहिला प्रश्न रशेल किम यांच्या चाचणीच्या निकालाची.
रशेल किम यांना त्यांच्या चाचणीच्या दुसऱ्या दिवशी मेसेज आला. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली.
त्या म्हणतात, "चाचणी नंतर लागण नाही, हे समजणं खूप दिलासा देणारं असतं. शिवाय, हे आणखी जास्त दिलासा देणारं आहे की माझ्यापासून इतर कुणाला धोकाही नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








