निपाह : वटवाघुळांपासून पसरणाऱ्या या व्हायरसचा तुम्हालाही धोका

फोटो स्रोत, SoumenNath / Getty Images
केरळमध्ये निपाह नावाच्या एका जीवघेण्या व्हायरसने नऊ जणांचा बळी घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
शास्त्रीय भाषेत या Nipah व्हायरसला निपा असं उच्चारतात.
गेल्या पंधरा दिवसात निपाह व्हायरसची लागण झालेले तीन रुग्ण आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अन्य सहा जणांचे तपशील लवकरच मिळतील, असं त्यांनी सांगितलं.
केरळच्या कोळिकोड शहरात इन्फेक्शनची लागण झालेल्या अन्य 25 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका नर्सचाही मृत्यू झाल्याचं केरळचे आरोग्य सचिव राजीव सदानंदन यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "निपाह व्हायरसची कथित लागण झालेल्या तीन रुग्णांच्या रक्त आणि शरीरातील अन्य घटकांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टि्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांना पाठवले आहेत. तीन जणांचा मृत्यू निपाह व्हायरसमुळेच झाला आहे, यावर शिक्कामोर्तब झालं आहे."
"या व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर काम करत आहोत. लस नसल्याने उपचार मर्यादित आहेत पण तरी व्हायरस पसरू नये यासाठी पावलं उचलत आहोत," असं त्यांनी पुढे सांगितलं.
काय आहे निपाह?
निपाह व्हायरस (NiV) हा एक नव्याने निर्माण होत असलेला इन्फेक्शनरूपी आजार आहे. हा व्हायरस प्राण्यांकडून मानवी शरीरात संक्रमित होतो. यावर उपचार म्हणून सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 10 प्रमुख जीवघेण्या आजारांच्या यादीत निपाह व्हायरसचा समावेश आहे. या व्हायरसची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता 70 टक्के असते.
याची कथित लागण होऊन मेलेल्या तीन जणांच्या घरात वघवाघुळांनी चावा घेतलेले आंबे आढळल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे फ्रूट बॅट्स अर्थात फळं खाणारे वटवाघूळ या व्हायरसचे नैसर्गिक वाहक असल्याचं मानलं जात आहे.
1999 मध्ये मलेशिया आणि सिंगापूरमध्ये डुकरांशी संपर्क येणाऱ्या शेतकऱ्यांना मेंदू आणि श्वसनासंदर्भात गंभीर आजार झाले होते. त्यावेळी तीनशे माणसांना या आजाराने ग्रासलं होतं आणि शंभर जणांचा मृत्यू झाला होता.
या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी त्या वेळी मलेशियात लक्षावधी डुकरांना मारण्यात आलं. यामुळे मलेशियातील शेतकरी उद्योजकांचं प्रचंड नुकसान झालं.
ताप, डोकं दुखणं, अशक्त वाटणं, श्वसनाचे आजार, मानसिक गोंधळ उडणं या आजाराच्या शक्यता आहेत. ही लक्षणं दोन दिवस कायम राहिल्यास रुग्ण कोमात जाऊ शकतो.
निपा (Nipah) व्हायरसवर उपचार म्हणन अद्याप लस नाही. तोवर आजारी डुकरं, वटवाघुळं यांच्याशी संपर्क टाळणं हाच या आजारावरचा उपाय आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








