एखाद्याची 'शी' ठरू शकते दुसऱ्यासाठी औषध

विज्ञान, तंत्रज्ञान
फोटो कॅप्शन, मल उत्सर्जनाच्या घटकांचं दुसऱ्या शरीरात रोपण करण्यात येतं.
    • Author, जेम्स गल्लाघर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मलरोपण- ऐकताक्षणी किळसवाणं वाटत असलं तरी वैद्यकीय क्षेत्रातलं हे नवं संशोधन आजारी माणसाला बरं करत आहे.

एका शरीरातल्या मल घटकांचं दुसऱ्या शरीरात रोपण केलं जातं. या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत 'ट्रान्स पू सिऑन' म्हटलं जातं. वैद्यकीय क्षेत्रातला हा प्रकार किळसवाणा वाटला तरी त्यानं आरोग्य सुधारतं.

आतापर्यंत वाचून जे तुम्हाला वाटतंय अगदी तस्संच केलं जातं. एका शरीरातला मल अर्थात उत्सर्जन घटक दुसऱ्या शरीरात रोपण केले जातात.

पोटात झालेला आजार बरा व्हावा यासाठी हे रोपण केलं जातं. रुग्णाच्या पोटात मलाद्वारे नव्या सूक्ष्मपेशी दिल्या जातात.

मलरोपण आजारी माणसासाठी संजीवनी ठरू शकतं.

सूक्ष्मजीवाणूंची शरीरातली भूमिका किती निर्णायक असते हे यातून सिद्ध होतं. पचनसंस्थेत सूक्ष्म जीवाणूंची समृद्ध अशी व्यवस्था असते.

सूक्ष्मजीव आणि मानवी उती यांचा एकमेकांशी संवाद होत असतो.

वर्षावनं आणि प्रवाळबेटांप्रमाणे आपल्या पोटातही समृद्ध अशी पेशी आणि जीवाणूंची विविधता असते. पण Clostridium difficile नावाचा जीवाणू या सुसंगत यंत्रणेत बाधा आणून आपलं प्राबल्य प्रस्थापित करू शकतो.

हा जीवाणू संधीसाधू असतो. आजारी माणसाला औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या प्रतिजैविकांना म्हणजेच अँटीबायोटिक्सनाही हा जीवाणू पुरून उरतो. माणसाला दुर्धर आजारातूनही बरं करणारी प्रतिजैविकं आधुनिक युगातील चमत्कार आहेत. मात्र ते चांगल्या आणि वाईट जीवाणूंना एकाचवेळी मारून टाकतात.

जंगलात जसा वणवा पेट घेतो तसं प्रतिजैविकं काम करतात. त्यांचा फटका बसलेल्या इतर जीवाणूंना बाजूला सारत Clostridium difficile स्वत:चं स्थान भक्कम करतो.

द मायक्रोबायोम

  • शरीरातल्या एकूण पेशींची संख्या मोजली तर केवळ 43 टक्के पेशी मानवी आहेत.
  • उर्वरित मायक्रोबाममध्ये जीवाणू, विषाणू, बुरशी आणि एकपेशी जीवांचा समावेश होतो.
विज्ञान, तंत्रज्ञान
फोटो कॅप्शन, शरीरातल्या पोटाची रचना
  • मानवी जिनोम हे 20,000 जीन्सपासून बनलेलं असतं. जिनोम द्वारेच मानवाला अनुवंशीय सूचना मिळतात.
  • पण जर आपण मायक्रोबायोममधले सर्व जीन्स एकत्र केले तर त्यांची संख्या 20 लाख ते 2 कोटी इतकी भरू शकते. याच स्थितीला द्वितीय जिनोम म्हणतात.

मलरोपण होतं तरी कसं?

Clostridium difficile हा जीवाणू शरीरात शिरल्यानंतर माणसाला गंभीर स्वरुपाचा अतिसार, पोटात पेटगं येणं, ताप असे आजार होतात. जीवावर बेतू शकेल असा या जीवाणूचा संसर्ग असतो.

या जीवाणूचा नायनाट करण्यासाठी आणखी प्रतिजैविकांचा मारा केला जातो. हे उपचार एका दुष्टचक्राचा भाग आहेत.

मलरोपण प्रक्रियेद्वारे सुदृढ माणसाच्या शरीरातील मलकणांचं आजारी माणसाच्या पोटात रोपण केलं जातं.

साधारण पोटाची रचना सारखी असेल अशा आजारी माणसाच्या नातेवाईकाकडून मलकण घेतले जातात.

मलकणाचा नमुना घेतल्यानंतर तो पाण्यात मिसळला जातो.

काही पद्धतीद्वारे मलकणाचे हाताने विघटन केलं जातं तर काहींमध्ये....

आजारी माणसाच्या शरीरात मलरोपण करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक थेट मुखावाटे तर एक गुदद्वारादारे.

हे प्रत्यारोपण प्रत्यक्षात साकारण्यासाठीच्या चमूत अमेरिकास्थित वॉशिंग्टनमधील पॅसिफिक नॉर्थवेस्ट नॅशनल लॅबोरेटरीमधील मायक्रोबायल इकॉलॉजिस्ट डॉ. जेनेट जान्सन यांचा समावेश होता.

61 वर्षीय महिलेला आठ महिने गंभीर अतिसाराने ग्रासलं होतं. या काळात त्यांचं वजन 27 किलोंनी घटलं होतं.

"त्यांच्या आजारावर ठोस उपाय हवा होता. Clostridium difficileने त्यांच्या शरीराला खिळखिळं केलं होतं. हा आजार त्यांच्या जीवावरही बेतू शकला असता. उपचारांचा भाग म्हणून दिली जाणारी प्रतिजैविकं कुचकामी ठरत होती," असं डॉ. जान्सन यांनी सांगितलं.

या महिलेच्या पतीच्या शरीरातील मलाचे कण घेऊन त्याचं रोपण महिलेच्या शरीरात करण्यात आलं.

रोपण प्रक्रियेचं यश पाहून ती महिला आश्चर्यचकित झाली.

"अवघ्या दोन दिवसात त्या महिलेचं मलउत्सर्जन ठीकठाक झालं, पोटाच्या पोषण हालचालीही सुधारल्या, पोटाची यंत्रणा सुरळीत झाली. मायक्रोबायल इकॉलॉजिस्ट म्हणून माझ्यासाठीही हे अनोखं होतं," असं डॉ. जान्सन यांनी सांगितलं.

विज्ञान, तंत्रज्ञान
फोटो कॅप्शन, मानवी संरचना

मलरोपण प्रक्रिया 90 टक्के यशस्वी होत असल्याचा अनुभव आहे.

प्रयोग यशस्वी होत असल्याने, ओपनबिओमसारख्या गटांनी पुढाकार घेतला आहे. मलरोपणासाठी आवश्यक अशा सार्वजनिक मल साठवण व्यवस्थेची (पब्लिक स्टूल बँक) स्थापना करण्यात आली आहे.

ट्रान्स पू सिऑन अर्थात मलरोपण केवळ Clostridium difficile पुरतं मर्यादित राहणार का?

माणसाला होणाऱ्या प्रत्येक आजारात सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे याविषयी संशोधन सुरू आहे.

संसर्गजन्य स्वरुपाचे पोटाचे आजार, डायबेटिस, पार्किन्सन, कॅन्सर यांच्यासह नैराश्य तसंच ऑटिझम अशा आजारांसाठी मायक्रोबाईमचा संबंध जोडला जातो.

मात्र त्याचवेळी मलरोपणाचे काही अनपेक्षित परिणाम असू शकतात.

2015 मध्ये यासंदर्भात एका महिलेबाबत घडलेली घटना समोर आली होती. मुलीच्या पोटातील मलकणांचं आईच्या पोटात रोपण करण्यात आलं. मलरोपणामुळे आईचं वजन तब्बल 16 किलोंनी वाढलं होतं.

जाड माणसाच्या पोटातील मलकण किंवा एका सडपातळ प्राण्याच्या शरीरातील मायक्रोबाईम उंदराच्या पोटात रोपण केलं जाऊ शकतं. याने उंदरावर काय परिणाम होऊ शकतात यावरून मलरोपणाविषयी संशोधकांमध्ये मतभेद आहेत.

विज्ञान, तंत्रज्ञान
फोटो कॅप्शन, मलरोपणाविषयी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

मलरोपण करताना धोकादायक आजार एका शरीरातून दुसऱ्या शरीरात संक्रमित होण्याची भीती आहे.

मलरोपण करण्यापेक्षा प्रयोगशाळेत नियंत्रित बॅक्टेरियांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे.

मलरोपण प्रक्रिया अधिक लक्ष्यकेंद्रित आणि शास्त्रोक्त होण्यादृष्टीने प्रयत्न करावे लागतील असं वेलकम संगेर इन्स्टिट्यूटचे डॉ. ट्रेव्हर लॉले यांनी सांगितलं.

मलरोपणाविषयी अद्याप जागरुकता झालेली नाही. जेव्हा यासंदर्भात औषधं तयार केलं जातं, त्यावेळी आजारी माणसाचं आरोग्य हे सर्वोच्च प्राधान्य असेल असं लॉले यांनी पुढे सांगितलं.

नक्की कशाचं रोपण करायचं हे आता आम्हाला कळलं आहे. ते करून रुग्णाची प्रकृती योग्य राहते हेही सिद्ध झालं आहे.

मायक्रोबाईल औषधांचं हे भविष्य असणार आहे. वैयक्तिक मायक्रोबाईममध्ये असलेली समस्या लक्षात घेऊन उपचार केले जातील.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)