एलफिन्स्टन रोडची दुर्घटना टाळता आली असती? काय सांगतं गर्दीचं मानसशास्त्र?

- Author, क्रिस्टीन रो
- Role, बीबीसी
एलफिन्स्टन रोड इथं घडलेली चेंगराचेंगरीची घटना आठवते का? गर्दी कशी प्राणाघातक ठरू शकते याचं हे उदाहरण होय. गर्दी चक्क तर्कसंगतही असू शकते. जगभरातील शास्त्रज्ञ जमावाच्या वर्तनाविषयी आणि मानसशास्त्राविषयी अधिकाधिक संशोधन करत आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मार्ग शोधण्याचेही तज्ज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत.
कधीकधी गर्दीचा भाग असणं हे केवळ अस्वस्थ होण्या इतकंच मर्यादित नसतं. काही वेळेला परिस्थितीला घातक वळणही लागू शकतं.
2017मध्ये प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनांमध्ये अंगोलातील फुटबॉल मैदान, इटालियन पिएझ्झा आणि मोरोक्कोमधील अन्न मदत केंद्रावर घडलेल्या घटनांचा समावेश आहे.
या घटना दुःखद आणि टाळता येण्यासारख्या होत्या.
भविष्यात अशा घटनांचे प्रमाण कमी व्हावं, यासाठी यूकेतील शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत.
श्रीकांत शर्मा हे यूकेमधल्या 'ब्युरोहॅपोल्ड' या अभियांत्रिकी फर्मच्या स्मार्ट स्पेस ग्रुपचे संचालक आहेत. त्यांच्या मते, "बहुतेक वेळा मानवी वर्तन अपेक्षित अशी असते. कारण आपण खूपच तर्कसंगत असतो."
अंदाज बांधण्याची ही क्षमता विश्लेषकांसाठी उपयुक्त ठरते. मोकळ्या जागेत लोकांच्या हालचाली कशा असतील याची कल्पना त्यांना करता येते.

फोटो स्रोत, Getty Images
गर्दीचे मानसशास्त्र ही संकल्पना 19व्या शतकापासूनच अस्तित्वात आहे. मात्र गेल्या काही दशकांमध्येच गर्दीबाबत अधिक व्यापक दृष्टिकोन बाळगण्यास सुरुवात झाली असून, गर्दीला डोकं नसतं यापलीकडे जावून त्याकडे पाहिलं जात आहे.
"व्यक्तीप्रमाणंच गर्दीचं मानशास्त्रसुद्धा विशिष्ट प्रकारचं असतं," ससेक्स विद्यापीठातील गर्दी व्यवस्थापनाचं सामाजिक मानसशास्त्र या विषयातील तज्ज्ञ जॉन ड्रुरी सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
1980च्या दशकात दंगलींसाठी मानसशास्त्रीय निष्कर्ष लागू करण्यात आले. तर 2000च्या दशकात गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या आणीबाणीच्या घटनांसाठी आणि 2010च्या सुमारास संगीत महोत्सव आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी या निष्कर्षांचा उपयोग केला गेला.
सध्याच्या काळात विशिष्ट आपत्कालीन घटनांमध्ये गर्दीच्या मानसशास्त्राचा वापर केला जात आहे. यात केमिकल, बायोलॉजीकल, रेडीओलॉजिकल किंवा न्युक्लिअर हल्ल्यांसारख्या घटनांचा समावेश होतो.
गर्दीचं भान
खरं तर, आणीबाणीच्या परिस्थितीत बऱ्याचदा सामुदायिक ओळखीचा उदय होतो असं मानसशास्त्रज्ञ आणि आपत्ती विशेषज्ञांच्या कामातून दिसून येतं.
ठराविक परिस्थितीत गर्दी सहकार्य करण्यास कितपत तयार आहे किंवा किती संवेदनक्षम आहे हे निश्चित करण्यासाठी ही ओळख महत्वाची असते.
उदाहरणार्थ, 2005च्या '7/7 लंडन बॉम्बस्फोट' घटनेतून वाचलेल्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर ड्रुरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या असं लक्षात आलं की त्या गर्दीतील सदस्यांनी एकमेकांना खूपच सहकार्य दाखवलं होतं. त्यांनी एकमेकांचे सांत्वन केलं, पाणी दिलं आणि प्रथोमोपचारही देऊ केले होते.

फोटो स्रोत, EPA
"अशा प्रकारच्या सामायिक सामाजिक ओळखीचा उदय क्षीण होईल, अशा गोष्टी न करणं महत्वाचं आहे," असं ड्रुरी सांगतात. कारण अशा वेळी आपापसांत असलेल्या संबंधांना बाजूला सारून गर्दीची स्वतःची एक ओळख बनते.
गर्दीचं व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल यासाठी धार्मिक किंवा वांशिक गटात गर्दीचं विभाजन करणं मुळीच उपयोगी ठरू शकत नाही, असं ते म्हणाले.
यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) सारख्या संस्थांच्या आपत्कालीन प्रतिसादामध्येही या निष्कर्षांचा समावेश करण्यात आला आहे.
ठराविक प्रकारच्या गर्दीची व्यवस्था पहात असताना हे 'नियम' समजून घेणं हेदेखील तितकंच महत्वाचं असतं.
पंक किंवा मेटल गिगमधील मोशपिट बिहेविअर बघा. मोशिंग ही एकप्रकारची नृत्यशैली असून, त्यात सहभागी नर्तक एकमेकांना आक्रमकपणे ढकलतात किंवा एकमेकांवर आदळतात. तर पंक हे एक प्रकारचं वेगवान आणि आक्रमक असं रॉक संगीत असून ते 1970च्या दशकात चांगलंच लोकप्रिय होतं.

फोटो स्रोत, Getty Images
बाहेरच्या लोकांना जरी हे दिसत नसलं, तरी शरीरांच्या या धुमसण्यामागं एक तर्कशास्त्र असते. हे तर्कशास्त्रच चाहत्यांना तुडवले जाण्यापासून वाचवतं. विशेष म्हणजे, याचाच दुसरा अर्थ असाही आहे की, ढोबळमानानं गोलाकारात फिरणारे मोशर्स बऱ्याचदा शेवटी तिथंच येतात जिथून त्यांनी सुरुवात केली असेल.
"गर्दीचे व्यवस्थापन करणाऱ्यांना हे माहीत असतं की जेंव्हा तुम्ही स्लॅम डान्सिंग किंवा मोशिंग पहात असता तेव्हा ते नियमबद्धच असतं," ड्रुरी सांगतात.
पण, जर परिस्थिती नीट माहीत नसलेल्या अननुभवी सुरक्षा रक्षकांना त्यांचे वर्तन धोकादायक वाटू शकते. अशावेळी त्यांनी ताकदीचा वापर करायला सुरुवात केली तर ही परिस्थिती धोकादायक बनू शकते.
1989च्या हिल्सबरो दुर्घटनेत हेच झालं, जेव्हा UKमधील शेफील्डमधल्या फुटबॉल मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीत 96 लोकांचा मृत्यू झाला होता. काही पोलीस आणि सुरक्षारक्षक हे संभाव्य गुंडगिरीच्या शक्यतेनंच एवढे ग्रासलेले होते की, त्यांनी चाहत्यांना एकत्र डांबून ठेवण्यासारखी कारवाई केली, ज्यामुळे परिस्थिती जास्त बिघडली.

फोटो स्रोत, Getty Images
मनोवैज्ञानिक दृष्टिनेही गर्दीच्या धोक्यांबाबत अतिशयोक्तीपूर्ण विचार न करणं महत्वाचं असतं. दुर्घटना या कितीही दुर्मीळ असल्या तरी बऱ्याचदा प्रसारमाध्यमं आणि लोकप्रिय संस्कृती हे धोके वाढवून सांगत असतात, असं ड्रुरी स्पष्ट करतात.
गर्दीतील इतर जण पॅनिक होतील असा विचार जर लोक प्रामुख्याने करत राहिले, तर तेच पॅनिक होण्याची शक्यता जास्त असते. वास्तविक कसलाच धोका नसता असं घडू शकतं आणि हीच हीच खरी समस्या आहे.
अॅडव्हान्स प्लॅन
जेव्हा एखाद्या विशिष्ट कार्यक्रमाचा किंवा इमारतीचा प्रश्न येतो, तेव्हा गर्दीला सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून काही मार्ग विकसित करण्यासाठी या संशोधनाची मदत होत असते. बऱ्याचवेळा सर्वोत्तम उपाययोजना अगदीच अनपेक्षित असू शकतात.
शर्मा यांचे सहकारी गर्दीच्या वर्तनावर परिणाम करणाऱ्या घटकांबाबत मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा करतात.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या क्राऊड सिम्युलेशन सॉफ्टवेअर पॅकेजचा वापर करून ते वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये हे व्हेरिएबल्स बसवतात. अगदी साधी उपाययोजनाही प्रचंड गर्दी टाळण्यात मदत करू शकतं, असं यातून दिसतं.
उदाहरणार्थ, रुग्णालयातील आपल्या मजल्यावरील ठराविक भाग हा सर्वाधिक वर्दळीचा असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांकडून मिळू शकते. पण कर्मचाऱ्यांवर ट्रॅकिंग टॅग बसवल्यानंतर मात्र धामधुमीचे केंद्र कदाचित दुसरीकडेच कुठंतरी असल्याचं दिसून येतं. ज्यामुळे जागेचे नियोजन करण्याचा वेगळा मार्ग सुचवता येऊ शकतो.
कधीकधी सूचना या अगदी साध्यासोप्या असतात. न्यूकॅसलमधील एका शाळेत शाळेची घंटा वाजल्यावर विद्यार्थ्यांना एकदम होणाऱ्या गर्दीचा सामना करावा लागत होता. एकाच मार्गावरून वेगवेगळ्या दिशेने जाताना या मुलांना झगडावे लागत असल्याचे शर्मांच्या टीमने पाहिले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की कॉरीडॉर रुंद करण्याची शाळेची कल्पना ही अनावश्यक आणि खर्चिक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्याऐवजी, शर्मांच्या टीमने साधी शिफारस केली. शाळेची घंटा काढूनच टाका आणि एका निश्चित वेळी वर्ग सोडण्यापेक्षा, ठराविक काही मिनिटांच्या अंतरानं, शिक्षकांचं शिकवणं पूर्ण झाले की, वर्ग सोडण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी केली. त्यानंतर कॉरीडॉरमधील हालचाल तुलनेने कितीतरी सुरळीत झाली.
शर्मा यांना असा ठाम विश्वास आहे की योग्य प्रश्न विचारले तर मर्यादित साधनांतही गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करता येऊ शकतात.
उदाहरणार्थ, मुंबईतील रेल्वे स्थानकं ही प्रचंड गर्दीसाठी कुप्रसिद्ध आहेत. योग्य माहिती दिल्यास आणि बाहेर जाण्याच्या मार्गावरून प्रवाशांना कशाप्रकारे वळवले जाते यावर लक्ष ठेवल्यास, एल्फिन्स्टन दुर्घटनेसारख्या दुर्घटना टाळता येऊ शकतात, असं ते म्हणतात.
२०१७मध्ये एल्फीन्स्टन रोड स्थानकातील जिन्यांवर झालेल्या चेंगराचेंगरीत कमीतकमी २२ जणांचा मृत्यू झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
गर्दी व्यवस्थापन शास्त्राने प्रगती केली असली, तरी अजूनही सुधारणेसाठी बराच वाव आहे.
गर्दीतील सदस्यांचा आपापसात कसा संवाद होतो, हे जाणून घेण्यात बरीच क्राऊड सिम्युलेशन टुल्स अपयशी ठरतात, असं केंट विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ ऍन टेम्पल्टन यांच्या कामातून दिसतं.
'शारीरिक गर्दी'(एकाच जागी असलेला फक्त शरीरांचा गट) आणि 'मानसिक गर्दी'(जिथे गर्दीला एक सामुदायिक ओळख आहे) यांची रचना वेगवेगळ्या प्रकारची असते.
डेटा मॉडेलिंगमधील वाढत्या अत्याधुनिकतेमुळे अशा प्रकारचे सहजासहजी न दिसणाऱ्या घटकांचाही परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
"आणीबाणीच्या परिस्थितीत शारीरिक गर्दीचं रूपांतर मानसिक गर्दीत होऊ शकतं. हे लक्षात घेता कंप्युटर मॉडेल्समध्ये वैविध्य असायला हवं. जेणे करून समूहाची ओळख आणि त्यानुसार त्यांच्या वर्तनात होणाऱ्या बदलांना सामावून घेता येईल," टेम्पल्टन सांगतात.
मानवी वर्तन आणि गरजा समजून घेण्याच्या दृष्टीनं लोक काय बोलतात, लोक काय करतात यांना एकत्र करता येऊ शकेल, असं ते म्हणतात.
गर्दी ही आश्चर्यकारकरित्या गुंतागुंतीची आणि आधुनिक असते. पण त्याचबरोबर, तिला समजून घेण्याचे तंत्रही तसेच विकसित होत चाललं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








