मित्राच्या तीन चिमुकल्यांची हत्या केली, मृतदेहाचे तुकडे केले आणि...

फोटो स्रोत, RALPH FAMILY
इशारा : या रिपोर्टमध्ये असलेला तपशील विचलित करणारा आहे.
एका 20 वर्षीय व्यक्तीनं 1973 मध्ये त्याच्या मित्राच्या तीन मुलांची हत्या करत अत्यंत निर्घृणपणे त्यांच्या मृतदेहांचे तुकडे-तुकडे केले होते. या घटनेमागचा हेतू कधी समोर आलाच नाही, शिवाय मारेकऱ्यानं कधी याबाबत दुःखही व्यक्त केलं नाही.
तुरुंगात जाऊन 45 वर्षे झाल्यानंतर आता डेवीड मॅकग्रेव्ही पुन्हा एकदा बाहेर रस्त्यांवर फिरू शकणार आहे.
हा एक असा गुन्हा होता ज्यामुळं एक कुटुंब उध्वस्त झालं, संपूर्ण देशात भयावह वातावरण निर्माण झालं, तसंच या गुन्ह्यातील निर्घृणपणामुळं एवढा संताप पसरला की, त्यामुळं संतप्त प्रतिक्रिया वोर्सेस्टरमध्ये पाहायला मिळाल्या.
पण असं असलं तरीही, हे प्रकरण बऱ्याच अंशी ब्रिटिश जनतेपासून दूरच राहिलं.
क्लाईव्ह आणि एलिस राल्फ यांच्या दृष्टीनं विचार करता 13 एप्रिल 1973 चा शुक्रवारचा दिवस हा त्यांच्यासाठी इतर सर्वसाधारण दिवसांसारखाच असणार होता.

फोटो स्रोत, PA
क्लाईव्ह राल्फ हे ट्रकचालक होते तर त्यांच्या पत्नी बारमेड (बारमध्ये काम करणारी महिला) होत्या. ते वोर्सेस्टरमध्ये गिलम रोडवर त्यांच्या पॉल, डॉन आणि समांथा या तीन मुलांसह राहत होते. त्यांची वयं चार वर्ष, दोन वर्ष आणि नऊ महिने अशी होती.
क्लाईव्ह राल्फ यांचे मित्र डेव्हिड मॅकग्रेव्ही हे त्यांचे भाडेकरू होते. क्लाईव्ह हे कामामुळं शक्यतो बऱ्याचदा घरापासून दूर असायचे आणि त्यांच्या पत्नी एलिसदेखील अनेकदा संध्याकाळच्या शिफ्टमध्ये काम करायच्या. त्यामुळं डेव्हिड यांची त्यांना अनेकदा मदत होत होती. डेव्हिड हे मुलांबरोबर नेहमी चांगलं वर्तन करायचे आणि त्यांना त्यांची काळजी घ्यायला आवडायचं, असं वाटत होतं.
त्या सायंकाळी क्लाईव्ह राल्फ काम संपवल्यानंतर पत्नी एलिस यांना कामावरून सोबत घेऊन जाणार होते. त्याचवेळी मॅकग्रेव्ही मात्र घरी बरीच बीअर प्यायले होते. नऊ महिन्यांच्याच्या चिमुकल्या समांथाचं रडणं त्यांना थांबवता येत नव्हतं.
त्यांनी नंतर सांगितलं की, त्यांनी तिच्या तोंडावर फक्त हात दाबला आणि तो तसाच बराच वेळ दाबून धरला, तिथंच सर्वकाही संपलं होतं.
नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा अंत झाला होता.

फोटो स्रोत, TRINITY MIRROR / MIRRORPIX / ALAMY STOCK PHOTO
त्यानंतर मॅकग्रेव्ही चार वर्षांच्या पॉलच्या खोलीत गेला आणि त्यानं एका वायरनं पॉलचा गळा आवळला. त्यानंतर दोन वर्षांच्या डॉनचा गळा त्यानं चिरला आणि समांथाला अक्षरशः कवटीमध्ये फ्रॅक्चर होईपर्यंत तो मारहाण करत राहिला.
त्यानंतर तो तळघरात गेला आणि त्यानं बागकामासाठी वापरलं जाणारं, एक अवजार आणलं आणि त्यानं चिमुकल्याचे मृतदेह अत्यंत निघृणपणे छिन्न विछिन्न केले.
त्यानंतर तो तिघांचे मृतदेह गार्डनमध्ये घेऊन गेला. त्यांचे लहान लहान मृतदेह त्यानं त्याठिकाणच्या दोन गार्डनच्या मध्ये असलेल्या लोखंडी रेलिंगवर ठेवले आणि तिथून निघून गेला.
राल्फ दाम्पत्य घरी पोहोचलं, तेव्हा त्यांची मुलं घरात नव्हती. पण त्यांच्या घरामध्ये सगळीकडं रक्त पसरलेलं होतं. त्यांचा भाडेकरू कुठे आसपास दिसत नव्हता. त्यामुळं त्यांनी पोलिसांना फोन केला.
पीसी रॉब या पोलिस अधिकाऱ्यांना गार्डनमध्ये शोध घेताना मृतदेह आढळले. त्यानंतर दोन तासांमध्येच मॅकग्रेव्ही जवळच्याच लॅन्सडाऊन रस्त्यावर फिरताना आढळला होता.
अटक करताना मॅकग्रेव्हीनं," हे काय चाललंय?" असं विचारत त्याला हत्यांबद्दल काहीही माहिती नसल्याचं म्हटलं. पण नंतर पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यानं मुलांच्या हत्येची कबुली दिली होती.

त्यानं अधिकाऱ्यांना हत्या कशा केल्या हे सांगितलं, मात्र त्यामागचं कारण त्यानं सांगितलं नाही.
त्यानं कधीही ते का केलं? हे सांगितलंच नाही.
राल्फ यांचे जुने मित्र असलेले मॅकग्रेव्ही हे स्वच्छंदी तरुण होते. त्यांनी एकदा एका मुलीला भेटल्यानंतर आठवडाभरातच तिला प्रपोज केलं होतं. दारु प्यायल्यानंतर अनेकदा त्यांचा पारा चढलेला असायचा. पण ते हत्या करू शकतात, असं कधीही त्यांच्या वर्तनावरून वाटलं नव्हतं.
ते एका लष्करी कुटुंबामध्ये वाढलेले होते. त्यांचे वडील वेगवेगळ्या पदांवर असल्यामुळं ते युके आणि जर्मनीमध्ये विविध ठिकाणी राहिलेले होते.
ते रॉयल नेव्हीत सहभागी झाले होते. पण एका कचऱ्याच्या डब्ब्याला आग लावल्यामुळं त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी ते अत्यंत अहंकारी आणि प्रत्येक शब्दाला उत्तर देणारे असल्याचं सांगितलं होतं.
आई वडिलांबरोबर राहण्यासाठी ते पेम्ब्रोकशायरमधील RNAS ब्रॉडीच्या छावणीतून वोर्सेस्टरला आले होते. त्यानंतर त्यांनी अगदी कमी कालावधीसाठी मजूर, शेफ आणि कारखान्यात कामं केली. अनेकदा त्यांनी दारुचं व्यसन आणि अहंकारी स्वभावामुळं नोकरी गमावली होती.

फोटो स्रोत, TRINITY MIRROR / MIRRORPIX / ALAMY STOCK PHOTO
त्यांच्या होणाऱ्या पत्नीनं 1971 मध्ये नवीन वर्षाच्या रात्री त्यांच्याबरोबरचं नातं तोडलं होतं. त्यानंतर मॅकग्रेव्ही यांनी त्यांच्या आई वडिलांशीही वाद केले होते. त्यानंतर ते राल्फ यांच्याबरोबर राहू लागले.
ते राल्फ यांना भाड्यापोटी आठवड्याला 6 युरो देत होते. तसंच कधीकधी त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं आणि मुलांची काळजी घेणं अशी कामंही करायचे.
या हत्या झाल्या त्यावेळी जुडी लेस्समन आणि त्यांचे पती रॉजर हे जवळपास तीन वर्षे याच रस्त्यावर राहत होते. त्या सिटी सेंटरमध्ये कामाला होत्या. कामाला जाण्यासाठी त्यांना रोज राल्फ यांच्या घरासमोरूनच जावं लागायचं. त्यांनी एलिस राल्फ यांना मुलांबरोबर बऱ्याचदा पाहिलं होतं.
"शनिवारी सकाळी मी रोजपेक्षा लवकर उठले होते. तेव्हा अंदाजे 7 वाजले असतील. मी खिडकीचे पडदे उघडले आणि माझ्या बागेच्या समोरच्या भागात काही पोलिस मला दिसले. पोलिसांचे श्वान तिथं काहीतरी शोधत होते.
"मला धक्का बसला. काय होत आहे ते समजत नव्हतं. मी नेहमीप्रमाणे कामाला निघाले आणि जाताना पोलिसांना नेमकं ते काय करत आहेत असं विचारले? त्यावर त्यांनी शस्त्र शोधत आहोत, असं म्हटलं. त्याशिवाय ते काहीही बोलले नाहीत. मी माझ्या नेहमीच्या गिलम रस्त्याने जाण्याचा प्रयत्न केला, पण एका बाजुनं तो रस्ता पोलिसांनी बंद केला होता.
"त्या रात्री मी घरी आल्यानंतर मला शेजाऱ्यांकडून त्याठिकाणी हत्या झाल्याचं समजलं. तोपर्यंत मला काहीही माहिती नव्हतं. आधी आम्हाला एक हत्या झाली असून, ते लहान बाळ होतं असं समजलं. पण नंतर लोकांनी सांगितलं की, जास्त हत्या झाल्या आहेत. पण त्यांनाही नेमकं माहिती नव्हतं.

फोटो स्रोत, TRINITY MIRROR / MIRRORPIX / ALAMY STOCK PHOTO
"मी माझे पती रॉजर यांच्या घरी येण्याची वाट पाहिली आणि त्यांना सर्वकाही सांगितलं. पण तिथं तीन हत्या झाल्या होत्या आणि तिन्ही लहान मुलं होती, हे आम्हाला दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रातूनच समजलं होतं. आम्हाला सर्वांना धक्का बसला होता. नेमकं काय बोलावं हेही कळत नव्हतं.
"त्यानंतर जेव्हा या घरासमोरून गेलो तेव्हा प्रचंड थंडी होती. त्यांचे मृतदेह शेजाऱ्यांच्या रेलिंगवर ठेवले होते. त्यांची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाही करू शकत नाही.
"आजही जेव्ही मी तिथून जाते, तेव्हा त्या रेलिंग मला आठवतात. अत्यंत भयावह अशी आठवण आहे ती.
"त्यांचे मृतदेह कसायासारखे लटकावले असतील. मी विचार केला, ते किती क्रूर होतं? एखादी व्यक्ती एवढी क्रूर कशी असू शकते?"
सध्या 79 वर्षांच्या असलेले अॅलेक मॅकी या तेव्हा पत्रकार होते. बर्मिंघम इव्हिनिंग मेलसाठी ते काम करायचे. वोर्सेस्टर पोलिस स्टेशनमधील पत्रकार परिषदेत ते उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांना गिलम रोडवरील घटनास्थळी नेण्यात आलं होतं.
"मीदेखील तीन मुलांचा पिता आहे. त्या तीन मुलांपेक्षा माझी मुलं थोडी मोठी आहेत," असं ते म्हणाले.
"मला काय झालं याची कल्पना देण्यात आली होती. तसंच पोलिसांनी घटनास्थळीदेखील बोलावलं होतं. दोन घरांच्या मध्ये असलेल्या कुंपणावरील ताडपत्री मी पाहिली. ते दृश्य भयावह होतं. त्यावेळी मला घरी असलेल्या माझ्या मुलांची आठवण झाली होती.

"मॅकग्रेव्हीला अटक झालेली आहे, हे आम्हाला माहिती होतं. पण आम्ही ते सांगितलं नाही. कारण आम्हाला एखादा साक्षीदार किंवा माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा होता. पण जेव्हा ही बाब समोर आली, त्यानंतर वोर्सेस्टरमध्ये असलेलं वातावरण हे उल्लेखनीय होतं.
"ज्या भयावह पद्धतीनं चिमुकल्यांची हत्या करण्यात आली होती, त्यामुळं संपूर्ण देशाला धक्का बसला होता.
"अगदी अजूनही जेव्हा मी वोर्सेस्टरमधील त्या भागातून जातो, त्यावेळी त्या शनिवारच्या सायंकाळच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाहीत."
तपासाचं नेतृत्व करणारे रॉबर्ट बूथ यांनी, जे काही घडलं त्याची अगदी तंतोतंत माहिती लोकांना देऊ शकत नसल्याचं म्हटलं होतं.

"हे अत्यंत भयावह होतं. त्यांची निर्घृणपणे, अत्यंत निर्घृणपणे हत्या झाली होती," एवढंत ते म्हणाले.
1997 ते 2010 दरम्यान वोर्सेस्टरचे खासदार राहिलेले माईक फोस्टर यांनी त्यांच्या कार्यकाळात जेव्हा मॅकग्रेव्हीच्या सुटकेची चर्चा सुरू होती, तेव्हा त्याच्या विरोधी भूमिका घेतली होती. या मारेकऱ्यानं तुरुंगातच राहायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.
"लोकांना हे सर्व अजूनही अगदी काल घडल्यासारखं लक्षात आहे. ज्या प्रकारे हत्या करण्यात आल्या होत्या आणि नंतर मृतदेहांबरोबर जे काही केलं होतं, ते अजूनही लोकांच्या स्मरणात आहे.
"संपूर्ण युकेमध्ये अशी डझनभरच प्रकरणं आहेत ज्याबद्दल लोकांची मतं सारखी आहेत. जेव्हा लोकांना याबाबत अधिक माहिती मिळते, त्यामुळं त्यांच्या मनात भीती निर्माण होते. "

केव्हा काय घडलं?
एप्रिल 1973 -डेवीड मॅकग्रेव्ही यांनी चार वर्षांचा पॉल आणि त्याच्या बहिणी डॉन आणि समांथा यांची गिलम रोडवरील त्यांच्या घरी हत्या केली
जून 1973 - मॅकग्रेव्ही यांना जन्मठेपेची शिक्षा झाली
1994 - मॅकग्रेव्ही यांनी खुल्या कारागृहात (श्रेणी ड) हलवण्यात आलं, त्यानंतर पुन्हा बंदीस्त कारागृहात (श्रेणी क) हलवण्यात आलं
2007 - पॅरोलच्या अनेक अर्जांपैकी आणखी एक फेटाळण्यात आला
2009 - मॅकग्रेव्ही यांना बंदीस्त तुरुंगातच राहावं लागेल असं सांगण्यात आलं. त्यांच्या सुरक्षेसंदर्भात अनामिक (नाव जाहीर न करता) आदेश देण्यात आला
2013 - नवव्या पॅरोलसाठीचा अर्ज विचारात असताना हा आदेश उठवण्यात आला
2016 - पॅरोल देणाऱ्या मंडळानं मॅकग्रेव्हीच्या नावाचा सुटकेसाठी विचार सुरू असल्याचं सांगितलं. नंतर त्याच महिन्यात त्याचा अर्ज रद्द करण्यात आला.
2018 - सफॉकमधील HMP वॉरन हिलमधून मॅकग्रेव्ही यांच्या सुटकेला मंजुरी देण्यात आली.

फोटो स्रोत, TRINITY MIRROR / MIRRORPIX / ALAMY STOCK PHOTO
एलिस राल्फ यांना पोलिसांनी जेव्हा त्यांचं आयुष्य उध्ववस्त करुन टाकणारी ही बातमी सांगितली, तेव्हा त्या अवघ्या 23 वर्षांच्या होत्या.
काय घडलं आहे हे कळल्यानंतर त्या पोलिस स्टेशनमध्येच बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना पुन्हा घरी जाऊ दिलं नव्हतं किंवा मुलांना पाहूदेखील दिलं नव्हतं.
मानसोपचारतज्ज्ञांनी मॅकग्रेव्ही हा मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि खटला चालवण्यासाठी योग्य असल्याचं सांगितलं.
त्यांनीही स्वतःचा बचाव केला नाही, काहीही स्पष्टीकरण दिलं नाही आणि गुन्हा मान्य केला. त्यांना किमान 20 वर्षाच्या कालावधीसह जन्मठेपेची शिक्षा झाली.

एलिस राल्फ या खटल्यानंतर एल्सी उरी या नावासह त्या भागातून निघून गेल्या. "या सर्वातून कसं बाहेर यायचं हेच काही दिवस कळत नव्हतं. त्यामुळं मी काहीवेळा स्वतःला संपवण्याचाही प्रयत्न केला," असं त्यांनी सांगितलं.
त्यांचं लग्न मोडलं आणि आता त्यांना मुलं नाहीत.
पॅरोल मंडळानं त्यांच्या अहवालात मॅकग्रेव्ही खूप बदलले असल्याचं म्हटलं होतं. पण तसं असलं तरी, त्यांची सुटका झाली तर ते परत हत्या करतील असं एल्सी (एलिस) यांना वाटतं.
"जर पॅरोल मंडळातील एखाद्या सदस्याबरोबर असं घडलं असतं, तर त्यांनी या माणसाला सोडण्याचा विचार केला असता का? शक्यच नाही. मग तो तुरुंगात राहावा म्हणून मला का लढावं लागत आहे?
"हा व्यक्ती पुन्हा असं करू शकत नाही, असं म्हणताच येणार नाही..
"त्यानं माझं आयुष्य उध्वस्त केलं. मग त्याची सुटका का करायला हवी?"
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








