सुलताना डाकू : जो आपल्या येण्याची आधीच सूचना द्यायचा, विरोधकांची तीन बोटं छाटायचा...

फोटो स्रोत, Getty Images
श्रीमंतांची संपत्ती लुटून गरीबांमध्ये वाटणारं कॅरेक्टर जर आपल्या डोळ्यासमोर येत असेल तर ते कॅरेक्टर हमखास 14व्या शतकातील 'रॉबिन हूड' असला पाहिजे.
हा रॉबिन हूड त्याच्या साथीदारांसोबत ब्रिटनच्या नॉटिंगहॅमशायरमधील शेरवूडच्या जंगलात राहत असतो.
हा रॉबिन हूड असतो एक साधा नागरिक, पण नॉटिंगहॅमच्या कुप्रसिद्ध शेरीफने त्याची जमीन जबरदस्तीने बळकावलेली असते. या घटनेनंतर तो दरोडे टाकायला सुरुवात करतो
या रॉबिन हूड पात्रावर कादंबर्या लिहिल्या गेल्या, अनेक चित्रपट बनले. पण नेमका प्रश्न पडतो तो म्हणजे असा कोणी रॉबिन हूड वास्तविक आयुष्यात होता का?
पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की असं एक कॅरेक्टर आपल्या भारतात अस्तित्वात होतं. हा दरोडेखोर श्रीमंतांना लुटायचा आणि गरीबांना मदत करायचा. हे कॅरेक्टर म्हणजे सुलताना डाकू ज्याला 96 वर्षांपूर्वी फासावर चढविण्यात आलं. ती तारीख होती, 7 जुलै 1924.
सुलताना डाकूच्या धर्माबद्दल निश्चित असं काही सांगता यायचं नाही. पण बऱ्याच लोकांच्या मते, तो मुस्लिम होता तर काही इतिहासकारांनी त्याला हिंदू धर्माचा असल्याचं म्हटलं होतं. कारण तो भाटो समाजाचा होता आणि हा समाज हिंदू धर्म मानणारा आहे.
सुरुवातीच्या काळात हा सुलताना छोट्या-मोठ्या चोऱ्या करायचा. उर्दूचे पहिले गुप्तहेर कादंबरीकार आणि त्या काळातील प्रसिद्ध पोलीस अधिकारी जफर उमर यांनी या सुलतानाला पकडण्यात यश मिळवलं होतं. त्याच्यावर लावलेलं पाच हजार रुपयांचं बक्षीस उमर यांना मिळालं होतं.
जफर उमर यांची मुलगी हमीदा अख्तर हुसैन राय पुरी आपल्या 'नायाब हैं हम' या पुस्तकात लिहितात की, जफर उमर यांनी सुलतानाला एका चकमकीत अटक केली होती.
त्यावेळी सुलतानावर चोरी व्यतिरिक्त खुनाचे कोणतेही आरोप नव्हते. त्यामुळे त्याला फक्त चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती.
जफर उमर यांना इनाम म्हणून जे पैसे मिळाले होते ते त्यांनी सैनिक आणि स्थानिक लोकांमध्ये वाटून दिले. यानंतर जफर उमरने उर्दूमध्ये अनेक कादंबऱ्या लिहिल्या. यातली पहिली कादंबरी होती 'नीली छत्री'. या कादंबरीचा नायक होता सुलताना डाकू.
सुलतानाची 'गुन्ह्याची पद्धत'

फोटो स्रोत, '20TH CENTURY: YEAR BY YEAR'
तुरुंगातून सुटल्यानंतर सुलतानाने आपली टोळी पुन्हा एकत्र केली. त्याने नजिबाबाद आणि साहिनपूर येथील सक्रिय लोकांशी संपर्क साधला. या सगळ्या विश्वासू लोकांना घेऊन त्याने लुटमार सुरू केली. त्याला या विश्वासू लोकांच्या माध्यमातून धनदांडग्यांच्या बातम्या मिळायच्या.
सुलताना प्रत्येक दरोड्याची योजना अत्यंत काळजीपूर्वक आखायचा. त्या काळातील प्रसिद्ध शिकारी जिम कॉर्बिट यानी त्यांच्या बऱ्याच लेखांमध्ये सुलतानाबद्दल लिहिलंय.
जफर उमर यांच्या मते, सुलताना डाकू अत्यंत निर्भयपणे दरोडे घालायचा. विशेष म्हणजे तो आपल्या येण्याची आगाऊ सूचना लोकांना द्यायचा.
दरोडा घालताना रक्तपात टळेल असाच त्याचा प्रयत्न असायचा. पण जर कोणी त्याला प्रतिकार केला, त्याला किंवा त्याच्या साथीदारांना मारण्याचा प्रयत्न केला तर मात्र तो त्यांना ठार करायचा.
सुलतानाविषयी बऱ्याच कथा प्रसिद्ध आहेत. यातली एक कथा म्हणजे तो आपल्या विरोधकांची आणि ठार करणाऱ्यांची तीन बोटं छाटायचा. श्रीमंत सावकार आणि जमीनदारांच्या अत्याचाराला बळी पडलेले गरीब लोक त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायचे. तो ज्या भागात दरोडा घालायचा त्या भागातील गरिबांना ती संपत्ती वाटून द्यायचा.
सुलतानाला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी नेमला...
सुलतानाची दरोडेखोरी आणि दहशत कित्येक वर्ष सुरूच होती. पण त्यावेळी भारतात ब्रिटिशांचा अमल होता त्यामुळे त्यांना हे न खपण्यासारखं होतं. त्यांनी भारतीय पोलिसांच्या जोरावर सुलतानाला पकडण्याचे प्रयत्न केले. मात्र, गरीब लोक आणि सुलतानाचे विश्वासू लोक यांच्यामुळे इंग्रज आपल्या हेतूंमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत.
सरतेशेवटी इंग्रजांनी फ्रेडी यंग नावाच्या अनुभवी इंग्रज पोलीस अधिकाऱ्याला ब्रिटनमधून बोलावलं.
फ्रेडी यंगने भारतात आल्यावर सुलतानाच्या सर्व घटनांचा तपशीलवार अभ्यास केला. त्याने सुलताना आणि त्याच्या टोळीतील इतर लोक अटकेतून सुटलेल्या घटनांची तपशीलवार माहिती गोळा केली.
शेवटी फ्रेडी यंग या निष्कर्षाप्रत आला की, सुलताना पोलिसांच्या जाळ्यात अडकत नाही. कारण त्याला माहिती देणाऱ्यांचे नेटवर्क खूप मोठं आहे. अगदी पोलीस खात्यातील लोक सुद्धा त्याला सामील आहेत. मनोहर लाल नावाचा एक पोलीस अधिकारी हा सुलतानाचा खास माणूस होता. सुलतानाला अटक करण्याच्या प्रत्येक प्रयत्नाची बातमी तो त्याच्यापर्यंत पोहोचवायचा. त्यामुळेच सुलतानाला निसटून जाणं शक्य व्हायचं.
फ्रेडी यंगने अतिशय हुशारीने सुलतानाला अटक करण्याची योजना आखली. त्याने पहिल्यांदा मनोहर लालची बदली दूरगावी केली. त्यानंतर नजिबाबादमधील वयस्कर लोकांच्या मदतीने सुलतानाचा विश्वासू मुन्शी अब्दुल रज्जाक याच्याशी हातमिळवणी केली. रज्जाक सुलतानाचा अत्यंत विश्वासू साथीदार होता.
सुलताना नजिबाबादजवळील कजली बन नावाच्या जंगलात लपायचा. हे जंगल खूप घनदाट होतं, यात जंगली प्राण्यांचा वास होता. पण सुलतानाला मात्र या जंगलातील प्रत्येक कोपरा न कोपरा माहीत होता.

फोटो स्रोत, FAMILY COLLECTION: JALILPUR BIJNOR
तो ज्या ठिकाणी रहायचा त्या जंगलाच्या भागात कीर्र झाडी होती. तिथं सूर्यप्रकाशही पोहोचत नव्हता. सुलताना वेश बदलण्यातही निष्णात होता
फ्रेडी यंगने मुन्शी अब्दुल रज्जाकच्या माहितीच्या आधारे सुलतानाभोवतीचे फास आवळण्यास सुरुवात केली. मुन्शी अब्दुल रज्जाक एकाबाजूला सुलतानाच्या संपर्कात होता, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या हालचालीची माहिती फ्रेडी यंगला देत होता.
एक दिवस मुन्शीने सुलतानाला एका ठिकाणी बोलावलं, त्याठिकाणी पोलीस आधीच दबा धरून बसले होते. मुन्शीने रचलेल्या सापळ्यात सुलताना अडकताच सॅम्युअल पॅरिस नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याला पकडलं. सुलतानाने बंदूक चालवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा प्रयत्न फोल ठरला. कारण पोलिसांनी त्याची बंदूक हिसकावली होती.
त्याने पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला पण एका हवालदाराने त्याच्या पायावर रायफलची बट मारली. अशा प्रकारे सुलतानाला अटक करण्यात आली. फ्रेडी यंग या ऑपरेशनचं नेतृत्व करत होता. त्याच्या या यशानंतर त्याला भोपाळच्या आयजी जेल पदी पदोन्नती देण्यात आली.
फ्रेडी यंगने सुलतानाला अटक केली आणि त्याला आग्रा तुरुंगात नेण्यात आलं. तिथे त्याच्यावर खटला चालवला गेला आणि सुलतानासह 13 जणांना फाशीची शिक्षा झाली. यासोबतच सुलतानाच्या अनेक साथीदारांना जन्मठेपेची आणि काळ्या पाण्याची शिक्षाही झाली.
सात जुलै 1924 मध्ये सुलतानाला फासावर लटकवण्यात आलं. पण त्याच्या दहशतीची आणि भीतीची चर्चा त्याच्या मृत्यूनंतरही बराच काळ सुरू होती.
सुलताना आणि त्याला पकडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची मैत्री

फोटो स्रोत, PARAMOUNT PICTURES / RD FILMS
सुलतानाच्या मनात इंग्रजांविषयी खूप द्वेष होता. याच द्वेषामुळे तो आपल्या कुत्र्याला ‘रायबहादूर’ नावाने हाक मारायचा. कारण ‘रायबहादूर’ ही पदवी ब्रिटिश सरकार त्यांच्या निष्ठावान भारतीयांना देत असे.
सुलतानाच्या घोड्याचं नाव 'चेतक' होतं. जिम कॉर्बेट लिहितात की, ज्या काळात सुलतानावर खटला सुरू होता त्या दरम्यान तो आणि फ्रेडी यंग चांगले मित्र झाले. सुलतानाला बेड्या घालणारा फ्रेडी यंग सुलतानाच्या कथेने इतका प्रभावित झाला की त्याने सुलतानाला माफीची शिक्षा मिळावी म्हणून अर्ज तयार करायला मदत केली. पण हा अर्ज फेटाळण्यात आला.
सुलतानाने फ्रेडी यंगला विनंती केली होती की, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सात वर्षांच्या मुलाला उच्च शिक्षण मिळावं. फ्रेडी यंगने सुलतानाच्या इच्छेचा आदर केला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाला उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवलं.
शिक्षण घेतल्यानंतर तो भारतात परतला. त्याने आयसीएस परीक्षा पास झाल्यानंतर तो पोलिस खात्यात उच्च अधिकारी झाला. पुढे महानिरीक्षक पदावरून निवृत्त झाला.
सुलतानावर सिनेमा
सुलताना जिवंतपणीच एक काल्पनिक पात्र, दंतकथा बनला होता. जनतेने त्याच्यावर प्रेम केलं, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असलेल्या गुणांमुळे त्याच्याकडे साहित्यिक आणि लेखक आकर्षित झाले. त्यामुळे हॉलीवूड, बॉलीवूड आणि लॉलीवूड या तिन्ही ठिकाणी
त्याच्यावर सिनेमे बनविण्यात आले.
हॉलिवूडमध्ये जो सिनेमा बनविण्यात आला त्याचं नाव होतं 'द लाँग डेव्हिल'. यात सुलतानाची भूमिका युल ब्रेनरने केली होती.
पाकिस्तानमध्ये 1975 मध्ये पंजाबी भाषेत त्याच्यावर एक सिनेमा बनवण्यात आला. यात सुलतानाची भूमिका कलाकार सुधीर यांनी साकारली होती.
सुलतानाच्या व्यक्तिरेखेवर सुजित सराफ यांनी 'द कन्फेशन ऑफ सुलताना डाकू' नावाची कादंबरीही लिहिली.
भूपत डाकू

फोटो स्रोत, PAKISTAN CHRONICLE
पाकिस्तान हा देश नकाशावर अस्तित्वात आल्यानंतर दोन दरोडेखोरांचं नाव मोठं झालं. यातला पहिला होता जुनागढचा भूपत डाकू.
जुनागढ हे सुखाने नांदणारं संस्थान होतं. पण त्याचं सुख दरोडेखोरांना बघवत नव्हतं. पाकिस्तान अस्तित्वात येण्यापूर्वी जुनागढच्या दरोडेखोरांमध्ये हिरा झिना आणि भूपत डाकू ही नावं चर्चेत असायची.
या दरोडेखोरांच्या कित्येक गोष्टी लोककथांप्रमाणे सांगितल्या जात होत्या. पाकिस्तान बनल्यानंतर भूपत डाकू पाकिस्तानात आला आणि 1952 मध्ये त्याला त्याच्या तीन साथीदारांसह अटक करण्यात आली.
भूपत डाकूने भारतातील शिवराष्ट्रात दरोडे आणि खूनाचं सत्र आरंभलं होतं. त्याच्यावर दोनशेहून अधिक खून व दरोड्याचे गुन्हे दाखल होते. भूपतच्या अटकेसाठी भारत सरकारने पन्नास हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं.
विशेष म्हणजे भारतात त्याच्यावर इतके गुन्हे दाखल होते, त्याच्या अटकेवर एवढं मोठं बक्षीस जाहीर केलं होतं, पण पाकिस्तानात मात्र भूपत डाकूवर कोणताही गुन्हा दाखल नव्हता. त्यामुळे पाकिस्तानात विना परवाना आल्याबद्दल आणि विना परवाना शस्त्र बाळगल्याच्या आरोपावर त्याला अटक करण्यात आली.
भूपतला पाकिस्तानात अटक झाल्याची बातमी भारत सरकारला मिळाल्यानंतर भूपतला भारताच्या स्वाधीन करावं म्हणून भारत सरकारने पाकिस्तान सरकारशी बोलणी सुरू केली. पण त्यावेळी गुन्हेगारांच्या हस्तांतरणाबाबत दोन्ही देशांमध्ये कोणताही करार झाला नव्हता. त्यामुळे भूपत पाकिस्तानातच राहिला.
हे प्रकरण इतकं महत्त्वाचं मानलं गेलं की, भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू स्वत: पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान मोहम्मद अली बोगरा यांच्याशी या प्रकरणासंदर्भात बोलले होते.
मोहम्मद अली बोगरा म्हणाले की, आम्ही भूपतला भारतीय सीमेपलीकडे ढकलून देऊ तिथून तुम्ही त्याला अटक करा. पण नंतर ही बातमी मीडियामध्ये लीक झाली आणि पाकिस्तानने आपल्या प्रस्तावापासून फारकत घेतली.
पुढे भूपत डाकू एका वर्षाने तुरुंगाबाहेर आला. तुरुंगात असताना त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्याला अमीन युसूफ हे नाव देण्यात आलं.
अमीन युसूफने सुटकेनंतर हमीदा बानो या मुस्लिम महिलेशी विवाह केला. तिच्यापासून मोहम्मद फारूख, मोहम्मद रशीद, मोहम्मद यासीन अशी तीन मुले आणि नजमा, बिल्कीस, परवीन, बाई मां या चार मुली झाल्या. अमीन युसूफने कराचीमध्ये दुधाचा व्यवसाय सुरू केला.
पाकिस्तान चौकात त्याचं दुधाचं दुकान होतं. बऱ्याचदा मी त्याच्या दुकानात लस्सी प्यायलो आहे. अमीन युसूफने हजची यात्रा सुद्धा केली होती.
अमीन युसूफने तुरुंगात असताना कालू वानिक नावाच्या एका व्यक्तीकडून त्याची कथा लिहून घेतली. आणि याचा उर्दू अनुवाद जाफर मन्सूर यांनी केला होता. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1957 मध्ये शिखर आणि 2017 मध्ये कराचीतून प्रकाशित झाली होती. 28 सप्टेंबर 1996 मध्ये कराचीत अमीन युसूफचं निधन झालं. त्याला कराचीतील स्मशानभूमीत दफन करण्यात आलं.
मोहम्मद खान डाकू

फोटो स्रोत, PAKISTAN CHRONICLE
1960 च्या दशकात पंजाबमध्ये एका दरोडेखोराची चर्चा जोरावर होती. काल्पनिक कथांपेक्षा याच्या नावाच्या सुरस कथा प्रसिद्ध झाल्या होत्या. या दरोडेखोराचं नाव होतं मोहम्मद खान.
मोहम्मद खानचा जन्म 1927 मध्ये धरनाळ मध्ये झाला होता. तो सैन्यात हवालदार म्हणून काम करत होता. एका भांडणात त्याच्या भावाचा खून झाला होता. याचा बदला घेण्यासाठी त्याने एकाचा खून केला आणि फरार झाला.
पोलिसांनी त्याला जाहिरात देऊन त्याला गुन्हेगार म्हणून घोषित केलं. तो फरार झाल्यावर काही लोकांनी त्याच्या दुसऱ्या एका भावाचा खून केला. या घटनेनंतर मोहम्मद खान सूडाच्या आगीत वेडा झाला. त्याने आपली एक टोळी तयार करून खुनात सामील असणाऱ्यांचा काटा काढायला सुरुवात केली, सोबतच लुटमार देखील चालू केली. काही वेळेस तर त्याने पोलिसांना आणि विरोधकांना आधी माहिती देऊन मग खून केले.
त्याचा परिणाम असा झाला की, एखाद्या साध्या हवालदारापासून ते एसपीपर्यंत कोणीही त्याच्या परवानगीशिवाय त्याच्या गावात जात नव्हतं. कालाबागचे नवाब मलिक अमीर मोहम्मद खान यांच्याशी त्याचे जवळचे संबंध होते. कालाबागचे नवाब पश्चिम पाकिस्तानचे गव्हर्नर असेपर्यंत कोणीही मोहम्मद खानवर हात टाकण्याचं धाडस केलं नाही. 1963 ते 1966 दरम्यान तो डोक्यावर मुकुट नसलेला बेताज बादशहा होता.
1965 च्या अध्यक्षीय निवडणुकीत त्याने अध्यक्ष आयुब खान यांच्यासाठी सर्व बीडी सदस्य आणि त्याच्या भागातील अध्यक्षांची मतं मिळवली. कालाबागच्या नवाबाचं राज्यपालपद संपल्यानंतर मात्र त्याला अटक करण्यात आली.
12 सप्टेंबर 1968 मध्ये मोहम्मद खानला चार वेळा मृत्युदंड आणि 149 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मोहम्मद खानने या सर्वांविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली आणि स्वत:ची केस स्वतः लढवली.

फोटो स्रोत, PAKISTAN CHRONICLE
त्याने न्यायालयात सिद्ध करून दाखवलं की, तपास अधिकाऱ्याचं माझ्याशी वैयक्तिक वैर असल्यामुळे त्याने माझ्यावर खोटेनाटे आरोप लावले आहेत. माझ्या नशिबात काय वाढून ठेवलंय ते मला बघावंच लागेल पण न्यायालयाने माझं म्हणणं निदान ऐकून घेतलं याचं मला समाधान आहे. न्यायलयाने त्याचं म्हणणं ऐकून घेऊन त्याच्या दोन फाशीच्या शिक्षा कमी केल्या मात्र इतर दोन फाशीच्या शिक्षा कायम ठेवल्या.
8 जानेवारी 1976 रोजी त्याला फासावर लटकवण्याचा आदेश देण्यात आले. पण शिक्षेच्या अवघ्या 5 तास आधी न्यायालयाने आपला निर्णय बदलला.
1978 मध्ये त्याच्या फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. पुढे बेनझीर भुट्टोच्या सरकारने 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कैद्यांसाठी माफी जाहीर केल्यानंतर मोहम्मद खानची तुरुंगातून सुटका झाली.
29 सप्टेंबर 1995 रोजी त्याने जगाचा निरोप घेतला. चकवाल जिल्ह्यातील तिला गंग तालुक्यातील ढोक मसायब या त्याच्या मूळ गावी त्याचा दफनविधी करण्यात आला.
दिग्दर्शक कैफी यांनी मोहम्मद खानच्या आयुष्यावर पंजाबी चित्रपट बनवला. चित्रपटाला नावही मोहम्मद खानचंच देण्यात आलं. यातली मुख्य भूमिका सुलतान राही यांनी साकारली होती. पण स्क्रिप्ट यथातथाच असल्याने चित्रपटही फारसा चालला नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








