ठग्स ऑफ हिंदुस्तान: रक्ताचा थेंबही न सांडता 'या' ठगाने केले होते 719 खून

ठग्स

फोटो स्रोत, Gopal shoonya

    • Author, राजेश प्रियदर्शी
    • Role, डिजिटल एडिटर, बीबीसी हिंदी

'ठग' शब्द ऐकताच चतुर आणि धूर्त माणसाची प्रतिमा डोळ्यासमोर येते जो तुम्हाला फसवून तुमच्या मौल्यवान वस्तू चोरून नेतो. मात्र एकोणविसाव्या शतकात भारतात इंग्रजांची ज्या ठगांशी गाठ पडली ते इतके साधे नव्हते.

ठगांविषयीचा मनोरंजक आणि खात्रीशीर तपशील 1839मध्ये प्रकाशित झालेल्या 'कन्फेशन ऑफ अ ठग' या पुस्तकात मिळते. पोलीस सुप्रिटेंडंट फिलिप मिडो टेलर यांनी हे पुस्तक लिहिलं. मात्र आपण केवळ लिखाण केल्याचं त्यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगितलं आहे.

खरंतर साडेपाचशे पानांचं हे पुस्तक म्हणजे ठगांचा सरदार आमीर अली खान याचं कन्फेशन म्हणजेच कबुली जबाब आहे. फिलिप मिडो टेलरने आमीर अलीशी तुरुंगात अनेक दिवस बातचीत केली आणि त्याची सगळी नोंद ठेवली. टेलर सांगतात, "ठगांच्या सरदाराने जे काही सांगितलं ते सर्व मी जवळपास शब्दशः लिहीत गेलो. त्याला मध्येच थांबवणं किंवा काही विचारण्याची फार गरजही पडायची नाही."

आमीर अलीने दिलेला कबुलीजबाब इतका माहितीपूर्ण आणि मनोरंजक आहे की त्याची कादंबरीच तयार झाली आणि प्रकाशित होताच ती फार गाजली. टेलर यांनी आमीरला "तू किती लोकांना मारलंस?" हे विचारलं तेव्हा त्याने हसून सांगितलं, "अहो साहेब, ते तर मी तुमच्या तावडीत सापडलो नाही तर हजार पार केले असते. तुम्ही लोकांनी 719वरच थांबवलं."

ठग्स

फोटो स्रोत, Gopal shoonya/bbc

ठगांची समस्या इतकी मोठी होती की इंग्रजांना त्यांचा सामना करण्यासाठी एक वेगळा विभाग तयार करावा लागला. तोच विभाग म्हणजे आजचा इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच गुप्तचर विभाग.

टेलर यांनी लिहिलंय, "अवध ते दख्खनपर्यंत ठगांचं जाळं होतं. ते खूप गुप्तपणे काम करायचे, त्यामुळे त्यांना जेरबंद करणं खूप कठीण होतं. त्यांना सामान्य लोकांपासून वेगळं ओळखता येण्याचा काही पर्यायच नव्हता. ते आपलं काम योजना आखून आणि अत्यंत चलाखीने करायचे. त्यामुळे कुणालाच त्यांच्यावर संशय यायचा नाही."

ठगांना पकडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विभागाचे सुप्रिटेंडेंट कॅप्टन रेनॉल्ड्स यांनी 1831 ते 1837 या दरम्यान केलेल्या कारवाईचा तपशील 1838 साली दिला. या तपशीलानुसार पकडण्यात आलेल्या ज्या 1059 लोकांवर दोष पूर्णपणे सिद्ध होऊ शकला नाही. त्यांना दूर मलेशियाजवळच्या पेनांग बेटावर नेऊन सोडण्यात आलं. याशिवाय 412 जणांना फाशी देण्यात आली तर 87 ठगांना जन्मठेप सुनावण्यात आली.

ठगांचं गुप्त आणि गूढ जीवन

ठगांसाठी इंग्रजांनी 'सिक्रेटिव्ह कल्ट', 'हाइवे रॉबर्स' आणि 'मास मर्डरर' असे शब्दप्रयोग वापरले होते. 'कल्ट' म्हणण्यामागचं प्रयोजन म्हणजे या ठगांचे आपल्या चालीरिती, प्रथा-परंपरा, श्रद्धा, विश्वास, मान्यता होत्या. हे ठग या सर्वांचं धर्माप्रमाणे आचरण करायचे. त्यांची स्वतःची अशी गुप्त भाषा होती. त्या भाषेला रमासी म्हटलं जायचं.

ऑक्सफर्डने प्रसिद्ध केलेल्या कन्फेशन्स ऑफ ठग्स पुस्तकाचं मुखपृष्ठ

फोटो स्रोत, Book cover Image

फोटो कॅप्शन, ऑक्सफर्डने प्रसिद्ध केलेल्या कन्फेशन्स ऑफ ठग्स पुस्तकाचं मुखपृष्ठ

भारतात ठगांवर जरब बसवण्याचं श्रेय मेजर जनरल विलियम हेनरी स्लीमन यांना दिलं जातं. इंग्रज सरकारने त्यांचा 'सर' पदवी देऊन गौरव केला होता. स्लीमन लिहितात, "ठगांच्या टोळीत हिंदू, मुस्लीम दोन्ही असायचे. अशा प्रकारच्या लुबाडणुकीची सुरुवात कशी झाली हे सांगणं अशक्य आहे. मात्र समाजात प्रतिष्ठा असलेले शेख ते मुस्लीम आणि सर्व जातीतल्या हिंदूंचा या टोळ्यांमध्ये समावेश होता."

मुहूर्ताला महत्त्व

हिंदू असो की मुस्लीम, ठग शुभ मुहूर्तू बघून पूजा-अर्चा करून कामावर निघायचे. याला 'जिताई पर जाना' म्हटलं जायचं. दुर्गापूजा ते होळीपर्यंतचा काळ हा ठगीचा काळ असायचा. कडाक्याचं ऊन आणि पावसात रस्त्यावर प्रवासीही कमी असायचे. त्यामुळे काम करणं कठीण व्हायचं. वेगवेगवळ्या टोळ्या आपल्या आस्थेनुसार मंदिरांमध्ये जायचे.

कालीमाता

फोटो स्रोत, Gopal shoonya/bbc

फोटो कॅप्शन, ठग्स हे कालीमातेची आराधना करत

बऱ्याचशा ठग टोळ्या काली देवीच्या भक्त असायच्या. याशिवाय प्रत्येक कामाआधी ते शकुन-अपशकुनाचा विचार करायचे. घुबडाचा आवाज, कावळ्याचं उडणं, मोराचं केकाटणं, लांडगा दिसणं, या सर्वांचा ते त्यांच्या परीने अर्थ लावायचे.

'जिताई पर जाना' म्हणजेच मोहिमेवर जाण्याच्या सात दिवसांआधीपासून 'साता' सुरू व्हायचा. या दरम्यान ठग आणि त्याचे कुटुंबीय खान-पान, झोपणं-उठणं, आंघोळीसारख्या गोष्टीत कठोर नियमांचं पालन करत.

साता दरम्यान बाहेरच्या व्यक्तीशी बोलणं, कुणाला आपल्या घरी बोलावणं किंवा त्याच्या घरी जाणं, या सर्व गोष्टी वर्ज्य असायच्या. या दरम्यान कुठल्याही प्रकारचं दानकर्म केलं जात नव्हतं. नियम इतके कडक असायचे की कुत्र्या-मांजरांनाही काहीही दिलं जात नव्हतं. मोहिमेत यश मिळालं की मग पूजा-अर्जा, दान-पुण्य केलं जायचं.

याच पद्धतीने 'इटब'च्या नियमांचं पालन व्हायचं. कामावर निघायच्या आधी पूर्णपणे पवित्र असणं, खूपच आवश्यक आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. टोळीतल्या एखाद्या सदस्याच्या घरात जन्म किंवा मृत्यू झाला तर दहा दिवसांसाठी, पाळीव प्राण्याचा मृत्यू झाला तर तीन दिवसांसाठी, तसंच जन्म झाला तर सात दिवसांसाठी एकतर संपूर्ण टोळीच थांबायची किंवा ज्याच्या घरात जन्म किंवा मृत्यू झाला आहे तो ठग मोहिमेवर जायचा नाही.

'कस्सी'चं महत्त्व

ठार झालेल्या लोकांची ज्या कुदळीने कब्र खोदली जायची त्याला 'कस्सी' म्हणायचे. तिचा फार आदर व्हायचा.

सखोल संशोधनांती उर्दू आणि हिंदीत लिहिलेल्या 'कई चांद थे सरे आसमां' या प्रसिद्ध कादंबरीत शम्सुर्रहमान फारुखी यांनी कस्सी पूजनाचं वर्णन अशा शब्दात केलं आहे...

"स्वच्छ ठिकाणी एका ताटात कुदळीला पाण्याने धुतलं जायचं. यानंतर पूजाविधी माहिती असणारा ठग मधोमध बसतो. इतर ठग आंघोळ करून त्याच्या भोवती बसतात. कुदळीला आधी गुळाचं पाणी, त्यानंतर दही आणि शेवटी दारूने स्नान घातलं जातं. त्यानंतर तीळ, जव, पान आणि फुलांनी तिची पूजा केली जाते. कुदळीच्या टोकावर शेदुराचे सात टिळे लावले जायचे. त्या कुदळीने एक नारळ फोडतात. नारळ फुटल्यावर सर्वच ठग, हिंदू असो की मुस्लीम, 'जय देवी माई की' असा जयघोष करतात."

या पुस्तकातही ठगांचा उल्लेख आहे.

फोटो स्रोत, Book cover image

ठगांवर कुदळ देवीचा आशीर्वाद असतो, असा समज होता. याशिवाय एक विशेष बाब म्हणजे नियमांचं पालन करून काम केलं तर त्यांच्यावर देवीची कृपा राहील, असं ठगांना वाटायचं.

पहिला नियम होता की हत्या करताना एक थेंबही रक्त सांडायला नको. दुसरं म्हणजे कुठल्याही परिस्थितीत स्त्री आणि लहान मुलं ठार होता कामा नये, तिसरा नियम म्हणजे जोवर मुद्देमाल मिळण्याची शक्यता नसेल, हत्या बिलकुल व्हायला नको.

टेलरने आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, "आमीर अलीला आपल्या कृत्याचा जराही पश्चाताप नव्हता." इतर ठगांबद्दलही मेजर जनरल स्लीमन यांनी लिहिलं आहे, "आपण काही चुकीचं करत आहोत, असं त्यांना वाटायचंच नाही. इतर कुठल्याही व्यवसायाप्रमाणे हादेखील एक व्यवसायच आहे, असं त्यांना वाटायचं. निष्पाप लोकांना मारून त्यांना गायब करून दिल्याचं त्यांना जराही दुःख किंवा पश्चाताप नव्हता."

रस्त्यांवर कसे लुबाडायचे?

जिताईवर निघालेल्या ठगांची टोळी वीस ते पन्नास लोकांची असायची. ते साधारणपणे तीन गटांमध्ये चालायचे. एक मागे, एक मध्यभागी आणि एक पुढे. या तिन्ही गटांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक-दोन माणसं असायची. ते वेगात किंवा हळू चालून एकत्र यायच किंवा दूर-दूर व्हायचे.

अनेक ठगांना अनेक भाषा, संगीत, भजन-किर्तन, नात-कव्वाली आणि हिंदू-मुस्लीम दोन्ही धर्मातल्या चाली-रिती माहिती असायच्या. तीर्थयात्री, लग्नातलं वऱ्हाड, मजारवर जाणारे भाविक किंवा नकली अंत्ययात्रा काढणारे, अशी वेगवेगळी रूपं ते गरजेनुसार धारण करायचे.

एकाच रस्त्यात ते अनेकदा रूप बदलायचे. त्यामुळे अर्थातच वेष बदलण्यात ते पटाईत होते. आपल्या सावजाला जराही संशय येऊ न देता खूप धीराने ते आपलं काम करायचे.

आमीर अलीने टेलर यांना सांगितलं की त्यांनी जे केलं त्याचा त्यांना पश्चाताप नाही

फोटो स्रोत, Gopal shoonya/bbc

फोटो कॅप्शन, आमीर अलीने टेलर यांना सांगितलं की त्यांनी जे केलं त्याचा त्यांना पश्चाताप नाही

ठगांचे सरदार लिहिता-वाचता येणारे, प्रतिष्ठित व्यक्तींप्रमाणे वागणारे असायचे. आपण जमीनदार आणि धनाढ्य लोकांशी गरजेनुसार कधी नवाबांचा शिपाई, तर कधी मौलवी तर कधी यात्रेकरूंचं नेतृत्व करणारे पंडित म्हणून भेटायचो, याचं तपशीलवार वर्णन आमीर अलीने 'कन्फेशन ऑफ अ ठग' या पुस्तकात केलं आहे.

आमीर अलीने सांगितलं की ठगांना काम वाटून दिलेलं असायचं. 'सोठा' टोळीची माणसं सर्वाधिक हुशार, लोकांना आपल्या वाक् चातुर्याने फसवणारे असायचे. सावज घेरण्यासाठी ते गावात फिरत असायचे. येणाऱ्या-जाणाऱ्यावर लक्ष्य ठेवायचे. मग त्यांच्या मालमत्तेचा अंदाज घेऊन त्यांना फसवायचे. आमिर अलीच्या टोळीचा सोठा गोपाळ होता. तो 'अत्यंत चातुर्याने आपलं काम करायचा.'

सावज हेरला की टोळीतले काही त्याच्या मागे, काही पुढे आणि काही सर्वांत पुढे चालायचे. संपूर्ण रस्ताभर या ठगांची संख्या वाढत जायची. मात्र आपण एकमेकांना ओळखतच नाही, असे ते वावरायचे. आपल्या माणसांना आपल्यासोबत येण्यापासून थांबवण्याचे नाटक करायचे. त्यामुळे कुणाला संशय यायचा नाही. हे सगळं काम खूपच शांत डोक्याने करावं लागायचं. गडबडीला जागाच नव्हती.

आमीर अलीने टेलर यांना सांगितलं होतं की अनेकदा आठवडा-दहा दिवस योग्य संधीची वाट बघितली जायची. काही गडबड वाटली तर मोहीम रद्द केली जायची.

कमालीचं सामंजस्य

सर्वांत पुढे चालणाऱ्या गटात 'बेल' म्हणजेच कबर खोदणारी माणसं असायची. किती जणांची कबर खोदायची आहे, हे त्यांना मधल्या गटात चालणारे कडीचं काम करणारी माणसं सांगायची. टोळीवर कुणी लक्ष्य ठेवून आहे का, हे बघण्याची जबाबदारी मागच्या टोळीवर असायची. शेवटी तिन्ही गट खूप जवळ यायचे. मात्र सावजाला हे कळायचं देखील नाही.

असं अनेक दिवस झाल्यानंतर जेव्हा सावज सावध नसायचा आणि जागाही योग्य असायची तेव्हा टोळीला कारवाईसाठी सतर्क करण्यासाठी आधीच ठरवण्यात आलेला शब्द उच्चारला जायचा. आमीर अलीने आपल्या कबुली जबाबात सांगितलं की यासाठी 'सरमस्त खा', 'लद्दन खा', 'सरबुलंद खा', 'हरिराम' किंवा 'जयगोपाल' अशा नावांचा वापर केला जायचा.

हा कारवाईसाठीचा पहिला इशारा असायचा. यानंतर ठगांमधल्या सर्वांत प्रतिष्ठित व्यक्तीची पाळी असायची. त्यांना 'भतौट' किंवा 'भतौटी' म्हटलं जायचं. रक्ताचा एक थेंबही न सांडता रुमालात बांधलेल्या रुपयाच्या मदतीने सावजाचा गळा आवळून हे भतौट त्यांची हत्या करायचे. प्रत्येक सावजामागे एक भतौट असायचा. सगळं काम एकत्र दोन ते तीन मिनिटात व्हायचं. कामासाठी तयार असलेले ठग आपल्या प्रमुखाच्या 'झिरनी'ची वाट बघायचे.

झिरनी म्हणजे काय?

आपल्या समोर उभ्या किंवा बसलेल्या सावजाचा गळा आवळण्यासाठी झिरनी हा शेवटचा इशारा असायचा. आमीर अलीने एका झटक्यात 12-15 धष्टपुष्ट पुरुषांना ठार केल्याचं वर्णन अतिशय सहजतेने केलं.

त्याने टेलरला सांगितलं, "इशारा म्हणजे झिरनी सहसा सुरती खा, हुक्का पाजा किंवा गाणं ऐकवा, यासारखे छोटे वाक्य असायचे. मग क्षणाचाही विलंब न करता भतौट सावजाच्या गळ्यात फास टाकायचे. मग दोन-तीन मिनिट तडफडून माणूस गार व्हायचा."

यानंतर मृतदेहावरून मौल्यवान वस्तू बाजूला करून एकाच्या शीराजवळ दुसऱ्याचे पाय असा तऱ्हेने मृतदेह आधीच खणून ठेवलेल्या कबरीत पुरले जायचे. या पद्धतीने मृतदेह ठेवल्यास कमी जागेत जास्त माणसाना पुरता यायचं. यानंतर ती जागा समतल करून आधीच आणून ठेवलेली काटेरी झाडी त्यावर लावली जायची. जंगली प्राण्यांनी कबरी खोदी नये, यासाठी ही व्यवस्था असायची. अशा प्रकारे जात असलेले जत्थेच्या जत्थे एकदम गायब व्हायचे आणि ठगही.

वेगळेच जीव होते ठग

आमीर अलीने आपल्या कबुली जबाबात सांगितलं की तो उत्तर प्रदेशातल्या जालौनमध्ये आपली बायको आणि मुलीसोबत राहायचा. अनेकांना तो मुसलमान जमीनदार किंवा व्यापारी वाटत असे. वर्षातले सात-आठ महिने तो घरी एका प्रतिष्ठित मुसलमानासारखा राहायचा आणि योग्य वेळी पूजा-अर्चा करून चार महिन्यांसाठी 'जिताई'वर निघायचा.

ठग कोण आहेत, हे खूप कमी लोकांना माहिती असायचं. मात्र ते एक पूर्ण नेटवर्क असायचं. हा संघटित गुन्हा होता. आमीर अलीच्या म्हणण्यानुसार अनेक छोटे-मोठे जमीनदार आणि नवाब ठगांपासून नजराना वसूल करायचे आणि संकटसमयी त्यांना आसराही द्यायचे. मात्र इंग्रजांना त्याचा थांगपत्ताही लागू द्यायचे नाही.

याच प्रकारे अनेक जमीनदारांनी अनेक ठगांना आपली नापीक जमीन वापरायला दिली होती. तिथे हे ठग सामूहिक कबरी खोदायचे. याबदल्यात ठग त्यांना हिस्सा द्यायचे.

याच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी ठगांची मदतनीस असायचे. ठग त्यांना पैसे द्यायचे. मदत करणाऱ्या अनेकांना आपण कुणाला मदत करत आहोत, हे बरेचदा माहितीही नसायचं.

कोण ठग आहे आणि कोण नाही, यावर इंग्रजांना बराच काथ्याकूट करावा लागला. फिलिप मिडो टेलर यांनी आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत 1825-26 सालच्या एका घटनेचा उल्लेख केला आहे. ते लिहितात, "मी हिंगोलीत तैनात होतो. तिथे हरी सिंह नावाचा एक व्यापारी होता. आम्ही त्याच्याशी व्यवहार करायचो. एक दिवस त्याने बॉम्बेहून कापड मागवण्याचं परमिट मागितलं. त्याला ते देण्यात आलं. त्याने कापड आणलं आणि मिलिट्री कॅन्टोन्मेंटमध्ये ते विकलं. ते कापड भलत्याच व्यापाऱ्याचं होतं. हरी सिंह याने त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना मारून कापड लुटलं होतं. हरी सिंह एक ठग होता."

हरी सिंह ठग असल्याचं इंग्रजांना अनेक वर्षांनंतर समजलं. त्याला जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा त्याने गोऱ्या साहेबांची थट्टा करत आपण कसं परमीट घेऊन गोऱ्या साहेबांना फसवलं, हे सांगितलं.

1835 सालानंतर जेव्हा ठगांना अटक व्हायला सुरुवात झाली तेव्हा ठगी किती मोठ्या प्रमाणावर चालते, हे समजायला लागलं. फिलिप मिडो टेलर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, "मी मंदसौरमध्ये सुप्रिटेंडंट होतो. तेव्हा सरकारी साक्षीदार बनलेल्या एका ठगाच्या सांगण्यावरून आम्ही एका ठिकाणी खणायला सुरुवात केली तेव्हा तिथे इतक्या सामूहिक कबरी सापडल्या की शेवटी आम्ही खोदकामच बंद केलं."

ठगांवर सव्वाशेर ठरले आफ्रिकी गुलाम

सखोल संशोधनांती लिहिलेल्या शम्सुर्रहमान फारुखी यांच्या 'कई चांद थे सरे आसमां' या कादंबरीत 1843-44मध्ये रामपूरच्या नवाबांचे खास दरबारी मिर्जा तुराब अली यांची ठगांनी हत्या केल्याची घटना तपशीलवार सांगितलेली आहे. यात सांगितलं आहे की बिहारच्या सोनपूरमधल्या जत्रेत हत्ती-घोडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या मिर्जा तुराब आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांना ठगांनी ठार केलं.

मिर्जा तुराब अली आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हत्येचा जो तपशील मिळाला आहे त्यानुसार ठगांनी एका मृत मुसलमान प्रवाशाच्या अंतयात्रेत नमाज पठणाच्या बहाण्याने शसस्त्र मिर्जा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घोड्यावरून उतरवलं होतं. जेव्हा ते नमाज वाचत होते तेव्हाच 'सुरती खिलाओ'चा आवाज आला आणि सात जणांचा रुमालाने गळा आवळून खून करण्यात आला.

तुराब अली रामपूरला परतले नाही तेव्हा ते ठगांच्या तावडीत तर सापडले नाहीत ना, असा संशय नवाबांना आला. त्यांनी अफ्रिकेतून गुलाम म्हणून गुजरातच्या किनाऱ्यावर आणण्यात आलेल्या अफ्रिकी लोकांबद्दल ऐकलं होतं. त्यांना सिद्दी म्हणायचे. त्यांनी या कामासाठी सिदी इकराम आणि सिदी मुनइम यांची मदत घ्यायचं ठरवलं.

सिद्दीबद्दल फारुखी लिहितात, "वंशावरून त्यांना सिद्दी तर कामावरून त्यांना खोजिया म्हटलं जायचं. त्यांच्या कौशल्याची चर्चा दूरवर पसरली होती. त्यांना गुजरातपासून अवधपर्यंत बोलवलं जाऊ लागलं. जुने पायांचे ठसे, बेपत्ता लोकांचा शोध घेणं आणि फरार लोकांचा माग काढण्यात ते सराईत होते. ते एकमेकांशी स्वाहिलीत तर इतरांशी हिंदीत बोलायचे."

कन्फेशन्स ऑफ ठग्स

फोटो स्रोत, Book cover image

रामपूरच्या नवाबांनी आपल्या विश्वासू मिर्जा तुराब अली आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शोध घेण्याची जबाबदारी सिद्दीवर टाकली. सिद्दी रस्ताभर झेंडे लावायचे. प्रत्येक वस्तू बारकाईने तपासायचे. फारुखी लिहितात, "ते एका मोठ्या चौकोनी मैदानात पोहोचले. तिथे त्यांनी लाकडाने मोठ-मोठे चौकोन बनवले. यानंतर त्यांनी एक-एक करत त्या चौकोनांचा वास घ्यायला सुरुवात केली आणि माती उकरणं सुरू केलं. श्वानपथकातल्या कुत्र्यांपेक्षाही जास्त एकाग्रचित्ताने ते आपलं काम करत होते."

ते एका जागी पोहोचले आणि आवाज दिला, "जमादारजी, वो मारा. यहा खुदाई करवाओ" तिथे खणलं असता मिर्जा तुराब अलीसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मृतदेह तिथे सापडले.

सिद्दी आजही गुजारतमधल्या काही भागात वसले आहेत. मात्र ठग पूर्णपणे संपले आहेत.

ठग आमीर अलीबाबत सांगण्यासारखी एक फिल्मी वाटणारी गोष्ट म्हणजे एका ठगानेच एका मोहिमेदरम्यान आमीरच्या वडिलांचा खून केला होता. त्यानंतर त्या ठगाने आमीरचा अगदी आपल्या पोरासारखा सांभाळ केला.

आमीरला दत्तक घेतलेल्या ठगाकडून त्याला ठगीची दिक्षा मिळाली. त्यामुळे त्याच्या लेखी ठगी एक चांगलं काम होतं.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)