ब्रिटिशांनी भारतातून नेमकी किती संपत्ती लुटून नेली?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जफर सैय्यद
- Role, बीबीसी उर्दू डॉट कॉम, इस्लामाबाद
बादशहाचा वाढदिवस आहे आणि मुघल रिवाजाप्रमाणे त्यांची तुला करण्यात येणार आहे. या समारंभाप्रसंगी ब्रिटिश राजदूत सर थॉमस रो सुद्धा दरबारात हजर आहेत.
जहांगीर बादशहाच्या वाढदिवसाचा शाही समारंभ, चहुबाजूंनी पाण्यानं वेढलेल्या एका चबुतऱ्यावर संपन्न होत आहे. मधोमध, सोन्याचा मुलामा दिलेला महाकाय तराजू ठेवला आहे. तराजूच्या एका पारड्यात कित्येक रेशमी थैल्या ठेवल्या आहेत. तर दुसऱ्या पारड्यात खुद्द, चौथे मुगल बादशाह शहनशाहा नुरुद्दीन मोहम्मद जहांगीर सावधपणे बसत आहेत.
जडभारी पोशाख, मुकूट, सोनं आणि दागदागिन्यांनी मढलेल्या बादशहा जहांगीर बादशहांचे वजन जवळपास २५० पौंड भरलं. तराजूच्या एका पारड्यात बादशहा बसले आहेत तर दुसऱ्या पारड्यात ठेवलेल्या रेशमी थैल्या एक-एक करून बदलल्या जात आहेत. पहिल्यांदा बादशहाची चांदीच्या नाण्यांनी तुला करण्यात आली.
तत्काळ ती सर्व नाणी गोरगरिबांमध्ये वाटली गेली. नंतर सोने, मग दागिने, उंची रेशीम आणि सरते शेवटी अन्य मौल्यवान वस्तूंनी बादशहाची तुला झाली.
चारशे वर्षांपूर्वीच्या एका शाही सोहळ्याचंहे सर्व वर्णन ब्रिटिश राजदूत सर थॉमस रो यांनी एका डायरीत नोंदवून ठेवलं आहे. मुघल बादशाह नुरुद्दीन मोहम्मद जहांगीर यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या त्या समारंभात ते स्वतः दरबारात हजर होते.
संपत्तीचे हे डोळे दिपवून टाकणारं प्रदर्शन पाहून सर थॉमस बुचकळ्यात पडले. राजाची तुला करताना, दुसऱ्या पारड्यातल्या बंद रेशमी थैल्यांमध्ये खरोखर सोनंच होतं ना? की दगडधोंडे? अशी शंका त्याच्या मनात आली.
पण मुख्य प्रश्न वेगळाच आहे, मुळात कोसोदूर असलेल्या, एका लहानशा बेटावरल्या देशाचा राजदूत त्यावेळी भारतात काय करत होता?
इंग्रजांसोबत करार म्हणजे 'प्रतिष्ठेशी प्रतारणा'
खरंतर सर थॉमस एका खास कामासाठी भारतात आले होते. एका लहानशा ब्रिटिश कंपनीला भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळावा यासाठीच्या सामंजस्य करारनाम्यावर काहीही करून स्वाक्षरी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
अर्थात सर थॉमस यांच्या डायरीतील नोंदी पाहून आपल्या लक्षात येते की, हे काम तितकं सहज साध्य ठरलं नाही. यासाठी त्या मेहनती राजदूताला भलतीच मेहनत घ्यावी लागली. त्याचं कारण म्हणजे, त्यावेळी बादशहाच्या दृष्टीने अख्ख्या जगात, इराणचे सूफी बादशाह आणि उस्मानी खलीफा हेच एकमेव तगडे प्रतिस्पर्धी होते.
इंग्लंड हे जहांगीर बादशाहाच्या मते खूपच लहान, ऐकिवात नसलेलं बेट होतं. अशा देशाच्या राजाबरोबर बरोबरीच्या नात्याने सामंजस्य करार करणं त्याला अप्रतिष्ठेचं वाटत होतं.

सर थॉमस याने मात्र हार न मानता तीन वर्षं अथक प्रयत्न सुरू ठेवले. कधी राजकारणातले डावपेच, तर कधी जहांगीर बादशहाला उंची भेटी देऊन, अखेर वली अहद शहजहानकडून एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी मिळवण्यात सर थॉमस यशस्वी झाला. त्याअन्वये त्याच्या कंपनीला सूरतेत कोणत्याही आडकाठीशिवाय व्यापार करण्याची परवानगी मिळाली. ही गोष्ट आहे आजपासून बरोबर 400 वर्षांपूर्वीच्या ऑगस्ट 1618 मधली आहे.
या कंपनीचं नाव होतं 'ईस्ट इंडिया कंपनी'. ही घटना कंपनीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरली.
युरोपातील एका देशाला, मुगल सल्तनतीने कायदेशीररीत्या करारनामा करून खुलेआम व्यापार करायला मोकळीक दिली आणि त्या देशातील कंपनीला प्रोत्साहनच दिले.
हे म्हणजे, आपल्या तंबूत उंटाला जागा करून देणाऱ्या अरबाच्या गोष्टीसारखे झाले होते.
सर थॉमस तुला प्रसंगाच्या वेळी तराजूच्या दुसऱ्या पारड्यातील वस्तूंच्या खरेपणाबद्दल साशंक होता. पण व्यापार करण्याच्या या परवानगीच्या परिणामीच, ब्रिटननं पुढल्या 350 वर्षांत भारतातल्या दौलतीची जी काही लूट केली, त्याचा आढावा घेण्याचा काही अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी प्रयत्न केला.
ती माहिती पुढे ओघाने येईलच. मात्र या आर्थिक नुकसानापेक्षा ही भयंकर ठरतील असे अन्य दुष्परिणाम ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश राज यांचे भारताच्या राजसत्तेवर झाले ते आधी जाणून घेऊया.
इतिहासातला चौथी भयावह घटना
अमेरिकी इतिहासकार मॅथ्यू व्हाईट यांनी "द ग्रेट बुक ऑफ हॉरिबल थिंग्स" नावाचे एक पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी इतिहासातील सर्वाधिक मनुष्यहानी झालेल्या 100 भयंकर घटनांची मिमांसा केली आहे. या पुस्तकात, ब्रिटिश राजवटीत भारतात आलेल्या दुष्काळाच्या घटनेची नोंद चौथ्या क्रमांकावर केली आहे. या आपत्तीत व्हाईट यांच्या मते 2 कोटी 66 लाख भारतीयांनी जीव गमावला होता, तरीही यात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बंगालमधील दुष्काळात मृत्युमुखी पडलेल्या 30 ते 50 लाख भारतीयांचा समावेश नव्हता.

फोटो स्रोत, Getty Images
ही दुष्काळाची घटना जमेस धरली तर ब्रिटिश राजवटीत उद्भवलेल्या केवळ दुष्काळाच्या संकटात जीव गमावलेल्याची संख्याच 3 कोटींपर्यंत पोहोचेल.
तेव्हाही आणि आजही, जगातील सर्वाधिक सुपीक प्रदेशांच्या यादीत भारताचं नाव घेतलं जातं. असं असूनही इतकी लोकसंख्या फक्त उपासमारीने का मरावी?
लेखक व्हाईट यांनी या दुष्काळाचे कारण 'व्यापाऱ्यांनी केलेले शोषण' असं सांगितलं आहे. हे विधान स्पष्ट करण्यासाठी आपण 1769 सालचा बंगालचा दुष्काळ विचारात घेऊ या.
नोबेल पुरस्काराने सन्मानित अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनीही या दुष्काळातील बळींची संख्या एक कोटी होती असे सांगितले आहे. तेव्हाच्या एका दृश्याचं, स्वतः इंग्रजांनीच केलेले वर्णन आपण वाचूया.
"दहा लाख लोक, अजून काही आठवडे जिवंत राहण्याची आस मनात घेऊन मरण पावले. त्या काही आठवड्यात पीक कापणीला आलं असतं. अगदी काही आठवड्यांचा अवधी होता, ते सर्वजण पिकांकडे डोळे लावून बसले होते, पिके तयार होणारच होती पण तो पर्यंत खूप उशीर झाला असता."
पिकाने डवरलेल्या शेतात, मानवी सापळे
पीक ठरल्या वेळी कापणीला आले, पण तेव्हा खरंच फार उशीर झाला होता. 1769 सालच्या याच दुरावस्थेची पुनरावृत्ती पावणेदोनशे वर्षांनी पूर्व बंगालमध्ये झाली.
16 नोव्हेंबर 1943 रोजीच्या टाइम्स ऑफ इंडियातील हे कात्रण, "पूर्व बंगाल मधील एक भीषण दृश्य. गेल्या पन्नास वर्षातील उत्तम पैदास, भरघोस पिकाने डवरलेले शेत पण त्यात कुजलेला सडलेला मानवी देहाचा सापळा नजरेस पडत होता आणि हे वरचेवर घडत होते."

फोटो स्रोत, Getty Images
साहीर लुधियानवी यांनी या अस्मानी आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एक नज्म लिहिली, त्यातले दोन शेर होते;
पचास लाख फ़सुर्दा, गले सड़े ढांचे
निज़ाम-ए-ज़र के ख़िलाफ़ एहतजाज करते हैं,
ख़ामोश होंटों से, दम तोड़ती निगाहों से
बशर बशर के ख़िलाफ़ एहतजाज करते हैं
दुष्काळ तर नैसर्गिक आपत्ती आहे, त्यात ईस्ट इंडिया कंपनीची काय चूक? असा प्रश्न कोणालाही पडेल. प्रसिद्ध तत्ववेत्ते विल ड्युरान्ट या संदर्भात लिहितात,
"भारतात आलेल्या महाभयंकर दुष्काळाच्या मुळाशी, निर्दयपणे केलेले शोषण, साधन-संपत्तीची असंतुलीत आयात आणि दुष्काळाच्या कालावधीतही, अत्यंत क्रूर पद्धतीने केलेली महागडी कर वसुली होती. उपासमारीने तडफडून मरायला टेकलेले शेतकरी कर भरू शकत नव्हते, पण सरकार मात्र मरणाऱ्या माणसांकडूनही करवसुली करायला मागे पुढे बघत नव्हतं."
एक लहानशी कंपनी, हजारो मैल दूर असलेल्या एका देशातील करोडो नागरिकांच्या आयुष्याचा फैसला करण्याइतकी बलाढ्य कशी होऊ शकली? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावून बघावे लागेल.
1498मध्ये, पोर्तुगीज वास्को द गामाने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाकडून जाणारे रस्ते शोधून, भारतातून युरोपला जोडणारा सागरी मार्ग शोधून काढला होता. नंतरच्या काही दशकांत धाकदपटशा, धमक्या आणि दंगे-धोपे करून पोर्तुगीजांनी, भारतातील किनारपट्टीवरील तमाम व्यापाऱ्यांवर दबाव आणला आणि बघता बघता पोर्तुगालचे नशीब उजळले.
हे पाहून तिकडे डच, तोफवाहू लढाऊ जहाज घेऊन भारताच्या किनारी भागात येऊन थडकले आणि पोर्तुगीज आणि डच यांच्यात खडाजंगी सुरू झाली.

फोटो स्रोत, FRANCIS HAYMAN/NATIONAL PORTRAIT GALLERY, LONDON
पोर्तुगीजांनी भारताच्या इतिहासात केलेली उलथापालथ, इंग्लंड लक्षपूर्वक पहात होते. या चढाओढीत ते थोडेच मागे राहणार. या दोन देशांच्या पावलावर पाउल ठेवत, डिसेंबर 1600मध्ये इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ हिने ईस्ट इंडिया कंपनीची उभारणी केली आणि आशियातील सर्व देशांशी, सर्व अधिकारांसह व्यापार करण्याची परवानगी देणारा करारनामा केला.
पण इंग्रजांच्या आधी भारतात आलेल्या या दोन युरोपीय देशांना जे जमले नसते ते काम इंग्रजांनी केले. त्यांच्या आधी भारतात आलेल्या डच आणि पोर्तुगीजांनी फक्त युद्धाशी निगडित व्यापार करण्यावर सारी शक्ती खर्च केली. पण ब्रिटिशांनी मात्र दूतावासांमार्फत संबंध जोडण्यावर खूप भर दिला. म्हणूनच ईस्ट इंडिया कंपनीला व्यापार परवाना सुरळीतपणे मिळावा या उद्देशाने त्यांनी रॉ थॉमस सारख्या मुरब्बी राजदूताला भारतात पाठवले.
मुघलांकडून रुकार मिळताच, इंग्रजांनी, भारतातील किनारपट्टीलगतच्या वेगवेगळ्या शहरांतून एका मागून एक व्यापारी तळ ठोकले. त्यांना 'फॅक्टरी' म्हटले जाई. यातून इंग्रजांनी मसाले, रेशीम आणि इतर चीज वस्तूंचा व्यापार सुरू केला. खरं तर त्यांना यातून खूप फायदा होत होता, पण प्रकरण फक्त व्यापारापर्यंतच न थांबता पुढे गेले.
जमवा-जमव
ईस्ट इंडिया कंपनीच्या युरोपीय देशांबरोबर सतत लढाया सुरू असत. त्यात एकमेकांच्या मालाची लूटमार ही बेलाशकपणे चालायची. यावर उपाय म्हणून इंग्रजांनी आपल्या फॅक्टऱ्यांमधून मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांची शिपाई भरती सुरू केली. थोड्याच अवधीत या व्यापारी फॅक्टऱ्यांनी लष्करी छावण्यांचं रूप धारण केलं.
जेव्हा कंपनीची आर्थिक स्थिती आणि सैन्यबळ पुरेसे मजबूत झाले तेव्हा, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी, स्थानिक संस्थानिकांच्या आपापसातील भांडणात नाक खुपसायला सुरुवात केली. कधी राजाच्या मदतीला सैनिकांची कुमक पाठव. कधी एखाद्या नवाबाला, शत्रूवर डागण्यासाठी तोफा पुरव. तर कधी कोणाला पैशांची निकड असेल तर पैसे उधारीने दे. असं करत करत ईस्ट इंडिया कंपनीने, किनारी प्रदेशांपासून लांब-लांबपर्यंत हातपाय पसरायला सुरुवात केली.
ईस्ट इंडिया कंपनीच्या देशभरात सुरू असलेल्या घोडदौडीला, 1757 साली झालेल्या प्लासीच्या लढाईने एक महत्त्वपूर्ण वळण दिलं. या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीच्या रॉबर्ट क्लाईव्हच्या 3,000 शिपायांनी बंगालचा नवाब सिराज-उद्दौला याच्या 50 हजारांच्या फौजेशी झुंज दिली.

फोटो स्रोत, AFP
हा लढा कसा दिला ते वर्णन "मोतालाए पाकिस्तान" या पुस्तकात लिहिलं आहे. पण या लढाईचा परिणाम म्हणजे, लढाई पश्चात, सिराजुद्दौलानं शतकानुशतके जपून ठेवलेला खजिना, क्लाईव्हने जहाजांवर लादून समुद्री मार्गाने थेट लंडनला रवाना केला. 18 वर्षांपूर्वी नादीर शाहाने असाच दिल्लीचा खजिना पूर्ण रिकामा करून इराणमध्ये नेला होता.
क्लाईव्हने सर्वच्या सर्व दौलत शाही खजिन्यात जमा केली नाही, तर त्यातली स्वतःसाठी ही राखून ठेवली. आजच्या भावाने तिची किंमत 3 कोटी डॉलर होते. या पैशातून त्याने ब्रिटनमध्ये एक दिमाखदार महाल बांधला, बरीच जमीन विकत घेतली आणि त्याचे नाव 'प्लासी' ठेवले. इतकेच नाही तर पैसे देऊन त्याने स्वतःसाठी आणि स्वतःच्या वडिलांसाठी संसदेत पद विकत घेतले. पुढे त्याला 'सर' हा किताब बहाल करण्यात आला.
पण याच दरम्यान बंगालमध्ये आलेल्या भयंकर दुष्काळ आणि त्यामुळे 33 टक्के लोकसंख्या मृत झाल्याची खबर इंग्लंडला पोहोचली. यासाठी लॉर्ड क्लाईव्हच्या धोरणांना जबाबदार मानण्यात आलं.
लॉर्ड साहेबांवर दोषारोप सुरू झाले, इतकेच नव्हे तर संसदेत ठराव करेपर्यंत गोष्ट गेली. पण तसे प्रत्यक्षात काही घडले नाही कारण तेव्हाच्या संसदेतील एक चतुर्थांश सभासद ईस्ट इंडिया कंपनीचेच भागीदार होते.
हे सर्व आरोप प्रत्यारोप होत असताना, गोळा केलेल्या संपत्तीबाबत क्लाईव्ह म्हणाला की, "मला स्वतःलाच समजत नाही की मी हात एवढा सैल कसा सोडला." म्हणजे क्लाईवची इच्छा असती तर आणखी मौल्यवान वस्तू आणि सोने गोळा करून इंग्लंडला रवाना करू शकला असता.
खरं तर भारतावर कोसळलेल्या या आपत्तीचे परिणाम थोडे बहुत का होईना क्लाईव्हच्या मनाला आणि बुद्धीला जाणवू लागले होते. त्यामुळे की काय पण त्याने मोठ्या प्रमाणात अफू खायला सुरुवात केली आणि 1774 साली स्वतःच्या राहत्या खोलीत क्लाईव्ह गूढरीत्या मृतावस्थेत सापडला.

फोटो स्रोत, EDWARD DUNCAN
क्लाईव्हने आत्महत्या केली की त्याने प्रमाणाबाहेर अफूचं सेवन केलं, हे आजही न उलगडलेलं कोडंच आहे. पण एक मात्र खरं की त्याने आखलेल्या डावपेचांबरहुकूम ईस्ट इंडिया कंपनीने मार्गक्रमणा केली आणि भारताचं स्वातंत्र्य धोक्यात आले. याच काळात मुघल राजवट स्वतःचा कमकुवतपणा आणि परकीय आक्रमणामुळे खिळखिळी झाली होती.
इंग्रजांच्या दिवसेंदिवस वाढत्या घुसखोरीकडे बघत राहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. त्यातच प्लासीच्या लढाई नंतर अवघ्या पन्नास वर्षांत ईस्ट इडिया कंपनीच्या शिपायांची संख्या अडीच लाखांच्या वर पोहोचली. या सैन्यानं भारताच्या मोठ्या भूभागावर अंकुश प्रस्थापित केला होता.
मुघल बादशाह कंपनीच्या तनख्याचा आश्रित
पुढे परिस्थिती इतकी बिघडली की 1803पर्यंत दिल्लीच्या तख्तावर बसलेला मुघल बादशाह, ईस्ट इंडिया कंपनीकडून मिळणाऱ्या वेतनावर जगणारा एक मामुली आश्रित उरला. एक काळ होता की जेव्हा याच शाहआलमचे पूर्वज जहांगीरच्या समोर ब्रिटिश राजदूत सर थॉमस रो गुढघे टेकून उभा असे आणि आता अशी अवस्था आली होती की बादशहाला कंपनीच्या एका क्लार्क पुढे वाकून पूर्ण बंगालचा अधिकारनामा सादर करावा लागला.
ब्रिटिश सरकारने नव्हे तर एका कंपनीने पार होत्याचे नव्हते केले होते आणि हीच मोठी चक्रावून टाकणारी बाब होती. कंपनीचे एकच तत्त्व होते, जे शक्य असतील ते उपाय वापरून आपल्या भागीदारांना अधिकाधिक नफा मिळवून द्यायचा. ही कंपनी लंडनमधल्या एका भागातल्या, एका लहानशा इमारतीतल्या कार्यालयातून सारी सूत्रं हलवायची.

फोटो स्रोत, HERITAGE IMAGE PARTNERSHIP LTD/ALAMY
कंपनीच्या उभारणीनंतर शंभर वर्ष उलटली तरी तिच्या स्थायी कर्मचारी संख्या अवघी 35 होती. खरोखर असे असूनही, जगाच्या इतिहासात, इतक्या प्रचंड ताकदीची अशी एकही कंपनी आजपर्यत झालेली नाही.
हल्लीच्या बहुराष्ट्रीय कंपन्या स्वतःच्या क्षमतेचा वेगवेगळ्या देशांतील ध्येय धोरणावर प्रभाव टाकत आहेत असा जर तुमचा आरोप असेल तर थोडा विचार करा. गुगल, फेसबुक, अॅपल, मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग या सगळ्या कंपन्या मिळून एक कंपनी बनवली. तिच्याकडे स्वतःची अत्याधुनिक सशस्त्र फौज असेल आणि जो देश त्या कंपनीची उत्पादने घेण्यास नकार देईल, त्या देशावर ही कंपनी आक्रमण करेल.
अफू का विकत घेत नाही?
ईस्ट इंडिया कंपनीने अगदी हेच चीनच्या बाबतीत केले. ईस्ट इंडिया कंपनी भारतात अफू पिकवायची, पण यातली सर्वच्या सर्व ते अधिकारी वापरायचे नाहीत. तर अफूच्या उत्पादनाचा मोठा हिस्सा चीनमध्ये नेऊन चढ्या भावाने विकला जायचा. जेव्हा ही बाब चीनच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी अशी खरेदी थांबवली.
अर्थात कंपनीला तोटा सहन करणं शक्यच नव्हते. कंपनीने 1839मध्ये तोफवाहू जहाजं चीनमध्ये पाठवून चीनचा आधीच कमजोर असलेला नौसेना तळ नेस्तनाबूत करून टाकला. अखेर चीनच्या बादशहाने चूक मान्य करून, अफूच्या आयातीवरील निर्बंध उठवले. इतकेच नव्हे तर दंडवसुली खातर हाँगकाँगही ब्रिटनच्या हवाली केले. पुढे 1997 साली ते पुन्हा चीनला परत मिळाले.
दरम्यानच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपली घुसखोरी सुरूच ठेवली. एका मागून एक संस्थाने, राजवाडे पदरात पाडून घेतले. 1818मध्ये कंपनीने मराठ्यांवर कब्जा केला आणि पुढल्या काही दशकांत शिखांना नमवून, पूर्ण पश्चिम भारत, म्हणजे आजचा पाकिस्तान ही त्यांनी काबीज केला. आता खैबर खिंडी पासून बर्मा आणि हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपासून कन्याकुमारीपर्यंत कंपनीचेच राज्य होते.

फोटो स्रोत, CONTRABAND COLLECTION/ALAMY
थोडक्यात एव्हाना उंटाने तंबूत शिरून मालकाला तंबू बाहेर काढले होते, असं म्हणायला हरकत नव्हती.
सगळे काही असेच सुरू असताना, नशिबाने धोका दिला. 1857मध्ये कंपनीच्या पदरी असलेल्या लष्करातील शिपायांनी कंपनीविरुद्ध बंड पुकारले. यादरम्यान मोठ्या प्रमाणावर रक्तपात झाला. या सुमारास वर्तमानपत्र सहज उपलब्ध होत होती. सहाजिकच 1857च्या बंडाच्या बातम्या पार इंग्लंडपर्यंत पोहोचल्या. याचा परिणाम म्हणजे लोकांच्या दबावामुळे, इंग्लंडच्या संसदेला कंपनीच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय घ्यावा लागला आणि भारत थेट ब्रिटिश सरकारच्या अंमलाखाली आला. राणी व्हिक्टोरियाच्या मुकुटातील सर्वांत किमती हिरा बनला.
ईस्ट इंडिया कंपनी तरीही कसेबसे दिवस रेटत होती. अखेर 1 जून 1874 रोजी, 275 वर्षांची प्रदीर्घ कारकिर्द गाजवून कंपनी लयास गेली.
नाही चिरा नाही पणती
आज लंडनमधील लीडन हॉल स्ट्रीटवर जिथे ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय होतं, तिथे बँकेची लखलखणारी आलिशान वास्तू उभी आहे. पूर्वीच्या ईस्ट इंडिया कंपनीचे अस्तित्व, आठवण, एखादी मूर्ती, एखादा फलक काहीच दिसत नाही. नाही चिरा नाही पणती.
कंपनीची कोणतीच दृश्य आठवण उरली नसली तरी कंपनीच्या कार्याचा प्रभाव अजूनही जाणवतो आहे.
कदाचित बऱ्याच लोकांचा विश्वास बसणार नाही. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात हातपाय पसरण्यापूर्वी, म्हणजे औरंगजेबाच्या कारकिर्दीत, भारत जगातील श्रीमंत देश म्हणून गणला जात होता. जगाच्या एकूण GDP पैकी 25 टक्के एकट्या भारतातून निर्माण होत होते आणि तेव्हा इंग्लंडचा जगाच्या जीडीपीतील सहभाग फक्त 2 टक्के होता.

फोटो स्रोत, HERITAGE IMAGE PARTNERSHIP LTD ALAMY
भारतातील जमीन सुपीक, निरनिराळ्या खनिज संपत्तीने परिपूर्ण होती. जनता कष्टाळू आणि हरहुन्नरी होती. भारतात तयार होणाऱ्या सुती कपडे, मलमल यांना जगभरातून मागणी होती. शिपिंग आणि स्टील उद्योगात भारत अग्रस्थानावर होता.
जगातील सर्वांत गरीब देश
हे सारे मनोहारी चित्र प्लासीच्या लढाईनंतर विस्कटून गेले. 1947मध्ये इंग्रज निघून गेले तेव्हा त्यांची झोळी भरलेली होती आणि आपल्या झोळीत मात्र शून्य होते. ज्यावेळी सिकंदर भारत सोडून गेला तेव्हा अगदी उलट घडले होते.
भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग याच गोष्टी संदर्भात म्हणाले होते की, "ब्रिटिश सरकार विरोधात आपली तक्रार समर्थनीय आहे. 1700 साली भारत एकटा जगातील 22.6 टक्के संपत्ती निर्माण करीत होता. पण 1952मध्ये हेच प्रमाण घसरून 3.8 टक्क्यांवर आले होते. 20व्या शतकाच्या सुरुवातीला, कधीकाळी ब्रिटनच्या राजमुकुटातील हिरा असलेला भारत, दरडोई उत्पन्नाच्या निकषांवर जगातील सर्वांत गरीब देश बनला होता.
आता आपण, इंग्रजांनी दोनशे वर्षें भारताचे शोषण करून नेमके किती नुकसान केले? या प्रश्नाकडे वळूया.

फोटो स्रोत, CLASSIC IMAGE ALAMY
याबद्दल अनेकांनी अनेक अंदाज करण्याचा प्रयत्न केला आहे. यातील, अर्थशास्त्रज्ञ आणि पत्रकार मेहनाज मर्चंट यांनी केलेले संशोधन आणि अंदाज सर्वाधिक प्रशंसनीय आहे. त्यांनी काढलेल्या अनुमानानुसार 1757 ते 1947 या काळात इंग्रजांकरवी भारताचे झालेले आर्थिक नुकसान 2015च्या फॉरेन एक्स्चेंजच्या हिशोबाने 3 लाख कोटी डॉलर होते.
जरा क्षणभर थांबून या रकमेचा अंदाज लावायचा प्रयत्न करा. याच्या तुलनेत बिचाऱ्या नादिरशहाला दिल्ली लुटून 14, 300 कोटी डॉलर वरच समाधान मानावे लागले होते.
चारशे वर्षांपूर्वी, पहिल्या जहांगीर बादशहाच्या दरबारात चाललेली सुवर्ण तुला पाहून, खरोखर सोने, चांदी, जड जवाहीर यांनी राजाची तुला करण्याइतका भारत देश इतका संपन्न आहे का? अशी शंका इंग्रज राजदूताला वाटली होती.
आज जर सर थॉमस भारतात आले आणि त्यांनी ही आकडेवारी बघितली तर कदाचित त्यांची शंका कायमची दूर होईल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









