दादासाहेब फाळके : 'चित्रपट निर्मितीतून इतकी कमाई व्हायची की, घरात बैलगाडीभरून पैसे यायचे'

दादासाहेब फाळके

फोटो स्रोत, Chandrakand Pusalkar

फोटो कॅप्शन, दादासाहेब फाळके
    • Author, मधू पाल आणि वंदना
    • Role, मुंबईहून बीबीसी हिंदी डॉटकॉमसाठी

धुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांना भारतीय सिनेमाचं जनक मानलं जातं. 30 एप्रिल 1870 त्यांचा जन्मदिन.

दादासाहेबांनी चित्रपट निर्मितीची मुळाक्षरं लंडनमध्ये गिरवली. पण आपला पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' बनवताना त्यांना खूप संघर्ष करावा लागला.

दादासाहेबांच्या पत्नी सरस्वती यांनी आपले दागिने गहाण ठेऊन चित्रपटासाठी पैसे जमा करण्यासाठी मदत केली. त्या काळी स्त्रिया अभिनयक्षेत्रात काम नव्हत्या करत, म्हणून 'राजा हरिच्छंद्र' चित्रपटावेळी पुरुष भूमिकेंसाठी कलाकार मिळाले, पण तारामतीच्या भूमिकेसाठी कुणीच मिळेना.

दादासाहेब मुंबईच्या देहविक्रय करणाऱ्यांच्या वस्तीतही गेले. या कामासाठी किती पैसे मिळतील, असं तिथल्या स्त्रियांनी विचारलं. दादासाहेबांनी काही एक आकडा सांगितल्यावर "तुम्ही जेवढे पैसे देणार तेवढे आम्ही एका रात्रीत कमावतो," असं त्यांनी दादासाहेबांना सांगितलं.

दादासाहेब हॉटेलात चहा पित असताना तिथे काम करणाऱ्या सडपातळ गोऱ्या मुलाकडे त्यांचं लक्ष गेलं. हा मुलगा मुलीचं काम करू शकतो, असं त्यांना वाटतं. त्या मुलाचं नाव साळुंखे होतं. अखेर साळुंखे यांनीच तारामतीचं पात्र साकारलं.

पण संघर्ष इथेच संपला नाही.

सोन्याचे दिवस

दादासाहेब फाळकेंनी चित्रपट बनवायला सुरू कल्यानंतर त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली.

दादासाहेबांनी तयार केलेलं 'कालिया-मर्दन', 'लंकादहन' यासारखे चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी ठरले. यातून पैसे मिळत गेले.

दादासाहेब यांची नात उषा पाटणकर सांगतात, "दासाहेबांची पत्नी म्हणजेच माझी आजी सांगायची की, चित्रपट निर्मितीतून इतका पैसा मिळायचा की, बैलगाडीभरून पैशांच्या गड्ड्या घरी येत."

2015 साली मुंबईच्या एका शासकीय इमारतीवर दादासाहेबांचं चित्र रंगवण्यात आलं.

फोटो स्रोत, Sushant Mohan

फोटो कॅप्शन, 2015 साली मुंबईच्या एका शासकीय इमारतीवर दादासाहेबांचं चित्र रंगवण्यात आलं.

मूक चित्रपटांचं पर्व संपल्यानंतर दादासाहेबांच्या अडचणी वाढल्या. मधल्या काळात ते वाराणसीला रवाना झाले. तिथून परतले मात्र पूर्वीसारखं यश मिळू शकलं नाही.

शेवटच्या दिवसांमध्ये एका पत्रकाराने फाळके यांच्या आयुष्याचा आढावा घेण्यासंदर्भात लिखाणाच्या दृष्टीने विचारलं. दादासाहेबांनी नकार दिला. ते म्हणाले, "चित्रपटविश्वाने मला दूर सारलं आहे. त्यामुळे त्या आठवणी उगाळण्यात हशील नाही."

चित्रपट उद्योग आणि फाळके

चंद्रशेखर पुसाळकर हे दादासाहेब फाळके यांचे नातू. चंद्रशेखर ही फाळके कुटुंबांची तिसरी पिढी.

शेवटच्या दिवसांमध्ये दादासाहेबांच्या हलाखीच्या परिस्थितीविषयी चंद्रशेखर सांगतात, "दादासाहेब कलाकार होते. पैसा कधीच त्यांचं प्राधान्य नव्हतं. शेवटच्या दिवसांमध्ये दादासाहेबांकडे काहीच पैसे उरले नाही."

त्यानंतरच्या पिढीपासून फाळकेंच्या घरात शिक्षणासंदर्भात अडचणी निर्माण झाल्या. "प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात गेला. आमच्या म्हणजे तिसऱ्या पिढीपैकी कुणीही सिनेमा क्षेत्राकडे वळलं नाही. यामुळेच आम्ही दादासाहेबांचे वारस आहोत याबाबत कोणाला माहिती नाही," पुसाळकर सांगतात.

दादासाहेब कलाकार होते. पैसा कधीच त्यांचं प्राधान्य नव्हतं.

फोटो स्रोत, Chandrashekhar Pusalkar

फोटो कॅप्शन, दादासाहेब कलाकार होते. पैसा कधीच त्यांचं प्राधान्य नव्हतं.

फाळके कुटुंबीयांविषयी चित्रपटविश्वाचा दृष्टिकोन काय होता?

चंद्रशेखर सांगतात, "चित्रपटविश्वाने दादासाहेबांकडे दुर्लक्ष केलं, असं मी म्हणणार नाही. सुनील दत्त यांनी आमची खूप मदत केली. माझी आई अल्झायमर आणि कॅन्सरने आजारी असताना सुनील तब्येतीची विचारपूस कायला घरी आले होते. त्यांनी आर्थिक मदतही केली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आईला तीन वर्षं पेन्शन मिळाली. आजकाल कोण असं वागतंय? यश चोप्रा यांनी मला ऑफिसात बोलावून चेक दिला होता. हे कोणाला सांगू नकोस, असंही त्यांनी बजावलं होतं."

चित्रपट, सिनेमा, मनोरंजन

फोटो स्रोत, Chandrashekhar Pusalkar

फोटो कॅप्शन, सुनील दत्त फाळके कुटुंबीयांसमवेत

जगभरात आज हिंदी चित्रपटांचे जे चाहते आहेत ते फाळकेंनी रोवलेल्या चित्रपटनिर्मितीच्या पायामुळेच आहेत. आता पुसाळकर यांना दादासाहेबांना सन्मान मिळवून द्यायचा आहे.

दादासाहेब फाळकेंना भारतरत्न मिळावा, अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा आहे.

शेवट हलाखीत

"शेवटच्या वर्षांमध्ये दादा अल्झायमरने ग्रस्त होते," चंद्रशेखर पुसाळकर बीबीसीला सांगतात.

"त्यांचा मुलगा म्हणजे आमच्या वडिलांनी दादांशी बोलताना एक गोष्ट विचारली. नव्या तंत्रज्ञानासह चित्रपट काढूया का, असं प्रभाकर यांनी दादांना विचारलं."

हा चित्र बनवण्याची फाळकेंनी 1944 मध्ये इच्छा व्यक्त केली.

दादासाहेब फाळके

फोटो स्रोत, Chandrakant Pusalkar

फोटो कॅप्शन, दादासाहेब फाळके चित्रिकरणाच्या वेळी

पुसाळकर पुढे सांगतात, "त्या वेळी ब्रिटिशांचं राज्य होतं आणि चित्रपट निर्मितीसाठी लायसन्स घेणं अनिवार्य होतं. लायसन्स मिळावं यासाठी 1944 मध्ये दादासाहेबांनी पत्र लिहिलं. दोन वर्षांनंतर 14 फेब्रुवारी 1946 रोजी दादासाहेबांना परवानगी नाकारणारं पत्र आलं."

"हा नकार दादासाहेबांच्या जिव्हारी लागला. पत्र मिळाल्यानंतर दोनच दिवसांत दादासाहेबांनी हे जग सोडलं!"

चित्रपट, सिनेमा, मनोरंजन

फोटो स्रोत, Chandrashekhar

फोटो कॅप्शन, चंद्रशेखर पुसाळकर

दादासाहेबांनी ज्या चित्रपटविश्वाची मुहूर्तमेढ रोवली त्यांना अंतिम निरोपाच्या वेळी अपेक्षित सन्मान न मिळाल्याची खंत पुसाळकर व्यक्त करतात.

"दादासाहेबांच्या अंत्यसंस्कारावेळी अगदी मोजकी माणसं उपस्थित होती आणि वर्तमानपत्रांनीही या घटनेला अल्प प्रसिद्धी दिली," असं ते सांगतात.

हे वाचलंत का

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)