शम्मी कपूर : दोन लग्नं, मुमताज-नूतनसोबत अफेअर आणि नव्या जमान्याचा रोमान्स साकारणारा स्टार

shammi

फोटो स्रोत, YOUTUBE

    • Author, प्रदीप कुमार
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

( प्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर यांचा आज (21 ऑक्टोबर ) जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने हा लेख पुन्हा शेअर करत आहोत.)

1957 हे वर्ष भारतीय सिनेमाच्या इतिहासातलं एक सोनेरी पान आहे. एकदा या वर्षात रिलीज झालेल्या सिनेमांची यादी पाहिली, तरी याची प्रचिती येईल.

याच वर्षी 'मदर इंडिया' प्रदर्शित झाला होता. जो आजही ब्लॉकबस्टर सिनेमा मानला जातो. 1957 सालीच दिलीप कुमारचा ‘नया दौर’ही आला होता आणि ज्याला आज क्लासिक म्हणून ओळखला जातो तो गुरुदत्तचा ‘प्यासा’ही याच वर्षीचा.

तीन हिट आणि सदाबहार सिनेमांबरोबरच याच वर्षी भारतीय सिनेमाला एक नवीन स्टारही मिळाला. शम्मी कपूरचा चार वर्षांचा संघर्ष आणि 19 फ्लॉप सिनेमांचा सिलसिला थांबला. नासिर हुसैन यांच्या ‘तुमसा नहीं देखा’ सिनेमा सुपर हिट झाला.

हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर असा काही चालला की शम्मी कपूरने अभिनय संन्यास घेण्याचा आपला विचारच बदलला. हो, 19 अपयशी सिनेमांची माळ लावल्यानंतर निराश झालेल्या शम्मी कपूरने चक्क फिल्म इंडस्ट्रीला रामराम करत आसामच्या चहाच्या मळ्यांमध्ये मॅनेजरची नोकरी करण्याची तयारी केली होती.

याला अजून एक कारण होतं. वटवृक्षाच्या छायेत इतर झाडं वाढत नाही असं म्हणतात. शम्मी कपूर समोर तर तीन-तीन विशाल वटवृक्षांचं आव्हान होतं...कुटुंबातून आणि कुटुंबाच्या बाहेरूनही.

कुटुंबामध्ये सर्वांत मोठं आव्हान होतं वडील पृथ्वीराज कपूर यांच्याकडून. ते स्वतः उत्तम अभिनेते होते, त्याकाळचे स्टार होते. वडिलांशी तुलना होणं स्वाभाविक होतं.

राज कपूरलाही पृथ्वीराज कपूर यांच्या स्टारडमचं आव्हान पेलावं लागलं होतं. पण आपली कलात्मकता आणि क्रिएटिव्हिटीच्या जोरावर राज कपूर यांनी स्वतःला खूप कमी वयात सिद्ध करून दाखवलं होतं. शम्मी यांची स्पर्धा भावासोबत होती.

तिसरं आव्हान होतं त्यांची पत्नी आणि त्यावेळी यशाच्या शिखरावर असलेली अभिनेत्री गीता बाली यांचं.

शम्मी कपूर

फोटो स्रोत, RAJSHRI

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

शम्मी कपूर यांना 1951 ‘जीवन ज्योती’ या चित्रपटात भूमिका मिळाली. ज्या वर्षी शम्मी यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली, त्याच वर्षी राज कपूर यांच्या आवारा चित्रपटाने त्यांना केवळ देशात नाही, जगभरात लोकप्रियता मिळवून दिली होती.

शम्मी कपूर यांचा पहिला चित्रपट 1953 मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतरची चार वर्षं शम्मी कपूर यांना केवळ अपयशालाच सामोरं जावं लागलं होतं. त्याच दरम्यान 1955 साली त्यांनी गीता बाली यांच्याशी विवाह केला. गीता बाली वयाने शम्मी कपूर यांच्यापेक्षा मोठ्या होत्याच, पण त्यांचं करिअरही तेव्हा भरात होतं.

शम्मी कपूर यांनी त्या सगळ्या कालखंडाबद्दल ब्रिटीश चॅनेल 4 मूव्ही महलमध्ये ‘शम्मी कपूर, ऑलवेज इन टाइम’ साठी नसरीन मुन्नी कबीर यांनी लिहिलं होतं, “लोक माझी तुलना राज सोबत करायला लागले होते. थिएटरमध्ये हे चालून गेलं, पण मी सिनेमात काम करायला लागलो तेव्हा ते माझ्यासाठी अडचणीचं ठरायला लागलं.

माझं लग्न गीता बालीसोबत झाल्यानंतर अडचणी अजूनच वाढल्या. कारण मी आता केवळ पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा, राज कपूरचा भाऊ नव्हतो; तर गीता बालीचा पतीही झालो होतो.”

स्वतःचं स्थान निर्माण करणं कठीण होतं

हा तो काळ होता, जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज कपूर, दिलीप कुमार आणि देव आनंद या त्रिमूर्तींचा दबदबा होता. या तिघांना लक्षात ठेवून चित्रपट आणि भूमिका लिहिल्या जायच्या. या सगळ्यात शम्मी कपूर यांच्या वाट्याला फारशा चांगल्या भूमिका मिळत नव्हत्या.

नेमक्या याच स्ट्रगलच्या काळात त्यांना ‘तुमसा नहीं देखा’ हा चित्रपट मिळाला. खरंतर ही भूमिका शम्मी कपूर यांना ऑफर होणार नव्हती. ती आधी देव आनंद यांना ऑफर करण्यात आली होती. पण देव आनंद यांच्याकडे त्यावेळी तारखा नव्हत्या. नासिर हुसैन यांनी मग सुनील दत्त यांचा या रोलसाठी विचार केला. मात्र सुनील दत्त यांच्याकडेही शूटिंगसाठी तारखा नव्हत्या.

‘बॉलिवूड टॉप 20 सुपरस्टार्स ऑफ इंडियन सिनेमा’मध्ये शम्मी कपूर यांच्यावर ‘द स्टार लाइक नो अदर’ या लेखात म्हटलं होतं की, शशिधर मुखर्जींनी नासिर हुसैन यांना शम्मी कपूर यांचं नाव सुचवलं. हा सिनेमा ऑफर होण्याआधी शम्मी कपूर यांनी फिल्म इंडस्ट्री सोडण्यासाठी मनाची तयारी केली होती.

शम्मी कपूर यांच्यावर बनवलेल्या एका डॉक्युमेंट्रीमध्ये स्वतः त्यांनीच सांगितलं होतं की, “मी फिल्म इंडस्ट्री सोडून काही वेगळं करण्याचा विचार करत होतो. याच काळात गीताने मला सांगितलं होतं की, तू एके दिवशी खूप मोठा स्टार होशील. माझ्या पत्नीचा हा विश्वास खरा ठरला.”

शम्मी कपूर

फोटो स्रोत, MOHAN CHURIWALA

‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटाने असं काय केलं, जे शम्मी कपूर यांच्या करिअरमध्ये आधी घडलं नव्हतं.

या सिनेमाने इंडस्ट्रीमध्ये शम्मी कपूर यांच्या स्टाइलचा कालखंड सुरू केला, ज्याची जादू पुढच्या दशकभरात कायम राहिली.

‘तुमसा नहीं देखा’च्या आधी भारतीय सिनेमातले नायक गायचे, पण डान्स करायचे नाहीत. शम्मी कपूरने उभ्या-उभ्या शरीराला हेलकावे देत, केवळ हात उंचावत केलेल्या डान्सची एक वेगळीच स्टाइल तयार केली.

डान्स करणारा, स्टारच्या गुर्मीने वावरणारा, ज्याची संवादफेकही लयबद्ध होती असा हा हिरो होता. त्याची केशरचना, कपडे हे सगळं त्या काळाच्या हिरोच्या प्रतिमांपेक्षा वेगळं होतं. शम्मी कपूर यांनी त्यासाठी खास मेहनतही घेतली होती.

या सिनेमाबद्दल ‘कपूर्स : द फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा’ या पुस्तकाच्या लेखिका मधु जैन यांच्याशी बोलताना सायकॉलॉजिस्ट उदयन पटेल यांनी म्हटलं होतं, “ते पहिले कलाकार होते, ज्यांनी सिल्व्हर स्क्रीनवर तरुणाईच्या मनातील प्रेमभावनेला मोकळेपणाने व्यक्त केलं होतं.”

याच पुस्तकात निर्माते-दिग्दर्शक आणि नंतर शम्मी कपूरचे व्याही बनलेले मनमोहन देसाई सांगतात, “जर शम्मी स्क्रीनवर असतील तर नेहमी उदास असणाऱ्या, रडणाऱ्या देवदास-पारोसारख्या व्यक्तिरेखांनाही दंगामस्ती, छेडछाड करावी वाटेल.”

द स्टार लाइक नो अदर

नसरीन मुन्नी कबीर यांनी आपल्या ‘द स्टार लाइक नो अदर’ या लेखात म्हटलं आहे, “शम्मी कपूर यांच्या आधीचे जे नायक होते, त्यांचा पडद्यावरचा वावर हा प्रौढ होता. एकतर त्यांच्यावर घर-कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असायच्या किंवा संस्कारांनी बांधलेले असायचे. पण शम्मी कपूर यांनी ही प्रतिमा मोडित काढली. त्यांच्या रुपाने पडद्यावर उत्साही, सळसळता तरूण पाहायला मिळाला. त्यांच्या सिनेमातून हे वेगळेपण दिसलं.”

‘तुमसा नहीं देखा’ या सिनेमाच्या यशानंतर शम्मी कपूर यांच्या घरासमोर निर्मात्यांची रांग लागली.

‘शम्मी कपूर : द गेम चेंजर’ या चरित्रात रौफ अहमद लिहितात की, “तुमसा नहीं देखाच्या यशानंतर अनेकांनी शम्मी कपूर यांना साइन करण्यासाठी निर्माते पुढे येत होते. पण त्यांच्या पत्नी गीता बाली यांनी विचारपूर्वक चित्रपट निवडण्याचा सल्ला शम्मी कपूर यांना दिला. निर्मात्यांची गर्दी कमी करण्यासाठी त्यांनी अजून एक उपाय सांगितला, की एक लाखांपेक्षा कमी रकमेवर कोणत्याही सिनेमाला होकार द्यायचा नाही.”

एक लाख रुपयांचा सल्ला शम्मी कपूर यांनी खूपच मनावर घेतला. त्यांचे मित्र बप्पी सोनी यांनी त्यांना एका सिनेमासाठी 90 हज़ार रुपये मानधन ऑफर केले होते, पण शम्मी यांनी नकार दिला.

शम्मी कपूर यांना एक लाख रुपये द्यायलाही काही निर्माते तयार होते. मात्र पुढचे सहा महिने शम्मी यांनी कोणताही सिनेमा साइन केला नाही.

‘तुमसा नहीं देखा’नंतर त्यांच्या स्टारडमवर शिक्कामोर्तब करणारा दुसरा सिनेमा होता, नासिर हुसैन यांनीच दिग्दर्शित केलेला ‘दिल देके देखो.’ 1959 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या यशाने सिद्ध केलं की, ‘तुमसा नहीं देखा’चं यश हे योगायोग नव्हतं आणि शम्मी कपूर यांचा स्वॅग प्रस्थापित झाला.

शम्मी कपूर

फोटो स्रोत, RAJSHRI

शम्मी कपूर यांच्या या स्वॅगबद्दल ऋषी कपूर यांनी आपल्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, “शम्मी अंकल आमच्या सगळ्यांचे लाडके होते. पापा हे वडिलांसारखे होते, त्यांच्याकडे आम्ही स्टार म्हणून पाहू शकायचो नाही. पण शम्मी अंकलकडे पाहिलं की, स्टारकडे पाहिल्यासारखं वाटायचं.

ते एकदम फॅशनेबल, स्टायलिश होते. त्यांनी चक्क दोन वाघांचे बछडे पाळल्याचं मला आठवतंय. ते मोठे झाले, तेव्हा त्यांना प्राणिसंग्रहालयात पाठवावं लागलं. ते आमच्या शेजारच्या बंगल्यात राहायचे. त्यांच्या घरी जाणं म्हणजे ट्रीट असायची. ते आम्हाला एका मोठ्या प्रोजेक्टरवर सिनेमा दाखवायचे.”

ऋषी कपूर यांनी पुढे लिहिलंय, “ते शिकारीला जायचे आणि आम्ही पण अनेकदा त्यांच्यासोबत गेलोय. ते हातात बीअरची बॉटल घेऊन जीप चालवायचे.”

शम्मी कपूर यांना खाण्यापिण्याचा खूप शौक होता. त्यांना लठ्ठपणाही खूप लवकर आला.

शम्मी अंकलने चाळीशीतच लीडिंग रोल करणं बंद केलं होतं. असं करणारे ते त्याकाळातील एकमेव स्टार होते, असं ऋषी कपूर लिहितात.

मात्र, त्या काळात त्यांनी पडद्यावरच्या हिरोची कुलीन-शालीन प्रतिमा बदलली होती.

मधु जैन यांनी शम्मी कपूर यांच्या कुटुंबियांच्या हवाल्याने लिहिलं आहे की, शम्मी कपूर अमेरिकन अभिनेते एरल फ्लिन आणि त्यांची आत्मकथा माय विकेड, विकेड थिंगने खूप प्रभावित झाले होते. त्यामुळेच ते चर्चेत राहण्याची एकही संधी दवडायचे नाहीत.

दोन लग्नं आणि दोन अफेअर्स

सिनेमांमध्ये यश मिळवण्याच्या आधीच शम्मी यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळं आली होती.

अभिनेत्री नूतनसोबत त्यांचं प्रेमप्रकरण सुरू झालेलं. त्यामुळेच नूतनची आई आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांनी आपल्या मुलीला शिक्षणासाठी थेट युरोपलाच पाठवून दिलं. शम्मी कपूर नूतनला आपली ‘चाइल्डहूड गर्लफ्रेंड’ म्हणायचे.

त्यानंतर त्यांना मधुबाला आवडायला लागली. ते तिच्यासोबत लग्नाचाही विचारही करत होते. पण मधुबाला तेव्हा दिलीप कुमार यांच्या प्रेमात होती आणि शम्मी कपूरची ओळख केवळ कपूर खानदानातला मुलगा एवढीच होती.

अभिनेत्री गीता बालीसोबतचं लग्नही त्यांनी झटपट आटोपलं होतं...तेही मंदिरात. त्यांच्या कुटुंबियांना या लग्नासाठी तयार होण्याचा वेळही मिळाला नाही.

कपूर घराण्यातील महिलांना तेव्हा सिनेमात काम करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळेच राज कपूर या लग्नामुळे खूश नव्हते. कारण गीता बाली तेव्हाच्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या.

स्वतः राज कपूर यांनी अरेंज मॅरेज केलं होतं.

शम्मी कपूर

फोटो स्रोत, YOUTUBE

रौफ अहमद यांनी ‘शम्मी कपूर : द गेम चेंजर’ या पुस्तकात राज कपूर यांचे सहाय्यक लेख टंडन यांच्या हवाल्याने लिहिलं आहे, “राज कपूर हे खूप पारंपरिक विचारांचे होते. मी त्यांच्यासोबत आरके कॉटेजमध्ये होते. त्याचवेळी घरून फोन आला की, लवकर घरी या. शम्मी कपूर त्यांच्या वधूसोबत येत आहेत. त्यावेळी राज कपूरने आता आपण गडबडीत असल्याचं सांगितलं.

पण नंतर त्यांनी विचार बदलला आणि ते पार्टीला गेले. आई-वडिलांनी शम्मी कपूर यांना आशीर्वाद दिला असेल, तर आपण का ताणून धरावं असा विचार त्यांनी केला असावा.”

शम्मी कपूर आणि गीता बालीच्या लग्नानंतर राज कपूर आपल्या कुटुंबियांसोबत वेगळ्या घरात राहायला लागले.

मधु जैन यांनी कपूर परिवारावर लिहिलेल्या पुस्तकात म्हटलं आहे की, पृथ्वीराज कपूर यांनी नियम बनवला होता की, मुलं झाल्यानंतर आपल्या मुलांनी स्वतःच्या घरात राहायला जायचं.

आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर शम्मी कपूर काही काळ राज कपूर यांच्या कुटुंबासोबतच राहात होते. त्यांचं दुसरं लग्न होईपर्यंत राज कपूर यांच्या पत्नीनेच त्यांच्या मुलांची काळजी घेतली. शम्मी यांच्या दुसऱ्या लग्नासाठीही राज कपूर यांच्या पत्नीनेच पुढाकार घेतला होता.

शम्मी कपूर जेव्हा करिअरमध्ये यशाच्या शिखरावर होते, तेव्हा राज कपूरसोबत त्यांनी काम केलं नव्हतं. पण करिअरच्या सेकंड इनिंगमध्ये त्यांनी राज यांच्यासोबत काम केलं.

1961 ते 1971 या काळात शम्मी कपूर यांनी सातत्याने हिट सिनेमे दिले होते. प्रोफेसर, ब्लफ मास्टर, काश्मीर की कली, राजकुमार, जानवर, तिसरी मंझिल, अन इव्हिनिंग इन पॅरिस, ब्रह्मचारी, प्रिन्स, तुमसे अच्छा कौन है आणि अंदाजसारख्या चित्रपटांचा यात समावेश आहे.

नवीन अभिनेत्रींसोबत काम

शम्मी कपूर यांनी आपल्या चित्रपटांमध्ये ज्या पद्धतीने रोमान्स केला आहे, त्याबद्दल शम्मी कपूर यांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये रणबीर कपूरने म्हटलं होतं, “माझे वडील (ऋषी कपूर) म्हणायचे की शम्मी कपूर यांच्याकडून रोमान्स करणं शिका. खरंच होतं. ते जेव्हा आपल्या अभिनेत्रींसमोर उभे राहायचे, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतूनच प्रेम व्यक्त व्हायचं.”

याच डॉक्युमेंट्रीमध्ये आमीर खाननेही म्हटलं होतं की, शम्मी अंकलने आम्हाला रोमान्स शिकवला. शम्मी कपूर ‘जानवर’ सिनेमात जेव्हा लाल छडी हे गाणं गायला लागतात, तेव्हा असं वाटायला लागतं की ते खरंच त्या लाल काठीवर प्रेम व्यक्त करत आहेत. पण नंतर लक्षात येतं की, त्या लाल काठीशिवाय सीक्वेन्समध्ये राजश्रीही आहेत.

शम्मी कपूर हेच असे अभिनेते असावेत, ज्यांच्यासमोर अभिनेत्रीही मोकळेपणाने गायच्या.

‘ओ मेरे सोना रे सोना, दे दूंगी जान जुदा मत होना रे. मैंने तुझे ज़रा देर में जाना, हुआ कसूर खफ़ा मत होना रे.’

शम्मी कपूर नवीन अभिनेत्रींसोबत काम करण्यासाठीही प्रसिद्ध होते.

तुमसा नहीं देखाची अभिनेत्री अमिता, मुजरिमची रागिनी, दिल देके देखोमधील आशा पारेख, प्रोफेसरमधली कल्पना या सगळ्या नवीन होत्या.

शर्मिला टागौर यांनी ‘कश्मीर की कली’ या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात शम्मी कपूरसोबतच केली होती.

शम्मी कपूर

फोटो स्रोत, Getty Images

1961 मध्ये आलेला जंगली सुपरहिट झाला होता. ‘याहू...कोई मुझे जंगली कहे, कहता रहे...’ असं गाणाऱ्या शम्मी कपूरची नायिका होती लंडनहून शिकून आलेली सायरा बानो. त्यांचा हा पहिलाच सिनेमा होता.

विशेष म्हणजे शम्मी कपूर यांनी आपल्या करिअरची सेकंड इनिंग चरित्र भूमिकांमधून सुरू केली. त्यावेळी 1975 साली आलेल्या ‘जमीर’ सिनेमात त्यांनी सायरा बानोच्या वडिलांची भूमिका केली होती.

एकीकडे शम्मी कपूर करिअरमध्ये यशस्वी होत होते, तर दुसरीकडे 1965 साली वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या पत्नी गीता बाली यांचं देवीच्या आजाराने निधन झालं. शम्मी कपूर यांच्यासाठी हा खूप मोठा आघात होता.

शम्मी यांना जेव्हा आपल्या पत्नीच्या आजारपणाची बातमी कळली, तेव्हा ते नासिर हुसैन आणि विजय आनंद यांच्या ‘तीसरी मंजिल’ या सिनेमाचं शूटिंग करत होते.

केवळ तीन आठवड्यांतच गीता बाली यांचा मृत्यू झाला. त्यावेळी देवीच्या आजाराची इतकी भीती होती की, कुटुंबातल्या लोकांव्यतिरिक्त शम्मी कपूर यांच्याकडे कोणीच गेलं नाही. पृथ्वीराज कपूर यांच्या मैत्रीमुळे एक डॉक्टर गीता बालींना पाहायला घरी आले होते.

शम्मी कपूर यांनी अनेक प्रसंगी हे बोलून दाखवलं की, जेव्हा ते यशाच्या शिखरावर होते, तेव्हाच देवाने त्यांना मोठा धक्का दिला.

गीता बाली यांच्या मृत्यूनंतर शम्मी कपूर यांचं अभिनेत्री मुमताज सोबतचं प्रेम प्रकरणही चर्चेत राहिलं.

मुमताज यांनी अनेक वर्षांनंतर एका मुलाखतीत सांगितलं होतं की, शम्मी यांना त्यांच्यासोबत लग्न करायचं होतं. त्यामुळेच राज कपूर यांच्या मेरा नाम जोकर यांच्या सिनेमात मला संधी मिळाली नाही. कारण कपूर घराण्यातील महिलांना चित्रपटात काम करता यायचं नाही.

मुमताज यांना आपलं करिअर सोडायचं नव्हतं, कारण त्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली होती. दुसरीकडे शम्मी यांना आपल्या मुलांची देखभाल करणारी आई, पत्नी हवी होती.

दुसऱ्या लग्नाची गोष्ट

त्यानंतर शम्मी कपूर यांचं अफेअर बीना रमानी यांच्यासोबत होतं. बीना रमानी तेव्हा लंडनमध्ये शिकत होत्या. शम्मी यांनी त्यांना स्पोर्ट्स कार गिफ्ट केली होती.

पण हे नातं फारकाळ टिकलं नाही. कारण बीना रमानी शम्मी यांच्यापेक्षा खूपच लहान होत्या.

याच काळात राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर यांनी भावनगरच्या राजघराण्यातील नीला देवींसोबत शम्मी कपूर यांच्या लग्नाची बोलणी केली.

भावनगरच्या राजघराण्याचे राज कपूर यांच्या कुटुंबासोबत मैत्रीचे संबंध होते. त्यांच्या मालकीची थिएटर असल्याने शम्मी कपूर यांचंही त्यांच्याकडे येणं जाणं असायचं. पण आता लग्नाची गोष्ट होती. त्यामुळे शम्मी कपूर यांनी थेट नीला देवी यांच्याशीच संवाद साधला.

नीला देवींनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं, “त्यांनी खूप रात्री उशीरा फोन केला. तो लँड लाइनचा काळ होता. माझ्या घरातील लोकांनी त्यांना म्हटलंही की आता खूप रात्र झाली आहे. मात्र, त्यांनी पुन्हा फोन केला. त्यांनी मला स्वतःबद्दल, प्रेम संबंधांबद्दल सांगितलं. त्यानंतर म्हटलं की, तुम्ही तुमच्या कुटुंबियांशी बोलून घ्या आणि सकाळी सगळे माझ्याकडे ब्रेकफास्टला या. आमचं बोलणं पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होतं. त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे ब्रेकफास्टला गेलो आणि तिथेच आमची सप्तपदीही झाली.”

शम्मी कपूर

फोटो स्रोत, Getty Images

1969 मध्ये दुसरं लग्न झाल्यानंतर शम्मी कपूर यांनी आपल्या करिअरवर अधिक लक्ष द्यायला सुरूवात केली होती. पण त्याचवेळी ‘राजकुमार’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक विचित्र अपघात झाला.

शम्मी कपूर यांच्या एका गाण्याचं शूटिंग सुरू होतं. यात ते हत्तीवर बसलेले होते. गाणं होतं- यहां के हम है राजकुमार.

हत्तीवरून पडू नये म्हणून शम्मी यांचा पाय साखळीने बांधला होता. साखळी हत्तीच्या गळ्यात अडकवली होती. पण चालता चालता हत्तीने अचानक मागे वळून पाहायला सुरूवात केली. हत्तीच्या गळ्यातल्या साखळीला पाय बांधला असल्यामुळे शम्मी कपूर यांच्या गुडघ्याच्या हाडाला दुखापत झाली. गाणं शूट करताना त्यांनी त्या वेदना चेहऱ्यावर दाखवून दिल्या नाहीत.

पण नंतर मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये अनेक दिवस काढावे लागले. त्याच काळात वजन वाढायला लागलं. पायाला झालेल्या दुखापतीमुळे डान्स करणं शक्य नव्हतं. त्यामुळे 1971 मध्ये त्यांनी ब्रेक घेतला. ‘अंदाज’ हा त्यांचा शेवटचा हिट सिनेमा होता.

या ब्रेकमध्ये त्यांच्यावर अनेक अडचणी आल्या. कारण याच काळात त्यांचे आई-वडील कॅन्सरशी झुंज देत होते. मेरा नाम जोकर फ्लॉप झाल्यानंतर राज कपूर आर्थिक अडचणींना सामोरं जात होते आणि त्यावर मात करण्यासाठी झगडत होते. शशी कपूर चार-पाच शिफ्टमध्ये काम करायचे. त्यामुळे दोन्ही भावांकडे वेळ नव्हता.

शम्मी कपूर

फोटो स्रोत, MOHAN CHURIWALA

या काळात शम्मी कपूर यांनी आपल्या आई-वडिलांची खूप सेवा केली. पृथ्वीराज कपूर यांच्या निधनानंतर अवघ्या सोळा दिवसांनी त्यांच्या पत्नीचंही निधन झालं होतं. त्यामुळे शम्मी, राज, शशी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

शम्मी कपूर यांनी या कौटुंबिक आघातानंतर आपल्या करिअरची दुसरी इनिंग सुरू केली. 1975मध्ये रिलीज झालेल्या ‘जमीर’ सिनेमापासून त्यांनी कॅरेक्टर रोल करायला सुरूवात केली. बीआर चोप्रा यांची निर्मिती असलेला हा सिनेमा होता. त्यानंतर प्रेम रोग, परवरिश, हिरो, विधातासारख्या सिनेमांतून त्यांनी सशक्त भूमिका साकारल्या.

शम्मी कपूर जेव्हा नायक म्हणून यशाच्या शिखरावर होते, तेव्हा त्यांनी कधी बीआर चोप्रांसोबत काम केलं नव्हतं. याबद्दलचा एक रंजक किस्सा रौफ अहमद यांनी सांगितला होता. स्वतः शम्मी कपूर यांनीच तो त्यांच्यासोबत शेअर केला होता.

रौफ अहमद लिहितात, “गुमराह या सिनेमात बीआर चोप्रा शम्मी कपूर यांना कास्ट करणार होते. सिनेमाच्या कथानकानुसार शम्मी कपूर यांच्या पत्नीचा रोल करणाऱ्या माला सिन्हा या सुनील दत्त यांच्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडतात. ही गोष्ट ऐकल्यावर शम्मी यांनी बीआर चोप्रांनी म्हटलं की, माझ्यासारखा नवरा जिचा असेल, ती दुसऱ्याच्या प्रेमात पडेलच कशी? बीआर चोप्रांना ही मस्करी जिव्हारी लागली.”

शम्मी कपूर यांचा असा अनुभव त्यांच्या करिअरला नवीन दिशा देणाऱ्या नासिर हुसैन यांनाही आला होता.

रौफ अहमद यांनी लिहिलं आहे की, दिल देके देखो या चित्रपटाच्या यशानंतर नासिर हुसैन यांनी स्वतःची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली. आपल्या बॅनरअंतर्गत त्यांनी जब प्यार किसी से होता है या सिनेमावर काम सुरू केलं. आशा पारेखनाच त्यांनी पुन्हा हिरॉइन म्हणून घेतलं. संगीतकार म्हणून शंकर-जयकिशन या जोडीलाच.

ही तयारी सुरू असतानाच नासिर हुसैन यांनी शम्मी यांना फोन केला आणि विचारलं की, “आशा आणि शंकर-जयकिशन माझ्यासोबत आहेत. तू माझ्याबरोबर आहेस की नाही?”

हा प्रश्न ऐकल्यावर शम्मी कपूर यांना राग आला. कारण आपण या सिनेमात असणार हे त्यांनी गृहीतच धरलं होतं. नासिर यांची सिनेमा ऑफर करण्याची पद्धत शम्मी यांना आवडली नाही. त्यांनी लगेचच उत्तर दिलं की, मी तुझ्यासोबत नाहीये.

या उत्तरानंतर नासीर यांनीही पुन्हा प्रयत्न केले नाहीत आणि शम्मी यांनाही आपली चूक कळली नाही.

‘जब प्यार किसी से होता है’साठी नासीर यांनी देवानंदला साइन केलं.

अर्थात, 1965 साली ‘तीसरी मंझिल’ सिनेमासाठी नासिर हुसैन आणि शम्मी कपूर पुन्हा एकत्र आले.

अॅपलचा कॉम्प्युटर वापरणाऱ्यांपैकी एक

शम्मी कपूर यांनी नंतर अध्यात्माचा मार्ग निवडला आणि उत्तराखंडमधील एका धर्मगुरूसोबत बराच काळ राहिलेही.

मात्र, इंटरनेटच्या आगमनानंतर त्यांच्या आयुष्यात बराच बदल झाला. भारतात अॅपलचा कॉम्प्युटर आणि इंटरनेट वापरण्याची सुरुवात करणारे ते पहिले व्यक्ती होते.

मात्र, तोपर्यंत त्यांच्या आजाराने गंभीर रुप धारण केलं होतं. पडद्यावर कायम नाचत-गात राहणाऱ्या या अभिनेत्याला आपल्या आयुष्याची शेवटची आठ वर्षं व्हील चेअरला खिळून राहावं लागलं होते.

आठवड्याचे तीन दिवस ते ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये डायलिसिससाठी जायचे. मात्र त्यांची जगण्याची उमेद कायम होती. ते या काळातही काम करत होते. निधनाच्या काही दिवस आधीच ते इम्तियाज अलीच्या रॉकस्टारमध्ये रणबीर कपूरसोबत दिसले होते.

शम्मी कपूर यांना दारू आणि सिगारेटखेरीज प्रचंड वेगाने गाडी चालवण्याचाही शौक होता. नीलादेवींनी आपल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, आपल्या आजारपणात ते नेहमी म्हणायचे की, ड्रायव्हिंग करू शकत नसाल तर जगण्यात काय अर्थ आहे.

14 ऑगस्ट 2011साली शम्मी कपूर यांचं निधन झालं.

शम्मी कपूर यांना करिअरमध्ये डान्सिंग स्टार, बंडखोर अभिनेता, भारतीय सिनेमाचा एल्विस प्रिस्ले, याहू स्टार, द गेम चेंजर अशा अनेक नावांनी ओळखलं गेलं. पण एक अभिनेता म्हणून त्यांना फार गांभीर्याने घेतलं गेलं नाही, त्यांच्या वाट्याला कौतुक आलं नाही. त्यांना कायम लाउड अभिनेता म्हणूनच ओळखलं गेलं.

त्यांना पहिल्यांदा 1963 साली प्रोफेसर चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराचं नामांकन मिळालं. पण पुरस्कार त्यांना 1968 साली ब्रह्मचारी सिनेमासाठी मिळाला.

त्यांना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार सहाय्यक अभिनेता म्हणून विधाता चित्रपटासाठी मिळाला.

ऋषी कपूर यांनी आपल्या आत्मचरित्रात आणि अनेक इंटरव्ह्यूमध्येही म्हटलं होतं की, शम्मी कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळायला हवा होता. पण तो त्यांना मिळाला नाही.

पुरस्कार मिळाले नसले, तरी त्यांना भारतीय सिनेरसिकांचं प्रेम नक्कीच भरभरून मिळालं.

त्यांच्या एका चित्रपटातलं गाणं आहे, ‘‘तुम मुझे यूं भुला ना पाओगे, सुनोगे जब भी गीत मेरे संग संग तुम भी गुनगुनाओगे.’

चित्रपटप्रेमीही शम्मी कपूर यांना कधी विसरू शकणार नाहीत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)