'कट्टरवाद्यांना आश्रय देणाऱ्या' पाकिस्तानला अमेरिकेने नाकारली 2,100 कोटींची मदत

इम्रान खान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इम्रान खान

अमेरिकेच्या लष्कराने पाकिस्तानला दिली जाणारी प्रस्तावित 2100 कोटी रुपयांची मदत रद्द केली आहे. कट्टरवादी गटांवर पाकिस्तान कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचं कारण देत ही मदत रद्द केल्याचं अमेरिकेच्या लष्कराने स्पष्ट केलं आहे.

या रकमेचा वापर अमेरिका इतर आवश्यक कामांसाठी करेल, असं अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल कोनी फॉकनर यांनी सांगितलं.

पाकिस्तानने आपल्या मदतीचा गैरवापर केल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केला होता. पाकिस्तान गेल्या 17 वर्षांपासून अफगाणिस्तानात युद्ध छेडणाऱ्या कट्टरवादी गटांना आश्रय देतोय, असा आरोप ट्रंप प्रशासनाने सातत्याने केला आहे.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते जर पाकिस्तानने आपली भूमिका बदलली तर अमेरिका त्यांना पुन्हा पाठिंबा देऊ शकतो.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाँपेओ यांच्या नियोजित पाकिस्तान भेटीच्या आधी या घडामोडी घडल्या आहेत.

तत्पूर्वी, अमेरिकेने सुरक्षेच्या क्षेत्रात गुंतवणूक कमी करणार असल्याचं जानेवारीमध्ये जाहीर केलं होतं. या निर्णयाला अमेरिकेच्या संसदेची मंजुरी अद्याप मिळालेली नाही.

अमेरिकेच्या या निर्णयाने नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढणार आहेत. इम्रान खान यांनी गेल्याच महिन्यात पाकिस्तानची सूत्र हाती घेतली आहेत आणि आर्थिक आघाडीवर त्यांना झुंजावं लागत आहे.

पाकिस्तानची परकीय चलनाच्या गंगाजळीत सातत्याने घट होत आहे. मे 2017 मध्ये पाकिस्तानची परकीय गंगाजळी 16.4 कोटी डॉलर होती. ती आता 10 कोटी डॉलरपेक्षा कमी झाली आहे. परकीय गंगाजळीत गुंतवणूक कमी झाल्याने संकट आणखी गहिरं झालं आहे.

ट्रंप यांचा झटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या वर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी केलेल्या एका ट्वीटमध्ये पाकिस्तानवर खोटं बोलण्याचा आणि कट्टरवाद्यांना थारा दिल्याचा आरोप लावला होता. ट्रंप म्हणाले की कोट्यवधी रुपयांची मदत देऊनसुद्धा पाकिस्तान कट्टरवाद्यांना आसरा देत आहे.

ते म्हणाले होते, "अमेरिकेने पाकिस्तानला गेल्या 15 वर्षांत 33 कोटी डॉलर पेक्षा जास्त मदत केली आहे. त्या बदल्यात छळ आणि खोटेपणा याशिवाय पाकिस्तानने काहीही दिलेलं नाही. त्यांना असं वाटतं की अमेरिकेचे नेते मूर्ख आहे. आम्ही अफगाणिस्तानच्या ज्या अतिरेक्यांना शोधतो आहे, त्यांना पाकिस्तानने आसरा दिला आहे."

लेफ्टनंट कोनी फॉकनर म्हणाले, "अमेरिकेच्या दक्षिण आशियासाठीच्या लष्करी धोरणात पाकिस्तानने सहकार्य न केल्याबद्दल त्यांना उरलेली 30 कोटी डॉलरची मदत रद्द करण्यात आली आहे."

पाकिस्तान कुणाला आश्रय देतंय?

हकानी नेटवर्क ही संस्था अफगाणिस्तानमध्ये कट्टरवादी कारवाया करण्यात अग्रेसर आहे. यासाठी पाकिस्तान त्यांना आपल्या भूमीचा वापर करू देतो, असा दावा अफगाणिस्तानने सातत्याने केला आहे.

हकानी नेटवर्क या संस्थेचे अफगाण तालिबानशी हितसंबंध आहेत, जो अफगाणिस्तान सरकारला सगळ्यांत मोठा धोका आहे.

हकानी नेटवर्क आणि अफगाण तालिबान या दोन्ही गटांनी अफगाणिस्तानात अनेक हल्ले केले आहेत, ज्यात अनेक अमेरिकन सैनिक मारले गेले आहेत. पाकिस्तान आणि विशेषत: ISI त्यांना थारा देत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)