संग्राम पाटील यांच्या विरोधातील लुकआऊट नोटीस रद्द करण्यास मुंबई पोलिसांचा नकार; कोर्टात काय घडलं?

डॉ. संग्राम पाटील

फोटो स्रोत, Dr. Sangram Patil / Youtube

फोटो कॅप्शन, डॉ. संग्राम पाटील
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 12 मिनिटे

डॉ. संग्राम पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे.

या प्रकरणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे.

4 फेब्रुवारी 2026 रोजी सुनावणी पार पडणार होती, मात्र सरकारी वकिलांनी केलेल्या विनंतीनुसार ही सुनावणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे.

"देशाच्या पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक मजकूर सोशल मीडियावर लिहितात, त्यामुळे त्याचा हेतू आम्हाला तपासायचा आहे," असं प्रतिज्ञापत्र सादर करत संग्राम पाटील यांच्याविरोधातील लुकआऊट नोटीस रद्द करण्यास मुंबई पोलिसांनी नकार दिला आहे.

लुकआऊट नोटीस रद्द करण्यास मुंबई पोलिसांचा नकार

डॉ. संग्राम पाटील यांच्याविरोधात जारी केलेली लुक आउट नोटीस रद्द करण्यास मुंबई पोलिसांचा सध्या तरी नकार आहे.

मुंबई पोलिसानी हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संग्राम पाटील यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात तपास सुरू असून लुक आउट नोटीस हटवता येणार नाही, असं सांगितलं आहे.

डॉ. संग्राम पाटील यांच्या भारत भेटीचा खरा उद्देश काय, ते तपासायचं आहे, असं सांगणारं प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांनी हायकोर्टात दाखल केलं आहे.

या प्रतिज्ञापत्रात असंही म्हटलंय की, "संग्राम पाटील भारतीय वंशांचे ब्रिटिश नागरिक आहेत. पण परदेशात बसून भारतातल्या घटनात्मक पदावरच्या व्यक्तींची ते बदनामी करत आहेत.

देशाच्या पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक मजकूर सोशल मीडियावर लिहितात त्यामुळे त्याचा हेतू आम्हाला तपासायचा आहे."

"देशाच्या बाहेरून हे सगळं होत असल्याने यामध्ये आणखी काही जणांचा म्हणजे संघटित उद्देशाचा समावेश असू शकतो," असंही मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे.

संग्राम पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

डॉ. संग्राम पाटील यांना दाखल असलेल्या गुन्ह्या संदर्भात पुन्हा चौकशी करण्यासाठी सोमवारी (19 जानेवारी) रात्री नोटीस बजावली. त्यानुसार पाटील आणि त्यांच्या वकिलांनी क्राइम ब्रँच युनिट तीनमध्ये चौकशीसाठी हजर झाले होते.

आता डॉ. संग्राम पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना नोटीस बजावत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेवरील पुढील सुनावणी 4 फेब्रुवारीला होणार आहे.

19 जानेवारीला संग्राम पाटील यांना नोटीस दिल्यानंतर त्यांना लंडनला जाण्यास रोखण्यात आले होते.

संग्राम पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

फोटो स्रोत, Facebook/Sangram Patil

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. संग्राम पाटील यांनी म्हटलं होतं की, "यापूर्वी देखील चौकशी झाली होती. मी योग्य ते सहकार्य केले. त्यानुसार एलओसी रद्द करण्यासाठी प्रक्रिया देखील करण्यात आल्याचं पोलिसांनी मला सांगितलं होतं. मात्र परदेशी परत जात असताना मला विमानतळावर रोखण्यात आलं असून माझी पुन्हा चौकशी करायची आहे असं पोलिसांनी रात्री नऊ वाजता नोटीस देत सांगितलं. मी आणि माझी पत्नी सध्या मुंबईत आहोत. मी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य करत आहे. माझी चौकशी करून पोलिसांनी जारी केलेलं लुक आउट सर्क्युलर रद्द करावं असं माझं म्हणणं आहे. यापूर्वी पोलिसांना योग्य ते सहकार्य करूनही मुंबई पोलिसानी लुक आउट सर्क्युलर रद्द केले नाही. पहिल्या दिवशी पंधरा तास, दुसऱ्या वेळेला आठ तास चौकशीसाठी दिले तरीही अद्याप चौकशी पूर्ण होत नाही."

पाटील यांनी पुढे म्हटलं की, "माझ्या ज्या पोस्टवरून हे सगळं सुरू आहे, त्यामध्ये काही मीडिया प्लॅटफॉर्मवर पोलिसांनी दोन समाजात तणाव निर्माण झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तशा प्रकारचा गुन्हा दाखल असून माझी चौकशी सुरू आहे आणि ही कारवाई झाली असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र माझ्या पोस्टमधून असं काहीही झालं नाही. त्यामुळे पोलिसांच्या कुठल्याही कायदेशीर चौकशीला मी बगल देणार नाही. मी पूर्णपणे सहकार्य करणार आहे. माझा कायद्यावर ठाम विश्वास आहे."

या संदर्भात मुंबई पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांच्याशी यासंदर्भात बीबीसी मराठीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

डॉ. संग्राम पाटील हे युनायटेड किंगडमचे नागरिक आहेत.

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. पाटील काय म्हणाले?

बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे यांनी संग्राम पाटील यांच्याशी सविस्तर बातचित केली. या मुलाखतीत डॉ. पाटील यांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत, त्यांनी लिहिलेल्या पोस्टबाबत आणि एकंदरित या संपूर्ण घटनाक्रमावर भाष्य केलं आहे.

प्रश्न : सध्या तुम्ही मुंबईत आहात. मागील दोन दिवसांपासून तुम्हाला लंडनला जायचं आहे. पण तुम्ही जाऊ शकलेला नाहीत. मागील 15 दिवसांत नेमकं काय घडलं हे आम्हाला सांगा.

डॉ. संग्राम पाटील : मी माझ्या पत्नीसह 10 जानेवारीला मुंबई विमानतळावर आलो. मला इमिग्रेशनमध्ये सांगण्यात आलं की, माझ्याविरोधात मुंबई पोलिसांत एक केस आहे. सोशल मीडियावर मी हेट स्पीच केलं असं मला सांगण्यात आलं. त्यांनी मला मुंबई पोलीस अटक करून पुढची प्रक्रिया करतील असं सांगितलं.

आम्ही 5 तास विमानतळावरच होतो. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँच युनिट 3 ने नंतर आम्हाला लोअर परेलला नेलं. त्यांनी आम्हाला तुमची सोशल मीडिया पोस्ट आहे, तुमच्यावर भारतीय न्याय संहितेचं 353 (2) असं कलम लावण्यात आलं आहे. त्यामुळे तुमच्यावर हा गुन्हा आहे. म्हणून आम्ही तुम्हाला इथं आणलं आहे, असं स्पष्ट केलं. मुंबई पोलीस आणि इमिग्रेशनमधील वेळ असे एकूण 15 तास आम्ही मुंबईतच होतो.

जेव्हा मला त्यांनी मला पोस्ट दाखवली तेव्हा मला धक्काच बसला. अशाप्रकारच्या पोस्टवर 353 (2) चं कलम लावलं. या कलमानुसार अफवा पसरवणं, खोटी बातमी पसरवणं आणि दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण करणं, ज्यामुळे वेगवेगळ्या पातळीवर त्यांच्यात शत्रुत्व निर्माण होईल, या गोष्टींचा समावेश होतो.

आणि तसं तर माझ्या पोस्टमुळे कुठलीही अफवा पसरलेली नाही. सध्याच्या चालू घडामोडींवर आधारित मी प्रश्न त्यात केलेला आहे. मी कुठल्याही दोन समाजांबद्दल बोललेलोही नाही. आणि त्या पोस्टमधून कुठले दोन समाजही निर्माण होत नाहीत. समाजाचाच प्रश्न नाहीतर कोणामध्ये द्वेष पसरेल. याचंही स्पष्टीकरण नाही.

हे आम्ही उपायुक्त, सगळे चौकशी अधिकारी, परेल 3 चे लोक सर्वांना विचारलं की या पोस्टमुळे कोणत्या दोन गटांमध्ये द्वेष निर्माण झाला आहे, हे तुम्ही आम्हाला स्पष्ट करा. यात कुठली वस्तुस्थिती खोटी आहे, ज्याच्यासाठी तुम्ही हे कलम लावलं आहे, असा प्रश्न केला. पण आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्याच दिवशी सर्व गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. माझा प्रवास कसा आहे, परतीचा प्लॅन काय आहे. हे सर्व त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं.

त्यांनी पहिल्याच दिवशी म्हणजे 10 तारखेला सांगितलं, तुमची एलओसी रिव्हर्स करण्याची प्रक्रिया आहे. त्याच्यावर सही करा. त्यांनी माझा पासपोर्ट फोटो घेतला आणि ती प्रक्रिया पूर्ण केली. तो फॉर्म त्यांनी बऱ्याचवेळेला एडिट केला. तो आम्ही आता पाठवत आहोत, असंही मला त्यांनी सांगितलं.

नंतर त्यांनी 16 तारखेला मला पुन्हा बोलावलं. 16 तारखेला मी पुन्हा परेल ब्रँचला जळगावहून आलो. त्या दिवशीही मी सर्वांना भेटून विनंती केली की, मी 19 तारखेला सकाळी लवकर प्रवास करतोय. तेव्हा मला माझ्या एलओसीवर निर्बंध आहेत, तू जाऊ शकत नाही, असं कोणीही सांगितलं नाही. मला अधिकृतरित्या कोणीच काही कळवलेलं नाही. माझा ई-मेल, फोन सर्व त्यांच्याकडे आहे.

19 ला सकाळी लवकर जेव्हा मी विमानतळावर गेलो तेव्हा मला थांबवलं गेलं. विमानतळावर तुम्ही जाऊ शकत नाही, असं सांगत मला परत पाठवलं.

आता त्यांनी मला प्रश्नोत्तरासाठी पुन्हा बोलावलेलं आहे. मी त्यांना निर्बंध हटवा म्हणून पुन्हा विनंत करणार आहे. माझा ट्रॅव्हल बॅन केला आहे, मी ब्रिटिश नागरिक आहे. माझं घर तिकडं आहे, मुलं तिकडे आहेत, माझ्या एम्प्लॉयरने तिथलं काम बुडतंय, पेशंटचं नुकसान होतंय, मी कधी जॉइन होतोय, असं विचारलं आहे. इथे मी चौकशीसाठी पूर्ण सहकार्यही केलं आहे.

फेसबुकवरची पोस्ट मीच टाकली आहे, हेही मी मान्यही केलं आहे. त्यात आता चौकशीचं फार काही उरलेलं नाही. तरी मी एकूण 20 ते 21 तास त्यांच्या चौकशीसाठी दिले आहेत. आज पुन्हा त्यांच्याकडे जाणार आहे. त्यांना पुन्हा विनंती करणार आहे की, प्रवासावरील बंदी काढा म्हणजे मला लवकरात लवकर परत जाता येईल. माझी मुलं तिकडे तणावात आहेत. माझी पत्नी माझ्यासोबतच आहे. तिचंही काम बुडत आहे. आणि एम्प्लॉयर आम्हाला तुमची लिव्ह संपलीय परत कधी येताय असं विचारत आहेत.

मी आता विचित्र परिस्थितीत आलोय. एक साधी फेसबुक पोस्ट ज्यात सरकार समर्थकांना काही प्रश्न विचारलेत. पण माध्यमांमध्ये सांगितलं जातंय की, आम्ही सरकारमधील नेत्यांना, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची मानहानी केलीय.

त्या पोस्टमध्ये कुठल्याही नेत्याची मानहानी केलेली नाही. त्यांना तेही विचारलं. पण कोणी स्पष्टीकरण द्यायला तयार नाही. त्यामुळे मला आता येथून बाहेर निघण्यासाठी विनंती करणार आहे.

बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे आणि डॉ. संग्राम पाटील

प्रश्न : मला यावर विचारायचं आहे की, तुम्ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असता. आणि अत्यंत स्पष्टपणे तुम्ही तुमच्या भूमिका मांडत आला आहात. तुम्हाला असं वाटतंय का, की स्पष्टपणे भूमिका मांडणं अडचणीचं ठरतंय म्हणून आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडताहेत.

डॉ. संग्राम पाटील : मला थोडा तोच प्रकार वाटतो आहे. हे भाजपच्या आयटी सेलच्या एका कर्मचाऱ्याने ती तक्रार केलेली आहे. या तक्रारीत दुसऱ्या एका प्लॅटफॉर्मवरची पोस्ट घेतली आहे त्यांनी. कुठली तरी शहर विकास आघाडी, ज्याचा माझा काहीही संबंध नाही.

सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट कधीतरी पाहिल्या असतील-नसतील, मला आठवत देखील नाही. जी पोस्ट आहे ती एफआयआरमध्ये मुख्य तक्रार आहे. त्याला जोडून त्यांनी माझी पण पोस्ट दिलेली आहे.

मला टार्गेट करण्यासाठी मला एका मोठ्या प्रकरणाशी क्लब केलेलं आहे आणि माझ्यावर एफआयआर केलेलं आहे, असं मला दिसतंय. शहर विकास आघाडीची जी पोस्ट होती, ती मात्र डिलीट झाली आहे. ती उपलब्ध देखील नाहीय. आणि मला मात्र विमानतळावर एलओसी लावून आक्रमक कारवाई केली आहे.

सोशल मीडियासाठी मला कुठली नोटीस दिलेली नाही, माझी प्राथमिक चौकशी केलेली नाही. माझ्याशी संपर्क साधण्यात आला नाही. माझे सर्व संपर्क भारतीय व्यवस्थेत आहेत. काही न करता मोठी अशी आक्रमक कारवाई करायची, विमानतळावर ताब्यात घ्यायचं, आणि जाण्यासाठी मला अडचण निर्माण करायची. मी पुन्हा प्रश्न विचारू नये, सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करू नये, यासाठी हे आहे का?

प्रश्न : या सगळ्या गोष्टींकडे कायदेशीर बाजूने तुम्ही कसं पाहता?

डॉ. संग्राम पाटील : मुळातच हा जो प्रकार झालेला आहे. तो माझ्या पोस्टला लागूच होत नाही. हेच बेकायदा आहे. त्यामुळे मग त्याच्यातून ज्या प्रक्रिया चालल्यात या देखील तशाच आहेत. इतका वेळ एक सोशल मीडिया पोस्टसाठी आणि तेही मी आधीच मान्य केलं आहे. मी त्यांना परत येण्याची ग्वाहीही दिलीय.

न्यायालयात बोलवल्यास त्यावेळीही येईन. माझे सर्व नातेवाईक इकडे आहेत. मी वर्षाला तीन ते चार वेळेला भारतात येत असतो. मी सगळी ग्वाही दिली आहे. तरी माझ्यावर निर्बंध लावणे, हे मला तेवढं संयुक्तिक वाटत नाही.

आणि खरं म्हणजे एफआयआरच्या कलमातच माझी पोस्ट बसत नाही. हाच मुळात मुद्दा आहे. म्हणजे तो एफआयआरच मला मुळात मान्य नाही.

प्रश्न : तुम्ही ब्रिटिश नागरिक आहात तर, तुम्हाला याबाबत ब्रिटिश सरकारकडून काही पाठिंबा मिळतोय का? त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहेत?

डॉ. संग्राम पाटील : मला ब्रिटिश सरकारकडून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. मी त्यांचे खूप धन्यवाद देतो. ब्रिटिश हायकमिशन मुंबईचे अधिकारी दररोज माझ्याशी बोलत आहेत. मला ई-मेल किंवा फोन करून विचारणा करतात. पोलीस अधिकाऱ्यांना देखील ते फोन करून विचारत आहेत, प्रक्रिया जाणून घेत आहेत.

माझे ब्रिटनमधील स्थानिक खासदारही ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. कारण मी त्यांना देखील ई-मेल लिहिला होता. माझ्यावर बेकायदा पद्धतीने एफआयआर करण्यात आलेला आहे, त्याबद्दल तुम्ही हस्तक्षेप करा अशी विनंती मी त्यांना केली होती. त्याप्रमाणे त्यांनी देखील यात लक्ष घातलेलं आहे.

माझा छळ केला जात आहे. मला घरी जाण्यापासून रोखलं जातंय, आणि मोठमोठ्या तासन्तासाच्या चौकशा लावल्या जात आहेत तेही एका फेसबुक पोस्टसाठी. ती पोस्ट मी केलीय हे मी मान्यही केलं आहे. तरीही मला वेगवेगळ्या कारणांनी थांबवलं गेलं आहे. हे बेकायदा आहे आणि माझा छळ केला जात आहे. हा ठरवून केलेला छळ आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

प्रश्न : तुम्ही भारतात असल्यासून राजकीय, सामाजिक कार्यात सक्रिय राहिलेले आहात. तुमचा ग्रामीण भागामध्ये टच आहे, तिथे गेल्यानंतरही भारतातील गोष्टींबद्दल सजग असणे, भाष्य करणे हे तुम्ही चालू ठेवलेलं आहे. या सगळ्या गोष्टींवर तुम्ही सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. तर तुम्हाला हे का करावसं वाटतं?

डॉ. संग्राम पाटील : कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त जरी मी भारतातून बाहेर गेलो असलो तरीही मी मूळ जळगावचाच आहे. माझे वडील आजही शेती करतात. ही माझी नाळ कशी सुटणार. भारत माझा देश आहे, जनगण म्हणत, वंदे मातरम म्हणत मोठा झालो आहे. तर हे सुटणार नाही.

तिथे जरी मी काही कारणास्तव गेलो आणि तांत्रिक कारणांसाठी ब्रिटिश नागरिकत्व घ्यावं लागलं आहे. कारण इकडे-तिकडे प्रवास करणं, कुठे काही अडचणी येतात, त्यामुळे तसं केलं आहे. पण हे देखील मी अनिच्छेने केलेलं आहे. भारतीय नागरिकत्व सोडून असं काही करायची माझी अजिबात इच्छा नव्हती. माझ्या इतर कारणांसाठी ते मी केलं. पण ही नाळ सुटत नाही आणि ती सुटणारही नाही. माझ्यावर कारवाया जरी झाल्या तरी मी देशाविषयी, देशाच्या लोकशाहीविषयी बोलणं थांबवणार नाही. ते चालूच ठेवेल.

प्रश्न : या सर्व गोष्टींचा तुमच्या कुटुंबावर काय परिणाम होतोय. त्यांची काय प्रतिक्रिया आहे?

डॉ. संग्राम पाटील : सर्वांना ताण येणार हे साहजिकच आहे. त्यांना काळजी वाटते, त्यांना वाटतं की, बाबा तू तिकडेच सुखाने जा. एरवी आई-बाबांना वाटतं की मुलांनी यावं भेटायला. आता त्यांना असं वाटतंय की सुखाने जा. उलटी प्रक्रिया झाली आहे. ही देखील एक भावनिक गोष्ट आहे. इथं सुरक्षा नाही, तू तिकडं सुरक्षित राहा, असं त्यांना वाटतं.

माझी मुलं चिंतेत आहेत. पत्नी माझ्यासोबत आहे. आम्ही मनाने ठाम आहोत. हे चुकीचं चाललंय, आणि का चाललंय तेही आम्हाला कळतंय. माझा आवाज दाबण्यासाठी हा छळ चालला आहे, हेही कळतंय.

त्यामुळे आम्ही ते स्वीकारलं आहे, आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत. मी आणि माझी पत्नी ठीक आहोत. बाकीच्यांना चिंता असणं हे नैसर्गिकच आहे.

प्रश्न : याचा काही परिणाम तुमच्या सोशल मीडियावर, लिहिण्यावर होईल, असं वाटतंय का?

डॉ. संग्राम पाटील : सोशल मीडियावर काही परिणाम होणार नाही. आहे त्याच पद्धतीने कुठलंही असंसदीय, असभ्य सोशल मीडियावर लिहित नाही. त्यामुळे मी ते लिहित राहणार. आता सध्या मला बरं नव्हतं. त्याचबरोबर मी व्यस्तही आहे, त्यामुळे मी सध्या फारसं लिहित, बोलत नाही. यातून बाहेर पडल्यावर मी पुन्हा चालू करेन. मी जे सामाजिक, सांस्कृतिक आणि काही राजकीय विषय मांडत होतो, ते मी मांडतच राहीन, या घटननंतर मी राजकारणावर जास्त बोलेन किंवा कमी बोलेन असं काही नाही. मी यापुढेही रास्तच भूमिका घेईन.

डॉ. पाटील यांना परत जाताना अडवलं

सोशल मीडियावरून राजकीय, सामाजिक विषयांवर ते सातत्याने व्यक्त होतात.

लंडनहून भारतात येतानाही मुंबई विमानतळावर डॉ. संग्राम पाटील यांची तासन् तास चौकशी झाली होती. लंडनला परत जातानाही डॉ. पाटील यांची चौकशी सुरू आहे.

याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. संग्राम पाटील यांनी सांगितलं की, लंडनला परत जाताना मला मुंबई विमानतळावर अडवण्यात आलं.

डॉ. संग्राम पाटील यांच्या नावावर काढण्यात आलेलं लुकआऊट सर्क्युलर अद्याप कायम असल्यानं, त्यांना देश सोडून जाता येणार नाही, असं इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सांगितल्याचंही त्यांनी नमूद केलं.

10 जानेवारीला एका सायबर गुन्ह्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं.

तेव्हा मुंबई पोलीस उपायुक्तांनी त्यांना अटक करण्यात आली नसून फक्त नोटीस बजावली असल्याची माहिती दिली होती.

विमानतळावर काय घडलं होतं?

डॉ. संग्राम पाटील म्हणाले, "मला पोलिसांनी 16 जानेवारीला बोलावलं होतं. त्याप्रमाणे मी त्या दिवशी वेळेवर जाऊन त्यांच्या सर्व प्रश्नांना लेखी उत्तरं दिली. माझा जबाब दिला. त्याचवेळी मी पोलिसांना विनंती केली होती की, आता चौकशी झाल्यानं माझ्या नावावरील लुक आऊट सर्क्युलर रद्द करा आणि मी 19 जानेवारीला पुन्हा माघारी जाऊ शकेल असं बघा."

"पोलिसांनी 10 जानेवारीपासूनच माझ्या सह्या घेऊन त्याबाबतची प्रक्रिया सुरू केली होती. त्यांनी माझा पासपोर्ट फोटोही घेतला होता आणि आम्ही लुक आऊट सर्क्युलरसाठी हे घेतोय सांगितलं होतं. त्यांनीही होकार दिला होता. डीसीपींनीही आम्ही हे करू असं सांगितल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं."

"मात्र, आज सकाळी मी परतीच्या प्रवासाला निघालो, तर मला विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यानं अडवलं. तसेच माझ्या नावावरील लुकआऊट सर्क्युलर कायम असल्याचं सांगत देश सोडून जाता येणार नाही, असं सांगितलं," अशी माहिती डॉ. संग्राम पाटील यांनी दिली.

सायबर गुन्ह्यात डॉ. संग्राम पाटील यांना नोटिस

फोटो स्रोत, FACEBOOK/DR SANGRAM PATIL

फोटो कॅप्शन, डॉ. संग्राम पाटील

डॉ. पाटील पुढे म्हणाले, "सध्या माझी मुलं लंडनमध्येच आहेत. माझा जॉबही तिकडे आहे. तिकडे सगळंच माझं वाऱ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि भारतातील कायदा मला मुक्तपणे फिरण्याचा अधिकार देतो. त्यावर निर्बंध घालण्यात आलेत. मला घरी जाता येत नाहीये."

"एका फेसबूक पोस्टसाठी लुकआऊट सर्क्युलरसारखी कारवाई करण्यात आली. ते सर्क्युलर आता लगेच मागे घ्यायला हवं होतं. त्यांनी ते परत न घेतल्यानं मला इथंच थांबावं लागत आहे. मी आणि माझी पत्नी दोघेही जात होतो. मात्र, मला विमानतळावर अडवल्यानं माझी पत्नीही माझ्यासोबतच थांबली."

"पोलीस याबाबत स्पष्टपणे काहीही बोलत नाहीयेत. ते वरिष्ठ पातळीवरील नावं सांगतात. यावरून वरिष्ठ पातळीवरून हे लुकआऊट सर्क्युलर मागे घेण्यात आलेलं नाही, असं दिसतंय. ते भेटही द्यायला तयार नाही. आम्ही 16 जानेवारीला त्यांना भेटायला गेलो होतो, पण भेट देण्यात आली नाही. डीसीपींनी भेट दिली आणि हे काम करतो म्हटले. मात्र त्यांनीही काही केलं नाही."

"चौकशीनंतर पोलिसांनी सांगितलं होतं की, आम्ही लुकआऊट सर्क्युलर मागे घेण्याची प्रक्रिया केली आहे. 19 जानेवारीला मी परत जातो आहे हे सगळ्यांना सांगितलं होतं. मात्र, तरीही त्यांनी ते सर्क्युलर मागे घेतलेले नाही. यामुळे मुक्तपणे संचार करण्याचा माझा अधिकार हिरावला गेला आहे," असा आरोप पाटील यांनी केला.

याबाबतीत बीबीसी मराठीने पोलिसांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. ती अद्याप मिळू शकली नाही. ती मिळाल्यावर बातमीत अपडेट करण्यात येईल.

आतापर्यंत काय काय घडलं?

डॉ. संग्राम पाटील यांना एका सायबर गुन्ह्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 10 जानेवारीला ताब्यात घेतलं होतं.

लंडनहून मुंबईत आल्यावर विमानतळावर त्यांची चौकशी झाल्याची माहिती समाजमाध्यमांतून प्रसिद्ध झाली.

त्यावर मुंबई पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी डॉ. पाटील यांना अटक करण्यात आले नसून त्यांना बीएनएसएसच्या 35 (3) नुसार पुढील तपासासाठी नोटीस दिल्याचे स्पष्ट केले होते.

तर संग्राम पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना या कारवाईबाबत दुजोरा दिला होता. रात्री अडीचच्या दरम्यान त्यांना ताब्यात घेतलं आणि सायंकाळी 5 वाजता सोडलं असं त्यांनी सांगितलं होतं.

संग्राम पाटील हे डॉक्टर असून त्यांच्या फेसबूक प्रोफाईलवरील माहितीनुसार त्यांचे शिक्षण पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण झाले असून ते भूलशास्त्र विषयात एमडी आहेत.

त्यानंतर ते इंग्लंडमधील विविध वैद्यकीय संस्थांशी संबंधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ते पेन मेडिसिन आणि अॅनेस्थेटिक्स कन्सल्टंट म्हणून कार्यरत असल्याचं या प्रोफाइलमध्ये म्हटलं आहे.

नेमके प्रकरण काय?

संग्राम पाटील यांच्याविरोधात ठाण्यातील रहिवासी निखिल भामरे यांनी तक्रार नोंदवली आहे. ते भारतीय जनता पार्टीसाठी महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक या पदावर काम करतात.

त्यांनी पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीनुसार 14 डिसेंबर 2025 रोजी 'शहर विकास आघाडी' हे खातं चालवणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक मजकूर प्रसिद्ध केला आहे.

त्यात त्यांनी आपल्या नेत्याबद्दल द्वेषाची भावना पसरवली आहे अशी तक्रार भामरे यांनी केली आहे.

तसेच एका महिलेबद्दल आक्षेपार्ह माहिती यात प्रसिद्ध केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्या मजकुराचा स्क्रीनशॉट घेतल्याचं या तक्रारीत नमूद केलं आहे.

याबरोबरच भामरे यांनी संग्राम पाटील यांच्याविरोधातही अशीच तक्रार केली आहे.

पाटील यांनी आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा तसेच समाजात द्वेषाची भावना निर्माण करणारा मजकूर प्रसिद्ध केला असं त्यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

डॉ. संग्राम पाटील यांची प्रतिक्रिया

डॉ. संग्राम पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "आम्ही मध्यरात्री अडीचच्या सुमारास लंडनहून मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी मला ताब्यात घेतलं होतं.

निखिल भामरे, या भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार मी केलेल्या एका व्हीडिओबाबत त्यांना ते कंटेंट आक्षेपार्ह वाटल्यामुळे गुन्हा दाखल आहे. त्यानुसार मला लोअर परळ येथील क्राईम ब्रँच कार्यालयात चौकशीसाठी मध्यरात्रीपासून ठेवलं होतं.

मला चौकशी करून सोडले आहे. पोलिसांनी विचारलेल्या माहितीनुसार मी सगळी माहिती त्यांना दिली आहे. मला या प्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यानुसार ही प्रक्रिया आणि चौकशी सुरू राहील.

डॉ. संग्राम पाटील

फोटो स्रोत, facebook/drsangramgpatil

दिलेल्या नोटीसला मी भारतातून निघण्यापूर्वी उत्तर देईन. आम्ही मुंबईहून गावाकडे निघालो आहोत."

पुढे संग्राम पाटील म्हणाले की, "मला या प्रक्रियेमुळे कुठेही जाता येणार नाही असं नाही. मला जिथे जायचं आहे तिथे मी जाऊ शकतो. एका सोशल मीडिया पोस्ट कोणाला आवडली नसल्यामुळे ही तक्रार आहे. त्यात फारसं काही नाही. त्यामुळे दहा दिवसांनंतर मी पुन्हा लंडनला जाणार आहे.

मला या सगळ्या 35 ते 40 तासांत या गोष्टीमुळे आणि प्रवासामुळे शारीरिक त्रास झाला. पण मानसिकदृष्ट्या मी बरा आहे."

समाजमाध्यमांत काय प्रतिक्रिया?

डॉ. संग्राम पाटील यांच्यासंदर्भातील तक्रारीबद्दल सोशल मीडियात विविध पोस्ट प्रसिद्ध झाल्या आहेत. काही पोस्टमध्ये त्यांना अटक झाल्याचे म्हटले आहे. मात्र पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी पाटील यांना अटक झालेली नसल्याचं सांगितलं आहे.

वकील असीम सरोदे यांनीही फेसबूकवर यासंबंधी पोस्ट लिहिली आहे.

ते लिहितात, "संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईत उतरताच पोलिसांनी एअरपोर्टवर ताब्यात घेतले.

आत्ताच त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांना व त्यांच्या पत्नीला पहाटे 2 वाजतापासून पोलिसांनी चौकशीच्या निमित्ताने ताब्यात ठेवलेले आहे.

खरे तर हे अन्याकारक आहे आणि छळवाद आहे, असंही सरोदे म्हणाले.

संग्राम पाटील हे लंडन मध्ये राहतात. सातत्याने सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. एक उत्तम भारतीय जे आता लंडनवासी आहेत त्यांच्यामध्ये डॉ संग्राम पाटील यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी लंडनमध्ये माझे भाषण आयोजित केले होते, असं सरोदेंनी म्हटलं आहे.

पोलीस त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचा बॉण्ड लिहून घेऊन त्यांना अटी आणि शर्ती घालून सोडले जाईल असे दिसते. मी त्यांच्या संपर्कात आहे आणि संग्राम पाटील यांना कोणतीही कायदेशीर मदत लागल्यास तशी पावले उचलण्यात येतील, असंही सरोदे यांनी लिहिलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)