'बेस्ट बस आमचा हक्क, पण त्यासाठी झगडावं लागतंय'; मुंबईच्या 'बेस्ट बस'सेवेची सद्यस्थिती कशी?

बस
फोटो कॅप्शन, बेस्ट बसची कमतरता, बस वेळेवर न येणे, जुनाट गाड्या, बसस्टॉप दुर्दशा यामुळे सध्या पालिकेच्या बेस्ट बस सेवेत सर्वसामान्य मुंबईकर त्रस्त आहेत.
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"महापालिका आमच्याकडून कर घेते, त्या बदल्यात सेवा देते. बस सेवा आमचा हक्क आहे, पण आज परिस्थिती अशी की त्यासाठी झगडावं लागतंय. बस खूप कमी आहेत, तासनतास वाट पाहावी लागते."

ही प्रतिक्रिया मुंबईत घाटकोपर येथे राहणाऱ्या रुपेश शेलटकर यांची आहे.

बेस्ट बसची कमतरता, बस वेळेवर न येणे, वेटलिजवरच्या बसेसची अवस्था, बेस्ट बसचे अनेक रूट्स बंद, जुनाट गाड्या, कर्मचाऱ्यांचा तुटवडा, बसस्टॉप दुर्दशा आणि बेस्ट उपक्रमाकडे पालिकेचे झालेले दुर्लक्ष यामुळे सध्या पालिकेच्या बेस्ट बस सेवेत सर्वसामान्य मुंबईकर त्रस्त आहेत.

तज्ज्ञांच्या मतानुसार, जर स्व-मालकीच्या बसेस वाढवल्या नाहीत, पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आणि सध्या असलेली व्यवस्था सुधारली नाही, तर एक दिवस मुंबईकरांना बेस्ट बसच्या प्रवासाला मुकावं लागेल.

तर बस फेऱ्या वाढवणे, नवीन गाड्या घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे आणि इतर सोयी सुविधा व्यवस्थित करण्यावर आम्ही भर देत आहोत, असे बेस्ट उपक्रमाचे म्हणणे आहे.

बेस्ट सेवा सुरळीत नसल्यानं मुंबईकर त्रस्त

मुंबईत सध्या बेस्ट उपक्रमाच्या बस सेवेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी बीबीसी मराठीची टीम मुंबईतील विविध भागांमध्ये पोहोचली.

त्या दरम्यान मुंबईतील अंधेरी स्थानक पूर्व, घाटकोपर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स स्थानकाबाहेर, कुर्ला पश्चिम, दादर, वांद्रे पूर्व आणि मुंबईतील इतर परिसरातील बस थांब्यांवर प्रवाशांना तासंतास बसच्या प्रतिक्षेत राहावं लागतं असल्याचे चित्र पाहायला मिळालं.

प्रवाशांची गर्दी एवढी की जवळच असलेल्या स्थानकात प्रवाशांच्या रांगा पाहायला मिळाल्या.

बेस्ट बस प्रवासावर अवलंबून असणारे मुंबईकर बेस्ट उपक्रमाच्या सध्याच्या व्यवस्थापनामुळे संतप्त असल्याचं सर्वत्र पाहायला मिळालं.

मुंबई परिसरातील बस थांब्यांवर प्रवाशांना तासनतास बसच्या प्रतिक्षेत राहावं लागतं असल्याचे चित्र पाहायला मिळतं.
फोटो कॅप्शन, मुंबई परिसरातील बस थांब्यांवर प्रवाशांना तासनतास बसच्या प्रतिक्षेत राहावं लागतं असल्याचे चित्र पाहायला मिळतं.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यासंदर्भात अंधेरी स्थानकाच्या बाहेर बस थांब्यावर अक्सा भाटिया या ऑफिसला जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना बीबीसी मराठीने त्यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "गेल्या काही वर्षात बसचा मोठा तुटवडा जाणवत आहे. आम्ही अर्धा तास ते तासभर बसची वाट पाहतो. बस वेळेत येत नाहीत. त्यामुळे ऑफिसला जायला देखील उशीर होतो. बस वाढवायला हव्यात."

तर घाटकोपर येथे घाटकोपर आगाराच्या बस थांब्यावर बसची वाट पाहणारे रंजन बक्षी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "असलेल्या बसची अवस्था व्यवस्थित नाही, बस भरगच्च भरून येतात. त्यामुळे बसमध्ये चढता येत नाही. बसचे रूट बदललेले आहेत. त्यामुळे बेस्ट बसने प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते."

तर कुर्ला येथे राहणाऱ्या विद्या कासारे कुर्ला पश्चिम परिसरात रांगेत उभ्या होत्या. त्या गेल्या 20 वर्षांपासून बेस्ट बसने प्रवास करतात.

विद्या कासारे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, "वेळेवर येत नाहीत, आली तर ड्रायव्हर कंडक्टर नसतो, मग त्या लगेच सोडत नाहीत. कशाही बस चालवतात, पूर्वी चांगलं नियोजन होतं, आता खूप मनस्ताप होतो. नाईलाजाने प्रवास करावा लागतो."

'बेस्ट आर्थिक, तांत्रिक आणि धोरणात्मक संकटात'

मुंबईत बेस्टमुळे संतप्त असलेल्या या केवळ प्रवाशांच्या प्रतिक्रिया नाहीत. तर दैनंदिन आयुष्यामध्ये जगत असताना, स्वतःच्या हक्कापासून वंचित रहाव्या लागणाऱ्या सर्वसामान्यांच्या वेदना आहेत.

मुंबईची दुसरी लाईफलाइन म्हणजे बेस्ट बस सेवा. सध्या दररोज 32 लाख प्रवासी याच सेवेमुळे ऑफिस, शाळा आणि दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडतात.

पण सध्या हीच सेवा आर्थिक, तांत्रिक आणि धोरणात्मक संकटात अडकली आहे.

अन् त्यामुळे सर्वसामान्य लोकांना पूर्वीसारखी सेवा मिळत नाहीये, असं बेस्ट बस सेवा व्यवस्थित मिळावी यासाठी लढणारे मुंबईकर आणि 'आपली बेस्ट आपल्यासाठी' संस्थेचे रुपेश शेलटकर सांगतात.

बेस्ट उपक्रमाच्या बस वाचाव्यात यासाठी गेल्या काही वर्षांपासून शेलटकर 'आपली बेस्ट आपल्यासाठी' संस्थेमार्फत लढत आहेत.

बस साठी थांबलेले नागरिक
फोटो कॅप्शन, मुंबईची दुसरी लाईफलाइन म्हणजे बेस्ट बस सेवा. सध्या दररोज 32 लाख प्रवासी याच सेवेमुळे ऑफिस, शाळा आणि दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडतात.

बीबीसी मराठीशी बोलताना रुपेश शेलटकर म्हणाले, "गेल्या 5-6 वर्षांमध्ये बसची सेवा खूप बदलली आहे. ही परिस्थिती प्रवाशांसाठी प्रतिकूल आहे. मागे थेट दुप्पट भाडेवाढ केली. त्या बदल्यात सुविधा कोणत्या दिल्यात? आजही आम्हाला गाड्यांसाठी उभं राहावं लागतं."

"स्वमालकीच्या बसेस दिवसेंदिवस कमी होत आहेत. वेटलिजवर बस घेऊन व्यवस्था सुधारणार आहे का? सर्वसामान्य मुंबईकर या हक्काच्या बेस्ट सेवेसाठी लढत आहेत, आमदार खासदारांनी त्यांचा निधी स्वमालकीच्या बेस्ट बस घेण्यासाठी द्यावा," अशी मागणी त्यांनी केली.

बेस्ट बस व्यवस्थापन सुधारणेवर आणि मुंबईकरांना त्यांच्या हक्काचा प्रवास करता यावा यासाठी गेल्या काही वर्षात मुंबईत सर्वसामान्य मुंबईकर, अनेक सामाजिक संस्था, कामगार आणि राजकीय संघटना सर्वच पातळीवर लढत आहेत.

मुंबईत सध्या बेस्ट बसची सद्यस्थिती बिकट

बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकीच्या 249 बस सध्या उपलब्ध आहेत. तसेच कंत्राटी 2400 बस आहेत. तर, 15 वर्षे पूर्ण झालेल्या बस सेवानिवृत्त करून त्यांना भंगारात काढले जाते.

त्यामुळे स्वमालकीच्या ताफ्यात हळूहळू घट होत राहील. सप्टेंबर 2023 पर्यंत बेस्टकडे स्वमालकीच्या 1500 बस होत्या.

तर, हा आकडा एप्रिल 2024 पर्यंत 1100 पर्यंत कमी झाला होता. नोव्हेंबर 2025 पर्यंत 298 आणि सध्या 249 स्वमालकीच्या बस शिल्लक आहेत.

त्यानंतर मार्च 2026 पर्यंत 235 आणि मार्च 2027 पर्यंत बेस्टकडे स्वमालकीचा ताफा उरणार नाही.

बेस्ट उपक्रमातील स्वमालकीचा ताफा 2027 सालापर्यंत संपुष्टात आल्यानंतर प्रवाशांना मिळणारी स्वस्तातील वाहतूक सुविधा बंद होण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, बेस्ट उपक्रमातील स्वमालकीचा ताफा 2027 सालापर्यंत संपुष्टात आल्यानंतर प्रवाशांना मिळणारी स्वस्तातील वाहतूक सुविधा बंद होण्याची शक्यता आहे.

बेस्ट उपक्रमातील स्वमालकीचा ताफा 2027 सालापर्यंत संपुष्टात आल्यानंतर प्रवाशांना मिळणारी स्वस्तातील वाहतूक सुविधा बंद होण्याची शक्यता आहे. बेस्टच्या ताफ्यात कंत्राटी 2400 बस आहेत.

त्यावर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी आहेत, परंतु या बसची देखभाल-दुरूस्ती योग्यप्रकारे होत नाही. तसेच या बसवरील कर्मचाऱ्यांना कर्तव्याप्रती योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे कंत्राटी बस सेवेबाबत प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोष आहे.

बेस्ट बसचे अनेक रूट्स बंद, बसेस वेळेवर नाहीत, जुनाट गाड्या आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि बेस्ट उपक्रमाकडे पालिकेचे झालेले दुर्लक्ष यामुळे सध्या बससेवेत मुंबईकरांना अडचणी येत असल्याचे मुंबईकर आणि तज्ज्ञ सांगतात.

या सेवेकडे दुर्लक्ष करणं घोडचूक आहे

गेल्या काही वर्षांपासून बेस्ट प्रशासन अपुरी सेवा देत असल्यामुळे प्रवासी संख्येत देखील मोठी घट झाली आहे.

2009 साली 45 लाख प्रवासी रोज प्रवास करायचे ती थेट संख्या 32 लाखांवर आली.

या सेवेबद्दल आणि सद्यस्थितीबद्दल परिवहन अभ्यासक आणि 'आमची मुंबई, आमची बेस्ट' संयोजक विद्यादर दाते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "पालिका सरकार प्रशासनाकडे भरपूर पैसे आहेत. या बस उपक्रम सेवेला पैसे देणे हे त्यांचं मूलभूत कर्तव्य आहे. मागे भाडेवाढ केली, पण प्रशासनाने बेस्ट उपक्रमाला पैसे देऊन परिस्थिती सुधारणे आवश्यक आहे."

"पालिका प्रशासनाने या सेवेकडे दुर्लक्ष करणं घोडचूक आहे. सर्वसामान्य लोकांवर याचा परिणाम होतोय. त्यामुळे ही परिस्थिती सुधारायला हवी. जगाच्या पाठीवर कुठलीही सार्वजनिक वाहतूक फायद्यात चालत नाही."

आंदोलनकर्ते
फोटो कॅप्शन, बेस्ट उपक्रम एकूण 8 हजार कोटींच्या संचित तुटीमध्ये आहे, असे कामगार संघटना प्रतिनिधी सांगतात.

तर महापालिकेकडून पुरेसा निधी बेस्ट उपक्रमाला मिळत नाही. तसेच बेस्टच्या विद्युत विभागाचा नफा परिवहनकडे वळवण्याचे बंधन आले आहे.

त्यामुळे बेस्ट उपक्रम एकूण 8 हजार कोटींच्या संचित तुटीमध्ये आहे, असे कामगार संघटना प्रतिनिधी सांगतात.

यापूर्वी बेस्ट उपक्रमातील विद्युत विभागाचा नफा परिवहन विभागाकडे वळविण्यात यायचा. तसेच पालिकेकडून या उपक्रमाला योग्य निधी उपलब्ध करून दिला जायचा. त्यामुळे बेस्ट सेवा सुरळीत होती.

या संदर्भात बेस्ट कामगार नेते रंगा सातोसे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "जगाच्या पाठीवर कुठलीही सार्वजनिक वाहतूक फायद्यात चालत नाही. बेस्ट उपक्रमातील इलेक्ट्रिसिटी सेवेत ही सेवा योग्यरीत्या कार्यरत होती."

"इलेक्ट्रिसिटी सेवेतील आर्थिक पुरवठा बंद केल्यामुळे बेस्ट बस सेवा ढासळत गेली. उत्पन्न आणि तूट यातला फरक महापालिकेने भरून द्यायचे हे कर्तव्य पालिकेने पार पाडले नाही. त्याचे परिणाम आज आपण हे सगळे पाहत आहोत."

बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाने आरोप फेटाळले

बेस्ट बस ही एक सेवा आहे. मुंबई महापालिकेच्या 1888 च्या कायद्याप्रमाणे कलम 63 अन्वये पालिकेने लोकांना पुरवण्याच्या सोयी सुविधा, यामध्ये बेस्ट उपक्रमाच्या सोयी सुविधा यांचा देखील उल्लेख आहे.

मात्र ही सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने प्रवासी आणि कामगार संघटना आमच्या सेवेवर व हक्कावर गदा येतेय, असं सांगतात.

या उपक्रमात वेटलिजवर गाड्या, कर्मचारी घेऊन खासगीकरण केले जात आहे. योग्य व्यवस्थापन नसल्याचे देखील आरोप कामगार संघटना आणि प्रवासी संघटना करतात.

मात्र हे सगळे आरोप बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाने फेटाळले आणि बेस्ट उपक्रमाची परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे सांगितले.

बेस्ट उपक्रम जनसंपर्क विभागाकडून याबद्दल माहिती देताना म्हटले की, बेस्ट उपक्रमाचे खासगीकरण करणे हे विचारात पण नाही, ही चुकीची माहिती आहे.

वेटलीज गाड्या घेत आहोत हे सर्वांना माहीत आहे. अनेक वर्षानंतर भाडेवाढ झाली ही बेस्टची परिस्थिती आणि व्यवस्था सुधारावी यासाठी होती.

बस फेऱ्या वाढवणे, नवीन गाड्या घेण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी पालिकेकडे प्रस्ताव देखील ठेवला आहे आणि इतर सोयी सुविधा व्यवस्थित करण्यावर आम्ही भर देत आहोत.

पालिका ही बेस्ट उपक्रमाला योग्य मदत करत नाही, असं काही नाही. मदत मिळत आहेत. आणखी अधिक मदत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

'तरच ही बेस्टची परिस्थिती सुधारू शकते'

मुंबईकरांची जीवन वाहिनी समजली जाणाऱ्या बेस्ट बसला चांगले दिवस यायचे असतील, तर साधारण 10 ते 15 हजार स्वमालकीच्या गाड्या घ्याव्या, बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिका अर्थसंकल्पात विलीन करावा, कंत्राटी पद्धतीने कर्मचारी आणि गाड्या घेणे बंद कराव्यात, अशी मागणी गेल्या काही वर्षात मुंबईकर, आपली मुंबई आपली बेस्ट, आपली बेस्ट आपल्यासाठी संस्था आणि कर्मचारी संघटना प्रशासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार आणि आंदोलन करत करत आहेत.

याच संदर्भात आणि बेस्ट कामगारांच्या मागण्यासंदर्भात 10 नोव्हेंबरला बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव उपोषणाला बसले होते.

उपोषणाला बसलेले बेस्ट वर्कर्स

यावेळी बेस्टने कायमस्वरूपी 3 हजार 337 बसेस स्वमालकीच्या राखणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची ग्रॅज्युएटी देणे, बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेत विलीन करणे, कंत्राटी बेस्ट कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन देणे, कंत्राटी बस घेणे बंद करणे यासह इतर मागण्या त्यांनी केल्या होत्या.

या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या तरच बेस्टची ही परिस्थिती सुधारू शकते, असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते.

याची दखल घेत बेस्टच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी आणि बेस्ट प्रशासनाने या मागण्यांवर पुढील 3 महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.

त्यामुळे बेस्ट बसची सेवा बेस्ट करण्यासाठी राज्य सरकार, पालिका आणि बेस्ट प्रशासन पुढील काळात काय ठोस प्रयत्न करते, यावरच बेस्टचे भवितव्य अवलंबून आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)