मुंबईत पार्किंग मिळणं इतकं अवघड का झालंय? शहरातील पार्किंगची सद्यस्थिती कशी आहे?

"मुंबईत कुठे जायचं झालं, तर पार्किंग मिळत नाही" मुंबई शहरातील पार्किंगची समस्या कधी सुटणार?
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"मुंबईत कुठे जायचं झालं, तर पार्किंग मिळत नाही. पार्किंग शोधण्यात वेळ जातो. कुठे जागा मिळालीच, तर नो पार्किंग कारवाई होते. पार्किंग नसल्यामुळे खूप त्रास होतो."

ही त्रस्त प्रतिक्रिया आहे मुंबईत प्रभादेवीजवळ राहणाऱ्या 24 वर्षीय संकेत गावडे या विद्यार्थ्याची. तो राहत असलेल्या परिसरातच नव्हे, तर शहरात सर्वत्र पार्किंग ही एक गंभीर समस्या बनली आहे.

शहरात दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांच्या पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे संकेतसारखे अनेक मुंबईकर विविध समस्यांनी त्रस्त आहेत.

मुंबईत वाहने वाढल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी, वायू आणि ध्वनी प्रदूषण, पार्किंगची समस्या, वाढते अपघात, इंधनाचा अपव्यय आणि पायाभूत सुविधांवर ताण यासारख्या अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिक, पार्किंगची मोठी समस्या आहे. यावर उपाय काढण्यासाठी पालिका आणि राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं आहे.

पार्किंगची जागा नसेल, तर गाडी मिळणार नाही, असा नवा नियम महाराष्ट्रात लवकरच लागू करणार आहोत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. तर पार्किंगसाठी आणखी जागा शोधून नियोजन सुरू असल्याचं पालिकेनं सांगितलं आहे.

पार्किंगच्या शोधात जाणारा वेळ

मुंबईसह राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पार्किंगसह उद्भवणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही मुंबईतील दादर, प्रभादेवी, वरळी, चर्चगेट, सीएसएमटी, कुर्ला, मुलुंड, वांद्रे, अंधेरी आणि दहिसर परिसरात पोहोचलो.

शहरात वाढलेली वाहनसंख्या, ट्रॅफिक, पदपथांवर आणि रस्त्यांवर कशाही पद्धतीने उभ्या केलेल्या गाड्या, तसेच पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजी दिसून आली.

मुंबईकरांशी संवाद साधला असता दैनंदिन जीवनातील काही वेळ पार्किंगच्या शोधात जातो आणि अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं, असं लोक सांगत होते.

दैनंदिन आयुष्यात पार्किंगच्या शोधात वेळ
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, मुंबईत प्रभादेवी येथे राहणारा 24 वर्षीय विद्यार्थी संकेत गावडे यांनी आपला अनुभव सांगितला. संकेत दादर येथील रुईया कॉलेजमध्ये शिकतो. सकाळी कॉलेजला निघाल्यानंतर कॉलेज, क्लास आणि इतर ठिकाणी त्याला पार्किंगची समस्या भेडसावते.

बीबीसी मराठीशी बोलताना संकेत गावडे म्हणाला, "कॉलेज आणि घर या सर्वच परिसरात पार्किंग शोधण्यात वेळ जातो. दिवसरात्र पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. जागा मिळाली आणि गाडी पार्क केली, तरी दंड लागतो."

"साध्या दुचाकीसाठीही कुठेच जागा उपलब्ध नसते. त्यामुळे मुंबईत गाडी चालवणं अवघड झालं आहे. पार्किंगची समस्या कधी सुटणार हे आता प्रशासनालाच माहीत."

मुंबईत प्रत्येक भागात अशा समस्या मुंबईकरांना भेडसावत आहेत.

मुंबईत दादर येथे राहणाऱ्या सुजाता तांबे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, "रस्ते आणि पदपथ गाड्यांनी व्यापलेले आहेत. त्यामुळे चालायला जागा नाही. दुचाकी आणि चारचाकी इतक्या वाढल्या आहेत की, सार्वजनिक बसमध्ये प्रवास करताना ट्रॅफिकमध्ये अडकून वेळ जातो. या गाड्यांमुळे आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांसाठीही मार्ग उपलब्ध राहत नाही."

तर मुंबईत टॅक्सी चालवणारे हार्दिक सिंग सैनिक म्हणाले, "पार्किंगची समस्या इतकी मोठी आहे की नो पार्किंग असतानाही गाड्या उभ्या केल्या जातात. वाहन उभं करणं आणि चालवणं मुंबईत कठीण झालं आहे."

"कुठे मिळेल त्या जागी गाडी लावली, तर वाहतूक पोलीस कारवाई करतात. गाडी चालवून पोट भरायचं की नाही, गाडी कुठे लावायची हा प्रश्न आम्हाला पडतो. प्रशासनाने यावर तोडगा काढायला हवा," अशी मागणी ते करतात.

वाहनं 48 लाखांहून अधिक, पार्किंग 1.5 लाख

परिवहन विभागाच्या माहितीनुसार मुंबईत एकूण 48 लाखांहून अधिक वाहने नोंदणीकृत आहेत. यामध्ये 28 लाख दुचाकी वाहने असून उर्वरित चारचाकी आणि तीनचाकी वाहने आहेत.

तर मुंबई शहरात मुंबई महानगरपालिका आणि खासगी संस्थांकडे मिळून सुमारे 1.5 लाख वाहनांची पार्किंग क्षमता उपलब्ध आहे. त्यामुळे वाहनांची संख्या अधिक आणि पार्किंग कमी अशी परिस्थिती सध्या मुंबईत आहे.

महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालानुसार गेल्या काही वर्षांत मुंबईसह राज्यात वाहनांची संख्या 4.88 कोटींवर पोहोचली आहे. दरवर्षी वाहनसंख्येत 5 ते 6 टक्क्यांनी वाढ होत आहे. मात्र, वाढती वाहनसंख्या आणि लोकसंख्येच्या तुलनेत पार्किंगचं नियोजन दिसून येत नाही.

'वाहन वाढण्याला सरकारकडून उत्तेजन'

मुंबईत पार्किंगची समस्या केवळ वाहनसंख्या वाढल्यामुळे झालेली नाही. अनेक रस्ते अरुंद असणं, सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी होणं, नियमानुसार पार्किंग नसतानाही इमारतींना ओसी देणे, अशी अनेक कारणं आहेत. ही परिस्थिती रोखणं हे सर्वांसमोरचं मोठं आव्हान असल्याचं शहर नियोजनकार सांगतात.

"मुंबईत कुठे जायचं झालं, तर पार्किंग मिळत नाही" मुंबई शहरातील पार्किंगची समस्या कधी सुटणार?
फोटो कॅप्शन, शहर नियोजनकार सुलक्षणा महाजन

शहर नियोजनकार सुलक्षणा महाजन म्हणाल्या, "मुंबईसारख्या शहरात एकेकाळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थित होती. खासगी वाहनांचा वापर वाढल्यामुळे पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला. अर्थव्यवस्था सुधारल्यानंतर लोकांनी घरासोबत गाड्याही घेतल्या."

"सरकार आणि फायनान्स कंपन्यांनी याला उत्तेजन दिलं. त्यामुळे वाहन हा हक्क असल्याची भावना तयार झाली. कोणताही विचार न करता गाड्या घेतल्या गेल्या. याची जबाबदारी नागरिकांचीही आहे."

मुंबईसह राज्यभरात वाढती वाहनसंख्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे भविष्यात ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते, असं देखील तज्ज्ञांचं मत आहे.

याबद्दल बोलताना सुलक्षणा महाजन म्हणाल्या, "वाहतुकीमधला गोंधळ हा शहरीकरणाच्या मुळावर आलाय. हे रोखण्यासाठी काहीही प्रयत्न शासन आणि सर्वसामान्यांकडून दिसत नाही."

"वाढती वाहन संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा धोका नागरिक व राज्यकर्त्यांच्या लक्षात कसा आणून द्यायचा हे मोठे आव्हान आहे. पण प्रशासनाने कठोर निर्णय घ्यायला हवेत आणि लोकांनी सहकार्य करायला हवं तरच ही परिस्थिती बदलेल."

'पार्किंग असेल, तरच कार खरेदी'

वाढती वाहनसंख्या पाहता प्रशासनही चिंतेत आहे. त्यामुळे पार्किंग असेल, तरच वाहन खरेदी करता येईल, हे धोरण राबवण्याच्या तयारीत महाराष्ट्र सरकार आहे. मात्र हा निर्णय जुना असून त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली नसल्याचं जाणकार सांगतात.

"मुंबईत कुठे जायचं झालं, तर पार्किंग मिळत नाही" मुंबई शहरातील पार्किंगची समस्या कधी सुटणार?
फोटो कॅप्शन, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "जो वाहन खरेदी करेल, त्याला पार्किंगची व्यवस्था दाखवावी लागेल. तरच वाहन नोंदणी केली जाईल असा निर्णय आम्ही घेण्याच्या तयारीत आहोत. याबाबत बैठका सुरू आहेत."

"प्रायोगिक तत्त्वावर एमएमआर विभागात हे धोरण राबवण्यात येईल. त्यानंतर संपूर्ण राज्यात अंमलबजावणी केली जाईल. वाहनधारकाकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल, तर स्थानिक स्वराज्य संस्थांनी ती उपलब्ध करून द्यावी."

वाहतूक व्यवस्थेत सुधारणेसाठी काय प्रयत्न सुरू?

शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी, तसेच सार्वजनिक स्थळे, रुग्णालये आणि शाळांजवळ बेकायदेशीरपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलं आहे.

"मुंबईत कुठे जायचं झालं, तर पार्किंग मिळत नाही" मुंबई शहरातील पार्किंगची समस्या कधी सुटणार?

सध्या मुंबईत 65 ठिकाणी रस्त्यावरील वाहनतळे असून त्यांची क्षमता 8 हजार 258 वाहनांची आहे. 37 ठिकाणी सार्वजनिक वाहनतळे असून त्यांची क्षमता 29 हजार 769 आहे. 2 रोबोटिक पार्किंग स्थळे प्रस्तावित असून त्यातून 1 हजार 380 पार्किंगची सोय उपलब्ध होणार आहे.

याशिवाय पार्किंगसाठी आणखी जागा शोधण्याचं काम सुरू असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

एकीकडे मुंबईत वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना दुसरीकडे पार्किंगची सुविधा मात्र अपुरीच आहे. त्यामुळे सामान्य मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा थेट परिणाम होत आहे.

ही समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने ठोस आणि प्रभावी निर्णय घेणं गरजेचं आहे, तरच पुढील काळामध्ये ही समस्या सुटू शकते, असं मुंबईकर आणि शहर नियोजनकार सांगत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)