छत्रपती संभाजीनगर महापालिका : सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला महापौरपद गमवावं लागलं होतं

फोटो स्रोत, Shrikant Bangale
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक तब्बल 10 वर्षांनंतर होत आहे. या निवडणुकीनंतर दीर्घकाळ प्रशासक असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पुन्हा लोकनियुक्त प्रतिनिधी येणार आहेत.
शहरात पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीनं मतदान होणार असून 29 प्रभागांमधून 115 नगरसेवक निवडले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत एकूण 11 लाख 18 हजार 118 मतदार आहेत.
गेल्या 25 वर्षांपासून संभाजीनगर महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय.
पण आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष आहे. या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारतो, ते 16 जानेवारीला निवडणूक निकालाच्या दिवशीच कळेल.
महापालिकेची पहिली निवडणूक
छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) शहरासाठी 1936 मध्ये नगर परिषदेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 8 डिसेंबर 1982 रोजी नगर परिषदेचं रूपांतर महानगर पालिकेत करण्यात आलं.
1982 ते 1987 या 5 वर्षांसाठी प्रशासक नेमून महानगरपालिकेचा कारभार चालवण्यात आला.
महापालिकेच्या स्थापनेनंतर 1988 मध्ये पहिली निवडणूक पार पडली. पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले.

फोटो स्रोत, Kiran Sakale
शिवसेना पाठोपाठ भारतीय काँग्रेस पार्टीचे 15 नगरसेवक, मुस्लीम लीगचे 10 आणि काही अपक्ष मिळून असे 60 नगरसेवक निवडून आले.
या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असतानाही शिवसेनेला महापौरपदापासून दूर राहावं लागलं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लीम लीग आणि काही अपक्ष मिळून काँग्रेसनं महापौरपद मिळवलं.
काँग्रेसचे नगरसेवक डॉ. शांताराम यशवंतराव काळे हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे पहिले महापौर झाले.
शेवटची निवडणूक कशी झाली होती?
छत्रपती संभाजीनगर महापालिकेची शेवटची निवडणूक 2015 साली पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेनं सर्वाधिक 28 जागांवर विजय मिळवला होता.
त्याखालोखाल MIM पक्ष 25 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर भाजपला 22 जागांवर समाधान मानावं लागलं.
या निवडणुकीत काँग्रेसला 12 जागा मिळाल्या, तर अपक्षांनी 18 जागांवर विजय मिळवला होता.

फोटो स्रोत, Kiran Sakale
2015 साली पहिल्यांदाच MIM हा पक्ष पहिल्यांदाच महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरला.
पक्षानं 54 जागांवर उमेदवार दिले, त्यापैकी 25 जागांवर विजय मिळवला होता. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका MIM ने निभावली.
यंदाची स्थिती काय?
2026 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना एकसंध नसून पक्षाचे दोन गट पडले आहेत आणि ते दोन्ही गट निवडणुकीला सामोरे जात आहेत.
2005, 2010 आणि 2015 पासून शिवसेना-भाजपने महापालिका निवडणुकीसाठी युती केली होती. भाजप नेहमीच शिवसेनेपेक्षा कमी जागांवर लढला आहे. पण, यावेळी मात्र 'मोठा भाऊ कोण' या स्पर्धेत शिवसेना आणि भाजपची युती तुटलीय.
पालकमंत्री पद, 2 आमदार आणि 1 खासदार असल्यामुळे आणि 2015 मध्ये सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे यंदाही जागावाटपात अधिक जागा मिळाव्यात, अशी शिंदेंच्या सेनेची अपेक्षा होती.
तर 2024 ची विधानसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या नगरपंचायत, नगरपरिषेदच्या निवडणुकीत मिळालेलं यश यामुळे भाजपला अधिक जागांची अपेक्षा होती. काही जागांवरुन शिवसेना-भाजप युती फिसकटली आणि दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले.

फोटो स्रोत, Shrikant Bangale
दुसरीकडे, शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, MIM, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टीसह इतर पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहे.
यंदा छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये 115 नगरसेवक पदासाठी 859 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
यात शिवसेना ठाकरे गट 97, भाजप 94, शिवसेना शिंदे गट 92, काँग्रेस 77, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 77, वंचित बहुजन आघाडी 62, MIM 48,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 25, बहुजन समाज पार्टी 21, रिपाई आठवले गट 6, तर 260 अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
नाराजांचा उद्रेक
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या यंदाच्या महापालिका निवडणुकीत इच्छुक नाराज उमेदवारांचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला.
भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं नाराजांनी नेत्यांच्या गाड्यांना काळे फासले, कार्यालयाची तोडफोड केली. काही कार्यकर्ते उपोषणालाही बसले.
शिंदेसेनेकडून उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर आंदोलन केलं.

फोटो स्रोत, Shrikant Bangale
तर, MIM पक्षातही नाराजी पाहायला मिळली. MIM चे नेते इम्तियाज जलील यांनी विद्यमान 22 नगरसेवकांचे तिकीट कापले. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी इम्तियाज यांच्याविरोधात घोषणा दिल्या, त्यांचे बॅनर्स फाडले. तसंच इम्तियाज यांच्या गाडीवर हल्लादेखील करण्यात आला.
एकाच प्रभागातून उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक असल्यामुळे आणि निवडणूक 10 वर्षांनंतर होत असल्यामुळे नाराजांची संख्या वाढल्याचं राजकीय पक्षांच्या नेतृत्वांकडून सांगण्यात आलं.
महत्त्वाचे प्रश्न
सध्या शहरात महापालिका निवडणुकीसाठीचा प्रचार जोरात सुरू आहे. सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत आपलं म्हणणं पोहचवत आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सर्वांत ज्लवंत प्रश्न आहे. सध्या बहुतांश भागात 8 ते 10 दिवसांनी पाणीपुरवठा केला जातोय.
गेल्या 20 वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठा योजना अपूर्ण अवस्थेत आहे. याआधी अनेक नेत्यांनी वेगवेगळी डेडलाईन देऊनही ही योजना पूर्ण होऊ शकलेली नाहीये.

फोटो स्रोत, Kiran Sakale
अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाईप टेस्टिंगचे काम झाले असून पुढच्या 2 महिन्यात संभाजीनगरमधील प्रत्येक घरात नळाचं पाणी पोहचेल, असं आश्वासन 8 जानेवारी 2025 ला दिलंय.
एकीकडे गुंतवणुकीसाठीचं मोठं हब म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर उदयास येत असताना, दुसरीकडे मात्र लोकसंख्येच्या तुलतेनत अपुऱ्या सिटी बसेस, ड्रेनेज लाईनचा प्रश्न, रस्त्यांवरील खड्डे, बंद आणि नादुरुस्त पथदिवे, घनकचऱ्याचं नीट न होणारं व्यवस्थापन, कचरा जाळल्यामुळे होणारे प्रदूषण, नशेखोरी आणि गुन्हेगारी घटनांमध्ये झालेली वाढ या शहरासमोरील प्रमुख समस्या आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











