'आमच्या पक्षात शिस्त आहे' सांगणाऱ्या भाजपमध्ये इतका गोंधळा का होतोय?

तिकीट न मिळाल्यानं भावनिक झालेली महिला कार्यकर्ती आणि भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, ANI

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

भाजपमध्ये शिस्त पाळली जाते, असं वारंवार बोललं जातं. भाजपचे बडे नेते मग ते केंद्रातील असो किंवा राज्यातील, भाजप हा शिस्तप्रिया पक्ष आहे, असं नेहमीच बोलून दाखवतात.

आता भाजपमधल्या या शिस्तीबद्दल बोलायचं कारण म्हणजे सध्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी सुरू केलेला राडा.

महापालिका निवडणुकीत भाजपसाठी वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही, असा आरोप करत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. आम्ही तुमच्या सभेसाठी महिला जमवायच्या आणि आता आम्ही काय सतरंज्या उचलायच्या का? असा थेट प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी नेत्यांना विचारला.

नागपुरात नाराज कार्यकर्त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारला. बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी देताय, भाजपची काँग्रेस होऊ देणार नाही, असंही कार्यकर्ते नितीन गडकरी यांच्या घरासमोर बोलताना दिसले.

नागपुरात भाजपनं 6 उमेदवारांना 2 एबी फॉर्म दिले होते. त्यापैकी 6 छाननीमध्ये रद्द केले. त्यामुळे किसन गावंडे यांच्यासह 6 उमेदवारांना भाजपनं माघार घ्यायला लावली.

परिणय फुके याबद्दल चर्चा करण्यासाठी किसन गावंडे यांच्या घरात गेले. पण, परिसरातील भाजप कार्यकर्त्यांनी उमेदवार किसन गावंडे यांच्यासह परिणय फुके यांना घरात कोंडलं.

अर्ज मागे घेण्यासाठी जाऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांना कुलूप लावून घरात कोंडलं.

पुण्यात उमेदवारी मागे घ्यायला लागली म्हणून पूजा जाधव मोरे माध्यमांसमोर ढसाढसा रडत होत्या.

छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, नाशिक सगळीकडे भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय.

भाजप सांगतंय की, आमच्या पक्षात शिस्त आहे, आमचा कार्यकर्ता शिस्तप्रिय आहे, मग पक्षात इतका गोंधळ का होतोय? यामागची कारणं नेमकी काय?

भाजपमध्ये इतर पक्षांमधून झालेलं इनकमिंग

गेल्या काही वर्षांमध्ये भाजपमध्ये दुसऱ्या पक्षांमधून इनकमिंग झालं. सुरुवातीला काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लोक आली. आता महायुतीतील घटक पक्षांमधील लोकही भाजपनं आपल्या पक्षात घेतली.

दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना महापालिकेत भाजपनं उमेदवारीही दिली. यामुळे कुठंतरी भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं बोललं जातंय.

याबद्दल नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार हे जुन्या भाजपचे नेते नेहमीच इशारा देतात.

काही दिवसांपूर्वीच "शनि शिंगणापूरनंतर दरवाजा नसलेलं ठिकाण असेल, तर ते भाजप आहे", असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते.

"बाहेरून आलेल्या या लोकांमुळे भाजपचा मूळ कार्यकर्ता तुटत चाललेला आहे. तो आता पक्षाचा आदेश पाळेल असं दिसत नाही", असं छत्रपती संभाजीनगरमधील ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड यांना वाटतं.

भाजपमध्ये जे नेहमीच शिस्तीचं उदाहरण दिलं जातं, तीच शिस्त आधीपासून नसल्याचं संजय वरकड सांगतात.

 चंद्रशेखर बावनकुळे

फोटो स्रोत, FACEBOOK/CHANDRASHEKHAR BAWANKULE

फोटो कॅप्शन, भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीबद्दल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पक्षानं इलेक्टीव्ह मेरीट बघून उमेदवार दिले आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते म्हणतात, "अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात सुद्धा बंडखोरी व्हायची. बंडखोरी झालेल्या लोकांना पुन्हा पक्षात घेतलं जायचं. भाजप जसा दावा करतेय की, पार्टी विथ डिफरन्स आहे, तसं कुठेच दिसत नाही. जुन्या काळातही त्यांच्या पक्षात अशी अनागोंदी दिसत होती."

"पण, उरलीसुरली जी काही शिस्त होती ती अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर बिघडली. हे बेशिस्तीची काम करूनही मंत्र्यांच्या, सत्तेच्या जवळ असतात, तर मग आम्ही का नाही, अशी भावना कुठंतरी भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण व्हायला लागली आहे."

भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीबद्दल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पक्षानं इलेक्टीव्ह मेरीट बघून उमेदवार दिले आहेत.

"याच इलेक्टीव्ह मेरीटच्या नावाखाली भाजपनं त्यांचं पार्टी विथ डिफरन्स, पक्षाची शिस्त हे सगळं पर्यायाला ठेवलंय. त्यांचं प्राधान्य फक्त सत्ता मिळवणं आहे. भाजपनं कार्यकर्त्यांना गृहीत धरलं आहे. कार्यकर्ते जाऊन जाऊन कुठे जाणार आहेत. कारण, सत्ता भाजपकडे आहे."

"त्यामुळे आपले कार्यकर्ते कुठेच जाणार नाही, असा आत्मविश्वास भाजप नेत्यांना आहे. कार्यकर्त्यांना गृहीत धरल्यानं इतका गोंधळ माजलाय", असं पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार अद्वैय मेहता यांना वाटतं.

कार्यकर्त्यांना इतकं गृहीत धरलं जातंय का?

पण, स्वतःच्या कार्यकर्त्यांना इतकं गृहीत धरणं, डावलणं असं का घडतंय? तर भाजपला 2019 पर्यंत स्वबळावर सत्ता आणायची आहे. त्याचे संकेत गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असताना दिले. आम्हाला कोणाच्या कुबड्यांची गरज नाही, असं अमित शाह म्हणाले होते.

भाजपला 2029 पर्यंत स्वबळावर सत्ता आणायची आहे. पंचायतीपासून तर संसदेपर्यंत भाजपला सत्ता हवी. त्यासाठी भाजप स्वतःच्या कार्यकर्त्यांना डावलून जो जिंकू शकतो अशांना प्राधान्य देतोय, असंही जाणकार सांगतात.

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भाजपला 2019 पर्यंत स्वबळावर सत्ता आणायची आहे. त्याचे संकेत गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते त्याचवेळी त्यांनी दिले. आम्हाला कोणाच्या कुबड्यांची गरज नाही असं अमित शाह म्हणाले होते.

पण, भाजपमधला हा गोंधळ अधिक वाढू शकला असता, असं नागपुरातील पत्रकार विकास वैद्य यांना वाटतं.

ते म्हणतात, "भाजपकडे हजारोच्या संख्येनं अर्ज आले. त्यातुलनेत हा गोंधळ आणखी वाढायला पाहिजे होता. पण, तो कमीच दिसला. भाजप सगळीकडे सत्तेत असल्यानं त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यालाही वाटतं की, आपणही सत्ता उपभोगायला हवी. आपल्याला पैसा, मान मिळायला हवा. त्यामधून हे सगळं घडलेलं आहे."

पण, भाजपमध्ये इतका गोंधळ का होतोय यामागे आणखी एक कारण संजय वरकड सांगतात, ते म्हणजे अलिकडच्या काळात पैशांचा होत असलेला अनिर्बंध वापर.

ते म्हणतात, "उमेदवारीसाठी मुलाखती घेताना कोणाचा खिसा किती मोठा हे बघितलं जातं. त्यात भाजपचा कार्यकर्ता हा त्यांच्या शिस्तीनुसार काम करत आलाय. बूथवर बस म्हटलं की, बूथवर बसायचं इतकंच त्यांना माहिती आहे."

"आता त्यांना लक्षात आलंय की, आपण इतरांसारखा पैसा कमावला नाही. फक्त शिस्तीत वागलो. म्हणून आता हा गोंधळ सुरू झालाय. पण, ही फक्त सुरुवात आहे," असंही ते म्हणतात.

कार्यकर्त्यांच्या नाराजीचा भाजपला फटका बसेल का?

नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं की, आम्ही भाजपचं काम करणार नाही. अनेक ठिकाणी बंडखोरी झाली.

नागपुरात तर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. कार्यकर्त्यांनी अशी टोकाची भूमिका घेतल्यानं, ते नाराज झाल्यानं खरंच भाजपला काही फरक पडणार आहे का? त्याचा फटका या निवडणुकीत बसणार आहे का? हे प्रश्न सुद्धा यानिमित्तानं उपस्थित होत आहेत.

"निवडणूक कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे हा कार्यकर्त्यांचा भ्रम भाजपनं दूर केलाय. सतरंजी उचलणारे कार्यकर्ते फार काही करू शकत नाही. तुम्ही फक्त सतरंज्या उचला, असा संदेश भाजपनं कार्यकर्त्यांना दिलाय. या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांना खरा धक्का बसलाय," असं संजय वरकड म्हणतात.

ते पुढे म्हणतात, "कार्यकर्त्यांच्या या नाराजीचा या निवडणुकीत नक्कीच फटका बसणार आहे. तो बहुमतात दिसला नाही, तरी प्रभागानुसार त्याचा प्रभाव दिसेल. उमेदवारी न मिळाल्यामुळे त्या परिसरात काम करणारा कार्यकर्ता सायलेंट मोडवर गेला आहे. बाहेरून आलेल्या लोकांमुळे भाजपचा मूळ कार्यकर्ता तुटत चालला आहे."

"तो आता पक्षाचा आदेश पाळेल असं वाटत नाही. भाजप डॅमेज व्हायला सुरुवात झाली आहे. पुढे हे आणखी वाढत जाणार आहे. पण, भाजपच्या कार्यकर्त्यांनी कितीही नाराजी दाखवली तरी भाजपला त्याचा काहीही फरक पडत नाही," असं विकास वैद्य यांना वाटतं.

"कारण, भाजपचा मतदार हा एकनिष्ठ आहे. तो कितीही नाराज असला, तरी शेवटी भाजपला मत देतो. राहिला प्रश्न कार्यकर्त्यांचा तर एका ठिकाणी कार्यकर्ता नाराज असेल, तर दुसऱ्या ठिकाणची फळी भाजप पाठवतो," असंही ते नमूद करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)