ब्रश करताना अचानक गळ्याची नस तुटली, 6 तासांच्या कठीण शस्त्रक्रियेनंतर वाचले प्राण

फोटो स्रोत, Lakshmi Jangde
- Author, विष्णुकांत तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"मी सकाळी ब्रश करत होतो, तेव्हा अचानक मला उचकी लागली. त्यावेळी गळ्याच्या उजव्या बाजूला काहीतरी आतून फुगत असल्यासारखं जाणवू लागलं. काही मिनिटांतच माझा गळा पूर्णपणे सुजला. मला प्रचंड वेदना होत होत्या, डोळ्यासमोर अंधारी आली."
छत्तीसगढची राजधानी रायपूरमध्ये राहणारे राहुल कुमार जांगडे यांना तो प्रसंग आठवतो. 1 डिसेंबर रोजी अचानक आलेल्या या असह्य वेदनेमुळे त्यांनी पत्नीला फक्त इतकंच सांगितलं की, "काहीतरी बिघडलंय, आपल्याला रुग्णालयात जावं लागेल."
नंतर जेव्हा ते शुद्धीवर आले, तेव्हा ते रायपूरच्या डॉ.भीमराव आंबेडकर रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल होते.
डॉक्टरांनी सांगितलं की, ही घटना कुठल्या दुखापतीमुळे किंवा आजारामुळे झालेली नव्हती, तर ही एक दुर्मिळ घटना होती. यात गळ्यातून मेंदूकडे रक्त पोहोचवणारी नस (आर्टरी/धमनी) अचानक तुटली होती.
याला स्पॉन्टेनियस कॅरोटिड आर्टरी रप्चर म्हणतात. छत्तीसगडमध्ये झालेलं अशा प्रकारचं हे पहिलंच प्रकरण होतं.
भीमराव आंबेडकर रुग्णालयाच्या हृदय, छाती आणि रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टरांनी यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
सुमारे 6 तास चाललेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर राहुल यांचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आले.

याच विभागाचे एचओडी डॉ. कृष्णकांत साहू यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, "गळ्याची नस तुटणे ही एक जीवघेणी घटना आहे. यात वेळेवर उपचार झाले नाहीत, तर काही मिनिटांतच व्यक्ती दगावू शकतो.
साधारणपणे असे प्रकार गंभीर अपघातांमध्ये किंवा गळ्याच्या किंवा घशाच्या कॅन्सरसारख्या आजारांत दिसून येतं. पण कोणताही मोठा आजार नसताना, अगदी सामान्य माणसाच्या गळ्याची नस आपोआप तुटणे ही अतिशय दुर्मिळ घटना आहे."
ते पुढे म्हणाले की, "ही घटना इतकी दुर्मिळ आहे की वैद्यकीय जर्नल्सनुसार जगभरात आतापर्यंत अशा केवळ 10 प्रकरणांचीच नोंद झालेली आहे."
40 वर्षीय राहुल छत्तीसगडची राजधानी रायपूरजवळील भनपुरी भागात राहतात. ते महिलांच्या सौंदर्यप्रसाधनाशी संबंधित एक छोटंसं दुकान चालवतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि तीन मुलांसह एकूण पाच जण आहेत.

फोटो स्रोत, Doctor Krishnakant Sahu
राहुल यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, यापूर्वी त्यांना कधीही अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला नव्हता. मात्र 1 डिसेंबरच्या त्या सकाळी जे घडलं, ते केवळ राहुल यांच्यासाठीच नव्हे तर डॉक्टरांसाठीही अत्यंत असामान्य अशी गोष्ट होती.
राहुल यांची उजवी कॅरोटीड आर्टरी आधीच फाटलेली होती, हे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झालं.
खरं तर गळ्यातील उजवी आणि डावी कॅरोटिड आर्टरी या हृदयातून मेंदूपर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचवण्याचं काम करतात.
हृदयातून शरीराच्या इतर भागांपर्यंत रक्त नेणाऱ्या नसांना आर्टरी (धमनी) म्हणतात. या धमन्यांचं जाळं मानवी शरीरात अतिशय सुरक्षित पद्धतीने पसरलेलं असतं.
डॉक्टरांच्या मते, शरीरात कुठेही जखम झाली तर ती प्रत्येक जखम प्राणघातक ठरत नाही. पण हृदयातून रक्त वाहून नेणाऱ्या या आर्टरींना (धमनी) दुखापत झाली तर मात्र धोका खूप वाढतो.
कारण या धमन्यांत रक्त जास्त दाबाने वाहत असते. त्यामुळे फार कमी वेळात शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर जाऊ शकतं.
या शस्त्रक्रियेचं नेतृत्त्व डॉ. कृष्णकांत साहू करत होते.
ते म्हणाले की, "कोणतीही जखम, संसर्ग, कॅन्सर किंवा आधीपासूनचा आजार नसताना कॅरोटिड आर्टरी आपोआप तुटणे ही अतिशय दुर्मिळ घटना आहे."
राहुल यांच्या मानेतील उजवी कॅरोटिड आर्टरी तुटल्यामुळे गळ्याच्या आत वेगानं रक्त साचू लागलं. या नसेभोवती रक्त जमा होऊन फुग्यासारखी रचना तयार झाली, ज्याला वैद्यकीय भाषेत स्यूडोएन्यूरिझ्म म्हणतात.
डॉ. साहू यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, "जगभरातील वैद्यकीय साहित्यात अशा प्रकरणांची संख्या बोटांवर मोजता येईल इतकीच आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी असा प्रकार कधी पाहिलाही नव्हता अन् ऐकलेलाही नव्हता."

डॉ. साहू म्हणतात की, "सोप्या भाषेत सांगायचं तर कॅरोटिड आर्टरीमध्ये अडथळा आला, तर स्ट्रोक येऊ शकतो. पण राहुल यांच्या प्रकरणात ही समस्या त्याहूनही धोकादायक होती, कारण आर्टरीच तुटलेली होती. तिथे तयार झालेली रक्ताची छोटाशी गाठ जरी मेंदूपर्यंत पोहोचली असती, तरी अर्धांगवायूची शक्यता खूप जास्त होती."
रक्ताच्या मोठ्या गाठी किंवा जास्त प्रमाणातील गाठी मेंदूपर्यंत पोहोचल्या असत्या, तर संपूर्ण मेंदूला गंभीर नुकसान झालं असतं किंवा रुग्ण ब्रेन डेड देखील झाला असता.
त्यांनी हेही सांगितलं की, शस्त्रक्रियेच्या आधी आणि दरम्यान दोन्ही वेळा आर्टरी पुन्हा तुटण्याचा धोका होता. असे झाल्यास अनियंत्रित रक्तस्त्रावामुळे काही मिनिटांतच रुग्णाचा मृत्यू होऊ शकला असता.
डॉक्टरांच्या मते, जेव्हा राहुल यांना रुग्णालयात आणलं गेलं होतं, तेव्हा त्यांची प्रकृती अस्थिर होती. मानेच्या आत एवढं रक्त साचलं होतं की, शस्त्रक्रियेच्या वेळी आर्टरी ओळखणं देखील खूप कठीण गेलं होतं.
डॉ. साहू सांगतात की, "गळा किंवा मानेच्या या भागात बोलणं, हात-पाय हलवणं आणि हृदयाचे ठोके नियंत्रित करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या नसा आहेत. जर शस्त्रक्रियेत थोडीशीही चूक झाली असती, तर रुग्णाला आयुष्यभर अपंगत्व किंवा त्याचा मृत्यूही होऊ शकला असता."
डॉक्टरांच्या मते, त्यांना फक्त धमनी शोधण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे दीड तास लागले.

फोटो स्रोत, Doctor Krishnakant Sahu
संपूर्ण शस्त्रक्रिया पाच ते सहा तास चालली. तुटलेली आर्टरी दुरुस्त करण्यासाठी बोवाइन पेरीकार्डियम पॅचचा म्हणजे गाईच्या हृदयाच्या झडपेच्या पॅचचा वापर केला गेला.
या शस्त्रक्रियेनंतर राहुल यांना सुमारे 12 तास व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते, असं डॉक्टरांनी सांगितलं.
डॉ. साहू म्हणाले, "राहुल शुद्धीवर आल्यानंतर सर्वात आधी आम्ही त्यांच्याशी बोलून आवाज तपासला. त्यानंतर हाता-पायांची हालचाल आणि चेहऱ्याची हालचाल पाहिली.
रक्ताची गाठ किंवा गुठळी मेंदूपर्यंत पोहोचली नाही आणि शस्त्रक्रियेदरम्यान कुठल्या महत्त्वाच्या नसेला दुखापत झाली नाही, याची खात्री यातून करण्यात आली."
राहुल यांच्या पत्नी लक्ष्मी जांगडे यांनी बीबीसी न्यूज हिंदीला फोनवर सांगितलं की, सुरुवातीचे दिवस त्यांच्यासाठी खूप भीतीदायक होते. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं.
त्या म्हणतात, "आता जेव्हा त्यांना बरं होताना मी पाहते, तेव्हा त्यांच्या गळ्याची नस तुटली होती, यावर माझा विश्वासच बसत नाही."
राहुल स्वतः सांगतात की, जेव्हा डॉक्टरांनी छत्तीसगडमधील हे पहिलंच प्रकरण असल्याचं सांगितलं, तेव्हा मला खूप भीती वाटली. पण रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने माझी काळजी घेतली, त्यामुळे मोठा धीर मिळाला.
आता राहुल यांना घरी जाण्याची हुरहुर लागली आहे. घरी जाऊन आपल्या मुलांना भेटायची ते तयारी करत आहेत.
विशेषतः आपल्या मुलीला त्यांना भेटायचं आहे, कारण मागील एक महिन्याहून अधिक काळापासून ते तिला भेटलेले नाहीत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











