राठी हत्याकांड : ब्रेसलेट गहाण ठेवून चाकू घेतला, लहान मुलांसह 7 जणांची हत्या केली, ऐवज लुटला आणि...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी पुण्याहून
महत्त्वाची सूचना – या वृत्तातील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतात. संवेदनशील व्यक्तींना त्याचा त्रास होऊ शकतो.
पुण्यातील कोथरुड भागातल्या पौड फाटा जवळच्या शीलविहार कॉलनीत राहणाऱ्या राठी कुटुंबातील सात जणांची भरदिवसा एकाच वेळेस निर्घृण हत्या करण्यात आली होती. यामध्ये पाच महिला (यातील एक महिला गर्भवती होती), दीड आणि अडीच वर्षांच्या दोन लहान मुलांचाही समावेश होता.
पुण्यात 1994 साली घडलेल्या या घटनेमुळे शहरच नाही, तर राज्य हादरलं होतं.
सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयामुळे ही घटना परत चर्चेत आली. या हत्याकांडातील एक आरोपी गुन्हा करतेवेळी अल्पवयीन असल्याचं सांगून 28 वर्षांनंतर त्याच्या सुटकेचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
हे हत्याकांड काय होतं?
पुण्यातील राठी कुटुंब
संजय राठी त्यांच्याकुटुंबासोबत पुण्यातील कोथरुड भागातल्या शीलविहार कॉलनीमधील हिमांशू अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहत होते.
संजय राठी यांच्यासोबत त्यांचे वडील केशरीमल राठी, आई मीराबाई राठी (वय 45), त्यांची लहान बहीण प्रीती राठी (19), बायको बबिता उर्फ नीता (वय 24) आणि अडीच वर्षांचा लहान मुलगा चिराग त्या घरात एकत्र राहायचे.
संजय राठी यांना अजून एक बहीण होती. तिचं नाव हेमलता (वय 27) होतं. हेमलताचं लग्न 1992 साली श्रीकांत नावंदर यांच्यासोबत झालं होतं. ते दुसऱ्या गावात राहायचे. हेमलता तिचा दीड वर्षांचा मुलगा प्रतिक सोबत त्या दुर्दैवी दिवशी सकाळी तिच्या भावाच्या म्हणजे संजय राठी यांच्या घरी आली होती.
संजय राठी आणि त्यांच्या वडिलांच्या मालकीचं सागर स्वीट मार्ट नावाचं मिठाईचं दुकान होतं. या मिठाईच्या दुकानात राजू राजपुरोहित नावाचा एक तरुण काम करायचा.
राजू आणि त्याचे दोन मित्र नारायण चेतनाराम चौधरी आणि जितेंद्र नयनसिंग गहलोत हेच तीन जण राठी कुटुंबियांसाठी कर्दनकाळ ठरले.
राजू, नारायण आणि जितेंद्र कोण होते?
मुळचा राजस्थान मधील असलेला राजू राजपुरोहित 1993-94 सालची अकरावीची परीक्षा पास झाल्यावर त्याच्या भावाकडे पुण्यात पुढच्या शिक्षणासाठी आला होता. लक्ष्मी रोडवरच्या 'बाँबे विहार' नावाच्या दुकानामध्ये त्याने जून 1994 पासून काम करायला सुरुवात केली.
नारायण आणि जितेंद्र सुद्धा याच काळात 'बाँबे विहार'मध्ये काम करत होते. तिथे या तिघांची ओळख झाली आणि त्याचं रुपांतर मैत्रीमध्ये झालं. पण राजूची 'बाँबे विहार'मधली नोकरी फार दिवस टिकली नाही.
त्याला 8 जून 1994 रोजी 'बाँबे विहार'मधून कामावरुन काढून टाकण्यात आलं. त्यानंतर त्याने राठी कुटुंबाच्या सागर स्वीट मार्टमध्ये काम करायला सुरुवात केली.
राठींच्या दुकानात काम करत असताना राजूला अनेकवेळा डबा आणण्यासाठी राठी कुटुंबाच्या घरी जावं लागायचं. यादरम्यान त्याची घरातल्या लोकांशी ओळख झाली आणि त्याला घराची रचना पूर्णपणे समजली.
कोणत्या वेळेस कोण घरी असतं याचा त्याला अंदाज आला. राठींच्या दुकानात दोन-अडीच महिने काम केल्यावर त्याने पगारवाढीची मागणी केली. जी राठींनी नाकारली आणि त्यानंतर राजूने त्यांच्या दुकानातलं काम सोडून दिले.
यादरम्यान नारायण आणि जितेंद्र यांनीसुद्धा बाँबे विहारमधलं काम सोडलं होतं. तिघंही नोकरी सोडून नारायणच्या नागपूर चाळीतल्या खोलीत राहायला लागले.
राठींच्या घरी दरोडा घालण्याचा प्लॅन
राजू, नारायण आणि जितेंद्र हे तिघंही बेरोजगार होते. त्यांनी त्यांच्या भविष्याचा विचार सुरु केला आणि त्यासाठी ‘सेठ’च्या घरी दरोडा घालण्याचा प्लॅन केला. आधी त्यांनी 23 ऑगस्ट 1994 रोजीच्या रात्री राठींच्या घरावर दरोडा घालण्याचा कट शिजवला.
या प्लॅन मध्ये थोडा बदल करुन त्यांनी 24 ऑगस्ट राठींच्या घरी जायचं ठरवलं. घरात हजर असलेल्या सर्वांना मारायचं त्यांनी ठरवलं. हे करणं सोपं जावं यासाठी तिखट जवळ ठेऊन ते राठी कुटुंबियांच्या डोळ्यात टाकायचं असं त्यांनी ठरवलं.
खून करण्यासाठी चाकू विकत घ्यावे लागणार आणि त्यासाठी आपल्याजवळ पैसे नाहीत हे ओळखून त्यांनी त्यांच्यापैकी एकाचं चांदीचं ब्रेसलेट नागपूर चाळीच्या जवळच्या सराफा दुकानात गहाण ठेवलं. त्यावरुन पैसे घेतले आणि चाकू विकत घेतले.

फोटो स्रोत, Getty Images
पण ते 24 तारखेला गेले नाहीत. त्यानंतर 25 तारखेला दुपारी ते तिघंही राठींच्या घराच्या अवतीभोवती थांबले. त्यांच्या लक्षात आलं की, दुपारी 2 ते 4 च्या दरम्यान त्या परिसरात शुकशुकाट असतो. तेव्हा त्यांनी ठरवलं की, दुपारी 2 ते 4 या वेळातच राठींच्या घरी जायचं, ऐवज लुटायचा आणि घरी जे कोणी असतील त्यांना मारायचं.
26 ऑगस्टची दुपार आणि राठी हत्याकांड
26 ऑगस्ट 1994 रोजी सकाळी हेमलता नावंदर तिचा नवरा आणि लहान मुलासोबत संजय राठींना राखी बांधण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी आली. दुपारी जेवण झाल्यावर संजय राठी हेमलताच्या नवऱ्यासोबत मोटरसायकल वरुन काही कामाने बाहेर गेले. तेव्हा घरात फक्त महिला आणि दोन लहान मुलं होती.
राजू, नारायण आणि जितेंद्र हे तिघंही दुपारी 12च्या दरम्यान त्यांच्या खोलीतून बाहेर पडले. चाकू आणि तिखट घेऊन ते राठींच्या घराजवळ आले. संजय राठींची मोटरसायकल घराबाहेर नाही हे पाहून त्यांची खात्री पटली की घरी बाकी कुणी नाहीये.
नारायणने राजूला वर राठींच्या फ्लॅटमध्ये जायला सांगितलं आणि घरच्यांना बोलण्यात गुंतवायला सांगितलं. राजू राठींच्या घराजवळ आला. तर त्यांच्या घराचं दार अर्धवट उघडं होतं. तेवढ्या वेळात नारायण आणि जितेंद्रने त्या मजल्याबरच्या बाकीच्या फ्लॅटच्या दारांच्या कड्या बाहेरून लावून घेतल्या.
राठींच्या घरात राजूने डोकावून पाहिलं. राठींकडे घरकाम करणारी सत्यभामाबाई सुतार फरशी पुसत होत्या. ते तिघंही राठींच्या घरात घुसले आणि घराचं दार आतून लावून घेतलं. हे पाहून सत्यभामा बाईंनी आरडाओरडा केला. त्यांच्या आवाज ऐकून घरात हजर असलेले सगळे हॉलमध्ये दाखल झाले.
ते सगळे हॉलमध्ये आल्यावर या तिघांनी त्यांच्यावर तिखट फेकलं. त्यांना चाकूचा धाक दाखवून शांत राहण्यासाठी धमकावलं आणि तसं न केल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर हॉलमध्ये एकत्र असलेल्या कुटूबियांना या तिघांनी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेलं.
नारायणने मीराबाई राठींना घरातले दागिने आणि पैसे कुठे आहेत याची विचारणा केली. मीराबाईंनी घरातल्या ऐवजाची जागा नारायणला दाखवली आणि सगळं घेऊन जा पण कुणाला इजा करु नका, अशी विनवणी केली.
नारायण आणि जितेंद्र मीराबाईंना ऐवज असलेल्या खोलीत घेऊन गेले. तिथे त्यांच्यावर चाकूने वार करुन त्यांना मारण्यात आलं. मीराबाई जवळच असलेल्या बेडवर कोसळल्या. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बबिताला दुसऱ्या खोलीत नेऊन चाकूने वार करुन मारण्यात आलं. तिच्यानंतर तिचा मुलगा चिरागलाही असंच संपवण्यात आलं.
राजूने प्रीतीला बाथरुमध्ये नेलं. तिथे नारायणने वॉशिंग मशिनची वायर कापून त्याने प्रीतीचा गळा आवळला. ती मेली आहे असं समजून ते दोघं तिथून बाहेर पडले. पण नारायणला परत बाथरुममधून आवाज ऐकू आला. तो परत बाथरुममध्ये गेला आणि प्रीती अजून जिवंत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने तिच्यावर चाकूने वार केले आणि त्यात प्रीतीचा मृत्यू झाला.
राजूने सत्यभामा बाईंना किचनमध्ये नेलं. तिथे नारायण पोहोचला होता आणि रक्ताने माखलेला चाकू धुवत होता. किचनमध्ये राजूने सत्यभामा बाईंना धरुन ठेवलं आणि नारायणने त्यांच्यावर चाकूने वार केले. यामध्ये सत्यभामाबाई कोसळल्या.
त्यानंतर राजू आणि नारायण हेमलता आणि तिचा मुलगा प्रतीक यांना ज्या खोलीत ठेवलं होतं तिथे वळले. त्यांच्यावर जितेंद्र लक्ष ठेऊन होता. त्यांनी प्रतीकला तिच्यापासून खेचण्याचा प्रयत्न केला. याचा हेमलताने प्रतिकार केला. पण जितेंद्र आणि राजू प्रतीकला घेऊन मीराबाई ज्या खोलीत पडल्या होत्या तिथे आले. तिथे त्यांनी प्रतीकला तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला. प्रतीक खाली कोसळला.
तो मेला आहे हे समजून ते दोघं हेमलता ज्या खोलीत होती तिथे आले. प्रतीकला त्याच्या आजीजवळ दिलं आहे असं तिला सांगितलं. हेमलताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जितेंद्रने तिच्या पायावर गुडघा ठेऊन तिला धक्के दिले. याने हेमलता बेशुद्ध झाली आणि त्यानंतर नारायणने तिच्या मानेवर चाकूने वार करुन तिचा जीव घेतला.
हत्याकांडानंतर...
घरात हजर असणाऱ्या सगळ्यांना मारल्यानंतर त्या तिघांनी घरातला ऐवज घरातूनच घेतलेल्या एका एअर बॅगमध्ये भरायला सुरुवात केली. जेवढं त्या बॅगमध्ये बसू शकेल तेवढं सगळं त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये रोख रक्कम, दागिने आणि मौल्यवान वस्तू यांचा समावेश होता.
घरातून बाहेर पडायच्या आधी नारायणने रक्ताने भरलेली त्याची पॅंट बदलली. राठींच्या घरातून खाकी पँट घेतली. जितेंद्रनेही त्याचा रक्ताने भरलेला शर्ट बदलला आणि घरातलाच एक काळा शर्ट घातला.
रक्ताने भरलेले कपडे त्यांनी त्याच एअर बॅगमध्ये ठेवले. याचवेळी घरातला फोन वाजला. चाकूने त्यांनी फोनची वायर कापून टाकली.
हे करत असताना त्यांना आतल्या खोलीतून लहान मुलाच्या रडायचा आवाज आला. तिथे जाऊन पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की चिमुकला प्रतीक जिवंत होता. ते पाहून जितेंद्रने नारायणकडून चाकू घेऊन प्रतीकवर वार केले आणि त्याला मारुन टाकलं.
घरातल्या सगळ्यांचे खून केल्यावर आणि गोळा केलेला ऐवज एअर बॅगमध्ये भरल्यावर ते हिमांशू अपार्टमेंटच्या कंपाउंड मधून बाहेर आले. रिक्षा करुन ते नागपूर चाळीच्या खोलीवर परत आले. खोलीवर आल्यावर जितेंद्रने राजूला पैसै देऊन दारु आणि काही खाण्यासाठी आणायला बाहेर पाठवलं.
राजू परत आल्यावर त्यांनी एअर बॅग उघडून त्यातल्या ऐवजाची वाटणी केली. जितेंद्र आणि नारायणने राजूला त्यांचे रक्ताने भरलेले कपडे धुवायला सांगितले. त्यानंतर त्यांनी चाकू लपवले आणि तिघंही दारु प्यायले.
संजय राठी घरी परत आल्यावर...
संजय राठी हेमलताच्या नवऱ्यासोबत संध्याकाळी पावणेसहाच्या दरम्यान घरी परत आले. त्यांनी बेल वाजवली पण कुणी दार उघडलं नाही. कुणी दार उघडत नाही हे पाहून त्यांनी दुकानात असलेल्या केशरीमल राठींना फोन केला. त्यांनी सांगितलं की घरी कुणी फोन उचलत नाहीये.
हे ऐकून संजय राठी दुकानात जाऊन घराची दुसरी किल्ली घेऊन आले. या दरम्यान सत्यभामाबाई घरी आलेल्या नाहीत म्हणून त्यांचे पती दामू सुतारही राठींच्या घरी पोहोचले होते.
घराच्या डूप्लिकेट चावीने संजय राठींनी दार उघडलं आणि त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सत्यभामाबाई दिसल्या. ते पाहून ते घाबरले आणि आरडाओरडा केला. त्यानंतर घरातले इतर मृतदेह त्यांच्या नजरेस पडले. यानंतर शेजारच्यांनी कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी येऊन पुढची कार्यवाही केली.

फोटो स्रोत, Getty Images
बातमी वाचून तिघांचा पळून जाण्याचा निर्णय
हत्या केल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 ऑगस्टला राजूने सकाळी काही वृत्तपत्र विकत आणले. त्यामध्ये राठी कुटुंबातील हत्याकांड आणि दरोड्या संदर्भात बातम्या होत्या. पण कुणावर संशय हे नमूद नव्हतं.
संध्याकाळी त्यांनी खास सायंकाळी प्रसिद्ध होणारं वृत्तपत्र विकत आणलं. त्यामध्ये संशयाची सुई या तिघांवर असल्याविषयी उल्लेख होता. हे वाचून त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या तिघांसाठी शोधमोहिम राबवण्यात आली.
नारायणला 5 सप्टेंबर 1994 रोजी अटक करण्यात आली. जितेंद्रला 21 नोव्हेंबरला तर राजूला 15 ऑक्टोबर 1994 रोजी अटक करण्यात आली. तिघांना राजस्थानमधल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक झाली.
राजू माफीचा साक्षीदार
त्यानंतर राठी हत्याकांडाचा खटला सुरु झाला. खटला सुरु होण्याआधी राजू राजपुरोहितने पोलीस आयुक्तांना पत्र लिहून गुन्हा कबूल करण्याविषयी इच्छा व्यक्त केली. राठी हत्याकांडाच्या संदर्भात फक्त पुरावे होते. पण त्या गुन्ह्याचा कोणीही साक्षीदार नव्हता. यामुळे राजूचा कबुली जबाब कोर्टात स्वीकारण्यात आला.
ट्रायल कोर्टाने नारायण आणि जितेंद्रला फाशीची शिक्षा ठोठावली.
आता नारायणची सुटका कशी झाली?
फाशीची शिक्षा झाल्यानंतर नारायण आणि जितेंद्रने तत्कालिन राष्ट्रपतींकडे दयेसाठी अर्ज केला. 2016 साली जितेंद्रची फाशीची शिक्षा ही जन्मठेपेवर करण्यात आली. नारायणने सुप्रीम कोर्टासमोर गुन्हा घडला त्यावेळी आपण अल्पवयीन असल्याचं सांगून पुनर्विचार याचिका दाखल केली.
2019 साली सुप्रीम कोर्टाने नारायणच्या दाव्याची शहानिशा करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये नारायणचे राजस्थानमधले काही कागदपत्र कोर्टासमोर सादर करण्यात आले. त्यावरुन नारायण गुन्हा घडला त्यावेळी 12 वर्षांचा असल्याने त्याच्या सुटकेचे आदेश देण्यात आले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)




