कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या; पुण्यामध्ये टोळीयुद्धं कशी सुरू झाली?

शरद मोहोळ
फोटो कॅप्शन, शरद मोहोळ
    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी (5 जानेवारी 2023) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शरद मोहोळवर 3 ते 4 अज्ञातांनी गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

कोथरूडमधील सुतारदरा भागात ही गोळीबाराची घटना घडली. गोळीबारात शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. पण तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं आहे.

बीबीसीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 8 दिवसांपासून एक व्यक्ती शरद मोहोळच्या बरोबर फरत होती. त्याच व्यक्तीने गोळीबार केला आहे.

शरद मोहोळच्या लग्नाचा 5 जानेवारी रोजी वाढदिवस होता. त्यासाठी दोघे पतीपत्नी गणपतीच्या दर्शनाला जायला निघाले होतो त्यावेळी मोहोळवर गोळीबार झाला आहे.40 वर्षीय शरद हिरामण मोहोळ हा पुण्यातील कोथरूड भागातील कुख्यात गुंड होता. त्याच्यावर दिवसाउजेडी गोळीबार आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्यानं या भागात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर पुणे, पुण्याच्या आसपासच्या परिसरातल्या टोळ्या, त्यांच्यातलं टोळीयुद्ध आणि गुन्हेगारीच्या मुळशी पॅटर्नची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

पुण्याच्या गुन्हेगारीचं चित्रण या चित्रपटातून करण्यात आलं आहे.

पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्याचा संदर्भ या चित्रपटाला आहे, पण ही कथा केवळ मुळशीपुरती किंवा पुण्यापुरती मर्यादित नाही असं मत लेखक बबन मिंडे यांनी व्यक्त केलं आहे.

2015मध्ये पुण्याच्या उरळी कांचन येथे प्रकाश हरिभाऊ उर्फ अप्पा लोंढे यांची दिवसा ढवळ्या गोळ्या घालून आणि नंतर तीक्ष्ण वार करून हत्या झाली आणि पुणे हादरलं.

उरळी कांचन भागात तणाव इतका वाढला की पटापट सर्व दुकानं बंद झाली. हत्येनंतर सर्वांत जास्त भीती वाटत होती ती म्हणजे पुण्यात पुन्हा गॅंगवार उसळणार याची.

अप्पा लोंढे यांच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद होती. 1991 ते 2006 या काळात त्यांच्यावर हत्या, खंडणी, अपहरण, अवैध वाळू उपसा इत्यादी 65 केसेस होत्या.

2004 साली त्यांच्यावर MCOCAअंतर्गत कारवाई करण्यात आली आणि त्यांना तुरुंगवास झाला. तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यात त्यांचे प्राण गेले.

मुळशी पॅटर्न

फोटो स्रोत, youtube grab

त्यांच्या हत्येला टोळीयुद्धाची पार्श्वभूमी होती. पुणे आणि परिसरात ज्या अनेक टोळ्या कार्यरत होत्या त्यांच्या संघर्षातून ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

एकेकाळी शांत असलेल्या पुण्यात अनेक टोळ्या कार्यरत झाल्या आणि शहराचं स्वरूप बदललं. रिअल इस्टेटच्या पार्श्वभूमीवर असलेल्या गुन्हेगारीचं चित्रण आपल्याला 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात पाहायला मिळालं, पण पुण्यात या टोळ्या कुठून आल्या या प्रश्नाची देखील चर्चा होताना दिसत आहे.

मुळशी पॅटर्न

फोटो स्रोत, ultra marathi/twitter

"2000 पूर्वी लोकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये जमिनीविषयी अत्यंत वेगळी भावना होती. जमिनीतून पीक येतं आणि त्यावर आपला उदरनिर्वाह चालतो अशीच त्यांची समजूत होती. पण 2000 नंतर लोकांच्या लक्षात येऊ लागलं की जमिनीतून अमाप पैसा कमवता येतो," असं लेखक आणि पत्रकार बबन मिंडे सांगतात. बबन मिंडे यांनी या विषयावर 'लॅंडमाफिया' नावाची कादंबरी लिहिली आहे.

"आयटी क्षेत्राच्या उदयानंतर पुण्याचा चेहरामोहरा बदलू लागला. पुण्याच्या आजूबाजूच्या गावातल्या जमिनीला भाव येऊ लागले. त्यातून जमीन मोकळी करून देणारे आणि व्यवहार पूर्ण करून देणाऱ्या एजंटची संख्या वाढू लागली. जमिनीच्या व्यवहारासाठी लाखो रुपये मोजले जाऊ लागले. कार्पोरेट कंपन्यांना एकगठ्ठा जमीन मिळवून देणाऱ्या एजंटची गरज पडू लागली. कधीकधी जमीन मोकळी करून घेण्यासाठी मसल पॉवरचा उपयोगही करावा लागत असे. त्यातून गुंडगिरीला चालना मिळाली," मिंडे सांगतात.

बबन मिंडे यांची कादंबरी लॅंडमाफिया

फोटो स्रोत, LandMafia/babanminde

फोटो कॅप्शन, बबन मिंडे यांची कादंबरी लॅंडमाफियाचं मुखपृष्ठ

"काही काळानंतर गुंडगिरीचं स्वरूप कुणाला धमकावण्यापुरतं मर्यादित उरलं नाही. कंपन्यांचं काँट्रॅक्ट मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली. या स्पर्धेचं रूपांतर संघर्षात झाल्याचं पाहायला मिळतं," मिंडे सांगतात.

या सर्व गोष्टींकडे सामान्य तरुण कसा आकर्षित होतो? असं विचारलं असता मिंडे सांगतात, "तरुणांना भुरळ पडावी असं या एजंट लोकांचं वर्तन असतं. महागड्या SUV आणि अंगात सोनं-नाणं याचं तरुणांना आकर्षण असतं. अंगावर जितकं सोनं आणि जितकी गाडी मोठी तितका मोठा एजंट असं अलिखित समीकरण असतं. त्यांच्याकडे ते सर्व असतं त्यामुळे तरुण त्यांच्याकडे आकर्षित होतात. बेरोजगार तरुणांना दिवसाला चारपाचशे रुपये देऊन किंवा मोठी डील झाली तर पार्टी देऊन खूश ठेवलं जातं. काही एजंट लोकांचं ऑफिस हे कार्पोरेट ऑफिसप्रमाणे चकाचक असतं. त्यामुळे तरुण आकर्षित होतो."

पुण्यातील टोळीयुद्ध

2006मध्ये मारणे गॅंगच्या सुधीर रसाळ यांची बाबा बोडके गॅंगच्या संदीप मोहोळने हत्या केली होती. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार या टोळ्या विविध व्यावसायिकांकडून आणि उद्योजकांकडून खंडणी वसूल करत असत. पौड, पिरंगूट आणि मुळशीच्या भागातून आखाड्यातली मुलं या गॅंगमध्ये भरती केली जात.

सुधीर रसाळ यांच्या हत्येनंतर पुण्यात टोळीयुद्धाला सुरुवात झाली होती. या हत्येचं प्रत्युत्तर म्हणून मारणे गॅंगनं संदीप मोहोळची हत्या केली. त्यानंतर या दोन टोळ्यांमधला संघर्ष तीव्र होत गेला. संदीप मोहोळच्या हत्येनंतर त्याचा नातेवाईक शरद मोहोळनं या हत्येचा कथित सूत्रधार किशोर मारणे यांची 2010मध्ये हत्या केली. या हत्येसाठी शरद मोहोळला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मारणे गॅंग आणि नीलेश घायवळ गॅंगमध्ये देखील पुण्यात चकमकी उडाल्या आहेत. मारणे गॅंगच्या सदस्यांनी घायवळ यांच्यावर हल्ला केला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले होते. घायवळ गॅंग कोथरूड भागात होती आणि पौड रोड भागात वर्चस्व स्थापन करण्याचा या गॅंगचा प्रयत्न होता, असं इंडियन एक्स्प्रेसनं पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.

ओम भूतकर मुळशी पॅटर्न

फोटो स्रोत, youtube grab

"काही वर्षांपूर्वी टोळ्या आणि त्यांच्यातला संघर्ष हा तीव्र स्वरूपाचा होता. खंडणी घेणं, जमीन मोकळी करणं, जमिनीवर ताबा मिळवून ती विकणं अशी कामं या टोळ्या करत असत. या टोळ्यांना बिल्डर लॉबीकडून पाठबळ मिळत असे. यातून बाबा बोडके, घायवळ, मारणे अशा टोळ्या उभ्या झाल्या," असं पुण्यातले क्राइम रिपोर्टर राहुल खळदकर यांनी बीबीसीला सांगितलं.

"आधीच्या गुन्हेगारीचं स्वरूप मटके, खंडणी किंवा इतर प्रकारच्या अवैध धंद्याचं होतं. रिअल इस्टेटचा पैसा गुन्हेगारांच्या हाती आला. या पैशाचं प्रमाण आधीच्या तुलनेत कित्येक पटीनं होतं. त्यांच्याकडे लॅंड रोव्हर, जॅग्वारसारख्या गाड्या आल्या. हिंजवडी, मुळशी, फुरसंगी, हडपसर, मान, कात्रज अशा प्रत्येक भागात गॅंग्स उभ्या राहिल्या. त्यावरूनच त्यांच्यातील वाद आणि संघर्ष विकोपाला जाऊन गॅंगवारला सुरुवात झाली."

"महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम अॅक्टचा (MCOCA) वापर करून पोलिसांनी या टोळ्या नियंत्रणात आणल्या. बहुतांश टोळ्यांचे प्रमुख आज तुरुंगात आहेत," असं राहुल खळदकर सांगतात.

गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी MCOCAचा वापर

जशी गुन्हेगारी वाढू लागली तसा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी MCOCAअंतर्गत कारवाई केली.

"पुण्यातल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील याचा पोलिसांनी पद्धतशीर अभ्यास केला. त्यानंतरच त्यांनी कारवाईला सुरुवात केली. गुन्हेगारी संपवण्यासाठी शक्य त्या कायदेशीर मार्गाचा वापर पोलिसांनी केला," असं माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सांगतात.

"गुन्हेगारी कमी करायची असेल तर लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. पण लोक तेव्हाच तक्रार करायला पुढे येतात जेव्हा त्यांना खात्री असते की पोलीस कारवाई करतील. आणि पोलीस तेव्हाच कारवाई करू शकतात जेव्हा त्यांना कायद्याचं पाठबळ आहे. MCOCA मुळे पोलिसांचे हात बळकट झाले. हे गुन्हेगार काही साधे नव्हते तुरुंगातही ते मारामाऱ्या करत असत. त्याचबरोबर Preventive Detention Act (म्हणजे काही होणार असा संशय आल्यास संशयिताला ताब्यात घेतलं जातं) या कायद्याचा वापर करून पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला."

"जशी शहरं विस्तारतील तसं गुन्हेगारीचं स्वरूप बदलतं आणि संघटित गुन्हेगारी येतेच. ही फक्त पुण्याचीच गोष्ट नाही तर जी शहरं विस्तारत आहेत तिथं आपल्याला संघटित गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसतं," असं दीक्षित सांगतात.

त्यांच्या मताशी साधर्म्य असणारं विधान मिंडे करतात, "मुळशी पॅटर्न या चित्रपटात जे दाखवलं गेलं आहे ते फक्त मुळशी किंवा पुण्यापुरतं मर्यादित नाही. तर शहरं विस्तारण्यामुळे वाढणारी गुन्हेगारी इतरत्रही दिसत आहे. मुळशी पॅटर्न ही फक्त पुण्याचीच नाही तर अवघ्या महाराष्ट्राची कथा आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)