मुसेवाला हत्या प्रकरण: संतोष जाधवला अटक कशी झाली?

संतोष जाधव
फोटो कॅप्शन, संतोष जाधव

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी संशयित शूटर संतोष जाधवला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

संतोषला रविवारी गुजरातच्या कच्छमधून अटक करण्यात आली. कोर्टाने त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. सिद्धू मुसेवालावर फायरिंगनंतर शार्प शूटर म्हणून संतोषचं नाव पुढे आलं होतं.

संतोष हा सिद्धू मुसेवाला हत्येची जबाबदारी स्विकारणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई गॅंगचा सदस्य आहे. "संतोषला सिद्धू मुसेवाला खूनाची माहिती आहे," असं अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) कुलवंत कुमार सारंगल पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

राण्या बालखेले खून प्रकरणी संतोष जाधव गेल्या वर्षभरापासून मोक्कामध्ये वॉन्टेड होता. संतोषसोबत पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याचा साथीदार नवनाथ सुर्यवंशीलाही अटक केलीये. सिद्धू मुसेवालांच्या हत्येचं पुणे कनेक्शन? तुम्ही इथं वाचू शकता.

संतोष जाधवला कशी झाली अटक?

कुख्यात गुन्हेगार राण्या बालखेले हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी संतोष जाधव गेल्या वर्षभरापासून फरार होता.

संतोष गुजरातमध्ये लपून बसला असल्याची माहिती पुणे पोलिसांना सौरभ महाकाळकडून मिळाली. पुणे ग्रामीण पोलिसांनी 7 जूनला सौरभला पुण्यातून अटक केली होती. त्याच्यावर फरार असताना संतोष जाधवला आसरा दिल्याचा आरोप आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "सौरभ महाकाळने पोलीस चौकशीत संतोष जाधव त्याचा मित्र नवनाथ सूर्यवंशीकडे गुजरातच्या कच्छमध्ये लपून बसला असल्याची माहिती दिली."

संतोष जाधव आणि नवनाथ सूर्यवंशी

फोटो स्रोत, BBC Nitin Nagarkar

संतोष गुजरातच्या मांडवी तालुक्यातील नागोरमध्ये असल्याची खबर पक्की होती. पोलिसांनी सर्वप्रथम नवनाथ सूर्यवंशीला ताब्यात घेतलं. नवनाथने सहजतेने संतोषची माहिती दिली नाही. पण, अखेर संतोषला आपल्या ओळखीच्या ठिकाणी ठेवल्याचं, त्याच्या खाण्यापिण्याची सोय आणि त्याला वापरण्यासाठी सीमकार्ड दिल्याचं चौकशीत कबुल केलं.

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख पुढे म्हणाले, "संतोषने आपला पूर्ण पेहराव बदलला होता. सिद्धू मुसेवाला प्रकरणी संतोषचा फोटो मीडिया आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे ओळख लपवण्यासाठी त्याने आपले केस कापले होते."

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथचे वडील गेल्या बऱ्याच वर्षापासून कामानिमित्त गुजरातमध्ये असतात. नवनाथ आणि संतोष एकमेकांना चांगले ओळखतात. त्यामुळे नवनाथने संतोषला लपण्यास मदत केली. पोलिसांनी आरोपीला आसरा दिल्याच्या आरोपावरून नवनाथला अटक केलीये.

सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी संतोषचा रोल काय?

प्रसिद्ध पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गॅंगने स्विकारली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष जाधव लॉरेन्स बिष्णोई गॅंगचा सदस्य आहे. मुसेवालाच्या हत्येनंतर शूटर म्हणून संतोषचं नाव पुढे आलं होतं.

अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) कुलवंत कुमार सारंगल सांगतात, "सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी संतोष आणि सौरभ महाकाळचा नक्की रोल काय याची आम्ही चौकशी करत आहोत. पण, बिष्णोई गॅंगचे सदस्य असल्याने त्यांना मुसेवाला खूनाची माहिती आहे." या हत्येप्रकरणी त्यांची लिंक काय? हे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करतायत.

लॉरेन्स बिष्णोई गॅंग पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये अॅक्टिव्ह आहे. या गॅंगचे सदस्य देशभरात ऑपरेट करतात. महाराष्ट्र पोलिसांच्या माहितीनुसार, राज्यातही लॉरेन्स बिष्णोई गॅंगचे काही सदस्य काम करत आहेत.

मुसेवाला हत्येनंतर दिल्ली, पंजाब आणि महाराष्ट्र पोलीस याप्रकरणी तपास करत होते. अतिरिक्त पोलीस महासंचालक पुढे म्हणाले, "मुसेवाला हत्येनंतर लॉरेन्स बिष्णोईचं नाव पुढे आलं. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ बिष्णोईच्या कसे संपर्कात आले याची माहिती आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतोय."

सिद्धू मुसेवाला

दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी मुसेवाला प्रकरणी सौरभ महाकाळची चौकशी केली होती.

कुलवंत कुमार सारंगल पुढे म्हणाले, "लॉरेन्स बिष्णोई गॅंगचा सदस्य विक्रम बराड कॅनडामध्ये असल्याची माहिती आहे. त्याचं नक्की लोकेशन माहिती नाही. सौरभ महाकाळ बराडसोबत सातत्याने संपर्कात होता."

पोलिसांच्या माहितीनुसार, सौरभ महाकाळ संतोषच्या संपर्कात होता. त्याच्याच मार्फत तो पंजाब आणि हरियाणाला गेला होता. विक्रम बराडसोबत सौरभ महाकाळचा संपर्क संतोषमुळे झाला. महाकाळला बिष्णोई गॅंगमध्ये का घेण्यात आलं, त्याचा रोल काय होता याची माहिती पोलीस गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सौरभ महाकाळ 2021 पासून संतोष जाधवच्या संपर्कात आला. तो राजस्थान, पंजाब, हरियाणा, आंध्रप्रदेश आणि उत्तरप्रेदश या राज्यात गेला आहे. कुलवंत कुमार सारंगल पुढे म्हणाले, "महाकाळने बिष्णोई गॅंगसाठी काही टार्गेटची रेकी पंजाब आणि हरियाणामध्ये केली होती."

सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाइंड लॉरेन्स बिश्नोई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाइंड लॉरेन्स बिष्णोई

संतोष जाधवने महाराष्ट्रातील अनेक मुलांना बिष्णोई गॅंगमध्ये सामील केलं असल्याची माहिती पोलिसांना मिळालीये.

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख पुढे म्हणाले, "यात तेजस शिंदेचं नाव पुढे आलंय. त्याला अजून अटक करण्यात आलेली नाही. तो संतोषसोबत हरियाणाला जाऊन आलाय. त्याचा या प्रकरणात काही रोल आहे का याची माहिती आम्ही गोळा करतोय."

बिष्णोई गॅंगने दिली सलमान खानला धमकी?

काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारू, अशी धमकी देणारं पत्र आलं होतं. पोलीस चौकशीत सौरभ महाकाळने हे पत्र बिष्णोई गॅंगचा सदस्य विक्रम बराडने लिहीलं असल्याची माहिती दिली होती.

कुलवंत कुमार सारंगल पुढे म्हणाले, "सौरभ महाकाळने पोलीस चौकशीत सांगितलंय की त्याला सलमान खानला धमकी देण्यात येणार असल्याची माहिती होती."

सलमानला बिष्णोई गॅंगच्या विक्रम बराडने धमकी दिल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं होतं.

धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. सलमानला लॉरेन्स बिष्णोई गॅंगने धमकी दिल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली होती.

सलमानच्या घरी धमकीचं पत्र देण्यासाठी तीन लोक राजस्थानच्या जालोरमधून मुंबईत आले होते अशी माहिती पोलिसांना मिळालीये. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा वाढवली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)