मुसेवाला प्रकरणात चर्चेत आलेल्या संतोष जाधवने जेव्हा आधी स्टेटस ठेवून ओंकार बाणखेलेला 'संपवलं'

- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून
(आज ( 29 मे) सिद्धू मुसेवालाच्या हत्येला दोन वर्षं पूर्ण झाली. या हत्येतील आरोपी संतोष जाधव हा पुण्यात राहत असे. संतोष जाधव कोण होता आणि तो गुन्हेगारी विश्वात रुळला याची माहिती देणारा हा लेख पुन्हा शेअर करत आहोत.)
1 ऑगस्ट 2021 रोजी, पुणे जिल्हातल्या एकलहरे (तालुका आंबेगाव) गावाजवळ एका सराईत गुन्हेगाराची भरदुपारी 2 वाजताच्या दरम्यान गोळ्या घालून खून करण्यात आला. आंबेगाव तालुक्यातल्या मंचर गाव आणि आजूबाजूच्या भागात 25 वर्षं वयाच्या ओंकार ऊर्फ राण्या बाणखेलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती होती.
बाणखेलेच्या खून प्रकरणात 9 आरोपींची नावं होती. त्यातील 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण यातला प्रमुख आरोपी संतोष जाधव (वय 22-24) मात्र फरार होता. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही. पण जवळपास 10 महिन्यांनी, 6 जून 2022 रोजी संतोष जाधव हे नाव अनपेक्षितरित्या परत चर्चेत आलं.
पण ज्या गुन्ह्यामुळे हे नाव पुढे आलं त्याची चर्चा ही आंतरराष्ट्रीय पातळीवर होते आहे. ते प्रकरण म्हणजे प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची झालेली हत्या. मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून पुणे जिल्ह्यातली दोन नावं होती. संतोष जाधव आणि सिद्धेश कांबळे (वय 19) ऊर्फ सौरभ महाकाळ.
- सिद्धू मुसेवाला प्रकरणात फरार असलेल्या संतोष जाधवची आई म्हणते
- सिद्धू मुसेवालांच्या हत्येचं पुणे कनेक्शन?
- सिद्धू मुसेवाला : स्वतःची संजय दत्तशी तुलना, बंदुका मिरवणं ते 30 गोळ्या झाडल्याने मृत्यूपर्यंत...
- सिद्धू मुसेवालांचे चाहते का म्हणत आहेत की 'त्याने त्याचा मृ्त्यू आधीच पाहिला होता?'
- संतोष जाधवचा 'बॉस' लॉरेन्स बिश्नोई कोण आहे, काय आहे त्याच्या गुन्हेगारीचा इतिहास?
मुसेवाला हत्या प्रकरणात संतोष जाधव हा शार्पशूटर आहे, असा तपास यंत्रणांचा कयास आहे. संतोष जाधव हा मंचरचा तर सिद्धेश कांबळे हा मूळचा जुन्नर तालुक्यांतील नारायणगावचा रहिवासी. यातल्या सिद्धेश कांबळेला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर संतोष जाधवला काल पुणे पोलिसांनी गुजरातमधून अटक केलीय.
संतोष जाधवचं कुटूंब आधी आंबेगाव तालुक्यातल्या पोखरी या गावात राहायचं. साधारणपणे 10 वर्षांच्या आधी संतोषचे वडील वारले आणि उदरनिर्वाह करण्यासाठी त्याची आई सिता जाधव त्याला आणि त्याची लहान बहिणीला घेऊन मंचर इथे आली.
तिथेच हे कुटूंब राहू लागलं. अल्पवयीन असल्यापासूनच संतोषचं नाव गुन्हेगार म्हणून पुढे येऊ लागलं. 2017 साली संतोषने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी त्याच्यावर मंचर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर बाललैंगिक अत्याचार कायदा (पॉस्को) अंतर्गत त्याच्यावर मंचरमध्येच 2019 साली गुन्हा दाखल आहे.
"या दोन्ही केसमध्ये जामिनावर तो बाहेर आल्यावर, 2021 साली परत एका गंभीर स्वरूपातल्या गुन्ह्यात त्याचं नाव पुढे आलं. ओंकार बाणखेलेचा गोळीबार करुन खून झाला आणि त्याचा मास्टरमाईंड संतोष जाधव होता असं म्हणावं लागेल कारण त्या खुनाच्या आधी सोशल मिडीयावर पोस्ट टाकून तसे इशारे त्याने दिले होते," असं मंचर भागातल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगतिलं.
'सूर्य उगवायच्या आत तुला संपवतो'
स्थानिकांनुसार संतोष जाधव आणि ओंकार बाणखेले हे आधी एकाच गॅंगमध्ये सोबत काम करायचे. पण त्यानंतर त्यांच्यात मतभेद झाले आणि शत्रुत्व निर्माण झालं.

31 जुलै 2021 ला संतोष जाधव याने 'सूर्य उगवायच्या आत तुला संपवतो' असं ठेवलं होतं. याला प्रत्यूत्तर म्हणून ओंकार बाणखेले याने 'भेटणार तिथे ठोकणार, कुठेपण असू दे', असं स्टेटस ठेवले. यातूनच त्यांच्यातला वाद विकोपाला गेला. यानंतर 1 ऑगस्टला एकलहरे गावाजवळ ओंकार बाणखेलेचा गोळ्या घालून खून झाला.
संतोष जाधवचं लग्न झालंय आणि त्याला मुलगीही आहे. पण घरातला मोठा मुलगा म्हणून, नवरा आणि वडील म्हणून त्याने आमचा विचार केला नाही, असं संतोषच्या आईने सांगितलं.
"आमची शेवटची भेट दीड वर्षांच्या आधी झाली होती. लहानपणापासून त्याचा स्वभाव चांगला होता. पण त्याचे वडील वारल्यावर त्याच्यात बदल झाले. त्यांना जाऊन 10 वर्षं झाले आहेत. त्याच्या स्वभावातला बदल जाणवत होता. मारामारी, भांडणं करायचा. मी त्याला बरेच वेळा समजावलं की हे सगळं आपल्याला नको आहे. पण तो ऐकायचा नाही. कारण त्याला बाहेर मित्रांमध्येच राहायला आवडायचं. घरी कधी तो आमच्या दोघींसोबत व्यवस्थित राहिला नाही.
लहानपणी जसे त्याचे वडील गेले, तेव्हापासून तो कधीच नीट राहिला नाही. वडील गेल्यावर मुलगा, भाऊ म्हणून जबाबदारीही घेतली नाही. आपल्या आईला आणि बहिणीला माझ्याशिवाय अजून कुणी नाही, याचा विचार नाही केला त्याने कधी. त्याला असंच वाटायचं की त्याचं जग वेगळं आहे. आपली आई बहिणीचा त्याने विचार केला नाही कधी. आईच्या काळजाला वाटतं की आपल्या मुलाने चांगलं वागावं, सुधारावं. मी माझ्याकडून प्रयत्न केले त्याच्यासाठी. पण त्याने स्वीकारलं नाही," असं सीता जाधव, संतोषच्या आईने सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष बालगुन्हेगारांसोबत काम करायचा. फरार झाल्यापासून संतोष जाधव हा राजस्थान, हरियाणा, पंजाब भागात होता. "राजस्थानच्या गंगानगर भागात आमची एक टीम तपासासाठी जाऊन आला होता. तिथेही त्याने गुन्हा केला होता. पण आमच्या टीमला तिथे तो सापडला नाही," असं पुणे क्राईम ब्रांचच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
सिद्धेश कांबळेला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडून संतोषची काही माहीती मिळतेय का याचा तपासही पोलिस करत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांसोबत, पंजाब आणि दिल्ली पोलिसही त्याची चौकशी करणार आहेत.
सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ असा बनला गॅंगस्टर
मुसेवाला हत्या प्रकरणात पंजाब पोलिसांनी 8 शार्पशूटर्सची नावं संशयित म्हणून दिलेली आहेत. त्यामध्ये सिद्धेश कांबळेचाही समावेश आहे.
19 वयाचा सिद्धेश हा नारायणगावचा राहणार आहे. पोलिसांनी त्याला पुणे-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरून ताब्यात घेतलं. संतोष जाधवला मदत करण्याशिवाय त्याच्यावरच्या आणखी काही गुन्ह्यांची पुणे ग्रामीण पोलिसांकडे सध्या तरी नाही.

उपलब्ध माहितीनुसार सिद्धेशच्या आईचं तो लहान असतानाच मृत्यू झाला. तो त्याचे मोठे भावंडं आणि नातेवाईक यांच्याकडे वाढला. त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर असल्याने बऱ्याच वेळा घरापासून दूर असायचे.
"पुणे जिल्ह्यातल्या खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांत अल्पवयातच गुन्हेगारीकडे वळलेल्या मुलांचं प्रमाण लक्षणीय आहे. यातूनच यांच्या गॅंग तयार होतात. बेकायदेशीर कामांमधून सहज मिळणाऱ्या पैशांची त्यांना चटक लागते. त्यातून छोटे गुन्हे करता करता मोठे गुन्हे करायला सुरुवात करतात," असं मंचर भागातल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने नाव न घेण्याच्या अटीवर सांगतिलं.
संतोषला चांगले संस्कार देण्याचा खूप प्रयत्न केला
संतोष जाधवची आई सीता जाधव यांच्या म्हणण्यानुसार, घरात संतोषला चांगले संस्कार देण्याचे त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले.
"आई वडिलांची माफक अपेक्षा असते की आपल्या पोरांनी एक चांगलं व्यक्तिमत्त्व म्हणून जगलं पाहीजे. त्यांनी खूप श्रीमंत व्हावं अशी अपेक्षा नसते. चांगली कुठेतरी नोकरी करुन दोन रुपये कमवावे हेच वाटतं. पण ते नाही मिळालं त्याच्याकडून," असं सीता जाधव सांगतात.

"आई कष्ट करते, घर सांभाळते. घर चालवणारी व्यक्ती काय-काय बघणार. तो बाहेर जायचा. स्वतःच्या वयाच्या मित्र संगती ठीक आहे. पण वयाने मोठ्या व्यक्तींसोबत उठबस असायची. कसे मित्र निवडावे हे त्याला कळलं नाही. बाप नाही हा काही पण करू शकतो, दिले दोन रुपये कुणाला पण मारू शकतो अशा चक्रात तो अडकला. बाहेरच्या जगामुळेच त्याच्यावर असे परिणाम झाले. आम्ही फार सर्वसाधारण लोक आहोत. फार पैसे किंवा श्रीमंतीची हौस नाही," असं सीता जाधव म्हणाल्या.
29 मे रोजी सिधू मुसेवाला पंजाबचे प्रसिद्ध गायक आणि कॉंग्रेस नेते यांची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांच्या 2 मित्रांसोबत ते जीपमध्ये होते तेव्हा गावाजवळच त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. सध्या तिहार जेलमध्ये असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गॅंगने या हत्येची जबाबदारी स्विकारली. या हत्येत लारेंस बिश्नोई हाच मास्टरमाईंड असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलंय.
पुणे जिल्ह्यातील या दोघांचा बिश्नोई गॅंग सोबत कसा संपर्क आला, मुसेवाला हत्याप्रकरणात त्यांचा कसा सहभाग होता, मुसेवाला हत्येचं षड्यंत्र कसं रचलं गेलं, ती हत्या कशी घडवून आणली गेली आणि यात अजून कोणाचा समावेश आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तपासातून पुढे येतील अशी अपेक्षा आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








