के पॉप सेक्स स्कँडल : 'चाहत्यांच्या धमक्यांमुळे तणाव, दोनवेळा गर्भपात झाला'

- Author, लुईस बरुको आणि काई लॉरेन्स
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हीस
दक्षिण कोरियामधील दोन महिला पत्रकार पार्क ह्यो-सिल आणि कांग क्युंग-यून यांनी प्रसिद्ध के पॉप स्टार्सचा समावेश असलेलं एक सेक्स स्कँडल जगासमोर आणण्यासाठी मदत केली. पण त्यामुळे त्यांच्या जीवनात एक अत्यंत धक्कादायक असं वळण आलं.
सत्य समोर आणण्याच्या या प्रयत्नात दोघींनाही त्यांच्या खासगी जीवनात मोठी किंमत चुकवावी लागली.
सोलमधल्या एका वृत्तपत्रासोबत रिपोर्टर असलेल्या पार्क या सप्टेंबर 2016 मध्ये एका वीकेंडला काम संपवून निघाल्या होत्या. त्यांना त्यांच्या मित्रांना भेटायला जायचं होतं. पण त्याचवेळी त्यांना त्यांच्या संपादकांचा फोन आला. त्यांच्याकडे एका विश्वासू पोलीस सूत्राकडून मिळालेली महत्त्वाची माहिती होती.
पार्क सांगतात, "गोपनीय पद्धतीनं चित्रित करण्यात आलेल्या सेक्स फुटेजसंदर्भातील एका मोठ्या केसचा तपास सुरू असून यात एका मोठ्या सेलिब्रिटीच्या डान्सचा समावेश असल्याचं त्यांनी मला सांगितलं. ते नाव होतं जंग जून-यंग."
जंग हे ड्रग रेस्तरॉ नावाच्या एका प्रसिद्ध बँडमधील मोठे गायक आणि गीतकार असून, लाखो चाहते असलेले टीव्ही स्टार होते. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जंग यांच्या गर्लफ्रेंडनं त्याच्यावर सेक्सदरम्यान गोपनीय पद्धतीनं व्हीडिओ तयार केल्याचा आरोप केला होता.
अशा प्रकारे छुप्या कॅमेऱ्यानं चित्रण करण्याच्या गुन्ह्याला दक्षिण कोरियामध्ये 'मोलका' असं म्हणतात.
'माध्यमं खलनायक ठरली'
ही माहिती मिळताच पार्क यांनी डीनरला जाण्याचा कार्यक्रम रद्द केला आणि संपादकांना भेटण्यासाठी त्या पुन्हा थेट ऑफिसकडे निघाल्या.
पार्क सांगतात, "आम्हाला ही बातमी हातून जाऊ द्यायची नव्हती. शुक्रवारी रात्री 22.50 आम्ही ती बातमी प्रकाशित केली. हे प्रकरण किती मोठं होईल, याची मला त्यावेळी कल्पना नव्हती.
"काही मिनिटांमध्येच या बातमीची संपूर्ण दक्षिण कोरियामध्ये चर्चा सुरू झाली. माध्यमांमध्ये याविषयी प्रचंड उत्साह असल्याचं पाहायला मिळत होतं."

फोटो स्रोत, AFP
यानंतर जंग यांच्या टीमनं हे प्रकरण सावरण्यासाठी वेगानं हालचाली सुरू केल्या. त्यांनी एक निवेदन जाहीर केलं. त्यात त्यांनी म्हटलं की, हा पोलीस तपास काहीही महत्त्वाचा नसून माध्यमांनी त्याचा गाजावाजा केला आहे.
जंग यांच्या चाहत्यांनीही लगेचच त्यांची गर्लफ्रेंड या स्टारबाबत खोटं बोलत असल्याचा आरोप केला. त्यानंतर चाहत्यांनी पार्क यांच्याकडं मोर्चा वळवला.
"या प्रकरणात माध्यमं खलनायक ठरली होती. मलाही त्याचा फटका बसला होता," असं त्या म्हणाल्या.
ट्रोलिंग आणि धमक्यांचा मारा
पत्रकार असलेल्या पार्क यांच्यावर ऑनलाईन आणि ईमेलद्वारे अत्यंत घाणेरड्या कमेंट्स केल्या जाऊ लागल्या. लोक त्यांचे बनावट फोटो पोस्ट करून त्यांना बदनाम करण्याचा शक्यत तो प्रयत्न करत होते.
लोक त्यांच्या वृत्तपत्राच्या संपादकांना फोन करून धमकी देत होते. "तुम्ही त्या रिपोर्टरला काढून टाकलं नाही, तर इमारत जाळून टाकू," अशा धमक्या दिल्या जात होत्या.
"ते मला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. माझे पती प्रचंड काळजीत होते. ते मला ऑफिसला जाऊ नको असं सांगत होते. खूप धोका असल्यामुळे घराबाहेरच पडायचं नाही, असं मला सांगत होते," असं पार्क म्हणाल्या.
सहा महिन्यांनंतर ही शिवीगाळ आणखीच वाढली.

पार्क सांगतात, "मला अगदी सकाळीही फोन कॉल येऊ लागले. तीन-चार तास हाच फोन येण्याचा प्रकार सुरू राहायचा. मी जेव्हा फोनवर प्रतिसाद देणं बंद केलं, तेव्हा मला फोनवरून आक्षेपार्ह फोटो पाठवायला सुरुवात केली."
पार्क यांना दररोज असे हजारो मेसेज मिळू लागले होते.
त्या पुढे सांगतात की, "मी गर्भवती होते आणि या प्रकारामुळे प्रचंड धक्क्यातही होते. मी मानसिकदृष्टीनं एवढी हादरले होते की, मला घराबाहेर पडणंही कठीण जाऊ लागलं होतं. त्यानंतर दोनवेळा माझा गर्भपात झाला आणि आता मी निःसंतान आहे."
कदाचित हेच एकमेव कारण नसेल. पण गर्भपातामध्ये तणावाची महत्त्वाची भूमिका नक्कीच होती. त्याचा प्रभाव पडला याची मला खात्री आहे, असं त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं.
लैंगिक छळाचे अनेक पुरावे
एकीकडे पार्क यांना अशाप्रकारे परिणामांचा सामना करावा लागत होता. त्याचवेळी एसबीएस या दक्षिण कोरियाच्या मोठ्या ब्रॉडकास्टरमधील मनोरंजन रिपोर्टर कांग क्युंग-यून यादेखील त्यांच्या पातळीवर काही के पॉप स्टार्सबाबत तपास घेत होते.
पार्क यांनी सुरू केलेल्या या प्रकरणाचा शेवट त्या करणार होत्या.
जंग यांची जेव्हा 2016 मध्ये पोलिसांनी मोलकाबाबत पहिल्यांदा विचारपूस केली, त्यावेळी त्याला तपासासाठी त्याचा फोन मागितला. पण त्यानं फोन देण्यास नकार दिला. त्याऐवजी त्यांनी एका खासगी फॉरेन्सिक कंपनीला त्यांनी फोन तपासणीसाठी दिला. त्यामागचं कारण त्यांनी कधीही सांगितलं नाही.
जंग यांच्या नकळत त्यावेळी त्यांच्या फोनमधील डेटाची कॉपी तयार करण्यात आली होती. तीन वर्षांनंतर एका निनावी खबऱ्यानं ते लिक करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं त्यातील कंटेंट कांग यांच्यापर्यंत पोहोचला होता.

"आजही त्याबद्दल विचार केला तर माझी धडधड वाढू लागते," असं कांग यांनी फोनमधील कंटेंट पाहिला त्यावेळच्या क्षणाची आठवण सांगताना म्हटलं.
पार्क यांनी 2016 मध्ये जंग यांच्या गर्लफ्रेंडच्या ज्या व्हिडिओबाबत बातमी केली होती, तो पाहायला मिळेल अशी कांग यांना आशा होती. पण तो व्हिडिओ त्यात नव्हता. पण त्याऐवजी त्यांना असे काही चॅट ग्रुप सापडले, ज्यात लैंगिक छळाचे अनेक व्हिडिओ होते. काही बेशुद्ध महिलांचे फोटो ग्रुपमध्ये शेअर करण्यात आले होते. त्या ग्रुपमध्ये जंग आणि इतर पुरुष के पॉप स्टार्स होते.
त्यांच्यामध्ये एफटी आयलँड नावाच्या रॉक बँडमधील आघाडीचे गिटारीस्ट चोई जोंग-हून आणि बिगबँग या प्रसिद्धी के पॉप सुपरग्रुपचे सदस्य आणि मोठे स्टार सेऊंग्री यांच समावेश होता.
अनेक पीडिता आल्या समोर
कांग यांनी या प्रकरणाच्या आणखी तळाशी जाण्याचं ठरवलं तर त्यांना विचलित करणारी काही माहिती मिळाली. खाली पडल्यानं डोक्याला मार लागून बेशुद्ध झालेल्या महिलेच्या गँगरेपबाबतचे तपशील त्यांना सापडले.
"मी काल खूप घाबरलो होते. तिची कवटी फुटली असं वाटत होतं," अशी कबुली एका व्यक्तीनं दिली होती.
त्यावर जंग यांनी मेसेज केला की, "ही माझ्या जीवनातली खरंच सर्वात गमतीशीर रात्र होती."
समोर आलेल्या माहितीनं कांग यांना प्रचंड धक्का बसला होता.
त्या म्हणाल्या, "तो अत्यंत किळसवाणा प्रकार होता. एखाद्या खेळण्याशी खेळावं तसं ते त्या महिलेच्या शरीराशी खेळत होते."

फोटो स्रोत, Getty Images
पोलिसांतील एका वरिष्ठानं या सर्वांना पाठीशी घातल्याची माहिती मिळणारे मेसेजही कांग यांना दिसले होते.
के पॉप इंडस्ट्रीतील या काळ्या सत्यावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे, याची त्यांना जाणीव होती. त्रास झाला, तरी त्यासाठी त्यांची तयारी होती.
कांग यांनी याबाबत तपास सुरू ठेवला. पुरेसे पुरावे हाती आल्यानंतर त्यांनी एक स्टोरी प्रकाशित केली. त्याद्वारे चॅटग्रुपमधील जंग, चोई आणि सेउंग्री यांच्या चॅटग्रुपमधील तपशील त्यांनी जगासमोर आणला.
पण यावेळी परिस्थिती जरा वेगळी होती. कांग यांची बातमी समोर येताच संबंधित अधिकाऱ्यांनी अगदी तत्परततेनं पावलं उचलली आणि कारवाई केली. यावेळी कारवाईत सर्वात पहिली अटक झाली जंग यांना.
यामुळे इतर पीडितांना बळ मिळालं आणि त्यांनी समोर येत मोठ्या स्टार्सच्या विरोधात अनेक आरोप केले.
पण यासाठी खूप शक्ती पणाला लावावी लागली. 2016 मध्ये जेव्हा जंगच्या गर्लफ्रेंडनं आरोप केले होते, त्यावेळी लोकांची काय प्रतिक्रिया होती हे पीडितांनी अनुभवलेलं होतं. पण तरीही या गायकांच्या विरोधात आरोप केल्यामुळे ज्या परिस्थितीचा सामना करावा लागेल, त्यासाठी सगळ्यांनी तयारी केलेली होती.
महिलाद्वेष हेच कारण?
पण या प्रकरणी न्यायदान होताच, ट्रोलर्सनी कांग यांना लक्ष्य केलं. त्यांच्याकडून कांग यांच्यावर अत्यंत खासगी स्वरुपाचे हल्ले केले जाऊ लागले.
कांग म्हणाल्या, "मी त्यावेळी गर्भवती होते? त्यामुळं ते मला फेमि-बिच, प्रेग्नंट फेमि बिच, लेफ्ट विंग-फेमि बिच म्हणू लागले."
"लग्नाला पाच वर्षे झाल्यानंतर मी गर्भवती राहिले होते. त्यामुळे मला खूप काळजी वाटत होती. माझ्या बाळाला काही होईल अशी शंका मनामध्ये होते. मला प्रचंड थकवा आलेला होता आणि मी खचून गेले होते."

फोटो स्रोत, Getty Images
सुमारे तीन वर्ष चाललेल्या या छळामध्ये सर्वात वाईट प्रतिक्रिया त्यांच्या बाळाबाबत देण्यात आली होती. पण मी त्याबाबत बोलूही शकत नाही. पण तरीही मला याचा काही पश्चात्ताप नाही, असं त्या म्हणाल्या.
जो एल्फविंग ह्वांग या ऑस्ट्रेलियातील पर्थच्या कर्टिन विद्यापीठातील कोरियन सोसायटी अँड कल्चरचे सहयोगी प्राध्यापक आहे. त्यांच्या मते, पीडितांना तोंड बंद करण्यासाठी ज्या हिंसाचाराचा सामना करावा लागला त्याच प्रकारचा अनुभव पॉप स्टार्सचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी पार्क आणि कांग यांना आला.
लैंगिक असमानतेबाबत बोलणं हे दक्षिण कोरियामध्ये प्रचंड विभाजनकारी ठरू शकतं. तर पीडित महिला आणि पत्रकार यांच्याबरोबर जे काही घडलं त्या सर्वाच्या मुळाशी महिलांबाबतचा द्वेष होता, असं त्या म्हणाल्या.
"महिलाद्वेष म्हणजे केवळ पुरुष महिलांबाबत बोलतात तो नाही. तर कोणत्याही समान मूल्य असलेल्या वर्गातून आलेल्या मताला शांत करण्यासाठीचा प्रयत्न आणि त्यासंदर्भात असलेली शक्ती याच्याशी त्याचा संबंध असतो," असं त्या म्हणाल्या.
पत्रकार असलेल्या पार्क आणि कांग यांना प्रचंड प्रचंड छळाचा सामना करावा लागला असला तरी, दक्षिण कोरियामध्ये एकप्रकारचा सांस्कृतिक बदल पाहायला मिळत असल्याचंही त्यांना जाणवत आहे.

त्यांच्या प्रयत्नांमुळे मनोरंजन क्षेत्रात सत्तेच्या दुरुपयोगाबाबत चर्चा सुरू झाली. तसंच मोलकासारख्या गुन्ह्यांमध्ये महिलांना अधिक संरक्षण मिळावं यासाठी आवाजही उठवण्यात आला.
कांग आता एका मुलीच्या आई आहेत. या संपूर्ण प्रकरणाला जगासमोर आणण्यासाठी त्यांनी बजावलेल्या भूमिकेमुळं त्यांना अजूनही काही प्रमाणात ट्रोलर्सकडून छळाचा सामना करावा लागत आहे. पण त्यांच्या या प्रयत्नांमुळं "के पॉप इंडस्ट्रीतील सत्तेच्या जोरावरील लैंगिक छळाचा बाजार" कसा आहे, याचा इशारा सर्वांना मिळाला आहे.
"आम्ही एका मोठ्या तळ्यात एक लहानसा खडा टाकलाय. तो तळाला जाऊन शांतही झाला आहे. पण अजूनही लोकांना त्याचं स्मरण असेल अशी आम्हाला आशा आहे. त्यामुळे जर पुन्हा असं काही घडलं तर खूप लवकर आपण त्यावर भूमिका घेऊ शकतो," असं त्या म्हणाल्या.











