जिम जोन्स : माथेफिरू धर्मगुरू ज्याने 900 भक्तांना विष पाजून स्वतःच्या डोक्यात गोळी मारली

जिम जोन्स

फोटो स्रोत, BBC 4

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

18 नोव्हेंबर 1978 ला गुयाना देशातल्या जोन्सटाऊन नावाच्या एका दुर्गम भागात असणाऱ्या वस्तीत पोचलेल्या पोलिसांना एक हादरवून टाकणारं दृश्य दिसलं.

900 हून जास्त स्त्री,पुरुष, लहान मुलं मृतावस्थेत पडले होते. हे मृतदेहही अस्ताव्यस्त नव्हते, तर नीट शिस्तीत पडले होते, कुठे गटागटाने तर कुठे एकटे. पण त्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटेल ही माणसं झोपलीत किंवा आरामात पहुडलीयेत. कुठे आईवडिलांच्या कुशीत मुलं पडली होती, कुठे प्रेमी युगुलांचे हात हातात होते.

सगळ्यांचे ओठ काळे-निळे झाले होते, घटनास्थळी पोटॅशियम सायनाईड या विषाचा मोठा साठा आढळला आणि सरबतांचे अनेक ग्लास, ज्यात हे विष मिसळलेलं होतं.

या मृत्यूच्या तांडवाला एकच माणूस जबाबादार होता - जिम जोन्स. काय घडलं होतं त्या दिवशी? किंवा तो दिवस यायच्या अनेक दिवस आधी...

(या लेखातलं कथन काही वाचकांना अस्वस्थ करू शकतं. )

कोण होता जिम जोन्स?

अनेकांना तो देवदूत वाटायचा, तर कित्येकांना वाटायचं की, त्याच्याकडे चमत्कारी शक्ती आहेत. तो आपल्या स्पर्शाने कॅन्सरही बरा करू शकतो. त्याचे हजारो भक्त होते. एक पंथच सुरू केला होता त्याने. त्याने आपल्या पंथांचं नवं चर्च काढलं आणि त्याला नाव दिल 'पीपल्स टेंपल.'

अमेरिकेतल्या इंडियाना राज्यातल्या एका खेड्याच त्याचा जन्म झाला होता. तो लहान असताना दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं, तेव्हा त्याच्या वयाची मुलं युद्ध युद्ध खेळायची, पण हा धार्मिक प्रवचन ऐकायला जायचा. त्याने पाच चर्चचं सदस्यत्व घेतलं होतं आणि तो पाचही चर्चमध्ये नित्यनियमाने हजेरी लावायचा.

जिमचा मुलगा स्टीफन जोन्स म्हणतात, "तो या पाचही धर्मगुरूंच्या कीर्तन-प्रवचनाची स्टाईल अभ्यासायचा. कोण काय बोलतंय, कोणत्या शब्दावर जोर देतंय, लोकांना कसं आपल्या कह्यात घेतंय."

ते पुढे म्हणतात की जिम जोन्सला लहानपणापासूनच सर्वांचं आकर्षण बनायचं होतं. लोकांच्या मनावर सत्ता गाजवायची होती.

जसा तो मोठा झाला त्याने स्वतःचं असं चर्च सुरू केलं आणि तो धर्मगुरू बनला.

कोण होते जिम जोन्सचे भक्त?

चांगल्या आयुष्याच्या, समान संधीच्या शोधात असणारे सर्वसामान्य लोक. हे सामुदायिक आत्महत्याकांड (?) घडलं, त्यातून जे वाचले त्यांना नंतर आयुष्यभर स्वतःच्या मनातल्या राक्षसांचा, सरकारी चौकशीचा आणि लोकांच्या घृणास्पद नजरांचा सामना करावा लागला.

अर्थात झाल्या प्रकारातून बोटावर मोजण्याइतके लोकच जिवंत वाचले. यातल्या त्याच्या माजी भक्तांशी आणि त्याच्या दोन मुलांशी बीबीसी फोर आपल्या डॉक्यमेंट्रीत बोललं आहे.

वर म्हटलं तसं हे लोक चांगल्या आयुष्याच्या आणि समान संधीच्या शोधात होते, म्हणजे नक्की काय? यासाठी त्यावेळेची अमेरिकेतली सामाजिक परिस्थिती समजून घ्यावी लागेल.

व्हर्नन गोस्ली श्वेतवर्णीय होते, तर त्यांची पत्नी कृष्णवर्णीय

फोटो स्रोत, BBC 4

फोटो कॅप्शन, व्हर्नन गोस्ली श्वेतवर्णीय होते, तर त्यांची पत्नी कृष्णवर्णीय

1960 आणि 70 च्या दशकात गोऱ्या-काळ्यामध्ये असणारा भेदभाव शिगेला पोचला होता. कृष्णवर्णीयांना बहिष्कृत आयुष्य जगायला लावणारी सेग्रिगेशन पद्धत अस्तित्वात होती. श्वेतवर्णीय लोक जिथे असतील तिथे कृष्णवर्णीयांना प्रवेश नव्हता. आंतरवांशिक लग्नांना असणारी बंदी संपली असली तरी समाजमान्यता नव्हती.

श्वेतवर्णीय-कृष्णवर्णीय जोडपं असेल तर समाज त्यांना सुखाने जगू देत नव्हता. अमेरिकन अर्थव्यवस्थेची वाढ होती नव्हती, त्यात भरीस भर म्हणून व्हिएतनामचं युद्ध अमेरिका लढत होती. तरुणांची एक पूर्ण पिढी त्यात होरपळली जात होती. अंमली पदार्थांना सुळसुळाट झाला होता. अमेरिकन समाजाला प्रश्नांनी ग्रासलं होतं.

यात भरडलेल्या गेल्या लोकांपैकी काही लोक जिमकडे ओढले गेले. व्हर्नन गोस्ली जिम जोन्सचे भक्त बनले. तेव्हा त्यांचं वय फक्त 20 वर्षं होतं. ते स्वतः श्वेतवर्णीय होते, तर त्यांची बायको कृष्णवर्णीय.

लेस्ली वॅगनर-विल्सनही तेव्हा अशाच विशीच्या होत्या. त्यांची बहीण ड्रग्सच्या आहारी गेली होती. त्यांच्या कुटुंबाला मदत मिळत नव्हती आणि मग लेस्ली, त्यांच्या आई आणि बहीण पीपल्स टेंपलमध्ये गेल्या. तिथे गरीब घरातून आलेल्या कृष्णवर्णीय लोकांसाठी व्यसनमुक्तीचा कार्यक्रम चालवला जायचा.

जिम कार्टर फक्त 19 वर्षांचे होते जेव्हा ते व्हिएतनाम युद्धात गेले. त्या युद्धाचा त्यांच्या मनावर गहिरा परिणाम झाला. ते परत आले तेव्हा त्यांना एका काळ्या गर्तेत अडकल्यासारखं वाटत होतं आणि बाहेर पडण्याचा कोणताच रस्ता दिसत नव्हता.

ते म्हणतात, इथे आलो तेव्हा मला पहिल्यांदा घरी आल्यासारखं वाटलं.

अशा शेकडो लोकांना पीपल्स टेंपलने आपलंस केलं, ज्यांना कोणी नव्हतं, ज्यांना संधी नव्हत्या, ज्यांना भेदभाव सहन करावा लागत होता. वरकरणी जिम जोन्स लोकांना आपला हिरो वाटायला लागला, कारण तो तेव्हा खरंच कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी, संपत्तीच्या समान वाटपासाठी, लोकांना समान संधी मिळण्यासाठी आवाज उठवत होता. तो स्वतःला सोशालिस्ट म्हणवत होता.

जिमची एक राजकीय विचारसरणी होता, तो चळवळीची भाषा बोलायचा इथपर्यंत ठीक होतं. पण दुसरीकडे तो स्वतःला देवदूत म्हणायचा. लोकांचे रोग तो नुसत्या स्पर्शाने दूर करतो असा दावा करायचा.

त्याच्या पीपल्स टेंपलमध्ये अनेक भानगडीही चालत होत्या.

काय घडायचं पीपल्स टेंपलमध्ये?

जोन्सटाऊनची घटना घडण्याआधी जिम जोन्सने त्याचं पीपल्स टेंपल सॅन फ्रान्सिस्को या शहरात हलवलं होतं. तोवर त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती, त्याच्या चमत्काराने लोक बरे होतात ही कीर्ती सर्वदूर पसरली होती.

लेस्ली म्हणतात, "मी डोळ्याने पाहिलं की एक अपघात झालेली महिला जिच्या पायाला प्लास्टर लावलं होतं. तिला जिमच्या प्रवचनात आणलं. त्याने तिला हात लावला आणि म्हणाला आता तू फक्त चालूच नाही, तर धावू शकतेस. आणि ती महिला चक्क उठून धावायला लागली."

त्याचे असे चमत्कार पाहून लोक त्याच्या भजनी लागत होते, त्याच्या मागे सर्वस्व झोकून द्यायचे. त्याने काही बसेस खरेदी केल्या आणि त्यात बसून त्याचे भक्त आणि तो संपूर्ण अमेरिकेत फिरायचे. तो वेगवेगळ्या शहरात प्रवचन द्यायचा.

जिमच्या पीपल्स टेंपलमध्ये समानतेचा संदेश दिला जायचा

फोटो स्रोत, BBC 4

फोटो कॅप्शन, जिमच्या पीपल्स टेंपलमध्ये समानतेचा संदेश दिला जायचा

त्याचा आवाज, देहबोली, तो बोलत असणारी समानतेची, एकात्मतेची भाषा भारावून टाकणारी होती. त्याची भक्तमंडळी वाढत चालली होती. यात गोरी-काळी, लहान थोर सगळ्या प्रकारची माणसं होती.

तो स्वतःच्या वागण्यातूनही तसाच संदेश द्यायचा. निदान तसं दाखवायचा. जिम जोन्सने आठ-नऊ मुलं दत्तक घेतली. यात वेगवेगळ्या वंशाचे मुलं-मुली होते.

जिम जोन्स ज्युनिअर त्याच्या बचावलेल्या काही मुलांपैकी एक आहेत. ते कृष्णवर्णीय आहेत. ते म्हणतात, "मला दत्तक घेतानाचा किस्सा माझ्या आईने मला सांगितला होता. ते जेव्हा अनाथआश्रमात गेले तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी मला द्यायला नकार दिला. ते म्हणाले हा मुलगा काळा आहे, तुम्ही गोरे. या आधी कधी असं झालं नाहीये. तेव्हा माझे वडील ठासून म्हणाले होते, की मला जे करायचं तेच मी करेन."

जिमच्या मागे लोक सगळं सोडून येत होती. सॅन फ्रान्सिस्कोला येण्याआधी तो कॅलिफोर्निया राज्यातल्या रेडवूड इथे राहायचा. तिथे त्याने आपलं पीपल्स टेंपल सुरू केलं.

रेडवूडमध्ये त्याचं जिथे चर्च होतं, तिथे आसपास त्याने जागा घेतली होती. तिथेच थोडी शेती घेतली, काही घरं बांधली गेली. लोक लोक आपलं घरदार विकून, सगळी संपत्ती या चर्चला द्यायला लागले. तो जिथे असेल तिथे स्थायिक झाली.

तो सॅन फ्रान्सिस्कोला आला, ही माणसं त्याच्या मागे आले. पुढे तो दक्षिण अमेरिकतल्या गुयाना देशात गेला, त्याची भक्त मंडळी त्याच्यापाठोपाठ तिथे गेली.

याच काळात त्याने सामाजिक सहजीवनाचा प्रचार सुरू केला. म्हणजे माणसाची एकट्याची अशी संपत्ती नाही, जे असेल त्यावर समुदायाचा हक्क. मग एकेका घरात त्याचे वीस-वीस भक्त राहायचे. अशी अनेक घरं.

ही माणसं नोकरी -धंदा, आप्तेष्ट सोडून जिमच्या मागे. तिथे शेतात काम करायची, स्वयंपाक करायची, धुणी-भांडी, झाडलोट, कारकूनी सगळी कामं करायची. फुकट!

जिम स्वतःला फादर म्हणवून घ्यायचा आणि त्याच्या बायकोला, मार्सेलिनला मदर म्हणायला सांगायचा.

संध्याकाळी चर्चा रंगायच्या, हास्यविनोद व्हायचे, नाचगाण्याचा कार्यक्रम व्हायचा, जगाला आपण बदलून टाकतोय, जगासमोर आपण जगण्याचा आदर्श ठेवतोय अशी भावना त्याच्या भक्तांमध्ये बळावली होती. आपण काहीतरी चांगलं घडवतोय या प्रेरणेने पछाडलेली माणसं होती ही.

पण लवकरच हा भ्रमाचा भोपळा फुटणार होता.

जिमच्या प्रवचनांना काळे-गोरे लोक एकत्र येऊन आनंदाने नाचत असायचे

फोटो स्रोत, BBC 4

फोटो कॅप्शन, जिमच्या प्रवचनांना काळे-गोरे लोक एकत्र येऊन आनंदाने नाचत असायचे

तिथले गैरप्रकार वाढायला लागले होते. त्याने कुटुंबांना दूर केलं. म्हणजे आईवडिलांपासून त्यांची मुलं काढून घेतली. कोणत्याच पालकांना आपलं मुलं सांभाळण्याची परवानगी नव्हती, ते दुसऱ्यांची मुलं सांभाळाचे.

व्हर्नन म्हणतात, माझा मुलगा दुसऱ्या बाईकडे दिला आणि मी स्वतः दुसऱ्यांची चार मुलं सांभाळायचो.

तरुण मुलींचं लैगिक शोषण व्हायला लागलं होतं. जिमचे त्याच्या पंथातल्या अनेक महिलांशी संबंध होते, आणि तो म्हणायचा की तो त्यांचा उद्धार करतोय.

खूप पैसा येता होता, पण त्याचा हिशोब नव्हता.

तुम्हाला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची परवानगी नव्हती, उलट बोलण्याची परवानगी नव्हती, इतकंच काय तुम्हाला कोण्या सहकारी व्यक्तीसोबत नातेसंबंध प्रस्थापित करण्याची, किंवा सेक्स करण्याचीही परवानगी नव्हती

दुसरं म्हणजे जिमच्या लेखी तुम्ही एखादा नियम मोडला तर तुम्हाला बेछूट मारहाण व्हायची. त्याचीही एक पद्धत होती. एका बॉक्सिंग रिंगमध्ये त्या व्यक्तीला आणलं जायचं, आणि त्याच्यावर एखादा अतिशक्तिशाली माणूस सतत ठोशांचे प्रहार करायचा. ज्याला शिक्षा होतेय त्या माणसाने स्वतःचा बचाव करायचा नाही. फक्त मार खायचा कारण ही 'फादर' ची इच्छा आहे म्हणून.

ग्रेस स्टोन यांना पीपल्स टेंपलमध्ये जगणं अशक्य झालं होतं

फोटो स्रोत, BBC 4

फोटो कॅप्शन, ग्रेस स्टोन यांना पीपल्स टेंपलमध्ये जगणं अशक्य झालं होतं

तुम्ही एकदा पीपल्स टेंपलमध्ये आलात की तुम्हाला जायची परवानगी नव्हती. तो पंथ तुम्ही स्वखुशीने सरळ सोडू शकत नव्हता. जो सोडण्याची गोष्ट करेल त्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जायच्या.

त्याने आपल्या पीपल्स टेंपलच्या प्रत्येक सदस्याकडून कोऱ्या कागदावर सह्या करून घेतल्या होत्या. त्यावर काहीही लिहिलेलं असू शकायचं. मी चोर-लुटारू, बलात्कारी आहे इथपासून ते मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मारण्याचा कट केला इथपर्यंत.

यातला गर्भित इशारा स्पष्ट होता, तुम्ही इथून जाण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही तुमचं आयुष्य नरक बनवून टाकू.

ग्रेस स्टोन या जिमच्या भक्तापैकी एक होत्या, त्यांना जिमपासून एक मुलगाही झाला होता. पण त्यांना पीपल्स टेंपलचं आयुष्य नकोसं झालं होतं, आणि एक दिवस त्या तिथून पळून जाण्यात यशस्वी झाल्या. पण त्यांचा चार-पाच वर्षांचा मुलगा तिथेच राहिला.

या आधी तिथून पळालेल्या लोकांनी, आणि ग्रेस यांनीही मग माध्यमांना मुलाखती दिल्या. तिथे काय घडतंय हे लोकांसमोर आणलं. तो ज्या चमत्कारांनी लोकांना बरं करत होता, तेही खोटं असल्याचं सांगितलं.

लेस्ली बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, "ज्या बाईचा पाय तुटला होता, आणि जी जिमने हात लावताच उठून धावायला लागली. तिचा पाय मोडलेलाच नव्हता. या लोकांनी तिला ड्रग्स दिले आणि सांगितलं की तुझा पाय मोडलाय. तिचाही विश्वास बसला."

ज्या माध्यमांनी जिमला सेलिब्रिटी म्हणून डोक्यावर उचलून धरलं होतं तेच आता त्याच्या मागे हात धुवून लागले. ग्रेस यांनी मागणी केली माझा मुलगा मला परत आणून द्या.

जिमने त्याच्या भक्तांना तर सांगितलं की हा खोडसाळपणा आहे, त्यांना आपलं नव्या प्रकारचं जगणं सहन होत नाहीये, आपण त्यांच्या डोळ्यात खुपतोय म्हणून असे आरोप केले जात आहेत. त्याने आपल्यावर आत्मघाती हल्ला झाल्याचं नाटकही केलं.

लेस्ली यांचा नंतर जिमच्या चमत्कारावरून विश्वास उठला होता

फोटो स्रोत, BBC 4

फोटो कॅप्शन, लेस्ली यांचा नंतर जिमच्या चमत्कारावरून विश्वास उठला होता

'माझ्यावर गोळ्या झाडल्या गेल्या, शर्टाला दोन भोकं पडली आहेत पण मला साधं खरचटंलही नाही कारण मी देव आहे' असं त्याने लोकांना सांगितलं. भक्तांनी ते भक्तीभावे ऐकलंही

पण त्याला आतून कळून चुकलं होतं की समाजातल्या इतर लोकांमध्ये असलेल्या त्याच्या सेलिब्रिटी स्टेट्सला धक्का बसला आहे आणि आता त्याला जो राजकीय पाठिंबा मिळत होता तो मिळणार नाही.

आज ना उद्या पोलीस चर्चच्या दारात येणार घडणाऱ्या प्रकारांची चौकशी करायला. त्याने दुसरी योजना आखली.

अमेरिकेतून पलायन

जिमच्या हातातून सत्ता निसटत चालली होती आणि तो सैरभैर झाला. त्यात त्याला अनेक वर्षांपासून गोळ्यांच्या स्वरूपातलं ड्रग्सचं व्यसनही लागलं होतं. पण तरीही त्याने आपल्या भविष्याची तयारी करून ठेवली होती.

दक्षिण आफ्रिकेतला एक देश गुयाना. तिथल्या सरकारशी बोलणी करून प्रचंड मोठी जागा मिळवली. गर्द जंगलात ही जागा होती. गुयानाचे राजधानी जॉर्जटाऊन तिथून जवळपास 300 किलोमीटर लांब होती.

या गर्द जंगलातल्या जागेत त्याने नवं गाव वसवायचं ठरवलं आणि त्याला नाव दिलं जोन्सटाऊन. जॉर्जटाऊनहून इथे यायला दोनच रस्ते होते, एक म्हणजे तिथून खाजगी विमान घ्यायचं आणि जोन्सटाऊनपासून दहा किलोमीटरवर असलेल्या धावपट्टीवर उतरून यायचं.

नाहीतर जॉर्जटाऊनहून नदीत उलटा उगमाच्या दिशेने प्रवास करायचा. या प्रवासाला तब्बल 19 तास लागायचे. इथे आलेला माणूस त्याच्या परवानगीशिवाय कुठेच गेला नाही पाहिजे, पळण्याचा विचारही त्याचा मनात यायला नको, आणि मुख्य म्हणजे बाहेरून इथे कोणाचा हस्तक्षेप नको याची त्याने पुरेपूर काळजी घेतली.

मीडियाचं प्रेशर वाढत चाललं होतं. 1976-77 च्या सुमारास त्याने अमेरिकेतून इथे पलायन केलं. त्यानंतर पुढचे काही महिने हळूहळू त्याचे भक्तही इथे आले.

जोन्सटाऊनला येणाऱ्या लोकांना 19 तासांचा नदी प्रवास करून यावं लागायचं

फोटो स्रोत, BBC 4

फोटो कॅप्शन, जोन्सटाऊनला येणाऱ्या लोकांना 19 तासांचा नदी प्रवास करून यावं लागायचं

1977 पर्यंत इथे 1000 लोक येऊन पोचले होते. नेहमीप्रमाणे आधी सगळे खूश होते, पण नंतर त्यांना त्रास जाणवायला लागला. लोकांना पुरेसं अन्न नव्हतं, राहायला जागा नव्हती, जंगलात वणवे लागत होते, सततचा पाऊस आणि जिम या लोकांकडून ढोर मेहनत करून घेत होता.

लोक अर्धपोटी झोपत होते. त्यातल्या अनेकांना परत जावंस वाटू लागलं. जिमला आधीच याची कल्पना होती की काय जाणे, त्याने या लोकांचे पासपोर्ट जप्त केले होते आणि या लोकांकडे एक रुपयाही ठेवला नव्हता. जायचं असलं तरी परत जाणार कसे.

जिम कार्टर म्हणतात, "आम्हाला ओलीस ठेवलं आहे हे स्पष्टच होतं."

चौकशी समिती

जोन्सटाऊनमध्ये राहाणारे लोक आता दहशतीतच्या छायेत वावरत होते. तर तिकडे अमेरिकतल्या त्यांच्या नातेवाईकांना त्यांची चिंता वाटत होती की या लोकांची ख्यालीखुशाली कळत नाही.

ग्रेस स्टोन यांनी आपल्या मुलाच्या कस्टडीसाठी जिम जोन्सवर कोर्टात दावा ठोकला होता.

अशात कॅलिफोर्नियाचे कॉग्रेसमन लियो रायन यांनी जिम जोन्सवर चौकशी समिती बसवली आणि घोषणा केली ते माध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन जोन्सटाऊनला जाणार.

जिम जोन्सने आधी याची परवानगी दिलीच नाही.

जिम कार्टर म्हणतात, "एक दिवस, ऑगस्ट-सप्टेंबर 1978 चा काळ असेल, जिमच्या अत्यंत विश्वासू लोकांची त्याने बैठक बोलावली. आपला जोन्सटाऊनचा प्रयोग फसतोय हे त्यांना दिसत होतं, आता अमेरिकन सरकारही मागे लागलं होतं. मग इतिहासात आपलं नाव नोंदवलं जाईल असं आपण काय करावं हे त्याने सहकाऱ्यांना विचारलं."

"त्याच दिवशी संध्याकाळी त्याने जोन्सटाऊनमध्ये राहाणाऱ्या सगळ्या भक्तांना बोलावलं आणि म्हणाला, लोक आपल्याला सुखाने जगू देत नाहीत. पण आपल्याला आपलं नाव इतिहासात नोंदवायचं आहे. आपण सगळ्यांनी क्रांतिकारी सामुदायिक आत्महत्या करूया... बोला कोण कोण तयार आहे? फक्त तीन लोकांनी हात वर केला."

पण ही सामुदायिक आत्महत्येची गोष्ट त्याच्या मनात पक्की बसली होती. त्याने जोन्सटाऊनच्या लोकांची भाथीही भडकवली होती की हे लोक येणार आपल्या मुलांना आपल्यापासून दूर नेणार, त्यांचा छळ करणार. आपण आपल्या मुलांच्या रक्षणासाठी शस्त्र हातात घेतली पाहिजेत.

ग्रेस स्टोन यांचा मुलगा जॉन

फोटो स्रोत, BBC 4

फोटो कॅप्शन, ग्रेस स्टोन यांचा मुलगा जॉन

व्हर्नन म्हणतात, त्याच्याकडे बंदूकांसारखी शस्त्र होतीच.

लियो रायन यायच्या आधी जोन्सटाऊनमधल्या वातावरणात तणाव वाढला होता. लोकांना बाहेर पडायचं होतं, येणाऱ्या शिष्टमंडळाला आपली खरी परिस्थिती सांगायची होती, पण कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नव्हतं.

तरी लेस्ली, व्हर्नन, जिम कार्टर यांनी मनाशी पक्कं ठरवलं की काहीही झालं तरी आपण आपल्या मुलाबाळांना घेऊन इथून निघायचं.

तो दिवस...

काँग्रेसमन लिओ रायन यांचं शिष्टमंडळ आलं तेव्हा सगळं किती छान असा एक कार्यक्रम झाला. जोन्सटाऊनची शेती, तिथलं स्वयंपाकघर, जेवणघर, लोकांचा नाच-गाण्याचा कार्यक्रम सगळं दाखवलं गेलं.

लिओही आपल्या भाषणात म्हणाले की इथली लोक इतकी आनंदी आहेत की त्यांना आपल्या मनाविरुद्ध इथे ठेवलं असेल असं वाटत नाही. टाळ्यांचा कडकडाट झाला.

याच कडकडाटातच व्हर्नन यांनी एक चिठ्ठी लिओ यांच्या हातात देण्यासाठी एका पत्रकाराकडे दिली. त्यांनी ती चिठ्ठी लिहिली. त्यात लेस्ली आणि व्हर्ननचं नाव होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की आमची इथून सुटका करा.

दुसऱ्या दिवशी परत वातावरण बदललं. 18 नोव्हेंबर 1978 च्या सकाळी लिओ रायन यांनी तिथल्या लोकांना विचारलं की कोणाकोणाला परत यायचं आहे. एक,दोन, तीन करत करत जवळपास वीस लोकांनी म्हटलं की आम्हाला परत यायचं आहे.

त्याच दिवशी सकाळी लेस्ली यांनी आपल्या बाळाला पाठीवर बांधलं, आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह जंगलातून चालू लागल्या होत्या. 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या खेड्यात जाऊन पुढे पाहू असा त्यांचा विचार होता. पण त्यांना सतत भीती होती की कुठूनही जिमच्या निष्ठावंतांची गोळी येईल आणि आपल्या शरीराचा वेध घेईल.

मागे वस्तीवर भलतंच घडत होतं. जिम दातओठ खात होता, लोक निघून चालले होते. तेवढ्यात त्याच्या एका विश्वासू सहकाऱ्याने लियो रायन यांच्यावर चाकूने हल्ला केला पण बाकीच्यांनी हल्ला मोडून काढला. लिओ वाचले पण त्यांना धक्का बसला.

जिम जोन्स या माणसाची ताकद इतकी जास्त होती की हा माणूस अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये निवडून गेलेल्या सदस्याला मीडियासमोर जीव मारण्याचा प्रयत्न करू शकतो? कुठल्याही क्षणी दंगल होईल अशी परिस्थिती निर्माण झाली.

तेवढ्यात दोन बस आल्या, लिओ रायन यांचं शिष्टमंडळ आणि जोन्सटाऊनमधून निघणारे लोकांना घेऊन, यात व्हर्ननही होते, 10 किलोमीटर लांब असणाऱ्या धावपट्टीकडे निघाल्या.

तिथे या लोकांना घ्यायला दोन छोटी विमानं येणार होती जी त्यांना गुयानाच्या राजधानीत घेऊन जाणार होती. तिथून ते अमेरिकेला परत जाणार होते.

हे लोक पोचून दहा मिनिटं झाले असतील नसतील, मागून एका ट्रॅक्टरमध्ये जिमचे समर्थक आले. व्हर्ननच्या लक्षात आलं काहीतरी होणार, त्यांनी लिओ रायन यांना हाक मारण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात गोळीबाराचा आवाज सुरू झाला.

सगळीकडून गोळ्या झाडल्या जात होत्या. लिओ रायन, सोबत आलेले पत्रकार यांच्यासह पाच लोकांना मृत्यू झाला. व्हर्नन गोस्लीच्या पायात आणि पोटात गोळ्या घुसल्या होत्या. सोबतचे अनेक जण खाली पडले होते आणि काही जण शेजारच्या गवतात पळून गेले.

काऊंटडाऊन सुरू झाला होता...

गोळीबार करून हे समर्थक परतले तेव्हा जिमच्या चेहऱ्यावर एक अजब आनंद दिसत होता असं जिम कार्टर म्हणतात. त्यांनी लाऊडस्पीकरवरून जोन्सटाऊनमधल्या सगळ्या रहिवाशांना बोलावलं आणि आपल्या भाषणाची सुरूवात केली.

"माझ्या मुलांनो, मी तुम्हाला सगळं द्यायचा प्रयत्न केलाय... पण तरीही काही लोकांनी मला बट्टा लावला, मी तुमचा देवदूत आहे. आणि जर हे लोक आपल्याला सुखाने जगू देत नसतील तर आपण एकत्र सुखाने मरूया आणि या लोकांना दाखवून देऊया."

हे भाषण त्याने रेकॉर्ड केलं होतं त्यामुळे घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांच्या हाती लागलं आणि नंतर डेथटेप म्हणून प्रसिद्ध झालं.

हेच ते सरबताचे ग्लास ज्यात सायनाईड मिसळलं होतं

फोटो स्रोत, BBC 4

फोटो कॅप्शन, हेच ते सरबताचे ग्लास ज्यात सायनाईड मिसळलं होतं

लोकांच्या चहूबाजूंनी बंदुका हातात घेतलेले गार्ड होते. सरबताच्या मोठ्या बादलीत सायनाईड मिसळलं गेलं. पण आधी नंबर लहान मुलांचा होता.

अगदी बाळांना सायनाईडचे इंजेक्शन्स दिले गेले. आईबापांसमोर पोटच्या मुलांनी प्राण सोडला. जिम कार्टर म्हणतात, लहान मुलांना आधी मारलं म्हणजे त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या पालकांनी उठाव करू नये आणि त्यांचीही जगण्याची इच्छा मरून जावी.

"जग म्हणत या लोकांनी आत्महत्या केली. पण तसं नाहीये, नंतर कित्येकांच्या हातांवर, कपाळावर, पोटात, गालावर इंजेक्शनच्या खुणा दिसल्या, या लोकांनी विषाचा प्याला स्वखुशीने तोंडाला लावला नाही. त्यांना जबरदस्ती सायनाईड दिलं गेलं. आणि एकतर बंदुकीची गोळी खाऊन मरा किंवा विष प्या असे दोनच पर्याय असताना ज्यांनी विष प्यायलं त्यांनी आत्महत्या केली असं कसं म्हणाल तुम्ही."

जिम कार्टर तिथेच होते, पण त्यांच्या हातात विषाचा प्याला आला नाही. एका बाईने त्यांना आणि अजून दोघांना बाजूला नेलं आणि म्हणाली की जिमने तुमच्यासाठी काम दिलंय. या पैशाने भरलेल्या तीन बॅगा गुयानाच्या रशियन दुतावासात नेऊन द्या. या बंदुका घ्या. काहीही झालं तर तुम्ही जिवंत कोणाच्या हाती लागणार हे पहा.

तो क्षण आठवताना जिम यांना रडू आवरत नाही. त्याच्या दोनच मिनिटं आधी त्यांनी आपल्या बायकोचा आणि मुलाचा तडफडून झालेला मृत्यू पाहिला होता.

जिम कार्टर आपल्या मरणाची वाट पहात बसले होते

फोटो स्रोत, BBC 4

फोटो कॅप्शन, जिम कार्टर आपल्या मरणाची वाट पहात बसले होते

"मला सुधरत नव्हतं काय करावं. माझ्या हातात बॅग दिली आणि मी चालायला लागलो. जंगलात गेल्यावर ती बॅग बाजूला ठेवली आणि मला मरण कधी येईल याची वाट बघत बसलो. ते आलं नाही, गुयानाच्या सैन्याने मला तिथून हलवलं."

व्हर्नन, धावपट्टीवर जखमी पडलेली माणसं, विषप्रयोगातून नजर चुकवून शेजारच्या जंगलात पळालेली मोजकी माणसं आणि त्या दिवशी सकाळी आपल्या मुलासह जंगलात पळून गेलेल्या लेस्ली या सगळ्यांना गुयानीज सैन्याने वाचवलं.

जिम जोन्सची मुलं गुयानाची राजधानी जॉर्जटाऊनमध्ये होती, त्यामुळे ती वाचली.

पण जोन्सटाऊनमधली 918 माणसं इतकी सुदैवी नव्हती. त्यांना कोणी वाचवू शकलं नाही. यात 300 लहान मुलं होती. ग्रेस स्टोन यांच्या मुलाला जिम जोन्सने स्वतःच्या डोळ्यासमोर सायनाईडचं इंजेक्शन देऊन घेतलं. व्हर्नन यांचाही मुलगा मारला गेला.

त्यांचा 'फादर' असण्याचा दावा करणाऱ्या माणसाने मात्र विष घेतलं नव्हतं.

पोलिसांना त्याच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडलेली दिसली. एवढ्या लोकांना मारूनही या माथेफिरू माणसाने पळून जायचा प्रयत्न केला, म्हणून चिडून एखाद्या गार्डने त्याच्या डोक्यात गोळी मारली की त्याने स्वतःच मारून घेतली हे गूढ कधी उलगडलं नाही.

जिम जोन्सने आत्महत्या केली की त्याची कोणीतरी हत्या केली हे गुढ उलगडू शकलं नाही

फोटो स्रोत, BBC 4

फोटो कॅप्शन, जिम जोन्सने आत्महत्या केली की त्याची कोणीतरी हत्या केली हे गुढ उलगडू शकलं नाही

त्याची बायको मार्सेलिन, त्याची तिथे असणारी मुलं मरून पडली होती.

तिथे पोचलेल्या सैनिकांनी अमेरिकन अधिकाऱ्यांशी बोलताना म्हटलं होतं, "इथे मृतदेहांचा खच पडलाय, खरोखर खच!"

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त