बुराडी प्रकरण : मृत व्यक्तीच्या मनात काय हे जाणून घेता येतं?

बुराडी प्रकरण

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, भूमिका राय
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

उत्तर दिल्लीतल्या संत नगर, बुराडी या भागात रविवारी एकाच कुटुंबातल्या 11 जणांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. पाच दिवस झाले तरी या प्रकरणाचा उलगडा झालेला नाही.

पोलीस या प्रकरणाचा हत्या आणि आत्महत्या अशा दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत. या संशयास्पद मृत्यूंचा तंत्र-मंत्र, अघोरी विद्या यांच्याशीही संबंध लावला जात आहे. घरात सापडलेल्या डायरीत मोक्षाबद्दलचे उल्लेख आहेत.

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते एक धार्मिक प्रवृत्तीचं कुटुंब होतं. त्याचवेळी घरात अशा काही गोष्टी मिळाल्या की त्यातून आत्महत्येचा संशय बळावतो. परंतु नातेवाईकांना मात्र तसं वाटत नाही. त्यांना ही हत्याच वाटते आहे.

थोडक्यात, अजूनतरी या सगळ्यातून काहीच स्पष्ट झालेलं नाही.

मृतदेहांचं शवविच्छेदन झालं आहे आणि अहवाल काही काळातच अपेक्षित आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते हे जर आत्महत्येचं प्रकरण असेल तर मग सायकॉलॉजिकल ऑटॉप्सी (म्हणजेच मृत व्यक्तीच्या मनोवस्थेचा अभ्यास/तपास) करून मृत्यूच्या कारणांचा शोध घेता येऊ शकतो. बहुचर्चित सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणात सायकॉलॉजिकल ऑटॉप्सीची मदत घेऊन मृत्यूच्या कारणांचा तपास करण्यात आला.

कशी करतात सायकॉलॉजिकल ऑटॉप्सी?

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर सायकॉलॉजिकल ऑटॉप्सी करण्यात आली. आता प्रश्न असा उपस्थित होतो की जी व्यक्ती मरण पावली आहे तिचं मन कसं वाचता येईल?

बुराडी प्रकरण
फोटो कॅप्शन, घराच्या बाहेरच्या भिंतीवर अशा प्रकारे 11 पाईप आहेत.

सायकॉलॉजिकल ऑटॉप्सीमध्ये मृत व्यक्तीशी निगडित वस्तूंचा अभ्यास केला जातो. त्यात, मृत्यूच्या तारखेच्या आसपासच्या व्यक्तीच्या वर्तनातला बदल समजून घेतला जातो.

एम्समधून निवृत्त झालेले मनोविकारतज्ज्ञ प्रा. मंजू मेहता म्हणतात की, आत्महत्येच्या प्रकरणात सायकॉलॉजिकल ऑटॉप्सीची मदत उपयोगी ठरू शकते.

"सायकॉलॉजिकल ऑटॉप्सीमध्ये मृत व्यक्तीची पार्श्वभूमी तपासली जाते. मृत्यूच्या आधी त्याचं वर्तन कसं होतं, मृत्यूपूर्वी त्यांनी कोणाशी काय बोलणं केलं होतं, या सर्व आधारावर, मृत व्यक्तीची मनोवस्था समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो."

बुराडीच्या संदर्भात त्या म्हणाल्या की, या प्रकरणात सायकॉलॉजिकल ऑटॉप्सीचा उपयोग होऊ शकतो कारण पोलिसांना तिथं एक टिपण आणि डायरीही मिळाली आहे.

अर्थात, सायकॉलॉजिकल ऑटॉप्सीद्वारे मृत्यूचं कारण समजण्याची शक्यता 50-50 टक्के असते. परंतु, मृत व्यक्ती काही लिखित गोष्टी ठेवून गेली असेल तर शक्यता वाढते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मंजू मेहता म्हणतात की, "भारतात आतापर्यंत बऱ्याच प्रकरणात सायकॉलॉजिकल ऑटॉप्सीची मदत घेतली गेली आहे. तसंच त्यापैकी काही प्रकरणांचा छडा लावण्यात यशही आलं आहे. "

कशी होते मदत?

बुराडीच्या प्रकरणाबद्दल, मंजू म्हणतात, "मी त्या लोकांबद्दल वाचलं. त्यातल्या एका मुलीचं लग्न होणार होतं. त्यामुळे ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलत असावी. ती काय बोलत होती, मृत्यूच्या आधी काय बोलणं झालं होतं? यापैकी काही कळलं तरी नेमकं काय घडलं आहे हे समजून घेण्यास मदत होऊ शकेल."

AIMSमधले मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनिल यादव म्हणतात की, जर हे प्रकरण आत्महत्येचं असेल तर सायकॉलॉजिकल ऑटॉप्सीची नक्कीच मदत होईल.

"ही एक अशी प्रक्रिया आहे की त्यात आत्महत्येचं कारण समजून घेण्यास मदत होते. यात मृत व्यक्तीशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला जातो. त्यांचे डॉक्टर, त्यांचे वैद्यकीय अहवाल यांची मदत घेतली जाते. या सर्व माहितीवर आधारित त्या व्यक्तिच्या मानसिकतेचा अंदाज घेतला जातो."

बुराडी प्रकरण
फोटो कॅप्शन, केवळ कुत्रा जिवंत होता.

पण, एवढ्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झाल्या असतील तर अशा प्रकरणातही सायकॉलॉजिकल ऑटॉप्सीचा उपयोग होईल?

डॉक्टर अनिल म्हणतात, याही प्रकरणात सायकॉलॉजिकल ऑटॉप्सीचा उपयोग होईल.

"जर हे प्रकरण आत्महत्येचं असेल तर त्याचाही छडा लावता येईल. परंतु या प्रकरणात असं सांगितलं जातं आहे की त्या लोकांचं वागणं फारच सामान्य होतं. सर्वच मानसिक विकार दिसत नाहीत. कदाचित ते मानसिक आजाराचा सामना करत असतील पण त्यांनी कधी ते उघडपणे दाखवलंही नसेल."

इतर देशात काय स्थिती...

द ब्रिटिश जनरल ऑफ सायकिएट्रीच्या मते, गेल्या दोन दशकांत, ब्रिटनसह इतर देशांमध्ये आत्महत्यांची प्रकरण वाढली आहेत. या प्रकरणांत आत्महत्येची कारणं जाणून घेण्यास सायकॉलॉजिकल ऑटॉप्सीची मदत घेण्यात आली. त्यात असं दिसलं की, बहुतेक आत्महत्या या बेकारी, एकाकीपणा, मानसिक विकार आणि व्यसन यांच्यामुळे झाल्या आहेत.

बुराडी प्रकरण

फोटो स्रोत, Reuters

त्याशिवाय, सायन्स डायरेक्टमध्ये प्रकाशित झालेल्या जनरल ऑफ इफेक्टिव्ह डिसॉर्डरच्या अहवालानुसार, इस्रायली लष्करानंही सायकॉलॉजिकल ऑटॉप्सीची मदत घेतली होती. 2009 ते 2013 या काळात 18 ते 21 वर्षे वयोगटातल्या 69 सैनिकांनी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूंचं कारण जाणून घेण्यासाठी सायकॉलॉजिकल ऑटॉप्सीची मदत घेण्यात आली.

बुराडीतल्या प्रकरणात त्या आत्महत्याच असल्याचं स्पष्ट झालं तर सायकॉलॉजिकल ऑटॉप्सीच्या मदतीनं कारणं जाणून घेण्याची शक्यता दाट वाटते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)