तुमच्या मेंदूचा बॅकअपही घेता येईल, पण...

फोटो स्रोत, Getty Images
मोबाईल, कंप्युटर, लॅपटॉप यांचा बॅकअप घेण हे काम अगदी चुटकीसरशी करता येतं. पण मेंदूचा बॅकअप घेता येईल का? समजा असं झालचं तर असा बॅकअप घेऊन मेंदूतील स्मृती पुन्हा जाग्या करता येतील का? आणि या सर्वांचं मोल काय असेल?
मेंदूचा बॅकअप घेण्याची ही कल्पना स्वप्नरंजन वाटू शकते, पण अमेरिकेतील एक कंपनी यावर खरोखरचं संशोधन करत आहे.
मृत व्यक्तीच्या मेंदूतले विचार आणि त्याच्या आठवणी काय होत्या याची पूर्ण माहिती आपल्या हाती लागू शकेल, असं या कंपनीचं म्हणणं आहे.
"एकेदिवशी तुम्हाला तुमच्या मेंदूचं बॅकअप घेता येईल पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवाचं मोल द्यावं लागेल," असा दावा या स्टार्टअपने केला आहे.
"आम्ही असं तंत्रज्ञान विकसित करू ज्याद्वारे मेंदूचं बॅकअप घेता येईल आणि मेंदू पूर्ण स्कॅन करता येईल," असं नेटकम या कंपनीनं म्हटलं आहे.
"असं असलं तरी हे संशोधन प्राणघातक आहे. यामुळे जीव जाण्याचा धोका आहे," असं मत MIT Technology Reviewने दिलं आहे.
नेटकममध्ये Y Combinator या संस्थेनं गुंतवणूक केली आहे. ही संस्था नवीन संस्थांना संशोधनासाठी पैसे पुरवण्याचं काम करते. या आधी Y Combinatorने Dropbox आणि AirBnB या कंपन्यांना अर्थसाहाय्य केलं आहे.
एकेदिवशी मेंदूतील सर्व रचना आणि मज्जातंतूचं जाळं आपल्याला अभ्यासता येईल. हा अभ्यास इतक्या सविस्तररीत्या करता येईल की तुमच्या मेंदूत काय विचार होते याचा शोध घेता येईल. म्हणजेच पूर्ण मेंदूचं बॅकअप तुम्हाला घेता येईल. मृत्यूनंतर आपल्याला त्या व्यक्तीच्या डोक्यात काय होतं याचा तपास लागेल असं नेटकमने म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या नेटकमला अमेरिकेच्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्थेकडून अंदाजे 60 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. "नेटकमला अर्थसाहाय्य करणं हे व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल," असं त्यांनी म्हटलं आहे.
"हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी नेटकमनं कायदेशीर बाबींचा विचार केला आहे. कॅलिफोर्नियामध्ये 'सन्मानपूर्वक' मृत्यूसंदर्भात काय कायदे आहेत याबाबत नेटकमने वकिलांकडे विचारणा केली आहे," असा दावा MITने केला आहे. दुर्धर रोगांनी पछाडलेल्या लोकांवर हा प्रयोग करून पाहण्याचा त्यांचा विचार आहे.
'एमबामिंग' या पद्धतीचा वापर करून मेंदू सांभाळून ठेवला जातो. या पद्धतीचा वापर करून सशाचा मेंदू त्यांनी सांभाळून ठेवला. त्यांच्या या संशोधनाला एक पुरस्कार देखील मिळाला आहे.
"नुकताच आम्ही पोर्टलॅंडमधील एका महिलाचा मेंदू सांभाळून ठेवला आहे. मृत्यूनंतर थोडा जरी वेळ वाया गेला तर त्या व्यक्तीचा मेंदू सांभाळून ठेवता येत नाही," असं नेटकमचं म्हणणं आहे.
त्यामुळे जर कुणी इच्छामरण घेणार असेल तर त्या व्यक्तीचा मेंदू आपल्याला सांभाळून ठेवणं सोपं जाईल, असं कंपनीनं सांगितलं.
आठवणींचं काय?
मृत्यूनंतर मेंदूतील आठवणी पुन्हा जाग्या करता येतील असं संशोधन अद्याप विकसित झालं नाही पण मृत्यू येण्यापूर्वी काही काळ आपल्या मेंदूत काय विचार होते यावर संशोधन सुरू आहे.
मृत्यूनंतर मेंदूतील विचारांचं आणि आठवणीचं जतन करता येतील हा दावा अतिशयोक्तीपूर्ण आहे, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. तसंच, मानवाच्या अमरत्वासाठी प्रयत्न करणं हा गेल्या काही काळामध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये तयार झालेला एक ट्रेंड आहे असंही त्यांचं म्हणणं आहे.
क्रायोनिक प्रिझर्व्हेशनच्या साहाय्याने काही कंपन्या मानवी शरीराचे जतन करत आहेत. भविष्यात जेव्हा पुनर्जिवित होण्याचं तंत्रज्ञान विकसित होईल तेव्हा तुम्हाला पुन्हा जिवंत होता येईल, असा या मागचा उद्देश आहे. अर्थात अद्याप ते तंत्रज्ञान विकसित झालेलं नाही.
तसंच नेटकमचा हा प्रयोग करण्यामागे नेमका उद्देश काय याबाबत स्पष्टता नाही.
6.5 लाख रुपये देऊन तुम्ही तुमच्या मेंदूचं जतन नेटकममध्ये करू शकता. MIT Technology Reviewनुसार, आतापर्यंत 25 लोकांनी त्यांच्या मेंदूचं जतन केलं आहे.
क्रायोनिक सर्व्हिस आणि नेटकममध्ये एक मूलभूत फरक आहे. तो म्हणजे नेटकम त्या लोकांना जिवंत करण्याचा प्रयत्न करणार नाही.
जेव्हा एखादा वृद्ध व्यक्ती मरण पावतो, तेव्हा त्याच्यासोबत त्या व्यक्तीजवळ असलेलं शहाणपणही नष्ट होतं. एखाद्या व्यक्तीजवळ असलेली माहिती जतन करू ठेऊ शकतो पण ते शहाणपण कसं करणार? असा प्रश्न नेटकमचे सह-संस्थापक रॉबर्ट मॅकलिनटायर विचारतात.
पुढं ते म्हणतात, दुसऱ्या पिढीला ती माहिती देता येणं सोपं आहे पण त्या व्यक्तीचं शहाणपण देता येणं कठीण आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








