नवी दिल्ली : एकाच कुटुंबातल्या 11 जणांनी घेतली फाशी; आत्महत्या की हत्या?

- Author, मोहम्मद शाहीद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
उत्तर दिल्लीतल्या संत नगर बुराडी भागातल्या गल्ली क्रमांक 4ए मध्ये शिरताच उजव्या बाजूला दोन प्लॉट सोडून एक तीन मजली घर आहे. तिथे आता एक फक्त एक पाळीव कुत्रा जिवंत आहे.
त्या घरातले सर्वच्या सर्व 11 जण रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळले. त्यांची तोंडं कापडाने झाकली होती आणि काही जणांचे हात बांधलेले होते.
भाटिया कुटुंबीयांचं घर म्हणून ही वास्तू ओळखली जाते. याच घरात 10 लोक तावदांनाना लटकलेले दिसले. तर एक वृद्धा फरशीवर मृतावस्थेत होती. मृतांमध्ये सात महिला आणि चार पुरुष आहेत. त्यांच्यात तिघंजण अल्पवयीन होते. हे कुटुंब मूळ राजस्थानातलं आहे. गेल्या 20 वर्षांपासून ते बुराडी भागात वास्तव्याला होते.
अंदाजे 75 वर्षीय महिला नारायण, त्यांची दोन मुलं भुप्पी (46) आणि ललित (42) त्यांच्या पत्नी सविता (42) आणि टीना (38) गळफास लावलेल्या अवस्थेत दिसत होत्या. भुप्पी यांच्या दोन तरुण मुली आणि एक अल्पवयीन मुलगा तसंच ललित यांचा 12 वर्षांचा मुलगाही मृतावस्थेत होते.
या 11 लोकांमध्ये नारायण यांची एक विधवा मुलगी आणि तिची मुलगी (म्हणजे नारायण यांची नात) प्रियंका (30) यांचाही समावेश आहे. प्रियंका यांचा 17 जूनला साखरपुडा झाला होता आणि ऑगस्टमध्ये त्यांचं लग्न नियोजित होतं.
सेंट्रल रेंजचे पोलीस सहआयुक्त राजेश खुराणा यांनी सांगितलं की, "सध्या काहीही सांगणं अवघड आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पण हत्या की आत्महत्या याबाबत आताच काहीही सांगता येणार नाही."
घटनेची माहिती मिळाली कशी?
या घरात तळमजल्यावर दोन दुकानं आहेत. एक किराणा सामानाचं दुकान आहे. भुप्पी हे दुकान चालवायचे आणि दुसरं दुकान प्लायवूडचं होतं. ते दुकान ललित बघायचे.
इतक्या लोकांना मृतावस्थेत पहिल्यांदा त्यांचे शेजारी गुरचरण सिंग यांनी पाहिलं. गुरचरण सिंग यांनी सांगितलं की, त्यांची पत्नी भाटिया यांच्या दुकानात नेहमीप्रमाणे सकाळी दूध आणायला गेली होती. पण सात वाजले तरी दुकान बंद होतं म्हणून तिनं मला चौकशी करायला जायला सांगितलं.

गुरचरण तिथल्या परिस्थितीबद्दल सांगताना म्हणाले की, "मी गेलो तेव्हा सगळे दरवाजे उघडेच होते आणि सगळ्यांचे मृतदेह तावदानाला लटकलेले होते. त्यांचे हात बांधलेले होते. इतक्या लोकांना असं लटकलेलं पाहून मी हादरलो. घरी येऊन मी जेव्हा पत्नीला सांगितलं तेव्हा ती तिथे जायला लागली, पण मी तिला थांबवलं."
त्यानंतर गुरचरण यांनी शेजारी राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला बोलावलं. त्यांनी सकाळी 7.30 वा. कंट्रोल रुमला फोन केला.
गुरचरण सांगतात की, ते कुटुंब इतकं चांगलं होतं की त्यांच्या दुकानातून सामान घेतल्यानंतर पैसेही नंतर द्यायला सांगायचे.
या कुटुंबाचे निकटवर्तीय नवनीत बात्रा सांगतात की, हे कुटुंब अतिशय चांगलं होतं. ते कायम पूजापाठ करत असायचे. ते सांगतात की त्यांचं कुटुंब रोज एकत्र पूजा करत असत.
बत्रा सांगतात की, नारायण यांची एक विवाहित मुलगी पानिपतला आणि त्यांचा एक मोठा मुलगा राजस्थानमध्ये राहतो.
धार्मिक होतं कुटुंब
आऊटर रिंगरोडला लागून असलेला बुराडी परिसर आधी एक गाव होतं. पण दिल्लीच्या वाढती लोकसंख्येमुळे बुराडी भागात युपी, बिहार आणि उत्तराखंडातील अनेक लोक येऊन स्थायिक झाले.
या भागात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक युवक राहतात. त्या कुटुंबाच्या समोरच्या घरात एक लायब्ररीसुद्धा आहे.
एक दुसरे शेजारी टी.पी.शर्मा म्हणाले, "या कुटुंबाचं कुणाबरोबरही शत्रुत्व नव्हतं."
शर्मा सांगतात की, "हे कुटुंब इतकं चांगलं होतं की या घटनेमुळे सगळेच दु:खी आहेत. त्यांनी आसपासची सगळी दुकानं बंद ठेवली होती. त्यांना आम्ही कुणाशीही भांडताना बघितलं नाही. भुप्पी यांनी आपल्या भाचीचा साखरपुडासुद्धा केला होता. घरी सगळं ठीक होतं. त्यांच्यात कोणताही कौटुंबिक वाद नव्हते."

गल्लीच्या बाहेर ठेला असलेले मोहम्मद युनूस सांगतात की, त्यांची नातवंडं भाटियांकडे ट्युशनला जायची. भुप्पी यांच्या दोन्ही मुली ट्युशन घेत असत.
युनूस सांगतात, "मी जेव्हा माझ्या नातींना सोडायला जायचो तेव्हा मला कायमच चांगली वागणूक मिळाली. घराकडे बघून कधी असं वाटलं नाही की त्यांना काही समस्या असतील."
हे कुटुंब धार्मिक असल्याचं सांगण्यात येतं. या परिसरात एक पुजारी मूलचंद शर्मा सांगतात की, त्यांचा या घराशी परिचय होता. ते एक संपन्न कुटुंब होतं.
ते म्हणतात, "काल रात्रीच माझी भुप्पीशी भेट झाली. मी त्यांच्याकडून प्लायवूडचं सामानही मागवलं होतं आणि सकाळी मला सामान देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं."
आत्महत्या की हत्या?
आणखी एक शेजारी सीमा सांगतात की हे कुटुंब सत्संगाला जात होतं आणि धार्मिक कार्यात पुढे असायचं.
त्या सांगतात, "किराणाच्या दुकानाच्या बाहेर हे कुटुंब कायम एक सुविचार लिहायचं. त्यांच्या कुटुंबातला सदस्य हा सुविचार लिहायचा. इतक्या चांगल्या विचारांचे लोक आत्महत्या कशी करू शकतात?"
सीमा सांगतात की हे कुटुंब संपन्न होतं आणि त्यांची मुलं सुशिक्षित होती. त्यामुळे या घटनेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. शेजाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते असंही सीमा सांगतात.

एवढ्या मोठ्या घडामोडीमुळे अनेक नेते घटनास्थळाला भेट देत आहेत. आधी या भागातले आमदार संजीव झा घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर खासदार मनोज तिवारी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही पोहोचले.
केजरीवाल यांनी सोनीपतहून आलेल्या नारायण यांच्या मुलीशी बातचीत केली. त्यांच्या मते सगळं कुटुंब सुखात होतं, लग्नाची तयारीही सुरू होती. मग हे कसं झालं त्यांनाही कळलं नाही.
केजरीवाल आणि तिवारी यांनी पोलिसांचा अहवाल येईपर्यंत वाट पाहण्यास सांगितलं आहे. आधीच अंदाज बांधणं योग्य होणार नाही असं दोघांचंही मत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
दुसऱ्या बाजूला पोलिसांनी हत्येची शक्यता नाकारलेली नाही. सगळे मृतदेह शवविच्छेदनासाठी सब्जी मंडी शवागारात पाठवण्यात आले आहेत.
या 11 लोकांच्या मृत्यूचं रहस्य शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या चौकशीनंतरच कळेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








