औरंगाबाद : दंगल हिंदू-मुस्लीम वादातून झाली का?

फोटो स्रोत, Ameya pathak/bbc
- Author, निरंजन छानवाल आणि अमेय पाठक
- Role, बीबीसी मराठी
औरंगाबादच्या शाहगंज भागात शुक्रवारी रात्री दंगल उसळली. सुरेश बन्सिले यांच्या घरासमोर दगडफेक सुरू झाली. काय होतंय ते त्यांना कळत नव्हतं. पण आता इथं कुटुंबाला ठेवणं सुरक्षित नाही, असं त्यांना वाटलं. घरातल्या सगळ्यांना घेऊन मामाच्या घरी रातोरात जाण्याचा निर्णय त्यांनी ताबडतोब घेतला.
घरातल्या महिला आणि मुलांना घेऊन ते निघाले. वडील जगनलाल बन्सिले विकलांग असल्यामुळे ते घरीच थांबले. त्यांना नेण्यासाठी सुरेश दुसरी फेरी मारणार होते. मामाकडे पोहोचताच त्यांना फोन आला की त्यांच्या घराला आग लागली आहे.
त्यांचं घर पेटवण्यात आलं तेव्हा 62 वर्षांचे जगनलाल घरी एकटे होते. त्यांचा होरपळून मृत्यू झाला. "घर पेटलं आहे अशी माहिती मिळताच मी धावत आलो. पण तोपर्यंत सगळं संपेलेलं होतं," सुरेश यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
बन्सिलेंच्या घरापासून थोड्याच अंतरावर चौराहा परिसरात एक आई काळजीत पडली होती. "रात्री 11चा सुमार असेल. बाहेर गडबड सुरू होती. माझा धाकटा चुलत भाऊ घरात नव्हता. त्याला शोधायला काकूनं मोठ्या चुलत भावाला (अब्दुलला) पाठवलं. तोही आला नाही म्हणून मग काकूनं मला जायला सांगितलं. मी जमावाच्या दिशेने गेलो तर अब्दुल जखमी झाला होता," असं समी कादरी यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, BBC/Ameya Pathak
अब्दुल हारिस कादरी या अवघ्या 17 वर्षांच्या तरुणाचा किडनीला प्लास्टिक बुलेट लागून मृत्यू झाला. दंगल नियंत्रणात आणण्यासाठी जमावाला पांगवण्यासठी पोलिसांना प्लॅस्टिकच्या गोळ्या माराव्या लागल्या. त्यातली एक नेमकी अब्दुलच्या कमरेवर लागली.
अब्दुलच्या वडिलांचा सायकलच्या खरेदी विक्रीचा धंदा आहे. तीन मुलांमध्ये तो सर्वांत मोठा. गेल्याच वर्षी तो दहावी पास झाला. मुलानं शिकून डॉक्टर व्हावं अशी आई-वडिलांची इच्छा होती. पण ती आता अपुरी राहणार.
बन्सिले यांच्या घराबाहेरच आम्हाला रमेश कोटले भेटले. 52 वर्षीय कोटले 35 वर्षांपासून तिथं चहा विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांनी सांगितलं की अशी दंगल त्यांनी कधी पाहिली नव्हती. "हा शहरातला संवेदनशील भाग असल्यामुळे अनेक वेळा दुकान बंद करावं लागलं. पण कधी जाळपोळ नव्हती. रात्री मी घरी गेलो आणि सकाळी आलो तर तिथं राख होती."
त्यांचंही दुकान शुक्रवारच्या दंगलीत जळलं आहे.
शक्यता १ - लच्छू पेहलवान विरुद्ध इर्फान शेख
आंबे विकत घेण्याच्या वादावरून दंगल पेटली असं म्हटलं तर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण या आंब्यांच्या मागे मोठा इतिहास आहे.
शहागंज परिसरातल्या इर्फान शेख नावाच्या आंबा विक्रेत्याकडून गांधी नगर परिसरातल्या व्यक्तीने आंबे विकत घेतले. ते खराब निघाले आणि ते आता इर्फान परत घेत नाहीये, अशी तक्रार या गिऱ्हाइकाने लच्छू पेहलवान यांच्याकडे केली.
लच्छू पेहलवान यांचं खरं नाव लक्ष्मीनारायण बखोडिया. ते शिवसेनेशी संबंधित असून त्यांची मुलगी यशस्वी बखोडिया शिवसेनेची नगरसेविका आहे.
लच्छू पेहलवान आपल्या काही सहकाऱ्यांसह शहागंजमध्ये गेले आणि तिथे त्यांच्यात आणि आंबा विक्रेत्यांमध्ये बाचाबाची झाली.
मग MIMचे नगरसेवक सय्यद शेख यांनी इर्फान शेख आणि इतर आंबा विक्रेत्यांची बाजू घेतली आणि ते पोलिसांत लच्छू पेहलवान यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी गेले.
आपल्यामुळे दंगल पेटली हा आरोप लच्छू पेहलवान यांनी फेटाळून लावला आहे. गरज पडल्यास आपली पोलीस चौकशी करावी. फोन कॉलही चेक करावे असं त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. आपल्या बाबतीत झालेला वाद आंब्यांच्या खरेदीवरून झाला. तेव्हा झालेल्या वादावादीतून आजूबाजूचे लोक गोळा झाले होते, असं पेहलवान यांनी म्हटलं.
आम्ही औरंगाबाद शहराचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांना दंगलीचं कारण विचारलं. (औरंगाबादला सध्या पूर्णवेळ पोलीस आयुक्त नसल्यामुळे विभागीय महानिरीक्षकांकडे प्रभार आहे.)
ते म्हणाले, "रात्री आठ-साडेआठच्या सुमारास टपरीवर देण्याघेण्यावरून युवकांमध्ये वाद झाला. काही तासांनंतर दोन्ही बाजूच्या गटांनी दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ सुरू केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत बळाचा वापर केला. यावेळी आम्हाला अनेक परिसरातून सतत फोन येत होते. त्यामुळे धावपळीची परिस्थिती निर्माण झाली होती."

फोटो स्रोत, Ameya pathak/bbc
MIMचे खासदार यांनी या दंगलीसाठी लच्छू पेहलवान यांना जबाबदार धरत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. तर जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शक्यता २ - मशिदीचं पाणी कापलं?
शाहगंज परिसरातले अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम महापालिकेनं सुरू केली होती. त्यात एका मशिदीचं नळ कनेक्शन तोडलं गेलं, पण जवळच्या असलेल्या मंदिराबाहेरचा नळ सुरू ठेवला. याला काही स्थानिकांनी आक्षेप घेतला आणि वादाची ठिणगी पडली, अशी एक शक्यता व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी महापालिकेनं अवैध नळ जोडण्या तोडल्या होत्या हेसुद्धा या हिंसेमागचं कारण असल्याचं पुण्यनगरीच्या औरंगाबाद अवृत्तीचे संपादक भालचंद्र पिंपळवाडकर यांना वाटतं.
औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनीही म्हटलं की पाण्यावरून ही दंगल पेटली असू शकते.
"औरंगाबाद महापालिकेकडून एकूण 40 अवैध नळ कनेक्शन तोडण्यात आले होते. ही सर्व कनेक्शन्स शहागंज परिसरातील होते. जे नळ अवैधरीतीने जोडण्यात आले ते तोडले, यात जात किंवा धर्म पाहण्याचा संबंधच येत नाही," असं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बालकृष्ण भालसिंग यांनी स्पष्ट केलं.
प्रभारी पोलीस आयुक्त भारांबेंनी पुढे म्हटलं, "आम्ही तणावग्रस्त परिसरात लाठीचार्ज, अश्रुधूर आणि रबर बुलेटचा वापर करत रात्री दीड-दोनच्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आणली."
शहागंज परिसराला औरंगाबाद शहरात ऐतिहासिक महत्त्व आहे. शहरातील मुख्य चळवळी आणि आंदोलनं इथूनच सुरू होत आली आहेत. निजामकालीन बाजारपेठ हे इथलं मुख्य वैशिष्ट्य. रहदारीची ही बाजारपेठ शनिवारी मात्र सुन्न दिसत होती.
रस्त्यावर पडलेले दगड आणि काचांचा खच, धुराचे लोट, नीरव शांतता, खिडकीतून बघणाऱ्या महिला आणि लहान मुलांच्या चेहऱ्यांवरची भीती. शुक्रवारची रात्रच इतकी भयंकर होती की इथली सर्वसामान्य माणसं अजूनही भेदरलेली होती.
पोलिसांना ताबडतोब जमावबंदी लागू करावी लागली. परिसरात शनिवार संध्याकाळपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आणि सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
हिंदू-मुस्लीम वाद का उफाळला?
ही दंगल म्हणजे हिंदू आणि मुस्लिमांचा राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचा धोकादायक प्रयत्न आहे, असं 'औरंगाबाद टाइम्स' या उर्दू वर्तमानपत्राचे व्यवस्थापकीय संपादक शाकेब खुस्रो म्हणाले.

फोटो स्रोत, Ameya pathak/bbc
"औरंगाबादचा इतिहास बघितला तर 1986-87ची दंगल आणि बाबरी मशीद पडल्यानंतर झालेली दंगल वगळता गेल्या 25 वर्षांमध्ये शहराचं वातावरण बऱ्याच अंशी शांत राहिलं. इतकी परिस्थिती कधीच वाईट नव्हती. शहरामध्ये बघता बघता एका भागात दोन्हीकडचे जमाव समोरासमोर येतात, जाळपोळीचे प्रकार घडतात, हे विचित्र आहे."
तर भालचंद्र पिंपळवाडकर यांनी म्हटलं की तरुणांमधली खदखद बाहेर यायला छोटी कारणंही पुरेशी आहेत.
"कालची घटना हा अनेक छोट्या-छोट्या कारणांमुळे उफाळून आलेला राग असावा. वेगवेगळी कारणं दंगलीत रूपांतरित झाली. आम्हाला टार्गेट केलं जातंय ही भावना यातून निर्माण झाली असावी."
"दोन युवकांत भांडण होतं, मग ते दोन गटांत पोहोचतं. तिथून दोन समाजापर्यंत पोहोचतं. हा दोनचा आकडा एकमेकांच्या विरोधात मोठा होत चाललाय. 2018ची सुरुवात भीमा-कोरेगावच्या घटनेनंतर शहरात उसळलेल्या जाळपोळीने झाली. कचऱ्याच्या प्रश्नावरून जमावावर लाठीचार्ज झाला. म्हणजे गेल्याकाही महिन्यांत युवकांमध्ये निर्माण झालेली खदखद बाहेर पडण्याचा मार्गावर आहे. त्यातूनच हे घडलं असावं असा माझा अभ्यास सांगतो," असं पिंपळवाडकर म्हणाले.
अजूनही दगडांचे खच
दंगल झालेला भाग मुख्यतः व्यापारी आहे. शहराच्या मध्यभागी असलेला हा इलाका. त्यात हिंदू, मुस्लीम, शीख, सिंधी असे सर्व जाती-धर्माचे व्यापारी आहेत. एरवी हा परिसर शांत असतो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पण शुक्रवारी दंगल भडकल्यावर चपला-बुटांची दुकानं जाळण्यात आली. शंभराच्या वर दुकानांचं नुकसान झालं. या जाळपोळीचे काही व्हीडिओ सोशल मीडियावर पसरले. त्यामध्ये पोलीस प्लास्टिक बुलेट्स मारताना दिसत होते.
ज्या नळावरून भांडण सुरू झालं असं म्हटलं गेलं तिथं दिवसभर पोलीस बंदोबस्त नव्हता. पण रात्री तिथं गडबड झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. तिथं दगडांचा खच होता.
दुकानांचं नुकसान झालेलं होतं. गांधीनगर, शहागंज बाजारपेठ इथं दुकानं जाळलेली दिसत होतं. फायर ब्रिगेडच्या गाड्यांची येजा सुरू होती. रस्त्यांवर दगड-विटांचा खच होता.
या घडीला औरंगाबाद शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. दंगलग्रस्त भागात जमावबंदी आहे. शहराच्या इतर भागात दैनंदिन व्यवहार सुरू असले तरी तिथंही लोक धास्तावलेले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








