बुरखा घालणारी मुलगी दबावाखाली असतेच असं नाही : झायरा वसीम

फोटो स्रोत, SPICE PR
- Author, सुप्रिया सोगले
- Role, मुंबई, बीबीसीसाठी
मनोरंजनाबरोबरच महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा 'दंगल' चित्रपट भारतातच नाही तर चीनमध्येही हिट झाला होता. 'दंगल'मुळे चर्चेत आलेली 17 वर्षीय काश्मिरी अभिनेत्री झायरा पुन्हा एकदा आमीर खानबरोबर 'सिक्रेट सुपरस्टार' या फिल्ममध्ये दिसली.
यामध्ये झायरा बुरखा घालून गाणी गाते आणि सोशल मीडियावर खळबळ उडवते, असा सीन आहे.
बुरखा घालणारी मुलगी किंवा महिला दबावाखाली असते, असं गृहीत धरणं चुकीचं आहे, असं या 'दंगल गर्ल'नं बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत झायराने बुरखा किंवा हिजाब याबद्दल असणाऱ्या गैरसमजांबाबत चर्चा केली.
"महिला दबावाखाली बुरखा घालतात असा लोकांचा गैरसमज आहे. मी अशाही महिला पहिल्या आहेत ज्यांना बुरखा घालायचा असूनही त्यांना घालू दिला जात नाही."
"काश्मीरमध्ये अशा खूप मुली आहेत ज्या स्वतःहून बुरखा घालतात आणि त्यांची लग्नं या कारणाने होत नाहीत." असं झायरा सांगते.

फोटो स्रोत, SPICE PR
आई-वडिलांनी बुरखा घालू नका असं बजावूनही मुली बुरखा काढायला तयार नाहीत. वडिलधाऱ्यांच्या दबावामुळेच मुली बुरखा घातला जातो हा एक भंपक विचार आहे, असं झायरा म्हणाली.
त्याच वेळी "चित्रपटात घातलेला बुरखा एका विशिष्ट धर्माशी निगडित नाही किंवा त्यामागे वैयक्तिक काही कारण नाही. ही या चित्रपटाची गरज असल्याने असा पोशाख घातला", असंही ती सांगते.

फोटो स्रोत, SPICE PR
झायरा वसीम काश्मिरी आहे. ती काश्मीरमध्येच लहानाची मोठी झाली. तिच्या मते काश्मीर आणि भारतातली इतर शहरं वेगळी नाहीत. 17 वर्षीय झायरानं आमीर खानबरोबर दोन वेळा काम केलं आहे.
शाळेपासूनच अभिनय
झायराला पहिल्यापासून सिनेमाची आवड नव्हती. पण, एकदा शाळेत स्त्री-भ्रूण हत्येवर आधारित नाटकात तिनं भाग घेतला होता. त्यावेळी ती शाळेच्या प्रिन्सिपलनी तिच्यातली अभिनयक्षमता हेरली.
शालेय जीवनापासून अभिनयाची क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शोधात असलेल्या एका कास्टिंग टीमला झायरा पहिल्या दर्शनातच पसंत पडली.
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या झायराच्या आई-वडिलांना मुलीनं बॉलिवूडमध्ये काम करणं सुरुवातीला मान्य नव्हतं. तिने सिनेमा अभिनेत्री होणं त्यांच्या पचनी पडायला जड होतं.
पण आमीर खानबरोबर ती काम करणार असल्याचं कळल्यावर तिला आई-वडिलांकडून परवानगी मिळाली, असं झायरा सांगते.
अद्वैत चंदन दिग्दर्शित 'सिक्रेट सुपरस्टार'मध्ये अमीर खानच मुख्य भूमिका बजावत आहे.

फोटो स्रोत, SPICE PR
दंगल या पहिल्याच चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली झायरा आता मात्र शिक्षणावर लक्ष केंद्रित करू इच्छिते. "सध्या अभ्यासावर कॉन्संट्रेट करते आहे. पुढे फिल्ममध्ये काम करायचं की नाही यावर अजून विचार केला नाही", असं ती सांगते.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








