औरंगाबादकरांच्या आरोग्याचाच 'कचरा'

फोटो स्रोत, Amey Pathak
- Author, अमेय पाठक
- Role, बीबीसी मराठीसाठी
औरंगाबादमध्ये कचरा डेपोला विरोध झाल्यानं शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग लागले आहेत. यामुळे नागरिकांचं आरोग्यही बिघडलं आहे.
औरंगाबादच्या विष्णूनगरमधल्या अलका निसर्गे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. इथल्या दोन खोल्यांच्या घरात निसर्गे यांचं 4 जणांचं कुटुंब राहत. घराच्या आजूबाजूला कचरा उचलला जात नाही आणि घरातील कचरा टाकायचा कुठं असा प्रश्न निसर्गे कुटुंबीयांना पडला आहे.
विष्णूनगर हा भाग पूर्वी फार स्वच्छ आणि चकचकीत होता, अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती, असं इथले लोक सांगतात.
मध्यमवर्गीय लोकांचा हा परिसर सध्या कचऱ्याच्या समस्येमुळं चांगलाच हैराण झाला आहे.
कचरा उचलला न गेल्याने होणारा त्रास त्यांच्या शब्दांतून व्यक्त होत असतो. इथं आकाशवाणी कार्यालयासमोर उकिरडा आहे. तेथून पाच सहा दिवस कचरा उचलला जात नाही. इथून जाताना लोक नाकाला रुमाल लावूनच जातात.
अलका यांच्या घरी पती आणि दोन मुलं असतात. त्यांचा मुलगा अक्षय यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "पूर्वी अशी परिस्थिती कधीच नव्हती. कचऱ्यामुळे घरात माशा, डास इतर किडे यांचा मोठा त्रास होत आहे. दुर्गंधी तर रोजची असते."

फोटो स्रोत, Amey Pathak
अक्षय यांचं वय 26 असून ते खासगी नोकरी करतात. कचऱ्याच्या समस्येमुळं रोगराईचा प्रश्न गंभीर झाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "गेली काही दिवस आई आजारी आहे, आईला ताप आहे. भागात स्वच्छता नसताना आजारपणाच्या समस्या फारशा नव्हत्या. आताही नवीच समस्या निर्माण झाली आहे."
आजारपणाची समस्या एकीकडे असताना घरातील कचरा कुठं टाकायचा ही मोठी समस्या निर्माण झालेली आहे, असं ते म्हणतात. कचरा उचलला जात नसल्याने या भागातील नागरिकांनी ओला कचरा कुंडीत टाकणे आणि सुका कचऱ्यातील शक्य असेल तो भाग विकून टाकणे, सुरू केलं आहे, असं ते म्हणाले.
महापालिका गेली तीन दशक जिथं कचरा टाकत होती त्या नारेगावतही अशीच स्थिती आहे. गेली 30 वर्षं कचऱ्याच्या टेकडी शेजारी राहणारे इथले लोक विविध आजारांना तोडं देत आहेत. इथं राहाणारे देवीदास देवखले आणि त्यांच्या पत्नी या दोघांना दमा आहे. त्याला ते या कचऱ्याला जबाबदार धरतात. तर त्यांचे पुत्र अरुण आणि नातू अविनाश यांना त्वचारोग आहे.

फोटो स्रोत, Amey Pathak
"आम्हा दोघांनाही दमा आहे, तर दोन्ही मुलांना त्वचारोग आहेत," देवखले दाम्पत्य सांगतं.
देवीदास सांगतात, "30 वर्षांपूर्वी इथं कचरा डेपो सुरू करण्यात आला. आमच्या शेताच्या शेजारी दररोज कचरा येऊन पडतो. दुर्गंधी, धूर, डास आणि माशांचा त्रास आम्ही गेली 30 वर्षं सोसत आहोत."
अरुण (40) म्हणाले, "आमचा कचरा डेपोला तीव्र विरोध आहे. 30 ते 35 फूट उंचीचे कचऱ्याचे ढिग साठले आहेत. पावसाळ्यात यावर पडलेलं पाणी शेतात आणि विहिरींत झिरपतं. यातून मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे."
औरंगाबादमध्ये नाथनगर इथं राहणाऱ्या 54 वर्षांच्या नंदा जैस्वाल यांचीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या जरी 6 असली तरी सध्या घरी त्या आणि त्यांची मोठी मुलगी नंदा या दोघीच घरी राहतात. त्यांचा मुलगा, सून आणि दोन नातवंडं यांनी कचऱ्याला कंटाळून औरंगाबाद इथल्या प्रति पंढरपूर भागात घर घेतल्याचं त्या सांगतात.

फोटो स्रोत, Amey Pathak
इथून जवळच असलेल्या सिंधी कॉलनीमधल्या 23 वर्षीय हरलनी सलूचा यांची बहीण 15 दिवसांपूर्वी आजारी होती. बहिणीच्या आजारपणाला त्या कचऱ्याला जबाबदार धरतात.
डॉक्टर काय म्हणतात?
डॉ. उज्ज्वला दहिफळे म्हणतात, "कचऱ्याच्या ढिगामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे प्रदूषण तर होतंच शिवाय कचऱ्यामुळे अनेक रोगांचा प्रसार होतो. कचऱ्यामुळे हगवण, पोटाचे विकार, डोकेदुखी, कॉलरा, टॉयफाइड, मलेरिया, त्वचेचे विकार आणि श्वसनाचे आजार होऊ शकतात. या ढिगाऱ्यावर कीटक बसतात, त्यांचा वावर सर्व परिसरात होतो त्यामुळे रोगांचा प्रसार होतो."
'नियमांचे उल्लंघन'
पर्यावरणवादी कार्यकर्ते प्रशांत शक्करवार यांच्यामते, रहिवासी क्षेत्रापासून किमान 200 मीटर अंतरावर डंपिंग ग्राऊंड असायला पाहिजे. "पण कांचनवाडी किंवा नारेगावात ते अगदी थोड्या अंतरावरच आहे. हमरस्त्यापासून 200 मीटर दूर कचरा डेपो असावा, पण कांचनवाडीत तो शंभर मीटरच्या अंतरावरच आहे," असं शक्करवार यांच म्हणणं आहे.
नेमकी समस्या काय?
औरंगाबादमध्ये दररोज साधारणतः 400 मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. गेल्या 17 दिवसांमध्ये 6000 ते 7000 मेट्रीक टन कचरा डंपिंग ग्राऊंडच्या प्रश्नामुळे तसाच पडून आहे. नारेगाव इथल्या ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतली आहे. नागरिकांच्या तीव्र विरोधामुळं महापालिकेनं इथल्या कचरा डेपोत कचरा टाकणं बंद केलं आहे. नारेगावच्या आजूबाजूला ब्रीजवाडी, मांडकी, गोलापूर अशी काही शिवारं आहेत.
महापालिका काय करत आहे?
शुक्रवारी कांचनवाडी इथल्या महापालिकेच्या 24 एकर जागेवर महापालिकेनं कचरा टाकला होता. याला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. आडगाव, तीसगाव, वाळूज या ठिकाणीही कचरा टाकण्याचा प्रयत्न महापालिकेने केला, तिथंही नागरिकांनी विरोध केल्यानं पालिकेची अडचण झाली आहे.
नारेगाव कचरा डेपो वगळता महापालिका हद्दीत कचरा टाकण्यास जर कुणी विरोध केला तर गुन्हे दाखल करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आणि आयुक्त दीपक मुगळीकर यांनी शनिवारी दिले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








