आसाम : चहाच्या मळ्यांमध्ये का पेटतोय हत्ती विरुद्ध मानव संघर्ष?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नवीन सिंग खडका
- Role, पर्यावरण प्रतिनिधी, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
आसाममध्ये गेल्या काही वर्षांत मनुष्य आणि हत्ती यांच्यातील संघर्ष वाढू लागला आहे. विशेषतः चहा उत्पादकांचं जंगलात अतिक्रमण वाढू लागल्याने हत्तींचा अधिवास धोक्यात आला आहे. यातून हा संघर्ष वाढत असून कधी मनुष्य तर कधी जंगली हत्तींचा यात बळी जात आहे.
स्थानिक प्रशासनाने चहा लागवडीवर ठपका ठेवला आहे, तर चहा उत्पादकांच्या मते ज्या भागात चहा लागवड मोठ्या प्रमाणावर होते, तिथं सरकारनं सुधारीत सर्वेक्षणसुद्धा केलेलं नाही.
शिवाय चहा उत्पादकांच्या एका मोठ्या संघटनेने या आरोपाचा इन्कार करत जंगलात लागवड करणं त्यांच्या सदस्यांच्या हितासाठी आहे, असा प्रतिवाद केला आहे. पण भारत सरकारच्या एका अभ्यासानुसार या भागातील चहाच्या बागा हे जंगलतोडीमागचं प्रमुख कारण आहे.
"वनक्षेत्रात घट होण्यासाठी जंगलाच्या जमिनीवरचं अतिक्रमण, जैविक दबाव, चहाच्या मळ्यांच्या लागवडीच्या पद्धती, अशा अनेक गोष्टी जबाबदार आहेत," असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 2015च्या वन अहवालात म्हटलं आहे.
बळींचा वाढता आकडा
अधिकृत आकडेवारीनुसार भारतात 2006 ते 2016 या काळात जंगली हत्तींमुळे 800 लोकांचा मृत्यू झाला होता. सरकारनं गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार वाघ किंवा जंगली हत्ती यांच्यामुळे भारतात दररोज एका व्यक्ती जीव गमवतो.
2014 आणि 2015 मध्ये जंगली हत्तींमुळे पश्चिम बंगालमध्ये 54 लोकांनी आपला जीव गमावला होता. त्याच्या खालोखाल आसामचा नंबर लागतो.

दक्षिण आसाममधल्या मरीअम केरकेट्टा यांच्या मुलीचा हत्तींमुळे बळी गेला आहे. त्या सांगतात, "माझ्या मुलीला हत्तीनं चिरडलं. तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. मला तिला शेवटचं बघतासुद्धा आलं नाही."
गेल्या वर्षी त्यांची 26 वर्षांची मुलगी बोबिता केरकेट्टा संध्याकाळी चहाच्या मळ्यातून मैत्रिणीसोबत दुचाकीवरून जात होती. बोबिता गाडीवर मागे बसली होती. हत्तीला पाहताच तिनं स्कूटरवरून उडी मारली आणि त्यात तिचा मृत्यू झाला.
"तिची मैत्रीण कशीबशी पळून गेली पण माझी मुलगी तिथून जाऊ शकली नाही. कारण चहाच्या मळ्यांच्या दोन्ही बाजूंना कुंपण होतं," केरकेट्टा सांगत होत्या. "आम्ही इथे अनेक वर्षांपासून राहतो. पण आता हा परिसर हत्तींमुळे फार धोकादायक बनला आहे," असं त्या सांगतात.
हत्तींचासुद्धा बळी
या संघर्षात लोकांचाच नाही तर हत्तींचाही बळी जात आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार 2013 आणि 2014 दरम्यान 72 हत्तींचा मृत्यू झाला. 2012 साली ही संख्या 100 इतकी होती.
रेल्वे, विषबाधा, विजेचा धक्का सारख्या अनेक कारणांमुळे 2001 ते 2014 या भारतात काळात 225 हत्ती मारले गेले आहेत.

आशियाई हत्तींची सर्वाधिक संख्या भारतात आहेत. एकूण आशियाई हत्तींपैकी 60 टक्के हत्ती भारतात आहेत. भारतात कर्नाटकमध्ये हत्तींची संख्या सर्वांत जास्त आहे. त्या खालोखाल आसामचा क्रमांक लागतो जिथे 5700 पेक्षा जास्त हत्ती आहे.
पर्यावरण संवर्धनात काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते आसाममधील हत्ती आता अधिकाधिक हिंसक होत आहेत. संकटात येत असलेला अधिवास, हे त्यामागचं प्रमुख कारण आहे.
उरलगुडी जिल्ह्यातील राखीव वनांचे वॉर्डन मनाश शर्मा म्हणतात, "या परिसरात पूर्वी जंगल होतं. मनुष्य वस्ती आणि राखीव वनक्षेत्र यांच्यात हे जंगल बफर म्हणून काम करत होतं."
या परिसरात पूर्वी मुबलक पाणी, अन्न उपलब्ध होतं. पण वाढती लोकसंख्या, चहाच्या मळ्यांचं वाढतं क्षेत्र, यामुळे आमच्या हाती काही राहिलेलं नाही, असं ते म्हणतात.
"चहाच्या मळ्यांचं हे अतिक्रमण आता राखीव वनक्षेत्रांच्या सीमेपर्यंत पोहोचलं आहे," असं ते सांगतात.

"हत्ती चहाची पानं खात नाही. त्यामुळे ते आता खेड्यांपर्यंत आले आहेत आणि आता मनुष्य आणि हत्तींमधील संघर्ष वाढल्याचं दिसू लागलं आहे," असं ते म्हणाले.
छोट्या प्रमाणात चहाची लागवड करणाऱ्या लोकांनी या जंगलात अतिक्रमण केल्याचा दावा शर्मा यांनी केला.
आसाममधील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला सांगितलं की बेकायदेशीररीत्या वनजमिनींवर चहाची लागवड करणाऱ्या उद्योजकांकडून जमिनी परत घेण्यात येत आहेत.
लहान लागवडीदारांवर लक्ष
शासनाच्या अखत्यारित असलेल्या टी बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेकडे आसाममधील 23 जिल्ह्यांतून 56,000 लहान चहा उत्पादकांनी नोंदणी केली आहे. पण स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक छोट्या उत्पादकांनी अजूनही नोंदणीच केलेली नाही. हे छोटे उत्पादक मोठ्या कंपन्यांना चहा विकतात.
चहाचं उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्यांतील लोकांनुसार हा मुद्दा मोठ्या चहा उत्पादकांशीसुद्धा निगडित आहे.

"मोठ्या चहा उत्पादकांनी दिलेल्या जमिनींचं सर्वेक्षण सरकार का करत नाही? काही लोकांना तर 70 वर्षांपूर्वी जमिनी दिल्या आहेत. त्यांच्याही जमिनीचं सर्वेक्षण का होत नाही," असा प्रश्न बोडोलँड टेरिटोरियल डिस्ट्रिक्ट ऑफ आसामचे नेते दिपेन बोरो विचारतात.
"आमच्या निरीक्षणानुसार 30-40 टक्के अतिक्रमण हे मोठ्या चहा उत्पादकांकडून झालं आहे आणि आम्ही मंडळ अधिकाऱ्यांवर आणि प्रशासनावर चहाच्या मळ्यांची नक्की काय स्थिती आहे, हे बघण्यासाठी दबाव टाकत आहोत," असं सांगून त्यांनी या मुद्द्यावर माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करणार असल्याचंही सांगितलं.
मोठ्या चहा उत्पादकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन टी असोसिएशननं मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे.
"आम्ही तिथे जंगलतोड करायला, झाडं तोडायला किंवा चहा लावायला गेलो नव्हतो," असं या संस्थेचे सचिव संदीप घोष यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
"जर आम्ही जंगलांशी खेळ केला तर चहावर सगळ्यांत जास्त परिणाम होईल. त्यामुळे हिरवळ असणं हे आमच्याच हिताचं आहे." ते पुढे सांगत होते. जमिनीचं सर्वेक्षण करणं ही आमची जबाबदारी नाही, असंही घोष यांनी सांगितलं.
"जमीन ही आमच्या अखत्यारित नाही. जमिनीबाबत किंवा जमिनीच्या सर्वेक्षणाबाबत आम्ही सरकारवर दबाव टाकू शकत नाही. जमिनीचं सर्वेक्षण आणि महसूल गोळा करणं ही संपूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे," असं ते म्हणाले.

आता सरकार हे सर्वेक्षण कधी करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
पण माणसांचा आणि हत्तींचा संघर्ष दिवसेंदिवस अधिक गंभीर वळण घेत आहे. वाढणारी लोकसंख्या आणि कमी होणारं वनक्षेत्र बघता मानव आणि हत्ती यांचं सहजीवन खरंच शक्य आहे का, असा प्रश्न आता लोक उपस्थित करत आहेत.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








