नागपूर : कथित भूतबाधेतून मुक्त करण्यासाठी पालकांची मारहाण; 5 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
कथित भूतबाधेतून मुक्त करण्याच्या अंधश्रद्धेतून पालकांनी केलेल्या मारहाणीत 5 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये ही घटना घडली आहे.
शुक्रवार आणि शनिवारी रात्री या मुलीच्या पालकांनी कथित काळ्या जादूच्या नावाखाली मुलीला मारहाण केली होती.
पोलिसांनी आथा मुलीचे वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना आणि मावशी प्रिया बनसोड यांना अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रँचचे डीसीपी चिन्मय पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सिद्धार्थ चिमणे गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपली पत्नी आणि दोन मुलींना घेऊन दर्ग्यामध्ये गेले होते. आपल्या मुलीच्या शरीरात एक दृष्ट आत्मा आलेला आहे. त्यामुळे तिच्या वागण्यात बदल झाल्याचा संशय त्यांना येत होता. आपल्या मुलीला भूतबाधा झाली असून ती घालवण्यासाठी काळी जादू करण्याचं त्यांनी ठरवलं होतं.
"हा दृष्ट आत्मा बाहेर काढण्यासाठी केलेल्या धार्मिक पूजेचा विधी म्हणून त्यांनी मुलीचे हातपाय बांधले आणि तिला मारहाण केली होती."
मुलीचे आई, वडिल आणि मावशीने मिळून अंधश्रद्धेतून ही पूजा केली आणि हा सगळा प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला.
पोलिसांनी मोबाइलमधून हा व्हीडिओ मिळवला आहे. या व्हीडिओत आरोपी वडील आपल्या रडणाऱ्या मुलीला काही प्रश्न विचारत असल्याचं दिसत आहे.
प्रश्न समजत नसल्याने मुलगी काहीच उत्तर देत नव्हती, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
अंधश्रद्धेतून असा प्रकार करताना तिघांनीही मुलीला अनेकदा झापड मारली. इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर मारहाणही केली.
यानंतर मुलगी बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळली, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

फोटो स्रोत, yogesh_more
यानंतर आरोपीने मुलीला शनिवारी सकाळी दर्ग्यात नेलं. नंतर तिला सरकारी रुग्णालयात दाखल करुन तिघांनी पळ काढला.
रुग्णालयाच्या गेटवर असणाऱ्या सुरक्षारक्षकाला संशय आल्याने त्याने गाडीचा फोटो काढला होता.
दरम्यान, डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित करुन पोलिसांना कळवलं. गाडीच्या नंबर प्लेटवरुन पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि त्यांना अटक केली.
या प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ चिमणे युट्यूबवर स्थानिक वृत्तवाहिनी चालवतात. पती-पत्नी दोघेही बारावी उत्तीर्ण आहेत.
आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ्या कलमान्वये, तसेच महाराष्ट्र प्रिव्हेन्शन अॅण्ड इरेडिकेशन ऑफ ह्युमन सॅक्रिफिस आणि इतर अमानुष, वाईट, अघोरी प्रथा, काळ्या जादू कायद्याच्या तरतुदींनुसार आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भोंदूबाबाला घेतलं ताब्यात
28 तारखेला चिमणे कुटुंबीय नागपूरजवळील एका धार्मिक स्थळी गेलं होतं. तिथं त्यांची एका भोंदूबाबाशी ओळख झाली होती, असं त्यांनी पोलीस चौकशीत सांगितलं आहे.
पोलिसांनी सांगितलं, "त्या बाबानं या कुटुंबाला काही धार्मिक विधी करण्यास सांगितलं होतं. तसंच तो फोनवरही काही सूचना त्यांना देत होता. भोंदूबाबा आमच्या ताब्यात आहे. त्याचं नाव शंकर असं आहे. त्याच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








