चंद्रपूर : जादूटोण्याच्या संशयावरून 7 जणांना खांबाला बांधून मारहाण

चंद्रपूर
    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

जादूटोण्याच्या संशयावरून 7 जणांना बेदम मारहाण केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वणी-खुर्द गावामध्ये घडलीय. याप्रकरणी जिवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मोहरम काळात गावामधील काही महिलांच्या अंगात कथितरित्या देवी आली. त्यांनी गावातील कांबळे आणि हुके कुटुंबांनी भानामती केल्याच सांगितलं. त्यावरून गावातील काही नागरिकांनी संशयित कुटुंबाला मारहाण करून खांबाला बांधून ठेवलं.

संशयित वृद्धांना भर चौकात खांबाला बांधून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाणीत 7 जण जखमी झालेत.

गेल्या अनेक दिवसांपासून कांबळे आणि हुके कुटुंबीय भानामती करत असल्याचा संशय गावकऱ्यांना होता, अस पोलिसांचं म्हणणं आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं.

गावात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती. पीडितांची लोकांच्या तावडीतून सुटका करून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

गावकऱ्यांच्या मारहाणीत एकनाथ हुके जखमी झालेत. त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. ते म्हणतात "आमचा काही दोष नाही. गावकऱ्यांनी नाहक आम्हाला टारगेट केलंय. भानामतीचा आरोप करून समज देण्यासाठी चौकात बोलावलं आणि मारहाण केली. आम्ही रोजमजुरी करून जीवन जगतोय. मुलगा गाडीवर जातो, त्यालाही चार पैसे देतो. पण काही गावकऱ्यांनी आम्ही जादूटोणा करत असल्याचा आमच्यावर आरोप लावला आणि बांधून बेदम मारहाण केली."

दुसरे पीडित म्हणाले "लोक पोलिसांनाही जुमानत नव्हते. आमचे हातपाय बांधून ठेवले होते. संपूर्ण गावानं आम्हाला मारलं. पोलिसांनी सुटका केली म्हणून वाचलो."

स्थानिक खासदार बाळू धानोरकर यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत पीडितांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.

ते म्हणाले "जादूटोण्याच्या संशयावरून सात बौद्ध बांधवांवर मोठा अन्याय करण्यात आला आहे. झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. काहींचे हात तुटलेत. काहींना मानेवर जबर मार बसलाय. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. 13 आरोपी अटक करण्यात आलीय. इतर 10 आरोपीना तात्काळ अटक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात कुठलाही जातीय रंग नाही."

चंद्रपूर

API संतोष अंबिके यांनी दिलेल्या माहितीनुसार "दलित कुटुंबाला गावातील काही दलित नागरिकांनीच मारहाण करून खांबाला बांधून ठेवलं होतं. त्यांच्यावर भानामती केल्याचा आरोप गावातील काही नागरिकांचा होता. आरोपींविरोधात 'जादूटोणा'विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती' अंतर्गत गावामध्ये जनजागृती करण्यात आली आहे."

"ही घटना महाराष्ट्राला हादरून सोडणारी आहे. अंधश्रद्धेच्या मानसिकतेतून ही घटना घडली आहे. आरोपी विरोधात 'जादूटोणा' कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्या गावामध्ये प्रबोधनाची आवशकता आहे," असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य अनिल दहागावकर यांनी सांगितलं.

घटनेची माहिती मिळताच दहागावकर गावामध्ये दाखल झाले. त्यांनी लोकांचं प्रबोधन केलं.

"त्याठिकाणी प्रचंड तणावाचं वातावरण होतं. तणाव काही प्रमाणात निवळला आहे. पण ग्रामीण परिसरात आजही समाज प्रबोधनाची आवशकता आहे," असं अनिल दहागावकर म्हणाले.

जादूटोणाविरोधी कायदा काय आहे?

विवेकवादी विचारवंत नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र सरकारने 2013 साली तडकाफडकी जादूटोणा, अघोरी कृती, नरबळी आणि काळी जादू याच्या विरोधात कायदा संमत केला.

या आधी हा कायदा पास व्हावा म्हणून दाभोलकरांनी 2010 पासून अनेक प्रयत्न केले होते. याच कायद्याचा मसुदा त्यांच्याच अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थेने तयार केला होता.

अनेक उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी हा कायदा 'हिंदू-विरोधी' आहे असं म्हणत याला विरोध केला होता. संसदेच्या सलग सात अधिवेशनांमध्ये यासंबंधी बिल मांडलं गेलं होतं पण दाभोलकरांच्या मृत्यूआधी हा कायदा पास होऊ शकला नाही.

जादूटोणा

फोटो स्रोत, yogesh_more

फोटो कॅप्शन, कथित भानामतीमध्ये वापरली जाणारी काळी बाहुली

सध्या या कायद्यात 12 कलमं आहेत. यात मारहाण, छळ, जबरदस्तीने मानवी विष्ठा खायला लावणं, भूत उतरवण्याच्या नावाखाली लैंगिक शोषण करणं, चमत्कार घडवण्याचा दावा करणं, काळी जादू केल्याचा आरोप करणं, काळी जादू केली म्हणून एखाद्याला बहिष्कृत करणं, जादूने एखाद्याचा आजार बरा करण्याचा दावा करणं अशा गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे.

'महिला अंधश्रद्धेच्या पीडित तर असतात पण वाहकही असतात'

अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचं सगळ्यांत जास्त शोषण होतं. त्या काळी जादू, मंत्रतंत्र प्रकरणाला बळीही पडतात आणि अनेकदा डाकीण, जखीण म्हणून त्यांना मारहाणही केली जाते.

नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र आणि व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ असलेले हमीद दाभोलकर याविषयी सविस्तर सांगतात, "बायका फक्त अंधश्रद्धेच्या पीडित नसतात तर त्याच्या वाहकही असतात. भले त्या स्वतः शोषक नसतील. महिलांना प्रश्न विचारण्याची मुभा नसते."

महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

अंधश्रद्धेचं निर्मुलन एका दिवसात, अचानक होणार नाहीये. या चळवळीला तळागाळातल्या लोकांना उत्तम आरोग्य व्यवस्था देण्याची चळवळ, स्त्री हक्कांची चळवळ आणि सर्वांसाठी शिक्षणाची चळवळ यांच्याशी जोडावं लागेल, असंही हमीद म्हणतात.

हक्क, शिक्षण, आरोग्य या गोष्टींच्या अभावी अंधश्रद्धा बळवते.

"आपल्या जगण्याचे, अस्तित्वाचे प्रश्न सुटत नसले की लोक अंधश्रद्धेचा आधार घेतात. आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्या की मरणाची भीती सतावते आणि लोक बाबा बुवांकडे धावतात.

गरीब आणि दुर्गम भागातल्या लोकांना चांगली आरोग्य व्यवस्था मिळाली तर अशा घटनांचं प्रमाण कमी होईल. अंधश्रद्धा एका दिवसात संपत नाहीत, फक्त आपलं रूप बदलतात. कोव्हिडच्या काळात ग्रामीण भागात पसरलेल्या अंधश्रद्धांवरून हे आपल्या लक्षात आलंच असेल."

आणि म्हणूनच अंधश्रद्धांच्या विरोधात जोरदार लढा उभारायची गरज आहे, विशेषतः उजव्या शक्तींचा उदय होत असताना असं ते ठामपणे सांगतात. धार्मिक, वांशिक उन्माद तुमच्या विवेकाला संपवतो आणि मग अंधश्रद्धा बळावतात, हमीद म्हणतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)