कराचीतले कारागीर कॉम्युटरच्या कचऱ्यातून कसं काढतात सोनं?

फाईल फोटो

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, एहसान सब्ज
    • Role, पत्रकार
    • Reporting from, कराची, पाकिस्तान

कराचीतील सिराजला त्याचे काका कचऱ्यातून 'शुद्ध सोनं' कसं काढायचं ते शिकवत होते. अ‍ॅसिडमुळं त्यांचे हात जळालेले होते. कराचीत शेरशाह हे मोठं भंगारचं मार्केट आहे. खैबर पख्तुनख्वाहच्या भागातील एका छोट्याशा गावातून सिराज याठिकाणी मोठी स्वप्नं घेऊन आला होता.

याठिकाणी आल्यानंतर जे काम शिकायचं, त्यात प्रावीण्य मिळवायचं आणि परत जाऊन मित्रांनाही शिकवायचं, असं सिराजनं गाव सोडून येताना ठरवलंच होतं.

खरखेलहून आलेल्या सिराजला या प्रचंड गर्दीच्या शहरात एक काम मिळालंही.

कराचीच्या नेपा फ्लायओव्हरवरून जाताना एकेकाळी खाली डाव्या हाताला एक मैदान दिसायचं. त्याच्या मधोमध सोन्या आणि चांदीच्या रंगाच्या डब्ब्यासारख्या इमारतींचे सापळे तयार केलेले होते. त्यावर मोठ्या बॅनरवर ‘कचरा दो, सोना लो’ असं लिहिलेलं होतं.

हे बॅनर गुल बहाव नावाच्या एनजीओजनं लावलं होतं. त्याकाळात अशा वेगळ्या प्रकारच्या घोषणेनं त्याची चर्चा झाली होती.

बॅनवरील कचरा म्हणजे दररोज घरात जमा होणारा आणि कारखान्यातून निघणारा कचरा असा अर्थ होता, तर सोनं म्हणजे गुल बहाव संस्था या कचऱ्यातून विविध आकाराच्या ज्या गोष्टी तयार करत होती, त्या गोष्टी.

सिराज पहिल्यांदा तेव्हाच कराचीला आला होता आणि तेव्हा त्याचं वय आठ वर्षं होतं.

लाल रेष

फोटो स्रोत, Getty Images

लाल रेष

फोटो स्रोत, Getty Images

नंतर एके दिवशी पहलवान गोठ भागात जात असताना रेल्वेच्या डब्यातून त्याने ही पाटी वाचली आणि कचऱ्याच्या मोबदल्यात सोनं कसं मिळणार, असा प्रश्न त्याला पडला.

त्यावेळी सिराज गावी परतला. पण काही वर्षानंतर शाहीद नावाच्या चुलतभावाशी फोनवर बोलताना त्यानं कराचीमध्ये कचऱ्यातून सोनं तयार करतो, असं सिराजला सांगितलं.

गुल बहाव ट्रस्ट

फोटो स्रोत, Gul Bahav Trust

फोटो कॅप्शन, "कचरा द्या, सोने घ्या." हे घोषवाक्य गुल बहाव ट्रस्ट नावाच्या स्वयंसेवी संस्थेने तयार केले होते जे त्या काळात त्याच्या नाविन्यामुळे खूप प्रसिद्ध झाले होते.

हे ऐकताच सिराजच्या डोळ्यात एक चमक आली. “कचरा दों. सोना लो’ची पाटी त्याच्या डोळ्यासमोर आली. सर्वकाही लख्ख आठवलं. काही दिवसांतच तो कराचीत त्याचे काका अली गुल यांच्याकडं पोहोचला.

सिराज अगदीच निरासग होता. खूप सारा कचरा गोळा करून त्या मोबदल्यात आपण सोन्याची वीट मिळवायची आणि गावकऱ्यांना ती वीट तोडून सोनं वाटायचं असं त्यानं ठरवलं होतं. पण ही एवढी सोपी बाब नव्हती.

शेरशाह भंगार मार्केट

शेरशाह भंगार बाजारातल्या गोंधळात एका गोदामात सिराजशी माझी भेट झाली. सिराज ज्या सोन्याच्या शोधात कराचीला आला होता, त्याचाच शोध मीही घेत होतो.

तिथेच सिराज, त्याचा चुलत भाऊ शाहीद आणि त्याच्या उस्ताद चाचांशी भेट झाली. मात्र त्यांच्या विनंतीवरून त्यांचं खरं नाव आम्ही वापरलेलं नाही.

ते त्यांच्या कामाबाबत फारच संवेदनशील होते. त्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीबरोबरच आम्हाला एकही फोटो काढू दिला नाही.

आम्हाला फक्त कराचीच्या भंगार बाजारातून कॉम्प्युटरच्या कचऱ्यातून सोनं कसं निघतं आणि हे काम कसं होतं? इतकंच जाणून घ्यायचं होतं.

भंगार बाजार

फोटो स्रोत, Ehsaan Sabz

फोटो कॅप्शन, शेरशाह भंगार बाजार
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पण इथपर्यंत पोहोचणंही सोपं नव्हतं. अनेक कच्चे रस्ते, गोदाम आणि खराब रस्त्यांवरून पुढं येत एक दुकान होतं. कच्चं-पक्कं बांधकाम असलेलं ते गोदाम होतं.

छतावरून लटकणारी एक मोठी चिमणी, खाली माती आणि ड्रमपासून तयार केलेल्या मोठ्या भट्टी सदृश्य चुली, एका बाजूला पडलेले डबे आणि आसपास जळणाच्या लाकडांचा ढिगारा असं सगळं चित्रं होतं.

या कचऱ्याबरोबरच शेकडो विविधरंगी प्लास्टिकच्या तुकड्यांचा ढीग होता. त्यापैकी बहुतांश हिरव्या, निळ्या रंगाचे होते. प्लॅस्टिकचे हे तुकडे म्हणजे जुने वापरलेले कॉम्प्युटरचे मदरबोर्ड्स होते.

सिराजला कचऱ्यातून सोनं कसं निघतं? हे सर्वप्रथम तिथंच समजलं.

कराचीच्या शेरशाह भागात अनेक प्रकारचं औद्योगिक साहित्य आणि जुनं, वापरलेलं सामान मिळतं. त्याचबरोबर विकसित देशांतून आयात करण्यात येणाऱ्या जुन्या, निकामी कॉम्पुटर्सही इथंच येतात.

यातीन चांगल्या स्थितीतील काही कॉम्प्युटर वेगळे केले जातात. दुरुस्ती करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी विरलं जातं.

पण जुन्या आणि वापरायोग्य नसलेल्या कॉम्प्युटरचा मुक्काम शेरशाहमधील या गोदामांमध्येच असतो. या गोदामांत कॉम्प्युटरचे भाग वेगळे करून तोडून त्यातून तांबं, लोखंड, सोनं आणि इतर धातू काढले जातात.

लाल रेष

पाकिस्तानसंदर्भातील इतर काही बातम्या :

लाल रेष

कॉम्प्युटरमधून सोनं कसं निघतं?

सिराजला ज्या गोदामात काम मिळालं तिथं एक उस्ताद आहेत. त्यांना चाचा म्हणतात. ते या कामात तज्ज्ञ आहेत.

कॉम्प्युटरचे वापरलेले मदरबोर्ड्स उचलतात आणि ते विस्तवावर ठेवतात. त्यावर चिटकलेल्या पिना आणि भाग नरम करून त्यांना प्लायर्सने विलग केलं जातं.

चाचांच्या हाताला सगळीकडे जळल्याच्या खुणा आहेत. त्यावरून हे काम किती कठीण आहे हे दिसून येतं.

दोन तासात चाचांनी जवळपास दीडशे मदरबोर्ड जाळून आणि खरडवून स्वच्छ केले आणि एका बाजूला पिना, आयसी, ट्रान्झिस्टर आणि चीप्स यांचा एक ढीग तयार झाला.

मग चाचांनी त्या ढिगाऱ्यातून हवी ती वस्तू निवडायला सुरुवात केली. ज्या पिनवर सोनेरी रंग होता, चाचा त्याला वेगळं काढून ठेवत होते.

गोदाम

फोटो स्रोत, Ehsaan Sabz

फोटो कॅप्शन, वेअरहाऊसमध्ये, जुने वापरलेले कॉम्प्युटर मदरबोर्ड जास्त आग लावून जाळले जातात जेणेकरून पिन आणि त्यावर अडकलेले भाग मऊ होतात आणि नंतर ते पक्कड वापरून बाहेर काढले जातात.

काही भागांमधून त्यांना सोनेरी रंगाच्या तारा वेगळ्या करण्याचं कामही करावं लागलं. अशा पद्धतीने या सोनेरी तारा, पिना आणि बारीक पट्ट्यांचा एक ढीग तयार झाला.

तितक्यात शाहीद कपड्याने झाकलेला एक इलेक्ट्रॉनिक तराजू घेऊन आला. त्याचं वजन चार किलो निघालं.

आता चुलीत विस्तव लावण्याची वेळ झाली होती. काकांनी सांगितल्याप्रमाणे सिराज आणि शाहीद लाकडाचे मोठे मोठे तुकडे घेऊन आले.

लाकडाचे हे तुकडे चुलीच्या आसपास ठेवले होते. आग पेटण्यासाठी वारा देण्याची गरज होतीच. त्यासाठी प्रेशर फॅन लावला आणि त्यामुळे काही सेकंदातच लाकडाने पेट घेतला.

तितक्यात काका म्हणाले, “बेटा, बाजूला हो.”

शाहीदच्या मते, काकांच्या हातात एक ‘सिक्का’ नावाचा एक धातू होता. तो त्यांनी गरमारगम चुलीत ओतायला सुरुवात केली.

चूल इतकी पेटली होती की, ते नाणं चुलीत पडल्यावर उकळायला लागलं. आम्ही याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, हे एक रसायन आहे. त्याला ‘सोनं तयार करणारं तेल’ असं म्हणतात.

हे सगळं उकळत असताना त्या पदार्थात काकांनी दिवसभर मेहनतीने गोळा केलेला सोन्याचा कचरा टाकला.

साधारण अर्धा तास ते मिश्रण उकळत होतं त्याचदरम्यान एक विचित्र वास पसरला. त्या चुलीतून येणाऱ्या धुराचा रंगही बदलत होता.

काकांनी एका चुलीत एका चिमटा पकडून जे हातात आलं ते म्हणजे, त्या चुलीत वितळलेला कचरा होता. तो एखाद्या प्लेटसारखा तुकडा झाला होता आणि त्यावर राख लागली होती.

ती धगधगती प्लेट त्यांनी बाजूला असलेल्या पाण्याच्या भांड्यात भिजवली तेव्हा श....श.. असा आवाज आला आणि खूप वाफ यायला सुरुवात झाली. गरम तेलात कांदा टाकल्यासारखं ते सगळं वाटत होतं.

ती प्लेट परत वर काढल्यावर राखेपासून वेगळी झाल्यामुळे स्वच्छ दिसत होती. काका म्हणाले, “सिराज बघ, चक्की तयार झाली.”

शाहीद काळ्या रंगाच्या बाटलीसारखा ड्रम दोन्ही हातांनी पकडून एका नालीकडे घेऊन आला. ती नाली चुलीच्या जवळ दूर असलेल्या पाण्याच्या नळाबरोबर तयार झाली होती.

काकांनी च्या चक्कीला स्टीलच्या ट्रेमध्ये ठेवलं. याचं कारण विचारलं असता कळलं की, चक्कीला एका आम्लाने स्टीलच्या ट्रेमध्ये धुवावं लागेल कारण स्टीलचं मिठाशिवाय कोणत्याच रसायनाने नुकसान होत नाही.

अस्सल आणि शुद्ध सोनं

जसं जसं चक्कीवर सोडलेला धूर नायट्रिक ॲसिड पडलं, चक्की विरघळून पातळ व्हायला लागली. ट्रेमधून उठलेल्या धुराचा रंगही बदलत होता आणि यावेळी त्याचा वासही उग्र झाला होता आणि तो सिराजच्या नाकपुड्यांमध्ये घुसताना दिसत होता.

चाचांनी जवळ बोलावून दाखवलं की, आता सोन्याचे कण कसे स्टीलटच्या ट्रे सारखे स्थिर होत होते आणि इतर धातू चक्कीवर चिटकले होते. आपल्या डोळ्यासमोर सोनं लकाकताना पाहण्याची सिराजची ही पहिलीच वेळ होती.

त्यानंतर शाहिदने सूत्रं हातात घेतली. पाण्यामुळे पातळ झालेला एक भाग त्याने नालीत वाहवला आणि बाकी तुकडा एका बाजूला ठेवून दिला होता. त्यातून जे धातू विलग केले जाणार होते तेसुद्धा महागाचे होते पण अर्थातच सोन्याइतके नाही.

दरम्यान आता खाली ट्रे मध्ये सोनेरी कण अतिशय ठळकपणे दिसत होते. हे कण दोन तीन रंगीबेरंगी रसायनांनी अतिशय काळजीपूर्वक धुण्यात आले.

नालीत वाहवताना वापरलेल्या रसायनाबरोबर एकही कण वाहून जाता कामा नये याची पूरेपूर काळजी घेतली गेली. दरवेळी हे कण आणखी सोनेरी दिसत होते.

त्यानंतर चाचा मागून छोटीशी पातेली घेऊन आले. सोने किंवा चांदीसारखा धातू वितळवण्यासाठी तिचा उपयोग होतो. ही पातेली प्राण्यांचं खूर, हाडांची राख किंवा चिकणमातीने तयार केलं जातं. उच्च तापमान असूनसुद्धा ती विरघळत नाही.

गोदाम

फोटो स्रोत, Ehsaan Sabz

फोटो कॅप्शन, गोदामातील सर्व काम सिराज काकांकडून शिकत होता.

ते सोन्याचे कण चाचांनी अगदी काळजीपूर्वक पातेलीत टाकले आणि जवळजवळ 20 मिनिटं ते धगधगत्या आचेवर ते कण तापवले.

त्या दरम्यान एका चिमट्याच्या मदतीने ते पातेलं बाहेर काढायचे आणि त्यावर मीठ टाकायचे जेणेकरून सोन्याचे कण पातेलीवर चिपकू नये,

आग आता चांगलीच भडकली होती. आणखी काही मिनिटांनंतर त्या धगधगत्या आगीत अदृश्य झालेली पातेली चिमट्याने उचलून बाहेर काढली आणि कुंडीसारख्या एका भांड्यात ठेवली.

आता चमकणारा अंड्यासारखा तुकडा पातेलीत पडला आणि धगधगत होता. चाचांनी तो तुकडा त्याच चिमटीतून उचलून पाण्याच्या एका पात्रात टाकून त्याला थंड केलं.

हे होतं सोनं. शुद्ध सोनं. कचऱ्यातून काढलेलं.

सिराजच्या डोळ्यासमोर ते काढलं होतं. सिराजला हे काम अतिशय आवडलं होतं.

तो चाचांबरोबर येऊन दररोज गोदाममध्ये हे काम करण्याची त्याची इच्छा आहे मात्र हे काम गावात होऊ शकत नाही याचीही त्याला जाणीव आहे. कारण गावात सगळंकाही आहे पण मदरबोर्ड नाही. सोनं तयार करणारा कचरा तिथे नाही.

कराचीमध्ये ई-कचऱ्यापासून सोनं काढणाऱ्या लोकांचे सोनार लोकांशी चांगले संबंध आहेत.

सोनार या कारखान्यांमधून निघणाऱ्या सोन्याचं परीक्षण करतात. ते किती कॅरेटचं आहे त्याचं मोजमाप करतात. त्यानंतर त्या दिवशीच्या सोन्याच्या किमतीवरून सोन्याचा व्यवहार होतो.

या व्यवहारातून मिळणाऱ्या रकमेतून कारखान्याचे मालक आपला हिस्सा काढून बाकी मजुरांना रोजंदारीच्या हिशोबाने त्याचं वाटप करतात. कमाईचा एक भाग रसायनं, लाकडं खरेदी करण्यासाठी ठेवला जातो.

मदरबोर्ड कुठून येतात?

पाकिस्तान दरवर्षी 954 किलो ई-कचरा आयात करतो. त्यातला 433 किलो ई-कचरा देशातच तयार होतो.

ब्रिटन, अमेरिका. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूएई, इराण, हाँगकाँग, जर्मनी, स्पेन, कोरिया, थायलंड, आणि काही अरब देशात ई-कचऱ्याचा लिलाव होतो.

त्यानंतर तो पाकिस्तान, भारत, बांगलादेश आणि आफ्रिकेतल्या काही देशात पाठवला जातो.

यूरोप, ब्रिटन, यूएई, इराण, आणि सौदी अरेबियाच्या बंदरातून येणाऱ्या या सामानाला पाकिस्तानात पोहोचवण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतात.

त्यानंतर हे सामान कराचीच्या आंतरराष्ट्रीय बंदरावर उतरतं. मग वेगवेगळ्या कंटेनर्सच्या माध्यमातून ते शेरशाह भंगार बाजार आणि तिथून शहरातल्या वेगवेगळ्या भागात पोहोचतं.

आयात केलेल्या या सामानाचं ए, बी, सी आणि डी या प्रवर्गात वाटप होतं.

कचऱ्यातून निघणाऱ्या सोन्याची तपासणी

फोटो स्रोत, Ehsaan Sabz

फोटो कॅप्शन, सोनार कचऱ्यातून काढलेले सोने किती कॅरेटचे आहे हे पाहतो.

ए आणि बी प्रवर्गात सुरू असलेले डिव्हाइस असतात. ते त्याच अवस्थेत स्वस्तात विकले जातात. सी प्रवर्गात असलेल्या डिव्हाइसला दुरुस्तीची गरज असते आणि डी प्रवर्गातले डिव्हाइस असे असतात ज्यातून मौल्यवान सामना काढलं जातं आणि बाकी भंगार सामान विक्रेते घेऊन जातात.

हेच डी प्रवर्गातील सामान ई-कचरा म्हणून विकलं जातं.

ई-कचऱ्याची बाजारपेठ किती मोठी आहे?

पाकिस्तानात ई-कचऱ्याची बेकायदेशीर आयात, पुर्ननवीकरण (रिसायकलिंग) आणि असुरक्षित पद्धतीने प्रक्रिया यात सातत्याने वाढ होत आहे.

कराची, लाहोर, पेशावर, रावळपिंडी आणि फैसलाबाद मध्ये इ-वेस्टचं रिसायकलिंग आणि डंपिग सातत्याने होत आहे.

स्थानिक ई-कचरा वितरकाच्या मते शेरशाह मार्केटमध्ये ई-कचऱ्यावर काम करणारे डझनावारी अड्डे आहेत. त्यात लागोपाठ वाढ होत आहे. त्यातून लक्षात येतं की, ई-कचऱ्याचं रिसायकलिंग हा एक मोठा उद्योग झालेला आहे,

मात्र, ई-कचऱ्याच्या रिसायकलिंगची कोणतीच संघटित पद्धती नाही. एका व्यासायिकाने सांगितलं की, पेशावर, गुजरांवाला, लाहोर आणि फैसलाबाद हेही आता ई कचऱ्याचे केंद्र म्हणून उभे राहत आहेत.

या कामात छोट्या छोट्या व्यावसायिकांपासून मोठे मोठ्या कंपन्या सहभागी आहेत.

पाकिस्तान

फोटो स्रोत, Ehsaan Sabz

फोटो कॅप्शन, पाकिस्तान दरवर्षी सरासरी 954 किलो टन ई-कचरा आयात करतो तर 433 किलो टन ई-कचरा देशातच तयार होतो.

वितरक आणि गोदामाचे मालक त्यांचं नाव घेऊन तिथे येतात. मात्र त्यांना कोणत्यातरी उद्योगसमुहाचं पाठबळ असतं. ते कायद्यानुसार ई-कचरऱ्याच्या डंपिंगचा खर्च वाचवण्यासाठी त्यांना मदत करतात.

ई-कचरा अतिशय स्वस्तात उपलब्ध असल्यामुळे अनेक अप्रशिक्षित लोक आणि भंगारकाम करणारे लोक त्याकडे आकर्षित होतात हे सुद्धा त्यात लक्षात घेण्यासारखी आहे.

लोक त्यांचं काम सोडून इथे येतात कारण नफा जास्त आहेच पण तो ताबडतोब मिळतोसुद्धा.

मात्र, ई-कचऱ्यामुळे होणारं नुकसान हाही महत्त्वाचा मुद्दा आहे.

ई-कचऱ्याचा आरोग्य आणि पर्यावरणावर परिणाम

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ई-कचऱ्याचं रिसायकलिंग करताना निघणारे विषारी वायू, रसायनं, आर्सेनिक, शिशं, फॉस्फरस सारख्या धातूमुळे पर्यावरणातील इतर घटक आणि मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे.

कराची येथील स्थानिक डॉक्टर मन्सूर अल्वी यांच्या मते, ई- कचऱ्यामुळे अनेक आजार होतात. त्यात दमा, फुप्फुसांचे आजार, मुलांची शारीरिक वाढ खुंटणं, स्नायूंच्या समस्या, आतड्यांना सूज, श्वास घेण्यास समस्या, त्वचेचे आजार. पोटात आणि डोळ्यात संसर्ग यांचाही समावेश आहे.

ई-कचऱ्यातून निघणारा धूर गरोदर महिलांसाठीसुद्धा अतिशय धोकादायक आहे. या आजारामुळे असंगठित रिसायकलिंगच्या कामात सामील होणाऱ्या मजुरांना आणि लहान मुलांना त्रास होतो.

डॉ. अल्वी यांच्यामते, हे काम करताना कॅन्सरचा धोकाही वाढतो. बहुतांश मजूर वर्गाला धोका निर्माण होतो कारण त्यांना आधीच स्वच्छ पाणी आणि चांगल्या दर्जाचं खायला मिळत नाही. ई-कचऱ्यात विषारी आणि महागडे घटक असतात. त्यातून महागडे घटक काढण्याची किंमत माणसांचे जीव देऊन चुकवावी लागते.

ई-कचऱ्यावर प्रक्रिया करणे

पर्यावरण तज्ज्ञ अहसन तन्वीर सांगतात की, ई-कचऱ्यावर प्रक्रिया करताना खुल्या जागेवर तो जाळणं आणि आम्लांमध्ये तो गाळणं या बेकायदेशीर पद्धतींचा वापर होतो.

त्यातून विषारी वायू निघतातच आणि कोणत्याही प्रकारची चूक झाली तर स्फोटाचा धोकाही असतोच.

शिसं आणि जस्त यासारखे जास्त वजनाच्या धातूंचं हवेत धुरात रुपांतर होतं. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात.

जे मजूर या वातावरणात सातत्याने राहतात त्यांना धोका सर्वांत जास्त आहे.

अहसन तनवीर यांनी सांगितलं की कराचीमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, हवेत आणि मातीत जस्त आणि शिसं यांचं प्रमाण धोकादायक पातळीच्या वर आहे. “या धातूंमुळे लोकांच्या आरोग्याचं नुकसान होतंय आणि पर्यावरणाची हानीसुद्धा होत आहे. हवेत या धातूंचं प्रमाण जास्त असल्यामुळे तापमानावरही त्याचा परिणाम होत आहे.

मात्र सिराज आणि शाहीद यांना या आरोग्याच्या समस्यांचं अजिबात गांभीर्य नाही. ते पूर्णत: अनभिज्ञ आहे. आर्थिक अडचणींमुळे ते हा धोका पत्करायला तयार आहेत,

सिराज म्हणतो, “आम्हाला काहीही फरक पडत नाही. काही होणार नाही. जर व्हायचंच असतं शाहीद किंवा चाचा यांना कधीचंच झालं असतं. ते दोघं ठीक आहेत ना? सांगा तुम्हीच. चाचांना जखमा होतात. पण ते हाताला मलम लावतात आणि त्या जखमा ठीक होतात. जेव्हा जास्त धूर निघतो तेव्हा आम्ही चेहऱ्यावर कापड बांधतो.”

“आता मी बाहेर जाऊन वेगळं काम करेन तर आणखी खर्च होईल. येण्याजाण्याचं भाडंही लागेल. तसंही रोजंदारीचं काम सहज मिळत नाही. संपूर्ण शहर मजुरांनी भरलं आहे. ही एक कला आहे. ती प्रत्येकाला जमेल असं नाही. तसंही माझी आपली म्हणावी अशी माणसं इथे कुठे आहेत? जेव्हा मी हे काम योग्य पद्धतीने शिकेन तेव्हा मजुरीपेक्षा जास्त पैसे कमावेन. आम्ही थंड प्रदेशातील झुंजार लोक आहोत. हा धूर आमचं काहीही वाकडं करू शकत नाही,” असं सिराज म्हणतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)