झाकीर नाईक : पाकिस्तानात जाऊन मुलींना 'ना-महरम' म्हटल्याचा नवा वाद, काय आहे प्रकरण?

झाकीर नाईक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, झाकीर नाईक

झाकीर नाईक त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे, कट्टर भूमिकांमुळं आणि दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणं देण्यासाठी चर्चेत असतात.

काही देशांमध्ये त्यांच्या भाषण किंवा व्याख्यानांवर बंदीही घालण्यात आली आहे. आता पाकिस्तान दौऱ्यावर असलेले झाकीर नाईक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हा ताजा वाद नेमका काय आहे ते पाहूया.

वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक झाकीर नाईक यांना बुधवारी (2 ऑक्टोबर) पाकिस्तानात एका अनाथाश्रमातील अनाथ मुलींचा सन्मान करण्यासाठीच्या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आलं आलं होतं.

मात्र, झाकीर नाईक यांनी अनाथ मुलींचा सन्मान करण्यास नकार दिला.

मुली व्यासपीठावर येताच झाकीर नाईक मागे हटले. या मुली 'ना-महरम' असल्याचे सांगत ते बाजूला झाले.

झाकीर नाईक यांच्या या कृतीवर पाकिस्तानात प्रचंड टीका होते आहे.

इस्लाममध्ये 'ना-महरम' या संकल्पनेचा वापर ज्या मुलींशी थेट रक्ताचं नातं नसतं अशा अविवाहित मुलींसाठी केला जातो.

या घटनेशी संबंधित झाकीर नाईक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं आहे की, झाकीर नाईक यांच्या जवळ मुली येताच, ते व्यासपीठावरून बाजूला होतात.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

'ना-महरम' काय असतं?

पाकिस्तान स्वीट होम फाऊंडेशननं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ही संस्था अनाथ मुलींसाठी काम करते.

कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकानं या मुलींचा 'बेटी' अशा अर्थानं उल्लेख केला. झाकीर नाईक यांची त्यावर भूमिका होती की. या मुलींना 'बेटी' म्हणू शकत नाही आणि त्यांना स्पर्शही करू शकत नाही.

नाईक म्हणाले की, या मुली 'ना-महरम' आहेत.

पाकिस्तानातील अनेक जणांनी झाकीर नाईक यांच्या या कृतीबद्दल त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ते नाईक यांना तिरस्कार करणारे, दांभिक आणि महिलांना तुच्छ समजणारे म्हणत आहेत.

पाकिस्तानी पत्रकार उस्मान चौधरी यांनी या व्हिडिओची क्लिप शेअर करताना लिहिलं आहे. "पाकिस्तानचे माजी खासदार जमरूद खान यांनी सन्मान करण्यासाठी अनाथ मुलींना व्यासपीठावर बोलावलं. मात्र झाकीर नाईक या मुलींचा सन्मान न करताच व्यासपीठावरून निघून गेले. झाकीर नाईक म्हणाले की या मुली 'ना-महरम' आहेत."

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही झाकीर नाईक यांची भेट घेतली आहे.

फोटो स्रोत, @drzakiranaik

फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही झाकीर नाईक यांची भेट घेतली आहे.

इस्लाममध्ये ज्यांच्याशी रक्ताचं नातं नसतं ते 'ना-महरम' असतात. तर ज्यांच्याशी रक्ताचं नातं असतं ते 'महरम' असतात.

काही वर्षांपूर्वीपर्यंत सौदी अरेबियामध्ये महिलांना त्यांच्याशी 'महरम' नातं असणाऱ्या (रक्ताचं नातं) पुरुषांबरोबरच घराबाहेर पडण्याची सक्ती असायची.

महरम नात्यात भाऊ, पती, मुलगा, पुतण्या, मामा किंवा काका असू शकतात.

मात्र 2019 मध्ये सौदी अरेबियाचे युवराज (क्राऊन प्रिन्स) मोहम्मद बिन सलमान यांनी हा नियम बदलला. त्यामुळे आता तिथे मुली एकट्या देखील घराबाहेर पडू शकतात.

पाकिस्तानातील वकील बेनझीर यांनी झाकीर नाईक यांचा व्हिडिओ रीट्विट करत लिहिलं की, "डॉ. झाकीर नाईक एक धार्मिक विद्वान आहेत. ते पाकिस्तानचे पाहुणे आहेत.

मात्र महिलांबाबतची त्यांची ही भूमिका तिरस्कारानं भरलेली, दांभिक आणि महिलांना तुच्छ दाखवणारी आहे. हा प्रसंग या छोट्या मुलींसाठी किती लज्जास्पद आणि अस्वस्थ करणारा ठरला असेल. माझा इस्लाम असा नाही."

पाकिस्तानात झाकीर नाईकांवर टीकेची झोड

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पाकिस्तानातील मार्क्सवादी प्राध्यापक डॉ. तैमूर रहमान यांनी देखील या कृतीबद्दल झाकीर नाईक यांच्यावर टीका केली आहे.

त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं, "या अनाथ मुली होत्या. झाकीर नाईक यांनी या मुलींशी हस्तांदोलन करणं आणि त्यांच्या डोक्यावर मायेनं हात फिरवणं तर दूरचीच गोष्ट राहिली, मात्र त्या मुलींना सन्मान देणं देखील इस्लामच्या विरोधात आहे असं त्यांना वाटतं."

"ना-महरम ही संकल्पना वयस्क महिलांसाठी वापरली जाते. लहान मुलींसाठी नाही. शिवाय इथे कोणत्याही प्रकारे स्पर्श होण्याचा देखील मुद्दा नव्हता. अनाथ मुलींचा सन्मान करण्यासदेखील इस्लामचा विरोध आहे का?"

पाकिस्तानातील आणखी एक पत्रकार अब्बास नासीर यांनी देखील झाकीर नाईक यांच्या या कृतीबद्दल आक्षेप घेतला आहे.

त्यांनी लिहिलं की, "झाकीर नाईक यांना पाकिस्तान का बोलावण्यात आलं, या गोष्टीचंच मला आश्चर्य वाटतं आहे. झाकीर नाईक यांना पीएमएलएन सरकारनं निमंत्रण दिलं आहे. यासाठी राणा मशूद यांनी त्यांचं स्वागत केलं. आता पुढील चार आठवडे नाईक पाकिस्तानातील वैचारिक वातावरण प्रदूषित करतील."

तर आर्थिक बाबींबाबत लिहणारे पाकिस्तानी पत्रकार युसूफ नजर यांनी देखील नाईक यांचा व्हिडिओ रिपोस्ट केला आहे.

त्यात त्यांनी लिहिलं की, "झाकीर नाईक यांच्यासारखे विचार करणारे लोक पाकिस्तानातही आहेत. आणखी अशा माणसांची इथे आवश्यकता नाही."

दिल्लीतील जामिया मिल्लिया विद्यापीठात इस्लामिक स्टडी सेंटर चे प्रमुख राहिलेले अख्तरुल वासे यांना विचारण्यात आलं की पाकिस्तानात अनाथ मुलींच्या कार्यक्रमातील झाकीर नाईक यांच्या कृतीकडे ते कसं पाहतात?

त्यावर अख्तरुल वासे म्हणाले, "सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भारताला डिवचण्यासाठी पाकिस्ताननं झाकीर नाईक यांना निमंत्रण दिलं आहे. दोन्ही देशांमधील संबंध आधीच बिघडलेले असताना पाकिस्ताननं झाकीर नाईक यांना बोलावलं आहे."

"पाकिस्तान हा एक इस्लामिक देश आहे. तर झाकीर नाईक तिथे इस्लामची ज्या पद्धतीनं मांडणी करत आहेत. त्यावरून पाकिस्तान हा कशा प्रकारचा इस्लामिक देश आहे हे दिसून येतं."

बांगलादेश, श्रीलंका आणि ब्रिटनमध्ये बंदी

झाकीर नाईक भारतीय पोलिसांसाठी वाँटेड आहेत. त्याचबरोबर भारतात मनी लाँडरिंग करणं आणि द्वेष पसरवणारी भाषणं देण्याच्या प्रकरणांमध्ये देखील ते आरोपी आहेत.

भारतात दोन समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याचा आणि शत्रूत्वं वाढवण्याचा आरोप देखील झाकीर नाईक यांच्यावर आहे.

मात्र या आरोपांबाबत नाईक यांचं म्हणणं आहे की, त्यांनी भारतात कोणताही कायदा मोडलेला नाही. इस्लामबाबतच्या कट्टर धार्मिक विचारांमुळे झाकीर नाईक यांच्यावर बांगलादेश, श्रीलंका आणि ब्रिटन या देशांमध्ये देखील बंदी आहे.

झाकीर नाईक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, झाकीर नाईक

जर्मनीतील सरकारी वृत्तवाहिनी डीडब्ल्यूत कार्यरत असलेले प्रसिद्ध पाकिस्तानी विचारवंत परवेज हुदभाई म्हणाले, "झाकीर नाईक यांना पाकिस्तान सरकारकडून राजकीय पाहुणा म्हणून आमंत्रण देण्यात आल्याबद्दल मला दु:ख वाटतं. मात्र मला त्याचं आश्चर्य वाटत नाही. पाकिस्तान सरकार आगीत तेल ओतण्याचं काम करतं आहे."

"सौदी अरेबियात कट्टर, परंपरानिष्ठ इस्लाम मागे पडत चालला आहे. ते पुढचं पाऊल टाकत आहेत. मात्र पाकिस्तानात या प्रकारच्या विचारांना संरक्षण दिलं जातं आहे. झाकीर नाईक यांना सरकारनं पाहुणा म्हणून आमंत्रण देण्यातून हीच गोष्ट दिसून येते.."

झाकीर नाईक सध्या मलेशियात राहतात. तिथे देखील भावना दुखावणारी वांशिक स्वरुपाची वक्तव्ये केल्याबद्दल त्यांना माफी मागावी लागली होती.

ऑगस्ट 2019 मध्ये मलेशियातील पोलिसांनी झाकीर नाईक यांच्यावर सार्वजनिक सभांमधून उपदेश देण्यास बंदी घातली होती. त्यांच्या वक्तत्व्यांसंदर्भात मलेशियातील पोलिसांनी त्यांची अनेक तास चौकशी देखील केली होती.

अनेक गुन्हेगारी प्रकरणांसंदर्भात झाकीर नाईक भारतात वाँटेड आहेत. मात्र पाकिस्तानमध्ये त्यांचं जोरदार स्वागत केलं जातं आहे.

पाकिस्तानी पंतप्रधानांनी केलं होतं स्वागत

30 सप्टेंबरला झाकीर नाईक पाकिस्तानात आले होते. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये त्यांचे विविध कार्यक्रम होणार आहेत.

बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी झाकीर नाईक यांची भेट घेतली होती.

झाकीर नाईक यांची भेट होताच शहबाज शरीफ म्हणाले होते की, मुस्लिमांना झाकीर नाईक यांचा अभिमान वाटतो. कारण ते सर्व जगभरात इस्लामचा प्रचार आणि प्रसार करत आहेत.

शहबाज शरीफ यांनी झाकीर नाईक यांचं प्रचंड कौतुक केलं होतं. ते म्हणाले होते, "तुम्ही सर्व जगभरात अभूतपूर्व पद्धतीनं पवित्र कुराणातील मूल्यांचा प्रसार करत आहात. याशिवाय जगभरात इस्लामचा प्रचार-प्रसार देखील करत आहात."

"संपूर्ण मुस्लिम जगताला तुमचा अभिमान वाटतो. कारण तुम्ही खरा इस्लाम लोकांसमोर मांडत आहात. तुमचे उपदेश तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत."

झाकीर नाईक यांच्यावर भारतात अनेक गुन्हे दाखल आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, झाकीर नाईक यांच्यावर भारतात अनेक गुन्हे दाखल आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान पुढे म्हणाले, "मला स्वत:ला वैयक्तिक पातळीवर तुमच्या उपदेशांचा फायदा झाला आहे. तुमच्याकडून इस्लामची मूल्ये, विचार शिकायला मिळतात. पाकिस्तानातील लोकांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे."

"तुम्ही पाकिस्तानात आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला आहे. तुमची तब्येत चांगली आहे आणि तुमची मुलंदेखील इस्लामच्या सेवेचे कार्य करत आहेत, या गोष्टीचा मला आनंद आहे."

शहबाज शरीफ यांची 2006 मध्ये झाकीर नाईक यांच्याशी भेट झाली होती. त्या भेटीची आठवणही याप्रसंगी शहबाज शरीफ यांनी करून दिली.

शहबाज शरीफ यांच्या भेटीनंतर झाकीर नाईक म्हणाले, "संपूर्ण जगात पाकिस्तान हा एकमेव देश असा आहे, ज्याची स्थापना इस्लामच्या मूल्यांच्या आधारे आहे. पाकिस्तानात इस्लामच्या मूल्यांच्या अंमलबजावणीत वाढ होईल अशी मला आशा आहे."

"माझ्या माहितीप्रमाणे कुराण हीच त्यांची राज्यघटना आहे. पाकिस्तानात कुराण आणि हदीशची पूर्ण अंमलबजावणी व्हावी अशी माझी इच्छा आहे. माझं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. मी पाकिस्तानच्या पवित्र भूमीत आहे. अल्लाहनं माझी अनेक वर्षांची इच्छा पूर्ण केली."

झाकीर नाईक म्हणाले, "याआधी 33 वर्षांपूर्वी 1991 मध्ये मी पाकिस्तानात आलो होतो. मात्र तो माझा वैयक्तिक स्वरुपाचा दौरा होता. त्यावेळेस मी उपदेश देत नव्हतो. यावेळेस मात्र पाकिस्तान सरकारनं मला इथं यायचं आमंत्रण दिलं आहे."

"पाकिस्तानी लोक मला खूप प्रेमानं, आपुलकीनं भेटतात. मला सर्वाधिक आमंत्रणं पाकिस्तान येण्यासंदर्भात मिळाली होती. पाकिस्तानी लोकांना मला सांगायचं आहे की कुराण हे जगातील सर्वोत्तम पुस्तक आहे."

मलेशियामध्येही घालण्यात आले होते निर्बंध

धार्मिक तेढ वाढवण्याचा आरोप असलेले इस्लाम प्रचारक झाकीर नाईक यांनी भारतातून पलायन करून मलेशियात आश्रय घेतला होता. पण मलेशियातही धार्मिक तेढ वाढवणारं वक्तव्य केल्याबद्दल ते मलेशियन सरकारच्या रडारवर आले होते.

भारतीय मुस्लीम प्रचारक झाकीर नाईक यांच्यावर मलेशियामध्ये भाषण करण्यास बंदी घालण्यात आली होती. हिंदू आणि चिनी-मलेशियन लोकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं ही कारवाई करण्यात आली होती.

देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बंदी घालण्यात आल्याचं मलेशियन अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं.
नाईक यांनी माफीनामा प्रसिद्ध केला होता. आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, FACEBOOK / ZAKIR NAIK

देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बंदी घालण्यात आल्याचं मलेशियन अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं.

नाईक यांनी माफीनामा प्रसिद्ध केला होता. आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

कोण आहेत झाकीर नाईक?

नाईक यांचा जन्म मुंबईत ऑक्टोबर 1965 मध्ये झाला. पेशाने ते डॉक्टर होते. पण 1991मध्ये इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनची (IRF) स्थापना केल्यानंतर ते पूर्णवेळ प्रचारक झाले.

इस्लामचे टीव्हीवरील प्रचारक (Televangelist) म्हणून ते प्रसिद्ध आहेत. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचं पीस टीव्ही (Peace TV) नावाचं चॅनल आहे. यावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत आणि व्याख्याते धर्माविषयीची व्याख्यानं देतात. 125 पेक्षा जास्त देशांमध्ये पीस टीव्हीचं प्रसारण होतं आणि ऑनलाईन स्ट्रीमिंगही होतं.

नाईक सोशल मीडियावरही प्रसिद्ध असून फेसबुकवर त्यांचे 17 मिलियन ( 1 कोटी 70 लाख) फॅन्स आहेत.

मनी लाँडरिंग आणि द्वेष पसरवणारी भाषणं केल्याप्रकरणी 2016 पासून भारतीय यंत्रणा नाईक यांच्या मागावर आहेत. प्रत्यक्ष हजर नसून मनी लाँडरिंगमध्ये सहभागी झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

मलेशियामध्ये देशव्यापी बंदी घालण्यात येण्याआधी नाईक यांच्यावर तिथल्या सात राज्यांमध्ये भाषण करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

गेल्या तीन वर्षांपासून झाकीर नाईक मलेशियामध्ये राहतात. त्यांना परत पाठवण्यात यावं अशी मागणी भारताने केली आहे. पण आतापर्यंत मलेशियन सरकारने त्यांच्या पर्मनंट रेसिडंट (PR) स्टेटसची पाठराखण करत नाईक यांच्यावर भारतात योग्य रीतीने खटला चालवला जाणार नाही, असं म्हटलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)