झाकीर नाईक सध्या काय करतात? : ग्राऊंड रिपोर्ट

फोटो स्रोत, Getty Images
- Author, झुबेर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी, क्वालालंपूरवरुन
इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक यांनी जवळपास तीन वर्षांपूर्वी भारत सोडून मलेशियामध्ये आपलं नवं आयुष्य सुरू केलं.
त्यानंतर अधून-मधून ते मोदी सरकार आणि हिंदू समाजावर करत असलेल्या टीकेमुळे चर्चेत असतात.
झाकीर नाईक सध्या काय करत आहेत आणि मलेशियात त्यांचं काय सुरु आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला.
यासाठी आम्ही मुंबईतल्या पीआर एजन्सीशी संपर्क साधून अधिकृत निवेदन दिलं. मात्र, आमची विनंती तात्काळ फेटाळण्यात आली.
तरीदेखील झाकीर नाईक यांची मुलाखत घेण्यासाठी आम्ही गेल्या आठवड्यात क्वालालंपूरमध्ये दाखल झालो.
झाकीर नाईक पुत्राजया या ठिकाणी राहत असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. क्वालालंपूरहून पुत्राजयाला जाण्यासाठी 40 मिनिटं लागतात.
या ठिकाणी मलेशिया सरकारची सरकारी कार्यालयं आणि निवासी भवन आहेत.
कधीकाळी हे ठिकाण रबराच्या झाडांसाठी प्रसिद्ध होतं. आज मात्र इथे गगनचुंबी इमारती आहेत.

इथे उभ्या असलेल्या सुंदर इमारती आणि विलोभनीय दृश्य मलेशियाच्या आर्थिक प्रगतीची साक्ष देतात.
आम्ही शुक्रवारी झाकीर नाईक यांची मुलाखत घ्यायचं ठरवलं. आम्हाला सांगण्यात आलं होतं की झाकीर नाईक दर शुक्रवारी या शहरातल्या मुख्य मशिदीत येतात.
आम्ही पुत्रजयामध्ये दाखल झालो तेव्हा त्या मशिदीत नमाज पठण करणाऱ्यांपेक्षा जास्त गर्दी पर्यटकांची होती. झाकीर नाईक दुपारी एक वाजेपर्यंत येतील, असं मशिदीच्या सुरक्षारक्षकांनी सांगितलं.
मात्र, आमच्याकडे बराच वेळ होता. त्यामुळे आम्ही झाकीर नाईक राहत असलेल्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला.
पाच मिनिटात आम्ही 'तमारा' रेसिडेंसी समोर उभं होतो. या परिसरात अनेक गगनचुंबी इमारती आहेत.
या रेसिडेंसीच्या सुरक्षा रक्षकांमार्फत आम्ही झाकीर नाईक यांना मेसेज पाठवला. सुरक्षारक्षकाने आमच्या पासपोर्टचे फोटो काढले.
यानंतर आम्ही झाकीर नाईक यांना भेटण्याची वाट बघत होतो. थोड्या वेळाने एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं की झाकीर नाईक संध्याकाळी पाच वाचता भेटतील.
दरम्यान आम्ही पुन्हा मशिदीत गेलो. थोड्या वेळानंतर झाकीर नाईक आपल्या सुरक्षारक्षकांसह मशिदीत पोचले.
त्यांना बघूत मशिदीतले लोक त्यांच्यासमोर झुकू लागले. त्यांच्याशी हस्तांदोलन करत होते.

फोटो स्रोत, Getty Images
ते दृश्य बघून आम्हाला कळून चुकलं की तिथे नाईक खरंच महत्त्वाचे नमाजी आहेत आणि या गर्दीत त्यांची भेट घेणं शक्य नाही.
मी माझा सहकारी दीपकला सांगितलं की हरकत नाही, आपण संध्याकाळी 5 वाजता त्यांना भेटू. संध्याकाळी पाच वाजता आम्ही त्यांच्या इमारतीच्या परिसरात पोहोचलो.
यावेळी सुरक्षारक्षकांनी आम्हाला आत जाण्याची परवानगी दिली.
आत गेल्यावर आम्हाला एक व्यक्ती भेटली. आपण झाकीर नाईक यांचे सहकारी असल्याचं त्याने सांगितलं.
या व्यक्तीने आम्हाला तिथल्या दोन इमारतींच्या मध्ये असलेल्या एका छोट्या मशिदीत जायला सांगितलं.
आम्हाला सांगण्यात आलं की झाकीर नाईक दुपारनंतरच्या प्रार्थनेचं नेतृत्व करणार आहेत.
आम्ही मशिदीत गेलो तेव्हा झाकीर नाईक 50-60 लोकांपुढे उभे होते. इकडे भारतात मात्र हजारो लोक त्यांचं भाषण ऐकायला यायचे.
नमाज झाल्यानंतर ते बाहेर पडत असताना आमची त्यांच्याशी भेट घालून देण्यात आली.
त्यांनी आम्हाला मशिदीत बोलावलं आहे, म्हणजे ते आमच्याशी बोलतील, असं आम्हाला वाटलं होतं.
मात्र, ते थेट म्हणाले, "आरिफने (मुंबईत झाकीर नाईक यांचे संपर्कसूत्र) तुम्हाला सांगितलं नाही का की मी तुम्हाला मुलाखत का देणार नाही? बीबीसीवर विश्वास ठेवता येत नाही आणि तुमच्यावरही विश्वास ठेवता येत नाही. तुम्ही माझ्याशी पक्षपातीपणा करता."
हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. कारण सहसा जबाबदार व्यक्ती आम्हाला पक्षपाती म्हणत नाही.

मी विरोध नोंदवत म्हणालो, "बीबीसी पक्षपातीपणा करत नाही आणि मी माझ्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत हे पहिल्यांदात ऐकतोय."
हे ऐकताच झाकीर नाईक म्हणाले, "याचं कारण म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच अशा व्यक्तीला भेटत आहात जी पहिल्याच वेळी खरं बोलते."
मी त्यांना म्हणालो की मुलाखत घेण्यासाठी दिलेलं निवेदन फेटाळल्यानंतरही आम्ही इतक्या लांब आलोय. यावरुन आम्ही त्यांच्याविरोधातल्या आरोपांवर त्यांची बाजू जाणून घेऊ इच्छितो, हे स्पष्ट होतं.
यावर ते म्हणाले की ते एका बिगर-मुस्लिम व्यक्तीला मुलाखत देऊ शकता. मात्र, मला नाही.
ते त्यांच्या शाळेवर आधारीत 2016 साली छापून आलेल्या माझ्या एका स्टोरीचा उल्लेख करत म्हणाले, "मी तुम्हाला शाळेत येण्याची परवानगी यासाठी दिली होती कारण मला वाटलं की तुम्ही मुस्लीम आहात आणि आम्हाला समजून घेऊ शकाल."
मला वाटलं जणू झाकीर नाईक वरच्या पायरीवर उभ्या असलेल्या एखाद्या प्रेषिताप्रमाणे माझी निंदा करत आहेत.
आमची ही भेट मिनिटभरापेक्षा जास्त नव्हती. ते माझ्यावर नाराज आहेत की बीबीसीवर, हे मला कळत नव्हतं.

ब्रिटनने एकदा त्यांना त्यांच्या देशात येण्यापासून रोखलं होतं. मात्र, यासाठी बीबीसीवर नाराज होण्याची गरजच काय?
मला याचंही आश्चर्य वाटलं की 2016 मध्ये दुबईमध्ये असताना त्यांनी बीबीसीला मुलाखत द्यायला होकार का दिला होता. आम्ही एअरपोर्टला जाण्याआधीच त्यांनी मुलाखत रद्द केली, हा भाग निराळा.
त्यांना आमच्याशी बोलायचं होतं तर मलेशिया सरकारकडून त्यांना मीडिया इंटरव्ह्यू करण्याची परवानगी घेणं गरजेचं होतं, यावरही माझा विश्वास बसत नव्हता.
गेल्यावर्षी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की मलेशियाचे हिंदू मलेशियाचे पंतप्रधान मोहम्मद महाथीर यांच्यापेक्षा मोदींप्रती अधिक समर्पित आहेत. यावरून वादही झाला होता. त्यावेळी अशी वक्तव्यं करण्यापेक्षा धर्मोपदेशावर लक्ष केंद्रीत करण्याची ताकीद त्यांना देण्यात आली होती.
आम्ही जवळपास आठवडाभर मलेशियात होतो. याकाळात आम्हाला जाणवलं की झाकीर नाईक यांचा तिथे बऱ्यापैकी प्रभाव होता. मलेशियाच्या पेनांग राज्याचे उपमुख्यमंत्री वाय. बी. कुमारसामी यांनी आम्हाला सांगितलं की झाकीर नाईक यांनी मलेशियात एखाद्या अवतारी पुरूषासारखी प्रतिमा तयार केली आहे.
मलय समाजातील तरुण-तरुणींच्या मनात त्यांच्याविषयी श्रद्धा होती. क्वालालंमपूरमध्ये आम्ही मुस्लीम तरुणांच्या एका गटाला भेटलो.
या भेटीत आम्ही त्यांना प्रसिद्ध भारतीयांची नावं घ्यायला सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
एकाने सांगितलं, "मला केवळ झाकीर नाईक आणि गांधी माहिती आहेत." दुसऱ्या एका तरुणाने शाहरुख खान आणि झाकीर नाईक यांची नावं घेतली. तर एका मुलाला प्रसिद्ध भारतीयांमध्ये केवळ झाकीर नाईक यांना ओळखत होता.
प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीवर झाकीर नाईक यांचा प्रभाव जाणवत होता.
हाजवान सायफिक नावाच्या व्यक्तीने झाकीर नाईक यांच्याविषयी बोलताना सांगितलं, "ते इस्लामचे विद्वान आहेत. त्यांचं सखोल ज्ञान आणि तार्किक युक्तीवादांमुळे इस्लामशी संबंधित माझे सगळे गैरसमज दूर झाले आहेत."
ते पुढे म्हणाले,"ते (झाकीर नाईक) केवळ इस्लामशी संबंधित माहिती देतात, असं नाही तर बौद्ध, हिंदू आणि ख्रिश्चन धर्माविषयीही संगतात."
मात्र, मलेशियात राहणारे इतर धर्मीय विशेषतः हिंदू आणि बौद्ध धर्मीय लोकांना इस्लामशी त्यांच्या धर्माची तुलना करणं आणि त्यांच्या धर्मावर टीका करणं, योग्य वाटत नाही.
सोशल मीडियावर झाकीर नाईक यांच्या कट्टर समर्थकांशी तर्क-वितर्क करणारे एके अरुण यांच्या मते झाकीर नाईक मलेशिया समाजाची बहुसांस्कृतिक मूल्यं नष्ट करत आहेत.
त्यांचं म्हणणं आहे, "झाकीर यांच्या उपदेशांमध्ये ते इतर धर्मांचा अपमान करतात. त्यांना राक्षसी सांगतात. हे आमच्यासारख्या लोकांना पटत नाही. कारण आम्ही मानवता आणि सर्व वंश समान असल्याच्या विचारांचे आहोत."

फोटो स्रोत, Getty Images
ए. के. अरुण त्या तमाम भारतीय वंशाच्या लोकांपैकी एक आहेत ज्यांच्यावर झाकीर नाईक किंवा त्यांच्या समर्थकांनी अवमान याचिका दाखल केली आहे.
तीन वर्षं हा खटला लढल्यानंतर अरुण थकले आहेत. ते म्हणतात, "हा मानसिक दहशतवाद आहे. मला मानसिक त्रास झाला आहे. इतरांचंही असंच म्हणणं आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्ही खंबीर नसाल तर तुमचं आयुष्य खराब होतं."
पेनांग प्रांताचे उपमुख्यमंत्री वाय. बी. कुमारसामी यांच्यावरही अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.
झाकीर नाईक यांनी इस्लामिक धर्मोपदेश करावे. मात्र, हिंदू धर्मावर टीका करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला, असं कुमारसामी यांचं म्हणणं आहे.
झाकीर नाईक यांचे अनेक कट्टर समर्थक आहेत. त्यांना झाकीर नाईक यांचे शिष्य म्हटलं जातं.
यात 35 वर्षांच्या जमरी विनोथ यांचाही समावेश आहे. ते पाचव्या पिढीचे भारतीय तमिळ आहेत.
वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. इस्लाम धर्म जाणून घेण्यासाठी ते झाकीर नाईक यांच्या मुंबईतल्या शाळेतही राहिले होते.
विनोथ म्हणतात, "ते किंवा मी किंवा त्यांचा कुठलाही शिष्य भारतीय किंवा इतर कुठल्याच धर्माविषयी चुकीचं काही बोलत नाही. आम्ही सर्वच धर्मांची तुलना करून एकमेकांना जवळ आणण्याचा प्रयत्न करतो."
जमरी विनोथ सोशल मीडियावर भक्कमपणे झाकीर नाईक यांची बाजू मांडतात. मलेशियातील काही लोक वगळता बहुतांश लोकांनी झाकीर नाईक यांचं स्वागत केल्याचं ते सांगतात.

मलेशियात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असणारे काही हिंदू आपला विरोध करत असल्याचा त्यांचा दावा आहे.
आपलं कुटुंब आजही हिंदू असल्याचं आणि झाकीर हुसैन यांच्याकडून होणारी सर्व धर्मांच्या तुलनेबद्दल आपल्या हिंदू मित्रांचीही काहीच तक्रार नसल्याचं ते म्हणतात.
मलय समाजातले बहुतांश लोक झाकीर नाईक यांचं समर्थन करतात, हे खरं आहे.
मलेशियातल्या 3.3 कोटी लोकसंख्येपैकी 65 टक्के लोक मलय समाजाचे आहेत. या समाजातले बहुतांश लोक इस्लामधर्मीय आहेत. मलेशियात 20 टक्के लोक चीनी आहेत. ते बौद्ध धर्मीय आहेत. सात टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत आणि यापैकी बहुतांश तमिळ आहेत.
या अल्पसंख्याकांना झाकीर नाईक यांच्यापासून आपल्या धर्माला धोका असल्याचं वाटतं. मलेशिया सरकारने झाकीर नाईक यांना भारताच्या हवाली करावं, जेणेकरुन त्यांच्याविरोधात सुरु असलेले खटले निकाली काढता येतील, असं या लोकांचं म्हणणं आहे.
मात्र, पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांचे पूर्वज भारतीय असल्याने झाकीर नाईक यांचं प्रत्यार्पण महाथीर यांच्यासाठी सोपं नाही.
रामासामी सांगतात की पंतप्रधानांसाठी हे अवघड काम आहे. कारण तसं केल्याने मलय समाजाच्या भावना दुखावतील.
शिवाय मलय सरकारची अशी भावना आहे की झाकीर नाईक यांच्या प्रत्यर्पणासाठी भारत सरकारने जे पुरावे दिले आहेत ते कमकुवत आहेत.
झाकीर नाईक यांना भारतात न्याय मिळणार नाही, असं मलेशियाच्या पंतप्रधानांना वाटतं.
भारतात झाकीर नाईक यांच्याविरोधात वॉरंट निघालं आहे. त्यांच्यावर धार्मिक आधारावर तरुणांना भडकवण्याचा आरोप आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, मलेशियाचे पुढचे पंतप्रधान कोण असतील, यावर झाकीर नाईक यांना भारताला कधी सुपूर्द करण्यात येईल, हे अवलंबून असणार आहे.
पंतप्रधानपदाचे आघाडीचे उमेदवार अनवर इब्राहिम भारताचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र, त्यांनाही झाकीर नाईक यांच्या प्रत्यार्पणासारखं मोठं पाऊल उचलण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवावी लागेल.
सरकारशी संबंधित थिंक टँक कंपनीसाठी काम करणारे अरूण एस म्हणतात की झाकीर नाईक यांच्यावर देखरेख ठेवण्यात येते. ते म्हणतात, "आतापर्यंत त्यांनी मलेशियाच्या कुठल्याच कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. त्यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे सापडलेले नाहीत. मात्र, त्यांच्यावर कायम पाळत ठेवली जाते."
झाकीर नाईक यांचा जगातील सर्वाधिक वादग्रस्त धर्मोपदेशक होण्याचा प्रवास फार विचित्र आहे. त्यांचं एक लोकप्रिय टीव्ही चॅनल आहे पीस टिव्ही. मात्र, या चॅनलवर आता भारत आणि बांगलादेशात बंदी आहे. 1965 साली मुंबईतल्या मुस्लम बहुल डोंगरी भागात जन्मलेले झाकीर नाईक यांच्या कुटुंबात बरेच जण डॉक्टर आहेत. त्यांचे वडील आणि भाऊदेखील डॉक्टर आहेत.
1991 साली झाकीर नाईक यांनीदेखील आपली मेडिकल प्रॅक्टिस सोडली आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली.
त्यांचं हे फाउंडेशन आणि शाळा दोन्हीला सरकारने टाळं लावलं आहे.
पीस टीव्ही यांच्या त्यांच्या चॅनलचे जगभरात 2 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स असल्याचं मानलं जातं. भारत सरकारने त्यांच्याविरोधात खोटा खटला दाखल केला आहे आणि त्यांनी भारतातला कुठलाच कायदा मोडलेला नाही, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.
मलेशियात एक वाद किंवा एक चूक केल्यास तिथल्या कायद्यानुसार नाईक यांना भारताच्या हवाली करता येऊ शकतं.
सार्वजनिक व्यासपीठांवर जाण्यापासून लांब राहणं कदाचित अशी कुठली चूक होऊ नये, यासाठी उचललेलं खबरदारीचं पाऊल असू शकतं.
मलेशियात सध्यातरी त्यांना कसलाच धोका नाही. मात्र, मलेशियात त्यांची उपस्थिती धार्मिक समुदायांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचं जाणवू लागलं आहे.
त्यामुळेच झाकीर नाईक जितकी वर्षं मलेशियात राहतील मलेशियातील समाजात फूट वाढेल, असं काहींना वाटतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)










