संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी वेब सीरिजवर का नाराज आहेत लाहोरचे लोक ?

फोटो स्रोत, NETFLIX
- Author, मुनज्जा अनवार
- Role, बीबीसी उर्दूसाठी
गेल्या आठवड्यात 'हिरामंडी: द डायमंड बाजार' ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. 8 एपिसोड्सची ही सीरिज प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केली आहे.
या सीरिजची कथा ब्रिटीश राजवटीविरोधात भारतामध्ये झालेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. 1910 ते 1940 या काळात ही घडणारं हे कथानक आहे.
ही कथा फाळणीपूर्वी आणि स्वातंत्र्य चळवळीदरम्यान लाहोर शाही परिसरात म्हणजेच हिरामंडी येथे राहणारी नृत्यांगना किंवा तवायफ 'मलिका जान' आणि तिच्या कोठ्याच्या अवतीभवती घडते.
भव्य महाल आणि अत्यंत महागड्या झुंबर-कारंजांनी सजवलेले आकर्षक सेट; सोने, चांदी आणि मौल्यवान रत्नांचा कारागिरी असलेले पोशाख परिधान करणाऱ्या नायिका आणि मनिषा कोईरालाच्या अप्रतिम अभिनयासह या सीरिजमध्ये कॅमेऱ्याचीही कमाल पाहायला मिळते.
पण इतकं सगळं असतानाही ही सीरिज 1940 मधील लाहोरच्या हिरामंडीची योग्य प्रतिमा मांडण्यात अपयशी ठरते.
ज्या सेटवर केवळ सजावटीचीच इतकी धडपड असेल, तिथं खोलवर जाणाऱ्या मानवी भावना दाखवणं तसं दुर्मिळच. भन्साळीसुद्धा इथेच अपयशी ठरताना दिसतात.
सलग आठ तास सीरिज पाहिल्यावर मला जाणवलं ते म्हणजे या मालिकेत भरलेली 'कृत्रिमता'. मालिकेत प्लॉट, स्क्रिप्ट, डायलॉग काहीच नाहीये.
अभिनेत्रींची शैली इतकी कृत्रिम आहे की त्यात फाळणीपूर्वीच्या तवायफांच्या संस्कृतीची झलक दिसतच नाही. याच गणिका ज्यांना तवायफ म्हटलं जायचं त्यांच्याकडे उच्चभ्रू वर्ग आपल्या मुलांना मूल्य, संस्कृती आणि उर्दू भाषेतील बारकावे शिकवण्यासाठी त्यांच्याकडे पाठवत असत.
भन्साळींनी आपल्या सेटवर ज्यापद्धतीची घरं दाखवली आहेक, तसं एकही घर तुम्हाला हिरामंडीमध्ये दिसणार नाही, असं लाहोरचे लोक म्हणतात.
त्यांच्या म्हणण्यानुसार त्या परिसरात अनेक मजले असलेले मोठमोठे कोठे आणि घरं होती. या सीरिजमध्ये चित्रित केलेल्या इमारतींचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.
याशिवाय यामध्ये अशा काही चुका आहेत की एवढ्या बिग बजेट मालिकेच्या संशोधनावर काही पैसे खर्च केले असते बरं झालं असतं, असं पाहताना वाटतं.
हिरामंडीत काय दाखवलं आहे?
सुमारे 200 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या मालिकेला संजय लीला भन्साळी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणतात. हा लेख लिहित असताना ही सीरिज नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर होती.
या सीरिजमध्ये, मलिका जान ही 'शाही महल' या हिरामंडीमधल्या सर्वांत सुंदर, मोठ्या हवेलीची मालकीण आहे आणि हिरामंडीतील सर्व वेश्या तिला आपा (दीदी) म्हणतात.
शाही महलची मालकिण बनण्यासाठी मलिका जानने तिच्याच मोठ्या बहिणीची (सोनाक्षीने भूमिका साकारलेली रेहाना) हत्या केलेली असते.
काही वर्षांनंतर रेहानाची मुलगी फरीदान (सोनाक्षी सिन्हा) तिच्या आईच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आणि शाही महलच्या चाव्या ताब्यात घेण्यासाठी येते.
इथूनच त्यांच्यात छुपं युद्ध सुरू होतं, दोघी डाव-प्रतिडाव खेळत राहतात.

फोटो स्रोत, NETFLIX
या छुप्या संघर्षाचा सर्वांत मोठा फायदा ब्रिटिश सरकारला होत असतो.
हा तो काळ आहे जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ जोमात होती आणि या भागातील तवायफही त्यात सक्रिय होत्या.
भन्साळींच्या या ड्रीम प्रोजेक्टमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, फरदीन खान, फरीदा जलाल, शर्मीन सेगल आणि ताहा शाह यांसारखे कलाकार आहेत.
ही सीरिज मोईन बेग यांनी लिहिली आहे.
त्याची पटकथा संजय लीला भन्साळी यांनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे.
सिरीजमध्ये गडबड नेमकी काय आहे?
या सीरिजमध्ये नेमकं चुकलं काय आहे?
उदाहरण घ्यायचं झालं तर या सीरिजच्या चौथ्या एपिसोडमधला एक सीन आहे. यामध्ये आदिती राव हैदरी (बब्बो जान) नवाजकडे तिची बहीण आलमजेबने ताजदारला लिहिलेलं पत्र घेऊन जाते.
या प्रसंगात तिच्या मागे कपाटात ठेवलेल्या पुस्तकांमध्ये उमैरा अहमद यांची पीर-ए-कामिल ही कादंबरी आढळते.
हा सीन फाळणीपूर्वीचा आहे आणि पीर-ए-कामिल 2004 मध्ये प्रकाशित झाली होती.
अजून एका सीनमध्ये सोनाक्षी सिन्हा (फरीदन) वाचत असलेले वृत्तपत्र 2022 सालामधलं आहे आणि सोनाक्षीने हातात धरलेल्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर कोरोना विषाणूची बातमीही छापली आहे.
या बातम्यांमध्ये सांगण्यात आलंय की, तुमचा आत्मविश्वास तुम्हाला कोरोना विषाणूशी लढण्यासाठी मदत करू शकतो.
वर्तमानपत्राच्या नावाबाबत 'मीम्स'ची वेगळीच मालिका सुरू आहे.
लाहोरवासियांना राग आलाय, कारण...
या मालिकेवर सर्वाधिक राग लाहोरवासियांचा आहे.
पत्रकार आणि विश्लेषक सबाहत झाकिया यांच्या आईने या सीरिजचा पहिला भाग अर्धाच पाहिला.
त्यांची तक्रार आहे की त्या हिरामंडी येथे राहणाऱ्या अनेक डॉक्टरांना, कॉलेजच्या प्राचार्यांना ओळखतात.

फोटो स्रोत, NETFLIX
हिरामंडीत केवळ वेश्या राहतात, असं दाखवण्यावर त्यांचा आक्षेप आहे.
मूळची लाहोरची असलेली हमद नवाजने ही मालिका पाहिल्यानंतर एका थ्रेडद्वारे त्यावर जोरदार टीका केली.
ती म्हणते की, हिरामंडीमध्ये 'हिरामंडी'शिवाय सर्व काही आहे.
त्यांनी सेटवरील एका फोटोची तुलना खऱ्याखुऱ्या हिरामंडीतल्या एका भागाशी करत प्रश्न उपस्थित केला की, हा सेट नेमका कुठे आहे?
खऱ्या जागेवर चित्रपट बनवण्याचा दावा असेल तर हवं ते दाखवू नये
आजही, लाहोरच्या जुन्या इमारतींपैकी सर्वात वेगळं काही दिसत असेल तर ते म्हणजे शाही किल्ला, त्याच्या लगतची मशीद आणि तिचे मिनार हा परिसर ग्लॅमरने भरलेला नसून इथे शोषण, गुलामगिरी आणि गरिबी होती.
तिथे राहणारे लोक प्रत्यक्ष जीवनात जसे होते तसे दाखवायला हवं होतं, असं तिचं मत आहे.

फोटो स्रोत, @PERVAIZALAM/X
राफी म्हणतात- ज्याप्रमाणे क्लिनिक या चित्रपटात लाहोरला व्हेनिसप्रमाणे दाखवलं होतं, त्याचप्रमाणे 'हिरामंडी'मध्ये संजय लीला भन्साळी यांनी अशा रस्त्यावर गाड्या चालवल्या आहेत, जिथे मध्यम आकाराची गाडी आली तरी रस्त्यावर चालणाऱ्यांना भिंतींना चिकटून बसावे लागेल.
एखाद्या काल्पनिक विषयवार चित्रपट बनवला तर तुम्हाला हवं ते दाखवण्याचा मुभा असते, असं ते म्हणतात. पण ही खऱ्या जागेवर आधारित कथा असल्याचा दावा केला जात असेल तर प्रत्यक्ष आणि कल्पना यात आपण इतकं अंतर ठेऊ नये.
या मालिकेतील तवायफ आणि इतर कलाकारांच्या बोलण्याची शैली आणि हावभाव यावरही समीक्षकांनी आक्षेप घेतले आहेत.

फोटो स्रोत, SOFISCHOOL
याबाबत वकास अल्वी म्हणतात की, लाहोरच्या 'बाजार-ए-हुस्न' हिरामंडीतील सर्व तवायफांचा संबंध लखनौशी कसा काय? त्या पंजाबी शैलीत किंवा भाषेत का बोलत नाहीत? उर्दूची इतकी वाईट शैली का?
इतका मोठा फरक संजय लीला भन्साळींना कोणीच कसा सांगितला नाही.
शर्मीन सेगलला मुख्य भूमिकेत ठेवण्यावरही काही समीक्षकांचा आक्षेप आहे.
भन्साळी काल्पनिक जग निर्माण करतात
मात्र, काही प्रेक्षक भन्साळीचा बचाव करतात आणि म्हणतात की त्यांची निर्मिती वास्तवाशी कधीही संबंधित नसते.
खऱ्या घटनांचा प्रभाव असला तरीही ते असं काल्पनिक जग तयार करतात ज्याचा वास्तवाशी काहीच संबंध नाही.
ते संगीताबरोबरच सुंदर सेट, दृश्यं बनवतात. माहितीसाठी आपल्याकडे पुस्तकं आणि माहितीपट आहेत, असाही बचाव काही जण करतात.
ज्या प्रेक्षकांना ही सीरिज खूप आवडली आहे ते समीक्षकांना 'सिनेमाचा आनंद घ्यायला शिका' असं सांगत आहेत. मनोरंजन, कला तसंच ताजदार आणि आलमजेब यांच्या प्रेमकथेचा आनंद घ्या, असं म्हणत आहेत.











