हिंदी चित्रपटात दलित पात्रांना हिरोची भूमिका का मिळत नाही?

लगान चित्रपट

फोटो स्रोत, LAGAAN FILM

    • Author, वंदना
    • Role, बीबीसी न्यूज

"कचरा ये खेल की आख़िरी गेंद है. हमका अभी जीतने के लिए पाँच दौड़ बाकी है. तुझे ही गेंद सीमा पार करनी होगी कचरा. नहीं तो तीन गुना लगान. हम सबकी ज़िंदगी तोहरे हाथ में है कचरा. कुछ कर कचरा."

हा संवाद वाचून तुमच्या डोळ्यासमोर लगेचच ‘लगान’ चित्रपटातील दृश्य उभं राहिलं असेल. कचरा हे या चित्रपटातील दलित पात्र होतं. झोमॅटो कंपनीने अलीकडेच आपल्या जाहिरातीत या पात्राचा आधार घेतल्याने वाद निर्माण झाला होता. काही लोकांनी या जाहिरातीला जातीयवादी असल्याचं म्हटलं होतं.

यानंतर कंपनीला ही जाहिरात मागे घ्यावी लागली.

ही सर्व परिस्थिती पाहता 2001 मध्ये आलेल्या ‘लगान’ या चित्रपटातील कचरा हे दलित पात्र खरोखरच जातियवादी होतं का? असा प्रश्न उपस्थित होतो.

लगानमध्ये कचरा हे पात्र वठवणारा अभिनेता आदित्य लखिया म्हणतो, "लगान मध्ये कचरा हे खूप सशक्त पात्र होतं. लगान प्रदर्शित झाला तेव्हा तर कोणाला हे पात्र अमानवीय पद्धतीने चित्रित केल्याचं वाटलं नव्हतं. मग आज 25 वर्षांनंतर ते अचानक अमानवीय कसं वाटू लागलं?"

"हे पात्र 1893 सालावर बेतलेलं आहे. आणि कचरा त्या काळाला सुसंगत असं समर्पक पात्र होतं. झोमॅटोच्या जाहिरातीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ती जाहिरात मागे घेणं योग्य आहे. आपल्याला याचं वाईट वाटलं कारण आपले विचार चांगले आहेत."

पण या प्रकरणाची सुरुवात झाली दिग्दर्शक नीरज घायवानच्या एका ट्वीटमुळे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, "आशुतोष गोवारीकरच्या ऑस्कर-नामांकित चित्रपट लगानमधील कचरा हे पात्र चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात अमानवीय पात्रांपैकी एक आहे."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

चंद्रभान प्रसाद हे अमेरिकेतील जॉर्ज मेसन विद्यापीठाशी संलग्न स्कॉलर आहेत.

ते म्हणतात, "पूर्वी दलितांची नावं अशा पद्धतीने ठेवली जायची की आपल्याला त्यांचा तिरस्कार वाटेल. जसं की, पडोह (ड्रेनेज), कटवारू म्हणजे कचरा. त्यामुळे आमिर खानच्या चित्रपटातील किंवा झोमॅटोच्या जाहिरातीतील कचरा हे पात्र त्यांनी मुद्दाम तयार केलेलं नाही. त्यांच्यासाठी हा विचारसरणीचा एक भाग आहे, याला पर्मनंट रिकॉल म्हणतात कारण या गोष्टी वर्षानुवर्षे सुरू आहेत.”

आदित्य लाखिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आदित्य लाखिया

पण ‘लगान’ मधील कचरा ही व्यक्तिरेखा सोडली तर हिंदी चित्रपटांमध्ये अशा कितीशा दलित व्यक्तीरेखा दाखवण्यात आल्यात?

जातीच्या मुद्द्यांवर चित्रपट बनविणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी 2022 मध्ये ‘झुंड’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्यातलं आंबेडकरांचं दृश्य खूपच लोकप्रिय झालं.

बीबीसी मराठीशी बोलताना नागराज सांगतो की, "अमिताभ बच्चन यांच्यासारख्या मोठ्या अभिनेत्याने आंबेडकरांसमोर हात जोडण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती."

अछूत कन्या ते सुजातापर्यंतचा प्रवास

जात आणि चित्रपटांचं समीकरण समजून घेण्यासाठी आपल्याला भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासाचा मागोवा घ्यायला हवा. 1936 सली ‘अछूत कन्या’ नावाचा चित्रपट आला होता. यात अशोक कुमार हे सवर्ण असतात तर देविका राणी या दलित असतात. त्यामुळे दोघांचं लग्न होत नाही.

चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात देविका राणीचे पती आणि अशोक कुमार यांच्यात रेल्वेच्या रुळावर जबरदस्त हाणामारी होते. मात्र दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात देविका राणीचा रेल्वेखाली जीव जातो. शेवटी काय तर, जातिभेदाची किंमत दलित मुलीलाच चुकवावी लागते.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1959 मध्ये बिमल रॉय यांनी ‘सुजाता’ नामक चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात अभिनेत्री नूतन यांना एका ब्राह्मण कुटुंबाने दत्तक घेतलेलं असतं. त्या अस्पृश्य समाजातील असल्याने त्यांच्या दत्तक आईने त्यांचा कधीच स्वीकार केला नव्हता.

लगान चित्रपट

फोटो स्रोत, LAGAAN FILM

शेवटी आईचा जीव वाचवण्यासठी नूतन आपलं रक्त देते तेव्हा त्यांची आई त्यांचा मनापासून स्वीकार करते.

आपल्याला स्वीकारावं यासाठी नूतनला स्वतःला सिद्ध करावं लागतं.

सक्षम दलित पात्रांची कमतरता

चंद्रभान प्रसाद विचारतात की, चित्रपटामध्ये जेव्हाही एखादं दलित पात्र घेतलं जातं तेव्हा त्याची प्रतिमा नेहमीच अशक्त, अपयशी अशी का असते? त्याचा चेहरा नेहमीच वेढब, भेसूर का असतो? त्याचं नाव कचरा किंवा याच पठडीतलं का असतं? एखादं दलित पात्र सुंदर का असू शकत नाही?

त्यांच्या मते दलितांचं शोषण दाखवणं हे जरी वास्तवावर आधारित असलं तरी वास्तव व्यक्तिनिष्ठ असतं.

आपल्या म्हणण्याचं स्पष्टीकरण देताना चंद्रभान प्रसाद सांगतात की, "भारताच्या इतिहासात असा एकही यशस्वी दलित नाहीये का, की ज्याच्यावर आधारित चित्रपट बनवता येईल? बाबू जगजीवन राम हे तर भारतातील मोठे नेते होते, बॅटल ऑफ कोहिमा मध्ये चांभार रेजिमेंटने महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. गुरु रविदासांनी वादविवादात सर्वांना पराभूत केलं होतं. इतकी पात्र तर आहेत आपल्यात इतिहासात."

‘अंकुर’ या चित्रपटाने विद्रोहाचं बीज पेरलं

तसं बघायला गेलं तर 70 ते 80 च्या दशकात आलेल्या समांतर चित्रपटांनी दलितांचं शोषण अगदी बारकाईने दाखवलं.

1974 मध्ये श्याम बेनेगल यांनी ‘अंकुर’ चित्रपट बनवला. यात शबाना आझमी (लक्ष्मी) आणि तिचा बेवडा मूकबधिर पती जात, लिंग आणि सत्तेच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाचे चेहरे आहेत.

गावातला तरुण जमीनदार शिक्षित असतो, तो स्वयंपाकीण म्हणून शबानाला कामावर ठेवतो. गावच्या लोकांचा या गोष्टीला विरोध असतो.

अंकुर चित्रपट

फोटो स्रोत, Ankur

यातच शबाना आणि जमीनदार यांच्यात संबंध प्रस्थापित होतात. पण एका दलित बाईच्या मुलाचा पिता होणं जमीनदाराला मान्य नसतं. पुढे लक्ष्मीचा पती गावाकडे येतो तेव्हा जमीनदार त्याला चाबकाने मारहाण करतो.

हे सगळं बघणारा मुलगा जमीनदाराच्या घरावर दगड फेकून मारतो. अंकुर चित्रपटातील हे शेवटचं दृश्य अतिशय बोलकं आहे. एका अर्थाने शोषणाविरुद्धच्या बंडखोरीला अंकुर फुटल्याचं यातून दाखविण्यात आलंय.

जातीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न

1984 साली आलेल्या गौतम घोष यांच्या 'पार' या चित्रपटाने शोषणाच्या साऱ्या सीमा पार केल्या. ‘पार’ ही बिहारमधील दोन भूमिहीन दलित मजुरांची कथा आहे. जातीच्या नावाखाली झालेल्या हिंसाचारात या मजुरांची घरं जाळली जातात. हे मजूर पळून कोलकात्याला येतात.

पण इथं आल्यावर नौरंगिया (नसीरुद्दीन) आणि रमा (शबाना) यांना जाणीव होते की, इथे पण आपलं काहीच भविष्य नाहीये. गावाकडे परतण्यासाठी तिकिटाला पैसे हवे असतात. ते जमविण्यासाठी 30 डुकरांच्या कळपाला पुर आलेल्या नदीच्या पार न्यायचं असतं. अशात रमा गरोदर असते.

जवळपास 12 मिनिटांचं हे दृश्य बघताना अंगावर शहारे येतात. त्यांना हे काम देणारा व्यक्ती म्हणतो की, या जातीचे लोक डुक्कर हाताळण्याचं काम चांगलं करतात.

सिने चौपाल नावाचं यूट्यूब चॅनल चालवणारे ज्येष्ठ पत्रकार अजय ब्रह्मत्मज म्हणतात की, अशा भूमिका, पात्र नेहमीच दुर्बल दाखवली जातात.

दलित पात्रांच्या चित्रणावर प्रश्न उपस्थित झाले तरी 80 च्या दशकापर्यंत ही पात्रं चित्रपटांमध्ये दाखवली जात होती.

90 च्या दशकानंतर दलित पात्र चित्रपटांमधून गायब

जसं जसं 90 चं दशक येऊ लागलं, तशी भारतीय सिनेसृष्टी ग्लोबल होऊ लागली. बॅंडिट क्वीन सारखे चित्रपट सोडले तर दलित पात्र हिंदी चित्रपटांमधून गायब होऊ लागली.

पार चित्रपट

फोटो स्रोत, PAAR FILM

‘दामुल’ चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या प्रकाश झा यांनी 2011 मध्ये अरक्षण हा चित्रपट बनवला होता.

बऱ्याच अवधीनंतर तयार झालेल्या या चित्रपटात आधुनिक हिंदी चित्रपटसृष्टीतील मुख्य प्रवाहातील अभिनेता सैफ अली खानने दलित पात्र साकारलं होतं. हे पात्र तरुण, शिक्षित, सक्षम तर होतंच, शिवाय जशास तसं उत्तर देणारं होतं.

‘मसान’ ते ‘न्यूटन’ - शिक्षित, सक्षम दलित हिरो

दिल्लीच्या जवाहरलाल विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक हरीश एस वानखेडे यांनी दलित चित्रपटांवर लिखाण केलंय.

ते सांगतात, "मर्यादा असतानाही हिंदी चित्रपटांमध्ये बदल दिसू लागलेत. जसं की, ‘न्यूटन’ चित्रपटाच उदाहरण घ्या. अमित मसुरकरच्या या चित्रपटात राजकुमार रावला नव्या पठडीतला दलित नायक म्हणून पुढं आणण्यात आलंय."

न्यूटन चित्रपटातलं एक दृश्य

फोटो स्रोत, Newton film

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हरीश वानखेडे सांगतात की, न्यूटनच्या भूमिकेत असणारा राजकुमार राव शिक्षित तरुण असून निवडणुका पार पाडण्याचं महत्वाचं काम करत असतो.

ते म्हणतात, "सरकारी अधिकारी या नात्याने त्याच्यावर नैतिक जबाबदारी आहे. तो भ्रष्ट नाहीये. ‘जंजीर’ चित्रपटात ज्या पद्धतीची भूमिका बच्चन यांनी केलीय, अगदी त्यालाच साजेशी भूमिका राजकुमारची होती असं म्हटलं तर वावगं ठरू नये."

"आपण त्याच्या जातीबद्दल केवळ अंदाज लावू शकतो. त्याच्या खोलीत आंबेडकरांचा फोटो दिसतो. जेव्हा तो लग्नाचं स्थळ नाकारतो तेव्हा त्याला बोलणी खावी लागतात की, तुला ब्राम्हण किंवा ठाकूरांच्या घरातली मुलगी मिळणार नाहीये. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दलित महिलांच्या चित्रणातील बदल. नुकतीच आलेली वेबसीरिज दहाड मध्ये सोनाक्षी सिन्हा दलित महिला पोलिस आहे. कटहल या वेबसीरिजमध्येही तशीच कथा आहे. त्यांची स्वतःची प्रतिष्ठा आहे आणि त्या सशक्त महिला म्हणून दाखवण्यात आल्यात."

याचं अगदी उत्तम उदाहरण 2015 मध्ये आलेल्या नीरज घायवानच्या ‘मसान’ चित्रपटात पाहायला मिळतं. चित्रपटाचा नायक दीपक (विकी कौशल) डोम समाजाचा असतो. डोम समाज गंगेच्या किनाऱ्यावर मृतदेहाला अग्नी देण्याचं काम करतो. यातला नायक जातीच्या बंधनातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नशील असतो.

2019 मध्ये आलेल्या ‘आर्टिकल 15’ या चित्रपटात देखील जात आणि लिंग यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या मुख्य भूमिकेत असलेला आयुष्मान खुराना त्याच्या वरिष्ठांना विचारतो, "सर ये तीन लडकियां अपनी दिहाडी में सिर्फ तीन रुपए अधिक मांग रही थीं. जो मिनरल वाटर आप पी रहे हैं, उसके दो या तीन घूंट के बराबर. उनकी इस ग़लती की वजह से उनका रेप हो गया सर. उनको मारकर पेड पर टांग दिया गया ताकि पूरी जात को उनकी औकात याद रहे.”

पण अजय ब्रह्मत्मज आणखीन एक प्रश्न उपस्थित करतात की, ज्या पद्धतीने एखादा सवर्ण दलितांवर अत्याचार करतो त्याच पद्धतीने आजही हिंदी चित्रपटांमध्ये दलितांचा रक्षक म्हणून कोणीतरी सवर्णच का असतो? ‘आर्टिकल 15’ मध्येही तसंच दाखवलंय.

दलित आकलनाचा अभाव

अजय ब्रह्मत्मज यांच्या मते, तामिळ आणि मल्याळम भाषांमध्ये जाती आधारित चांगले चित्रपट तयार होतायत. त्यांच्या चित्रपटांमधील जे दलित आकलन आहे ते हिंदी चित्रपटांमध्ये दिसत नाही.

मसान

फोटो स्रोत, MASAN

2021 मध्ये आलेल्या कर्णन या तमिळ चित्रपटात सुरुवातीच्या दृश्यात एक लहान मुलगा बसवर दगड फेकताना दिसतोय. कारण त्यांच्या जातीमुळे या गावात एकही बस थांबत नाही, अगदी गरोदर महिलेसाठी देखील नाही.

मराठी चित्रपट फॅन्ड्री मध्ये दाखवलेल्या मुलाचा आक्रोश आणि कर्णन या तामिळ चित्रपटात दाखवलेल्या मुलाचा आक्रोश अगदी सारखा आहे. त्यांना माहीत आहे की आपण आपल्या जातीपलीकडे आपली ओळख कधीच प्रस्थापित करू शकणार नाही. म्हणूनच शेवटच्या दृश्यात तो रागाने जमावावर दगडफेक करतो.

हेच दृश्य तुम्हाला 1974 च्या ‘अंकुर’ चित्रपटामध्येही दिसतं.

हा आक्रोश दलित पात्रांची ताकद आहे असं म्हणायचं की, जातीच्या जोखडात बांधून ठेवण्याचा प्रयत्न?

चित्रपटात जातीच्या बंधनातून मुक्त आणि तटस्थ पात्र दाखवणं सकारात्मक पाऊल आहे का? की जातीय शोषणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहणं चित्रपट निर्मात्यांची जबाबदारी आहे?

हरीश एस. वानखेडे यांच्या मते, "भले ही नव्या चित्रपटांमध्ये सशक्त अशी दलित पात्र दाखवली जात असतील, मात्र दलितांच्या मुद्द्यावर ही पात्र तटस्थ आहेत असं म्हणता येणार नाही. प्रकाश झा यांच्या 'परीक्षा' नामक चित्रपटात दलित बापाच्या अडचणींसोबत त्याच्या आकांक्षाही दाखवण्यात आल्यात. हा फार काही मोठा बदल म्हणता येणार नाही. मात्र चित्रपट हळूहळू लोकशाहीकडे मार्गक्रमण करू लागलेत."

यावर अजय ब्रह्मताज प्रश्न उपस्थित करतात की, हिंदी चित्रपटात आजही दलित पात्रांना नायकत्व का मिळालेलं नाही? विकी कौशलने मसान मध्ये भूमिका केली तेव्हा तो या क्षेत्रात नवीन होता. पण आजच्या घडीला मुख्य प्रवाहातील एखादा अभिनेता दलित भूमिका करेल का?

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)