हिरामंडी : गणिकांची जिथे सत्ता होती, पण अफगाण आक्रमणानंतर देह व्यापार सुरू झाला आणि

फोटो स्रोत, BHANSALIPRODUCTIONS/TWITTER
- Author, जयदीप वसंत
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
‘जिन लाहौर नहीं वेखिया, ओ जम्या नहीं’ म्हणजेच ‘ज्यानं लाहौर पाहिलं नाही, तो जन्मलाच नाही’
पाकिस्तानातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहराबद्दल असं म्हटलं जातं. लाहोरचा प्रसिद्ध किल्ला, वझीर खानची मशीद, ऐतिहासिक रेल्वे स्टेशन, मिनार-ए-पाकिस्तान, आलमगीर औरंगजेब बादशाही मशीद, लाहोरची खाद्यसंस्कृती याबद्दल खूप काही बोललं जातं. लाहोरची ओळख सांगताना या गोष्टींचा मोठ्या अभिमानाने उल्लेख केला जातो.
पण याच लाहोरमधली एक अशी जागा आहे, जी प्रसिद्ध होती, पण तिच्याबद्दल बोलणं टाळलं जातं. ती जागा म्हणजे ‘हिरामंडी.’ ही लाहोरमधलं हे ठिकाण ‘बदनाम गली’ म्हणूनही ओळखली जाते.
पण हिरामंडीबद्दल आता चर्चा सुरू असण्याचं कारण म्हणजे नेटफ्लिक्सवर आलेली ‘हिरामंडी’ नावाची वेबसीरीज.
या सीरिजच्या टीझरमध्ये म्हटलं आहे, “संजय लीला भन्साळी तुम्हाला अशा जगाची सफर घडवत आहेत, जिथे गणिका या राण्या होत्या.”
जवळपास 450 वर्षांचा इतिहास असलेला हा भाग एकेकाळी नृत्य, गाणं आणि अदब यांसाठी ओळखला जायचा, पण हळूहळू ही ओळख बदलत गेली आणि केवळ आनंद-मनोरंजानासाठी ही जागा वेगळ्याच कारणासाठी ओळखली जाऊ लागली.
हिरामंडी मार्केट

फोटो स्रोत, Getty Images
हिरामंडीचं आताचं जे नाव आहे, ते अडीचशे वर्षांपूर्वी सापडलं, जेव्हा इथे नाचगाण्याचा व्यवसाय होऊ लागला.
पण अकबराच्या काळात लाहोर हे एक महत्त्वाचं केंद्र होतं. हैदरी गली, शेखपुरिया, तिब्बी गली, हिरामंडी आणि फोर्ट रोड भागातील नोव्हेल्टी चौक हा सगळा भाग ‘शाही मोहल्ला’ म्हणून ओळखला जायचा.
सध्याच्या काळात ज्या लोकांना हिरामंडीला जायचं असतं, पण या भागाचं नावही घ्यायचं नसतं, ते लोक रिक्षा-टॅक्सीवाल्यांना ‘शाही मोहल्ला’ असाच पत्ता सांगायचे.
मुघलांच्या काळात या भागातले अनेक कोठे सुरू झालेले. हा त्यांच्या कलेसाठी सुवर्णकाळ होता.
कंजार आणि मिरासी समुदायानं मुख्यतः हा भाग वसवला होता. कंजार समुदायातल्या मुली या मुख्यतः नाच-गाण्याचा व्यवसाय करायच्या. मिरासी समुदायातले लोक हे वादन करायचे. बऱ्याचदा ते या मुलींचे ‘उस्ताद’ असायचे. त्यांना नृत्य-गायन याची तालीम द्यायचे. या मुलींनाच ‘तवायफ’ म्हटलं जायचं. त्यांच्यापैकीच एखादी या कोठ्याची मालकीण व्हायची.

फोटो स्रोत, Getty Images
पंजाबी भाषेत उंच, एकाहून जास्त मजले असलेल्या इमारतीला ‘कोठा’ म्हणतात. सहसा, या इमारतींच्या सर्वांत वरच्या मजल्यावर मुजरा सादर केला जायचा.
या व्यवसायाच्या अवतीभोवती फिरणारे इतर अनेक उद्योग इथं आकाराला येत गेले. वाद्यांची दुकानं, सौंदर्यप्रसाधनं, कपडे, फुलांची दुकानं, खाण्या-पिण्याची ठिकाणं अशी एक अर्थव्यवस्थाच इथे उभी राहायला लागली.
मुघलांच्या या काळात सरदार, आमीर-उमराव यांची ऊठबस या भागात असायची. सण-उत्सवाच्या काळात या तवायफांचे नृत्याचे कार्यक्रम महालांमध्ये आयोजित केले जायचे.
ज्येष्ठ रंगकर्मी त्रिपुरारी शर्मा यांच्या मते (अदृश्य, सीझन-1, एपिसोड- 5) आपण आताच्या काळात ‘कोठा’ हा शब्द ज्या संदर्भांनी वापरतो, तो योग्य नाहीये. त्याकाळी कोठे हे कलेचं केंद्र असायचे. तिथे नृत्य, संगीत, गायन व्हायचं. इथले लोक स्वतःला ‘कलाकार’ म्हणवून घ्यायचे. लेखन, शेरो-शायरी केली जायची.
“इथल्या महिलांनी स्वतःला घराच्या चार भिंतीत कोंडून घेतलं नव्हतं. त्या पुरुषांसोबत मोकळेपणाने, बरोबरीने वावरायच्या. कल्पनांची-शब्दांची देवाणघेवाण व्हायची. इथला संवाद हा अभिरूचीने युक्त असायचा. अनेकदा समाजाच्या वरच्या स्तरातील लोक संवाद कौशल्य, सामाजिक देवाणघेवाणीची कला शिकण्यासाठी या ठिकाणी यायचे.”
1598 नंतर लाहोर हा मुघल राजवटीचा केंद्रबिंदू होता. पण या भागाची प्रतिष्ठा आणि प्रभाव कायम राहिला. औरंगजेबाच्या काळात इथली बादशाही मशीद बांधली गेली.
हिरामंडीवरचा ‘कलंक’

फोटो स्रोत, Getty Images
निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा कलंक या चित्रपटात स्वातंत्र्यपूर्व काळातील लाहोर दाखवण्यात आलेलं. याच सिनेमात हुस्नाबाद या जागेचा उल्लेख आहे. कलंकमधलं हे हुस्नाबाद हिरामंडीवरूनच बेतलेलं होतं.
मुघलांची सत्ता कमकुवत होत असतानाच, दक्षिणेत मराठ्यांची ताकद वाढत होती. मराठ्यांच्या या सामर्थ्याला आव्हान दिलं अहमदशाह अब्दाली याने. अफगाणिस्तानच्या दुर्रानी वंशातील हा शासक होता. त्याने भारतावर अनेकदा चढाई केली होती.
पंजाब, राजपुताना आणि उत्तर भारतावर आक्रमण करणाऱ्या अब्दालीने जिंकलेल्या प्रदेशातील अनेक महिलांना गुलाम बनवलं होतं. त्याच्या शिपायांनी हिरामंडी जवळच्या धोबीमंडी आणि मोहल्ला दारा शिकोह या भागांमध्ये कुंटणखाने सुरू केले होते.
या कुंटणखान्यात येणारे लोक काही कलेच्या ओढीने वगैरे यायचे नाहीत. इथे काही नातेसंबंधही आकाराला यायचे, पण त्यांना काही सामाजिक मान्यता नव्हती. मुलांना त्यांच्या वडिलांचं नाव नाही मिळायचं. मुलगी झाली तर ती आईचाच हा ‘व्यवसाय’ पुढे चालवायची. सुना मात्र कधीही या व्यवसायात यायच्या नाहीत.
दुर्रानींची आक्रमणं थोपविण्यासाठी मुघल सरदार जंगजंग पछाडत होते. मुघल-अफगाण, मराठा-अफगाण आणि नंतर शीख-अफगाण असे संघर्ष सुरू होते. या भागातील लोकांसाठी हा सगळा काळ अनागोंदी, अस्थिरतेचा होता. या प्रदेशातली सुबत्ता ओरबडली जात होती. याचकाळात अनेक महिला या व्यवसायात ढकलल्या गेल्या. स्वाऱ्या-मोहिमांमध्ये विधवा झालेल्या, कुटुंबाचा आधार हरविलेल्या अनेक महिला उदरनिर्वाहासाठी या व्यवसायात आल्या.
तिबिगली नावाचा भाग हा वेश्याव्यवसायासाठी ओळखला जायचा. इथल्या महिला इतक्या असहाय परिस्थितीत होत्या की अनेकदा छोट्या रकमेसाठीही देह विक्रयाला तयार व्हायच्या.
राजा रणजित सिंह यांची प्रेमकहाणी

फोटो स्रोत, Getty Images
अफगाण आक्रमकांनी जेव्हा अमृतसरमधल्या सुवर्णमंदिराचा विध्वंस केला, तेव्हा शीख समुदायामध्ये मोठा असंतोष उफाळला. त्यांनी अफगाणांना तितक्याच जोरकसपणे प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली.
शीखांच्या रेट्यानंतर अहमदशाह अब्दालीच्या वारसांनी लाहोरमधून माघार घेतली. लाहोर शिखांच्या ताब्यात आलं.
लाहोरच्या किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकला. इथली अस्थिरता दूर झाली आणि पुन्हा एकदा या शहराला त्याचं जुनं वैभव प्राप्त व्हायला लागलं.
शीख राज्यकर्त्यांनी या तवायफ आणि त्यांच्या आसपासच्या व्यवसायांमध्ये फारसा हस्तक्षेप केला नाही. याचं एक कारण महाराजा रणजित सिंह यांची प्रेमकहाणी असू शकते.
1799 मध्ये रणजित सिंह यांनी लाहोरचा ताबा मिळवला. 1801 मध्ये त्यांचा राज्याभिषेक केला गेला. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं 20 वर्षं. 1802 च्या दरम्यान रणजित सिंह आणि कंजार समुदायातली नर्तकी मोरा यांचे प्रेमसंबंध जुळले.
या दोघांना लाहोर किंवा अमृतसरमध्ये भेटणं शक्य नव्हतं. त्यामुळे ते माखनपूर इथे भेटायचे. ते मोराचं गाव होतं.
रणजित सिंह यांच्या आयुष्यावर संशोधन करणाऱ्या मनवीन संधू यांच्या मते, रणजित सिंह यांनी समाजाच्या विरोधात जात तिच्यासोबत विवाह केला. अमृतसरजवळच्या शेरिफपुरा भागात तिची व्यवस्था केली. त्यांनी तिच्या नावे मोरा सरकार या नावाने नाणीही पाडली.
पण राजा असले तरी रणजित सिंह हे अकाल तख्ताहून श्रेष्ठ नव्हते. त्यामुळेच मोरासोबत लग्न केल्याबद्दल त्यांना चाबकाच्या फटक्यांची शिक्षा सुनावली आणि आर्थिक दंडही सुनावला.
रणजितसिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातही सत्ता संघर्ष सुरू झाला. त्याच काळात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी आणि शीख समुदायामध्येही संघर्ष सुरूच होता. या सगळ्या संघर्षात शीख सत्ता कमकुवत होत गेली.
राजा रणजितसिंह यांचे थेट वंशज दलिप सिंह वयाच्या दहाव्या वर्षी गादीवर आले. रणजित सिंह यांचे दिवाण होते ध्यान सिंह. याच ध्यान सिंह यांचे पुत्र हिरा सिंह डोग्रा हे नवीन राजे दलिप सिंह यांचे दिवाण बनले.
लाहोरमधील धान्याच्या बाजाराला याच दिवाणांच्या नावावरून हिरामंडी असं नाव पडलं. इथल्या धान्यांच्या दुकानांच्या वरच्या मजल्यावर तवायफ त्यांची कला सादर करायच्या.
29 मार्च 1849 मध्ये कंपनी सरकारने लाहोर आणि कोहिनूर हिरा या दोन्हींचा ताबा घेतला.
ब्रिटीशांच्या काळातील हिरामंडी

फोटो स्रोत, Getty Images
1857 ला उठाव झाला. लखनौ, दिल्ली, आग्रा, कानपूर, मीरत आणि लाहोर या उठावाची प्रमुख केंद्रं होती. कारण ही सगळी शहरं लष्करी छावण्या होती.
या उठावादरम्यान कलावंतिणींनी भारतीय सैनिकांना खूप मदत केली. ब्रिटीशांना त्याची कल्पना नव्हती अशातला भाग नाही. त्यामुळे उठावानंतर जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली आणि भारताची सूत्रं ब्रिटिश सरकारकडे आली, तेव्हा या कलावंतिणींच्या परिस्थितीत काही फरक पडला नाही.
1871 साली जेव्हा क्रिमिनल ट्राइब्ज अॅक्ट संमत करण्यात आला, तेव्हा पारधी, गारुडी, नटभजनीसारख्या जमातींसोबतच कंजार समुदालायालाही गुन्हेगारी समाजांच्या यादीत टाकण्यात आलं. त्यामुळे या समाजामधल्या महिलांची परिस्थिती अजूनच खालावली.
प्रोफेसर शर्मा यांच्या मते, 1857 च्या उठावानंतर ब्रिटीशांनी त्या प्रत्येक संस्थेला, समुदायाला, व्यक्तिंना विरोध करायला सुरूवात केला, जे त्यांच्यासाठी भविष्यात धोका ठरू शकले असते. कलावंतिणींनी उठावात सैनिकांना मदत केली होती, त्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रिया होत्या.
पण ब्रिटिश काळात तवायफ म्हणजे देहविक्री करणारी महिला अशीच प्रतिमा तयार केली गेली. या व्यवसायासाठी पोलिस चौकशी, परवाना इत्यादी गोष्टी आवश्यक केल्या गेल्या. यामुळे पोलीस त्यांना वाटेल तेव्हा तपासाच्या, छाप्यांच्या नावाखाली यायचे, कागदपत्रं मागायचे. कोणतीही सभ्य व्यक्ती अशा ठिकाणी जाणं टाळणारच जिथे सतत पोलिसांचं येणजाणं असेल. त्यामुळे हळूहळू लोकांच्या मनातली ‘कोठा’ या जागेची प्रतिमा डागाळत गेली. कोठ्यांना प्रतिष्ठा राहिली नाही.
नंतर काय बदललं?

फोटो स्रोत, Getty Images
दादासाहेब फाळके यांनी 1913 साली भारतातील पहिला चित्रपट बनवला. त्यानंतर भारतात सिने इंडस्ट्री उभी राहायला सुरूवात झाली. पण त्याकाळी बायका सिनेमात काम करायच्या नाहीत. त्यामुळे नाटकांप्रमाणेच सिनेमातही स्त्रीभूमिका पुरूषच करायचे. याच काळात तवायफांनी सिनेमात काम करायला सुरूवात केली.
1931 साली भारतातली पहिला बोलपट ‘आलम आरा’ रिलीज झाला. बोलपटामुळे गाणी, गझल, संगीत यांनाही सिनेमात जागा मिळाली आणि त्यामुळेच या कलावंतिणींच्या आवाजाला, गायनकलेला पुन्हा दाद मिळायला लागली.
विभाजनपूर्व भारत आणि सध्याच्या पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेक अभिनेत्री, गायिकांची घराणी ही हिरामंडीशी संबंधित आहेत. काहीजण हे खुलेपणाने स्वीकारतात, पण काही जणांना त्यांचा हा भूतकाळ नकोसा वाटतो.
फाळणीच्या वेळीही अत्याचाराला बळी पडलेल्या काही स्त्रिया या हिरा मंडीमध्ये ढकलल्या गेल्या.
पाकिस्तानी लेखिका फौजिया सईद यांनी हिरामंडीवर ‘टॅबू : द हिडन कल्चर ऑफ रेड लाइट एरिया’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी मोहम्मद कंजार यांनी सांगितलेल्या काही नोंदी नोंदवल्या आहेत.
त्यानुसार, जनरल झिया उल हक यांच्या काळात (1978 ते 1988) या भागातील महिलांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. हा तोच काळ होता, जेव्हा इथे दारुचं व्यसन वाढीस लागलं.
अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत युनियनचं सैन्य घुसल्यानंतर तिथला ड्र्ग्जचा व्यापार वाढला. ड्रग्जचं हेच लोण हिरामंडीपर्यंतही पोहोचलं.
90 च्या दशकात तबला, सारंगी आणि इतर पारंपरिक वाद्यांची जागा आधी ऑडिओ कॅसेट्स आणि नंतर सीडींनी घेतली. फौजिया यांच्या पुस्तकात इथल्या काही महिलांनी मुजऱ्यांची जागा फिल्मी गाण्यांनी आणि पारंपरिक नृत्याची जागा अश्लील हावभावांनी घेतल्याची तक्रार केली.
इथल्या हॉटेल्स आणि इतर व्यावसायिकांनी अधिक भाडं आकारायला सुरूवात केली आणि इथल्या महिलांच्या अडचणीत अजूनच भर पडली.
अनेक शतकांपासून नृत्य, गायन या कलांची जोपासना करणारा हा भाग काळाच्या ओघात ‘तसली’ जागा म्हणून ओळखला जाऊ लागला. भविष्यात कदाचित इथे अजूनही बदल होत राहतील. पण सध्या तरी वेब सीरिजच्या निमित्ताने इथल्या भूतकाळाला उजाळा मिळतोय.











