'खिलजीने नालंदा विद्यापीठाला आग लावल्यावर जेव्हा तीन महिने नालंदा जळत होतं'

फोटो स्रोत, Tahir Ansari/Alamy
- Author, सुगातो मुखर्जी
- Role, लेखक
थंडीच्या दिवसात धुक्याने दाटलेली ती सकाळ होती. आमची कार एक घोडागाडीच्या मागे वळाली. पूर्व भारतातील बिहार राज्याच्या ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणावर घोडागाड्या दिसतात.
भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेल्या बोधगयात एक रात्र थांबून आम्ही नालंदाच्या दिशेने निघालो.
नालंदा शहराची ओळख तिथल्या विद्यापीठामुळेच आहे. हे नालंदा विद्यापीठ केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात मोठं शैक्षणिक केंद्र होतं. आज मात्र या विद्यापीठाचे केवळ अवशेषच शिल्लक आहेत.
इसवीसन 427 दरम्यान या विद्यापीठाची स्थापना झाली होती. हे जगातील पहिलं निवासी विद्यापीठ मानलं जातं. नालंदा विद्यापीठात पूर्व आणि मध्य आशियातून आलेले जवळपास दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते, तर या विद्यापठाच्या ग्रंथालयात हजारो हस्तलिखित ग्रंथ होते.
नालंदा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने वैद्यकशास्त्र, सांख्यदर्शन, तर्कशास्त्र, बौद्ध पंथाचे तत्त्वज्ञान असे अनेक विषय प्रतिष्ठित विद्वानांकडून शिकवले जात. दलाई लामा एकदा म्हणाले होते की, "नालंदा विदयापीठ हा आपल्या (बौद्ध) ज्ञानाचा मुख्य स्रोत होता."
सात शतकांहून अधिक काळ नालंदा विद्यापीठाची भरभराट होत राहिली. जगप्रसिद्ध असलेल्या या विद्यापीठाप्रमाणे जगात इतर कोणतंही विद्यापीठ नव्हतं.
ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि युरोपमधील सर्वात जुने विद्यापीठ अशी ख्याती असलेल्या बोलोग्ना विद्यापीठाच्याही आधी जवळपास 500 वर्ष हे विद्यापीठ अस्तित्वात होतं. नालंदामध्ये शिकवलं जाणारं तत्त्वज्ञान आणि धर्माविषयीचा दृष्टिकोन यामुळे आशियातील संस्कृतीला आकार मिळाला.

फोटो स्रोत, imageBROKER/Alamy
गुप्त सम्राटांच्या काळात नालंदा हे एक विश्वविद्यालय म्हणून समोर आलं. हे गुप्त राजे धर्माभिमानी हिंदू होते पण त्यांनी बौद्ध विद्यापीठाची स्थापना केली, कारण त्यांना त्यावेळच्या बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल आणि तात्विक लेखनाबद्दल सहानुभूती होती.
त्यांच्या कारकिर्दीत विकसित झालेल्या उदारमतवादी सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांमुळे नालंदाच्या बहुविद्याशाखीय शैक्षणिक अभ्यासक्रमाचा विकास झाला.
निसर्गावर आधारलेली आयुर्वेदातील उपचार पद्धती नालंदा विदयापीठात शिकवली जायची. आणि येथील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही उपचार पद्धती भारतभर पोहोचली. विद्यापीठाच्या परिसरातील भव्य इमारती, सभागृह, अध्यापनाचे कक्ष यातून इतर बौद्ध विद्यापीठांनी प्रेरणा घेतली.
नालंदा विद्यापीठाच्या भित्तिकामाने थायलंडमधील कलेवर प्रभाव टाकला. विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या धातूकामाचा प्रभाव तिबेट आणि मलायन द्वीपकल्पातील धातूकामात दिसून येतो.
पण नालंदा विदयापीठाचा सर्वांत महान आणि प्रदीर्घ वारसा म्हणजे गणित आणि खगोलशास्त्रातील यश.
प्राचीन भारतातील खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि भारतीय गणिताचे जनक म्हणून आर्यभट्ट यांची ओळख आहे. इसवीसन 6व्या शतकात ते नालंदा विद्यापीठाचे प्रमुख असल्याची शक्यता सांगितली जाते.
कोलकाता येथील गणिताच्या प्राध्यापक अनुराधा मित्रा म्हणतात की, "शून्याला अंक म्हणून मान्यता देणारे आर्यभट्ट पहिले गणितज्ञ होते. खरं तर ही क्रांतिकारी संकल्पना होती. यामुळे गणितीय संकल्पना सोप्या झाल्या. शिवाय त्यांनी बीजगणित आणि कॅल्क्युलस सारख्या क्लिष्ट विषयांतील संकल्पनांही सोप्या करून सांगितल्या."
त्या पुढे सांगतात की, "जर शून्याचा शोध लागला नसता तर कम्प्युटर अस्तित्वात आले नसते. त्यांनी चौरस आणि घनमूळ, त्रिकोणमिती, भूमिती विषयांचे नियम तयार केले. चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो हे सांगणारे ते पहिले व्यक्ती होते."

फोटो स्रोत, Dinodia Photos/Alamy
या कामामुळे दक्षिण भारतातील आणि अरबी द्वीपकल्पातील गणित आणि खगोलशास्त्राच्या विकासावर परिणाम झाला.
बौद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी नालंदा विद्यापीठातून चीन, कोरिया, जपान, इंडोनेशिया आणि श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये मोठमोठे विद्वान पाठवण्यात आले. या प्राचीन सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे संपूर्ण आशियामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार व्हायला मदत झाली.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नालंदा विद्यापीठाचा समावेश आहे. इसवी सन 1190 मध्ये बख्तियार खिलजी नावाच्या एका सुलतानाने हे विद्यापीठ जाळून उध्वस्त केलं.
यामुळे विद्यापीठाच्या मालमत्तेचे भयंकर नुकसान झालं, अतिशय मौल्यवान, दुर्मिळ ग्रंथ संपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. असं म्हणतात की विद्यापीठामध्ये इतकी पुस्तके होती की आग जवळपास तीन महिने सतत धुमसत होती. आज 23 हेक्टर उत्खनन केलेली जागा मूळ विद्यापीठाचा छोटासा भाग असल्याचं सांगितलं जातं.
मी या विद्यापीठाच्या भग्न इमारतींमधून फेरफटका मारला. चालत चालत मी लाल-विटांच्या उंच भिंती असलेल्या एका कॉरिडॉरमध्ये आलो. तिथून आत सरकत मी एका मठाच्या आतील भागात पोहोचलो.
माझ्यासोबत असलेल्या लोकल गाईड कमला सिंगने मला सांगितलं की, "हा एक अध्यपन कक्ष होता. या कक्षात एकावेळी तीनशे विद्यार्थ्यांना बसण्याची सोय करण्यात आली होती. तिथे शिक्षकांना बसण्यासाठी एका व्यासपीठाची सोय होती."
तिथूनच मी एका छोट्याशा खोलीत गेलो जिथे अफगाणिस्तान सारख्या दूर देशातील विद्यार्थी राहायचे. या खोलीत समोरासमोर असे दोन तेलाचे दिवे ठेवण्यासाठी जागा होती, विद्यार्थ्यांना स्वतःचं सामान ठेवण्यासाठी जागा होती, खोलीच्या प्रवेशद्वाराजवळ लहान, चौकोनी आकाराची पोकळी होती जे लेटरबॉक्सच्या स्वरूपात वापरलं जायचं.
जसं आज एखाद्या मोठ्या संस्थेत प्रवेश करताना कठीण अशा प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात, अगदी त्याचप्रमाणे नालंदा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अगोदर पात्रता परीक्षा द्यावी लागायची. शीलभद्र, धर्मपाल या नावंजलेल्या आचार्यांच्या हाताखाली शेकडो अध्यापक अध्यापनाचं काम करायचे.
जगातील प्राचीन नालंदा विद्यापीठाचे ग्रंथालय हे नऊमजली होतं. या ग्रंथालयात नऊ दशलक्ष हस्तलिखित ग्रंथ होते.
तिबेटचे बौद्ध विद्वान तारानाथ यांनी या ग्रंथालयाचं वर्णन करताना त्याला "आकाशाला गवसणी" घालणारी इमारत असं म्हटलं होतं. जेव्हा हे विद्यापीठ आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं तेव्हा आपला जीव वाचवून पळून जाणाऱ्या बौद्ध भिक्षूंनी काही हस्तलिखिते आपल्या सोबत नेली. आज ही हस्तलिखिते अमेरिकेतील लॉस एंजेलिस काउंटी म्युझियम ऑफ आर्ट आणि तिबेटमधील यारलुंग संग्रहालयात बघायला मिळतात.

फोटो स्रोत, REY Pictures/Alamy
प्राचीन भारताला भेट देणाऱ्या अनेक तत्कालीन पर्यटकांनी त्यांच्या नोंदींमध्ये नालंदा विद्यापीठाचा उल्लेख केलाय.
सातव्या शतकात प्रसिद्ध चिनी प्रवासी झुआनझांग याने नालंदाला भेट दिली. केवळ भेट देऊन न थांबता त्याने इथे दीर्घकाळ वास्तव्य करून अभ्यास केला आणि पुढे याच विद्यापीठामध्ये तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून काम केलं.
इसवी सन 645 मध्ये तो चीनला परतला तेव्हा त्याने सोबत 657 बौद्ध धर्मग्रंथ नेले. झुआनझांग जगातील बौद्ध विद्वानांपैकी एक होते, त्यांनी या ग्रंथातील काही भाग चिनी भाषेत अनुवादित करून एकच ग्रंथ तयार केला.
दोशो हा जपानी भिक्षू झुआनझांग यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आला होता. शिक्षण पूर्ण करून जपानला परतल्यानंतर त्याने बौद्ध धर्माचा प्रसार केला. त्यामुळे पूर्वेकडील देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचं श्रेय झुआनझांगला दिलं जातं.
झुआनझांगच्या नालंदा येथील प्रवासवर्णनात महान स्तूपाचा उल्लेख आढळतो. गौतम बुद्धांच्या पट्टशिष्यांपैकी एकाच्या स्मरणार्थ हा स्तूप बांधण्यात आला होता. मी त्या अष्टकोनी स्मारकाच्या अगदी समोर उभा होतो.

फोटो स्रोत, Sugato Mukherjee
मुंबईतील इतिहासाच्या शिक्षिका अंजली नायर मला याठिकाणी भेटल्या. त्यांनी या स्तुपाविषयी माहिती देताना सांगितलं की, "नालंदा विद्यापीठाच्या निर्मिती आधीच या स्तूपाची रचना करण्यात आली होती. सम्राट अशोकाने तिसऱ्या शतकात हा स्तुप बांधला होता. पुढच्या आठ शतकांमध्ये अनेक वेळा या स्तूपाची पुनर्बांधणी आणि पुनर्निर्मिती करण्यात आली. या विद्यापीठासाठी ज्या बौद्ध भिक्खूंनी आपलं संपूर्ण आयुष्य वाहिलं त्यांच्या अस्थी या स्तूपांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत."
बख्तियार खिलजी आक्रमण करून नालंदा पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. विद्यापीठ नष्ट करण्यामागे बख्तियार खिलजीचा हेतू नेमका काय होता यावर आजही विद्वानांमध्ये एकमत नाही.
भारतातील अग्रगण्य पुरातत्वशास्त्रज्ञ एच.डी. संकलिया 1934 साली लिहिलेल्या 'नालंदा विद्यापीठ' या त्यांच्या पुस्तकात लिहितात की, "या विद्यापीठाला लाभलेलं किल्ल्यासारखं स्वरूप आणि तिथं असणाऱ्या संपत्तीच्या कथांमुळे या विद्यापीठावर आक्रमण करण्यात आलं. तर काहींना वाटतं की, निव्वळ बौद्ध धर्माच्या असूयेपोटी हे आक्रमण झालं होतं."
ऑनसाइट संग्रहालयाचे संचालक शंकर शर्मा सांगतात की, "आक्रमण का झालं यामागचं निश्चित कारण सांगणं कठीण आहे."
शर्मा सांगतात की, "नालंदा विद्यापीठावर झालेला हा काही पहिला हल्ला नव्हता. 5 व्या शतकात मिहिरकुलातील हूणांनी या विद्यापीठावर हल्ला केला होता. पुढे 8 व्या शतकात बंगालच्या गौड राजानेही विद्यापीठावर आक्रमण केलं होतं."

फोटो स्रोत, Sugato Mukherjee
हूणांनी विद्यापीठावर हल्ला करण्यामागे लुटीचा उद्देश होता. मात्र बंगालच्या राजाने केलेला हल्ला हा नेमका कशासाठी होता हे सांगणं कठीण आहे. शिवाय त्या काळात शैव हिंदू आणि बौद्ध धर्मात वैमनस्य वाढत होतं, याचा परिणाम म्हणून दुसरा हल्ला झाला का? हे निश्चित सांगता येत नाही. मात्र दोन्ही हल्ल्यानंतर राज्यकर्त्यांच्या मदतीने विद्यापीठाची पुनर्बांधणी करण्यात आली.
शर्मा सांगतात, "खिलजीने विद्यापीठावर आक्रमण केलं त्यावेळी भारतातून बौद्ध धर्म नामशेष होण्याच्या मार्गावर होता. अशातच 8 व्या शतकापासून विद्यापीठाला संरक्षण देणाऱ्या पाल राजघराण्याचं पतन झालं आणि खिलजीने केलेल्या तिसऱ्या आक्रमणात तर विद्यापीठाचा शेवटच झाला."
1812 मध्ये स्कॉटिश सर्व्हेयर फ्रान्सिस बुकानन-हॅमिल्टन यांनी नालंदा विद्यापीठाच्या उत्खनननला सुरुवात केली असली तरी नालंदा विद्यापीठाचा शोध सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी 1861 मध्ये लावला.
या विद्यापीठातच असलेल्या एका लहान स्तूपाजवळ उभं राहून
मी एका तरुण भिक्षूंच्या जथ्याला न्याहाळत होतो. यातला एक तरुण तपस्वी ध्यानस्थ मुद्रेत बसून एक गौरवशाली भूतकाळाला श्रद्धांजली वाहतोय असं वाटलं.











