ऑटोमन साम्राज्याला महासत्ता बनवणारा तोफखाना ज्यानं बदलला युद्धाचा इतिहास

ऑटोमन साम्राज्य

फोटो स्रोत, FAUSTO ZONARO

    • Author, असद अली
    • Role, बीबीसी ऊर्दू, लंडन

एप्रिल १४५३. ऑटोमन साम्राज्याचा २१ वर्षांचा सुलतान दुसरा मेहमद याच्या फौजेने हजार वर्षांपासून टिकून असलेल्या बायझन्टाइन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपलला(आजचं इस्तंबूल) वेढा घातला आहे.

ऑटोमन फौजा या शहराच्या तटबंदीवर तोफगोळे डागत होत्या. त्या वेळी सुलतान दुसऱ्या महमूदाला १० वर्षांपूर्वी त्याचे वडील सुलतान दुसरे मुराद यांच्याशी झालेला एक संवाद आठवत होता.

कॉन्स्टँटिनोपलवर ऑटोमन फौजांनी मिळवलेल्या विजयाची कहाणी सांगणाऱ्या 'ऑटोमन' या 'नेटफ्लिक्स'वरील चित्रपटामधलं हे एक खास दृश्य आहे.

कॉन्स्टँटिनोपल हे विश्वाचं हृदय आहे, या शहरावर विजय मिळवणारा माणूस जगावर राज्य करेल, असं याच मजबूत तटबंदीसमोर उभं राहून सुलतान दुसरे मुराद यांनी 1443 साली आपल्याला सांगितलं होतं, त्याची आठवण सुलतान मेहमूदला येते.

या शहरावर विजय मिळवू पाहणाऱ्या सर्व सैन्यदलांना या तटबंदीने थोपवलं, असं त्याचे वडील त्याला म्हणाले.

कुस्तुनतुनियामधील विजय अजूनही युरोपच्या स्मृतींमध्ये जागा आहे

वडिलांचं बोलणं शहजादा असलेल्या मेहमूदने ऐकलं आणि कॉन्स्टँटिनोपल शहराची ही तटबंदी कोसळवत का नाही असं विचारलं. ही भिंत उद्ध्वस्त करू शकेल इतकं शक्तिशाली अस्त्र अजून तयार झालेलं नाही, असं त्याचे वडील म्हणाले. यावर मेहमूद आत्मविश्वासाने म्हणाला, "मी ही तटबंदी खाली आणेन. मी सुलतान होईन तेव्हा कॉन्स्टँटिनोपलवर विजय मिळवेन."

चित्रपटात 1443 आणि 1453 या वर्षांमधील दोन दृश्यांमध्ये एक बदल लक्ष वेधून घेणारा आहे.

सुलतान दुसरे मुराद कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच कुस्तुनतुनियाच्या बाहेर उभे असतात तेव्हा त्यांच्या मागे शक्तिशाली घोडदळ दिसतं, परंतु १४५३ साली सुलतान दुसरा मेहमद कुस्तुनतुनियापाशी येतो, तेव्हा गडगडाट ऐकू येतो. तोवर जगातील कोणत्याही शत्रूने आपल्यावर हल्ला करायला येणाऱ्या सैन्याचा इतका प्रचंड आवाज ऐकला नसेल.

"जगात आधी कधीच इतक्या संख्येने तोफा- त्या फौजेसोबत ६९ ते ७० तोफा होत्या- एकत्र दिसल्या नव्हत्या," असं चित्रपटात एक इतिहासकार म्हणतो.

शहजादा मेहमद सुलतान झाला तेव्हा आपल्या वडिलांना दिलेल्या वचनानुसार 1453 साली त्याने कुस्तुनतुनियाच्या मजबूत तटबंदीचा पाडाव केला आणि विश्वाचं हृदय असणारं हे शहर ऑटोमन साम्राज्याची नवी राजधानी म्हणून जाहीर केलं.

इतिहासकार गॅबोर ऑगस्टोन यांनी 'गन्स फॉर द सुलतान: मिलिट्री पॉवर अँड द वेपन्स इंडस्ट्री इन द ओटोमन एम्पायर' या पुस्तकात लिहिलं आहे की, वेढा घालून होणाऱ्या युद्धांमध्ये 1450 सालापर्यंत तोफांची भूमिका निर्णायक ठरू लागली होती, याचा एक दाखला म्हणून ऑटोमन फौजांनी कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच कुस्तुनतुनियावर मिळवलेल्या विजयाकडे पाहता येतं.

ऑटोमन साम्राज्य

फोटो स्रोत, NETFLIX

त्या काळातील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासोबतच मोठ्या संख्येने शस्त्रास्त्रं बनवण्यासाठी आवश्यक संसाधनं व सुविधा उपलब्ध असल्यामुळे ऑटोमन साम्राज्य युरोपीय प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अधिक बलशाली झालं.

'ऑटोमन' या चित्रपटात दाखवल्यानुसार, औरबान नावाचा एक कारागीर सुलतान दुसरे मेहमद यांच्या दरबारात हजर होतो आणि एका तोफेचं डिझाइन दाखवतो. या तोफांचे गोळे कुस्तुनतुनियाभोवतीची ऐतिहासिक भिंत कोसळवू शकतील, असा दावा त्याने केला.

या तोफा आठ मीटर लांब असतील आणि त्यांची किंमत १० हजार दुकत इतकी असेल, असं त्याने सांगितलं.

या वेळी सुलतान दुसऱ्या मेहमदाने त्या कारागिराला सांगितलं की, या तोफांनी कुस्तुनतुनियाची तटबंदी कोसळवली तर आहे त्याहून चार पट अधिक किंमत दिली जाईल, पण तीन महिन्यांत तोफा तयार व्हायला हव्यात.

उस्ताद औरबान हा अत्यंत कुशल कारागीर हंगेरीचा रहिवासी होता, असं इतिहासकार ऑगस्टोन यांनी 'जे-स्टोर'वर प्रसिद्ध केलेल्या एका लेखात नोंदवलं आहे.

त्यांनी लिहिल्यानुसार, औरबानने आधी कॉन्स्टँटिनोपलमध्ये बायझेन्टाइन राज्यकर्त्यांना या तोफेचं डिझाइन दाखवलं होतं, पण ते या तोफेसाठी इतकी रक्कम द्यायला तयार नव्हते आणि त्यांच्याकडे एवढी मोठी तोफ तयार करण्यासाठी आवश्यक संसाधनं होती.

ही परिस्थिती लक्षात घेऊन औरबान आता ऑटोमन राज्यकर्त्यांसमोर त्यांच्या तोफेचं सादरीकरण करायला आले होते.

सुलतान दुसरे मेहमद यांनी औरबानचा प्रस्ताव स्वीकारला. कॉन्स्टँटिनोपलच्या वेढ्यामध्ये तुर्कस्तानी कारागिरांनी तयार केलेल्या तोफांची भूमिका महत्त्वाची होती आणि ऑटोमन फौजा केवळ भडिमार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या (आणि या लेखात आपण ज्यावर बोलणार आहोत त्या) मोठ्या तोफांवर नव्हता, हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे.

ऑगस्टोन लिहितात त्यानुसार, ऑटोमन साम्राज्यातील कारागिरांनाही जहाजबांधणी, नायट्रस अॅसिड व दारूगोळा बनवण्याचं उत्तम कौशल्य होतं, याचे पुरावे देणारे अनेक दस्तावेज अभिलेखागारांमध्ये पडलेले आहेत.

औरबानने तोफा तयार केल्या आणि त्या कुस्तुनतुनियाच्या हद्दीवर पोचवण्यात येऊ लागल्या.

'पंधराव्या आणि सतराव्या शतकातील ऑटोमन तोफखाना आणि युरोपीय सैनिकी तंत्रज्ञान' या शीर्षकाच्या लेखात ऑगस्टोन यांनी अनेक ऐतिहासिक स्त्रोतांचा संदर्भ दिला असून, या देवहेकल तोफा ऑटोमन साम्राज्याची राजधानी एडिर्नमधून कॉन्स्टँटिनोपलकडे घेऊन जाण्याची प्रक्रिया त्यांनी निस्ताराने नोंदवली आहे.

या वाहतुकीसाठी ६० शक्तिशाली बैलांकडून खेचल्या जाणाऱ्या ३० बैलगाड्या वापरण्यात आल्या. बैलगाड्यांचा तोल बिघडून तोफा खाली पडू नयेत यासाठी दोन्ही बाजूला दोनशे शिपाई तैनात केलेले होते.

तोफांची वाट साफसूफ करण्यासाठी 50 कारागीर आणि 200 मदतनीस पुढून चालत होते. वाटेतील खराब भागात पुलासारखं बांधकाम करत जाणं, हे त्यांचं काम होतं. एडिर्नेहून कुस्तुनतुनियापर्यंतच्या या प्रवासाला जवळपास दोन महिने लागले आणि फेब्रुवारी-मार्च यात गेल्यावर कॉन्स्टँटिनोपलपासून पाच मैलांवर योग्य जागा पाहून तिथे या तोफा तैनात करण्यात आल्या.

ऑगस्टोन यांनी लिहिल्यानुसार कॉन्स्टँटिनोपलच्या वेढ्यादरम्यान या तोफा दिवसात केवळ सात वेळा डागता येत होत्या, आणि मे महिन्यात त्यांची दुरुस्ती करावी लागली. पण या तोफांमधील भरदार बॉम्बगोळ्यांनी कॉन्स्टँटिनोपलच्या तटबंदीचं बरंच नुकसान केलं आणि ऑटोमन साम्राज्याच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली.

ऑटोमन साम्राज्याचे असाधारण सामर्थ्य असलेले सुलतान

पंधराव्या-सोळाव्या शतकांमध्ये प्रत्येक गुणवान व काहीएक उद्दिष्ट राखणारी व्यक्ती ऑटोमन साम्राज्याकडे आकर्षित होत होती.

या साम्राज्याची इतर वैशिष्ट्यं होतीच, शिवाय तिथे "सामाजिक प्रगती साधण्याच्या संधी होत्या. त्या काळी युरोपात स्पेन व पोर्तुगाल इथे मुस्लिमांना आणि ज्यू लोकांना जबरदस्तीने धर्मांतर करायला भाग पाडलं जात होतं. असं न करणाऱ्यांना देश सोडून जाण्याव्यतिरिक्त दुसरा काही पर्याय नसायचा. धार्मिक असहिष्णूतेच्या या वातावरणात राज्याचा धर्म न स्वीकारणाऱ्यांचा छळ केला जात असे किंवा मारून टाकलं जात असे. त्याच काळात ऑटोमन साम्राज्यात मात्र तुलनेने धार्मिक स्वातंत्र्याचं वातावरण होतं."

इतिहासकार लिहितात त्यानुसार, ऑटोमन साम्राज्याच्या सुलतानांचा दरारा एका बाजूला असला, तरी ते ज्ञान व गुणवत्तेचा सन्मान करायचे आणि विशेषतः सैनिकी क्षेत्राशी संबंधित गुणांबद्दल त्यांना खास आस्था होती.

ऑटोमन साम्राज्य

फोटो स्रोत, NETFLIX

ऑगस्टोन लिहितात, "ऑटोमन साम्राज्यात असाधाराण कार्यक्षम सुलतान राज्य करत होते."

सुलतान दुसऱ्या मेहमूदाला सैनिकी विषयांमध्ये रुची असल्याची वार्ता इतकी पसरली होती की, युरोपातील तज्ज्ञ मंडळी सैन्यविषयक लेखन त्याच्या नावावर करत असत.

युरोपातील अनेक राज्यकर्ते ऑटोमन सुलतानाच्या जवळ जाण्यासाठी आपल्या सैनिकी तज्ज्ञांना स्वतःहून त्याच्याकडे पाठवत असत, असं ऑगस्टोन लिहितात. बिगरख्रिस्ती राज्यांना कोणत्याही तऱ्हेची सैनिकी माहिती देऊ नये, अशी सक्त ताकीद रोमच्या पोपने दिली होती, तो हा काळ!

ऑटोमन साम्राज्याने जिंकलेल्या प्रदेशातील कारागिरांना आपापले आधीचे व्यवसाय सुरू ठेवण्याची मोकळीक दिली होती, एवढंच नव्हे तर या कारागिरांना प्रगती साधण्यासाठी आवश्यक वावही दिला जात होता. कैदी झालेल्या गुणवान कारागिरांच्याही बाबतीत ऑटोमन साम्राज्याचं हेच धोरण होतं.

सुलतान पहिला सलीम याने तर तबरेझवरून कारागिरांना इस्ताम्बूलमध्ये आणल्याचं बोललं जातं, असं इतिहासकार नोंदवतात.

ऑटोमन फौजेत परिपूर्ण तोफखाना कधी तयार करण्यात आला, याबद्दल स्पष्टता नाही, परंतु युरोपात अशा पद्धतीचा तोफखाना उभा राहण्यापूर्वीच सुलतान दुसरा मुराद (1421-1451) याच्या कार्यकाळात ऑटोमन फौजांमध्ये तोफखाना अस्तित्वात आला होता.

ऑटोमन साम्राज्य आणि ज्यू व ख्रिस्ती कारागीर

या शतकांमध्ये इस्ताम्बूलला येणारे युरोपीय लोक ऑटोमन शस्त्रागारात मोठ्या संख्येने काम करणारे ख्रिस्ती कारागीर पाहून चकित होत असत. या शस्त्रागारांमध्ये ज्यू लोकही काम करताना दिसत होते.

या संदर्भात ऑगस्टोन यांनी 1556 मध्ये प्रकाशित झालेल्या एका पुस्तकातील दाव्याचा उल्लेख केला आहे. स्पेनहून हद्दपार करण्यात आलेल्या ज्यू लोकांनी ऑटोमन साम्राज्याच्या सैन्याला सैनिकी कामकाजाबद्दल बरीच माहिती दिली. काश्यापासून तयार केलेली शस्त्रं आणि 'फायर लॉक' याबद्दलची बरीच माहिती या निराश्रित ज्यूंनी दिली.

ऑटोमन साम्राज्य

ज्यूंनी ऑटोमन साम्राज्याला कितपत सैनिकी सेवा पुरवली, याबद्दलचे उल्लेख सावधपणे तपासायला हवेत, पण त्यांनी मदत केली होती हे नाकारता येणार नाही, असं ऑगस्टोन लिहितात. इस्तंबूलमधील शाही तोफखान्यातील 1517-1518 या वर्षांमधील खतावणीत ज्यू कारागिरांचा (अहिंगरान ज्यू) उल्लेख आहे.

परंतु, त्या काळात विविध धार्मिक समुदायातील कारागीर व तज्ज्ञ वेगवेगळ्या राज्यकर्त्यांसाठी व साम्राज्यांसाठी काम करतच असत.

सेविलमधील एक प्रवासी जेरोम मोरंड यांनी 1544 साली लिहिल्यानुसार, त्यांना इस्तंबूलमधील ओतशाळेत (फाउन्ड्री) सुलतानासाठी तोफा तयार करणारे 40 ते 50 जर्मन कारागीर दिसले होते.

इस्तंबूलमध्ये फ्रान्स, स्पेन, व्हेनिस, जीनिव्हा व सिसिली इथले तज्ज्ञ काम करत असल्याचं इस्ताम्बूलमधील फ्रेंच राजदूताने 1547-1548 दरम्यान लिहिलं होतं.

इथेसुद्धा परदेशी कारागिरांसंदर्भातील अतिशयोक्त उल्लेखांबाबत सावध राहायला हवं, असं इतिहासकार म्हणतात. परंतु, ऑगस्टोन लिहितात त्यानुसार, पंधराव्या शतकाच्या मध्यात ऑटोमन साम्राज्यातील युरोपीय किल्ल्यांवर ख्रिस्ती कारागिरांसोबतच तुर्क तोपचीसुद्धा काम करत असत आणि सोळाव्या शतकापर्यंत त्यांची संख्या ख्रिस्त्यांपेक्षा जास्त होती.

कारागीर नसल्यामुळे स्पेनमधील तोफांचे कारखाने बंद पडले, पण केवळ ऑटोमन साम्राज्याच परदेशी कामगारांचं कौशल्य वापरून घेत होतं असं नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. ऑगस्टोन यांनी त्यांच्या पुस्तकात या संदर्भात अनेक दाखले दिले आहेत. उदाहरणार्थ, हंगेरीच्या तोफखान्यांमध्ये बहुतांशाने जर्मन कारागीर काम करत होते आणि काही इटालियनसुद्धा होते.

व्हेनिसमध्येसुद्धा सोळाव्या शतकाच्या आरंभापासून जर्मन कारागीर तोफा तयार करायच्या कामाला होते आणि शतकाच्या मध्यापर्यंत परिस्थिती अशीच होती, त्यानंतर व्हेनिसमध्ये तोफखाना कारागिरांना प्रशिक्षण देणारी संस्था सुरू झाली.

या काळातील स्पेनचं उदाहरण रोचक आहे. सोळाव्या शतकात स्पेनमध्ये तोफा तयार करण्यासाठी स्वतःचे कारागीरच नव्हते, त्यामुळे तिथल्या राज्यकर्त्यांना सतत जर्मन, इटालियन किंवा फ्लेमिश कारागिरांना भरती करून घ्यावं लागत असे.

एकदा, 1575मध्ये तर कारागीर न मिळाल्यामुळे परिस्थिती इतकी बेकार झाली की मालागा इथली तोफांची ओतशाळा बंद करावी लागली, असं ऑगस्टोन यांनी नमूद केलं आहे.

या घटनेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. जर्मनीवरून कारागिरांना बोलावण्यात आलं, तेव्हा ते प्रोटेस्टंट पंथाचे असल्याचं लक्षात आलं. स्पेन तर अधिकृतरित्या कॅथलिक देश होता.

त्यामुळे या कारागिरांना कैद करण्यात आलं आणि 'तोफखान्याचं काम इन्झबर्गहून कॅथलिक कारागीर आल्यानंतरच सुरू झालं.'

ऑटोमन साम्राज्या आणि समकालीन युरोपीय राज्यं यांच्यातील धार्मिक धोरणात किती तफावत होती, याचाही दाखला यावरून मिळतो.

ऑगस्टन सांगतात की, हीच परिस्थिती पोर्तुगालममध्ये होती. त्या काळी पोर्तुगाल मोठी जागतिक महासत्ता होती, नवीन शस्त्रास्त्रं आफ्रिका व आशियापर्यंत पोचवण्यात पोर्च्युगीज साम्राज्याचा मोठा हात असायचा.

रशियाला तोफा तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं?

रशिया व फ्रान्समध्येसुद्धा अशी उदाहरणं दिसतंत.

ऑगस्टोन यांनी लिहिल्यानुसार, हॉलंडचा नागरिक असणाऱ्या आन्द्रेस वेनेस याने रशियातील विख्यात शस्त्रशाळा सुरू केली होती, आणि 1647 पर्यंत तोच या कारखान्याचं कामकाज पाहत असे. कालांतराने राज्यकर्त्यांशी केलेल्या समजुतीच्या करारानुसार त्याने रशियन कारागिरांनासुद्धा प्रशिक्षण दिलं.

त्याच्या कराराचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर रशियाने हा कारखाना चालवण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. त्यानंतर 1648 साली आंन्द्रेसला आणखी 20 वर्षांसाठी परत रशियाला बोलावण्यात आलं.

ऑटोमन साम्राज्य

नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत त्या काळी इंग्लडसारख्या अतिशय विकसित देशालासुद्धा बाहेरची मदत घ्यावी लागत होती आणि इंग्लंडच्या प्रभुत्वशाली स्थानामध्ये फ्रेंच लोहार व तोपची सैनिकांची भूमिका महत्त्वाची होती.

तुर्कस्तानी बनावटीच्या भडिमार तोफा

उस्ताद औरबान यांनी तयार केलेली तोफ 'बंबार्ड' (भडिमार) या प्रकारात मोडणारी होती.

'गन्स फॉर द सुलतान' पुस्तकामध्ये तपशिलात नोंदवल्यानुसार, यातील सर्वांत मोठ्या तोफेचा व्यास 50 ते 80 सेंटीमीटर असायचा, तर वजन सहा हजार ते 16 हजार किलोंपर्यंत होतं. या तोफांमधून फेकण्यात येणाऱ्या गोळ्यांचं वजन 150 ते 700 किलोंपर्यंत असायचं.

युरोपातील राज्यांनी सोळाव्या शतकारंभी या तोफा बाजूला सारल्या, पण ऑटोमन साम्राज्याने 1510 सालानंतरसुद्धा अशा काही तोफांचं उत्पादन सुरू ठेवलं होतं.

या तोफांच्या निर्मितीसाठी 'जमात तोपचियान आहनगरान' या नावाचा लोहारांचा एक विशेष गट तयार करण्यात आला. सन १४९०पासून १५२७पर्यंत त्यांची संख्या आठ ते २९ दरम्यान होती.

ऑगस्टोन यांनी नोंदवल्यानुसार, १५१७-१५१८मध्ये मुस्लीम व ज्यू लोहारांनी तयार केलेल्या लोखंडाच्या २२ तोफांमधील चार सर्वांत मोठ्या तोफांची लांबी ७१४ सेंटीमीटर होती आणि नऊ तोफांची लांबी ५५८ सेंटीमीटर होती, तर नऊ लहान तोफांची लांबी सरासरी ४९१ सेंटीमीटर होती.

तब्बल ६२१० किलो वजनाच्या या तोफा युरोपातील सर्वांत अवजड तोफांमध्ये गणल्या गेल्या. हाप्सबर्ग साम्राज्याचे राज्यकर्ते पहिले मॅक्समिलियन (१४९३-१५१९) यांनी तयार केलेल्या सर्वांत मोठ्या भडीमार तोफेचं वजन ५६०० ते ७२८० किलो इतकं होतं.

उस्ताद औरोबान यांना अनुसरून ऑटोमन तज्ज्ञांनी पंधराव्या शतकात दोन देवहेकल तोफा तयार केल्या. सुलतान दुसरा मेहमदसाठी १४६७मध्ये तयार केल्या जात असलेल्या काश्याच्या एका तोफेचं वजन १७५०० कोलि होतं. पंधराव्या शतकात तयार करण्यत आलेली १८ टनांहून अधिक वजनाची तोफ १८६७मध्ये सुलतान अब्दुलअझीझ यांनी राणी व्हिक्टोरियाला भेट पाठवली.

या तोफांच्या आकारामुळे त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणं अवघड जात असे, असं ऑगस्टोन लिहितात. यावर उपाय म्हणून तोफांसाठीचा कच्चा माल उंटांवरून व इतर प्राण्यांच्या पाठीवरून वेढ्याच्या ठिकाणी नेला जात असे आणि तिथे मग तोफ तयार केली जात असे.

या भडीमार तोफांनी बायझन्टाइन, बल्कान व हंगेरी इथले अनेक किल्ले जिंकण्यासाठी ऑटोमन फौजांना मदत केली.

परंतु, केवळ या तोफांच्या सहकार्यावर लढाई जिंकता येत नाही, हे इतिहासकार अधोरेखित करतात. याचा एक दाखला बुल्गरादमधील वेढ्यादरम्यान मिळतो. कुस्तुनतुनियामध्ये विजय मिळवल्यानंतर १३ वर्षांनी सुलतान दुसऱ्या मेहमदाने १४५६ साली बुल्गरादला वेढा घातला.

एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने नोंदवल्यानुसार, सुलतान मेहमूदच्या २२ भडीमार तोफांनी ब्लुगरादचा किल्ला उद्ध्वस्त केला, पण तरीही किल्ल्याचा बचाव करणाऱ्या फौजांना तत्काळ अधिक ताकदीची मदत मिळाल्यामुळे त्या वेळी ऑटोमन सैन्य हा किल्ला जिंकू शकलं नाही.

ऑगस्टोन लिहितात की, ऑटोमन तोफखान्यांच्या बळावर युरोपातील एक-एक किल्ले ऑटोमन फौजांच्या ताब्यात येत गेले. उदाहरणार्थ- १५२१ ते १५६६ या दरम्यान हंगेरीतील १३ किल्ले दहा दिवसांमध्ये आणि नऊ किल्ले २० दिवसांच्या वेढ्याद्वारे ऑटोमन फौजांनी ताब्यात घेतले.

तत्कालीन ऑटोमन इतिहासकार इब्राहीम पैजवी (ज्यांनी बरंचसं आयुष्य हंगेरीजवळच्या सीमावर्ती भागात घालवलं) यांचा संदर्भ देऊन ऑगस्टोन यांनी एका वेढ्याचं विस्ताराने कथन केलं आहे. "पहिल्यांदा मेहमद पाशाने सर्व तोफांना एकाच वेळी एका ठिकाणी नेम धरण्याचा आदेश दिला. मग एक-एक करून त्याच जागेवर मारा करण्यास सांगण्यात आलं."

मेहमूद पाशाने हेतंत्र १५९५मध्ये एस्तेरगॉनच्या वेढ्या वेळी ख्रिस्ती सैन्याकडून शिकून घेतलं होतं, असं पैजवी लिहितात.

स्फोटक शस्त्रं आणि दारूगोळा असताना शूर व्यक्तीचा काय उपयोग?

स्फोटक शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा मिळवण्यात केवळ संसाधनांचाच अडथळा होता असं नाही. याचा एक दाखला म्हणजे एका लढाईत ५०० ख्रिस्ती सैनिकांनी २५०० ऑटोमन सैनिकांचा पराभव केला होता.

या संदर्भात ऑटोमन सेनाधिकाऱ्याकडे जाब मागण्यात आला, तेव्हा साम्राज्याचे प्रधानमंत्री रुस्तुम पाशा यांना तो म्हणाला, "तुम्हाला काय झालं ते धड लक्षात आलं नाहीये. आपण दारूगोळ्याच्या शस्त्रांमुळे हरलो, हे तुम्ही ऐकलंच नाहीत. या दारुगोळ्यामुळे आपण हरलो, शौर्याच्या कमतरतेमुळे नव्हे. ते आमच्याशी शूर मर्दांसारखे लढायला आले असते तर लढाईचा निकाल वेगळा लागला असता."

ऑटोमन सेनाधिकाऱ्याने दिलेलं हे उत्तर त्या काळातील स्पेन, इटली, सफावी, फ्रान्स, जर्मनी व इंग्लंड इथल्या सेनाधिकाऱ्यांचाही भावना व्यक्त करणारं होतं.

युरोप आणि ऑटोमन साम्राज्यापर्यंत दारूगोळा कसा पोचला?

ऑगस्टन लिहितात की, पहिल्यांदा सातव्या व आठव्या शतकात चीनमध्ये दारूगोळा तयार करण्यात आला आणि तिथे औपचारिकरित्या १२८० साली स्फोटक शस्त्रास्त्रं तयार करायची सुरुवात झाली. युरोपात चौदाव्या शतकारंभी युद्धभूमीवर आणि वेढ्यांमध्ये या शस्त्रास्त्रांचा वापर होऊ लागला.

चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला ऑटोमन साम्राज्य अस्तित्वातसुद्धा नव्हतं, त्यांचं राज्य केवळ प्रादेशिक पातळीवर होतं, हे इथे लक्षात घ्यायला हवं.

इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, चौदाव्या शतकाच्या मध्यात स्फोटक शस्त्रास्त्रं हंगेरी व लकान या भागांपर्यंत पोचली आणि १३८०च्या दशकात ऑटोमन साम्राज्याचा शस्त्रास्त्रांशी परिचय झाला.

ऑटोमन साम्राज्य

फोटो स्रोत, HULTON ARCHIVE / GETTY IMAGES

यासाठी त्यांनी दोन तुर्कस्तानी इतिहासकारांचा संदर्भ दिला आहे. ऑटोमन फौजेने कोसोवोमधील १३८९ सालच्या लढाईत पहिल्यांदा तोफांचा वापर केला, त्या सैन्यात हैदर नावाचा एक तोपची होता, असं यातील एका इतिहासकाराने नमूद केलं आहे. तर, ऑटोमन फौजांनी १३६४ साली तोफा तयार करायला सुरुवात केली आणि १३८६ साली पहिल्यांदा त्यांचा वापर झाला, असं दुसऱ्या इतिहासकाराने नोंदवलं आहे.

पहिलं दारूगोळ्याचं स्फोटक शस्त्रास्त्र कधी तयार झालं, हा प्रश्न नसून त्याचा प्रभावी वापर कधीपासून सुरू झालं, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, असं ऑगस्टोन लिहितात. आणि पंधराव्या शतकाच्या मध्यात ही प्रक्रिया सुरू झाली, असं त्यांचं यावरचं उत्तर आहे.

ते लिहितात की, नवीन शस्त्रास्त्रांचा वापर हळूहळू होऊ लागला. दारूगोळ्यांचा वापर करणारी शस्त्रास्त्रं मिळवण्यात आली, त्यासाठीचा दारूगोळा मिळवण्यात आला आणि या शस्त्रांच्या वापरासाठी खास पथकांची स्थापनाही करावी लागली. ही आव्हानं पेलवणं सर्व राज्यांना शक्य नव्हतं, पण ऑटोमन साम्राज्याने व्यावहारिकता व सामाजिक संरचनेच्या जोरावर यामध्ये चांगलं कौशल्य कमावलं.

चिन्यांसोबतचा व्यापार किंवा थेट संपर्क, या मार्गांनी आशियामध्ये दारूगोळ्यासंबंधीची माहिती आली, असं ऑगस्टोन लिहितात.

"मंगोल लोक १२३०च्या दशकापासूनच दारूगोळा व त्याच्याशी संबंधित शस्त्रास्त्रांबद्दल माहिती राखून होते. तेराव्या शतकाच्या मध्यात त्यांच्यात माध्यमातून मध्य आशिया, इराण, इराक व शाम (आजचा सिरिया) इथे दारूगोळ्याचं ज्ञान पोचलं."

ऑगस्टोन पुढे लिहितात, "तैमूरलंगचा मुलगा शाहरूख याच्या काळात (१४०५ ते १४४७) दारूगोळ्याबद्दल लोकांना माहिती होतीच, शिवाय स्फोटक शस्त्रं त्याच्या साम्राज्यात (इराणचा काही भाग, अक्सस नदीचा भाग, अझरबैजान आणि अफगाणिस्तानचा काही भाग असं हे राज्य पसरलेलं होतं) तयारसुद्धा केली जात होती."

"फारूख नावाच्या एका सुताराने १४३४ ते १४३५ या काळात एक तोफ तयार केली होती. या तोफेतून किमान ३२० किलोटा बॉम्बगोळा फेकला जातो, असं सांगितलं जात असे."

स्फोटक शस्त्रास्त्रं व दारूगोळा यांच्यामुळे जग कसं बदललं?

स्फोटक शस्त्रास्त्रांची माहिती युरोपातील सत्तांना सर्वाधिक कळली होती, याबाबत तज्ज्ञांमध्ये सहमती असल्याचं ऑगस्टोन लिहितात. तिथेच या स्फोटक हत्यारांना नवसंजीवनी मिळाली आणि 'पुढील काही शतकांमध्ये संघटित हिंसेचं रूप बदललं.'

दारूगोळ्यावर आधारित स्फोटक शस्त्रास्त्रांचं आगमन आणि त्याचा विपुल वापर, यांमुळे राज्यांच्या व साम्राज्यांच्या लढायांची पद्धतीच बदलून टाकली.

आता सैनिकी पातळीवर स्पर्धा करण्यासाठी तोफा, तोफांना तोंड देऊ शकणारे किल्ले, बंदुकांनी सज्ज असलेलं लष्कर आणि तोफांनी सज्ज असलेलं नौदल गरजेचं झालं.

किमान युरोपात तरी या काळात युद्धभूमीपेक्षा वेढे घालून मुलुखविजय मिळवण्याची चलती होती. असे वेढे यशस्वी करण्यासाठी आणि हंगेरी, हॅप्सबर्ग, व्हेनिस व सफावी यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी तोफखाना आणि दारूगोळा अतिशय गरजेचा होता.

युरोपीय इतिहासकारांच्या मते, दारूगोळा आणि छपाई हे मध्य युगातील दोन मोठे शोध आहेत, असं ऑगस्टोन लिहितात.

तोफखाने सांभळणं आणि तोफा सुरक्षित ठेवण्यासाठी किल्ले उभारणं, या कामाचं सामर्थ्य केवळ बादशहांकडे होतं, त्यामुळे या शोधांनंतर लहान राज्यांना टिकाव धरणं अवघड झालं. त्या काळातील बदल केवळ दारूगोळ्यामुळे झालेले नव्हते, असं मानणारेही काही इतिहासकार आहेत. त्यामुळे दारूगोळ्याचं महत्त्व किती होतं, याबद्दल चर्चा सुरूच राहिली आहे.

ऑटोमन सुलतानांच्या व्यावहारिक वृत्तीमुळे चौदाव्या व पंधराव्या शतकात नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं आणि स्फोटक शस्त्रास्त्रांचं सातत्यपूर्ण उत्पादन करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय रचना उभी करणं सोपं झालं. भूमध्य समुद्र, हंगेरी व बायझेन्टाइन साम्राज्य यांच्या शक्तिशाली किल्ल्यांमुळे ऑटोमन फौजांना आपल्या युद्धविषयक व्यूहरचनांमध्ये बदल करणं भाग पडलं आणि नवीन शस्त्रास्त्रं स्वीकारावी लागली.

"रोपातील स्फोटक शस्त्रास्त्रांच्या तंत्रामध्ये अठराव्या शतकाअखेरीपर्यंत कोणताही मोठा बदल झाला नव्हता. या दरम्यान युरोपीय तंत्रज्ञानाच्या आगमानामुळे आणि दळणवळणाचं प्रभुत्व यांमुळे ऑटोमन फौजांना युरोपचा सामना करणं अवघड नव्हतं."

ऑटोमन तोफखाना आणि साम्राज्यातील खनिजांचा साठा

ऑगस्टोन लिहितात त्यानुसार, सोळाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत ऑटोमन फौजांनी सर्व आकारांच्या तोफांचा वापर केला. तीस ग्रॅमपासून ५०० ग्रॅमपर्यंतचे बॉम्बगोळे फेकणाऱ्या तोफांपासून ते ३१ किलो ते ७४ किलोपर्यंत गोळे फेकणाऱ्या तोफांचा यात समावेश होता.

इतकंच नव्हे तर पंधराव्या व सोळव्या शतकामध्ये त्यांच्या तोफखान्यामध्ये १०० किलोंहून अधिक गोळ्यांचा भडीमार करणाऱ्या तोफांचाही समावेश झाला.

पंधरा ते २० किलो वजनाचे बॉम्बगोळे फेकू शणाऱ्या तोफांसाठी ऑटोमन दस्तावेजांमध्ये 'किला कूब' असा शब्दप्रयोग केला आहे.

ऑटोमन शस्त्रास्त्रांमध्ये सर्वाधिक वापरात असलेली तोफ 'दरबझीन' ही होती. त्यातील बॉम्बगोळ्यांचं वजन १५ दशांश ते अडीच किलोपर्यंत होतं.

ऑटोमन फौजा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यांच्या शस्त्रास्त्रांमध्ये फारसा फरक नव्हता, असं ऑगस्टोन लिहितात.

सोळाव्या-सतराव्या शतकात ऑटोमन साम्राज्यातील मोठ्या व मध्यम आकाराच्या तोफा काश्यापासून तयार केलेल्या असत, त्यामुळे ऑस्ट्रिया, स्पेन व ब्रिटिश तोफांपेक्षा त्या हलक्या वजनाच्या व अधिक सुरक्षित असत, असंही ऑगस्टोन यांनी लिहिलं आहे.

ऑटोमन साम्राज्याच्या प्रदेशात तांबं मोठ्या प्रमाणात होतं. सोळाव्या-सतराव्या शतकात हे साम्राज्य पितळ, लोखंड व शिसं यांच्या उत्पादनामध्ये स्वावलंबी होतं. त्यांना फक्त कथल आयात करावं लागत असे.

"सोळाव्या-सतराव्या व अठराव्या शतकात ऑटोमन साम्राज्य युरोपात (हंगेरीमधील) बिदापासून ते आशियातील बसरापर्यंत पसरलं, तेव्हा तिथल्या जवळपास प्रत्येक मोठ्या राज्यात दारूगोळा तयार केला जात होता."

अठराव्या शतकाच्या मध्यात हे उत्पादन कमी व्हायला लागलं, आणि त्यानंतर ऑटोमन साम्राज्यात युरोपातून होणारी दारूगोळ्याची आयात वाढली.

परंतु, प्रशासकीय पुनर्रचनेद्वारे पुन्हा ऑटोमन साम्राज्य याबाबतीत स्वावलंबी झालं.

मध्ययुगीन कालखंड आणि दारूगोळ्याचे महत्त्व

'गन्स फॉर द सुलतान' या पुस्तकामध्ये प्रधानमंत्री हसन पाशा यांनी १६०३ साली सुलतानाकडे केलेल्या अर्जाचा मजकूर दिला आहे, तो असा: "सन्माननीय बादशाह, सुलतानांच्या मोहिमांची खरी ताकद दारूगोळ्यामध्ये आहे, हे आपल्याला माहीतच आहे. दारूगोळ्याविना लढाई अशक्य आहे. तो दुसऱ्या गोष्टींसारखा नसतो... दारूगोळा थोडा जरी कमी झाला तर सोन्याच्या नाण्यांचा ढिगाराही त्याची जागा घेऊ शकत नाही. किल्ल्यांचं संरक्षण आणि मोठमोठ्या मोहिमा दारूगोळ्याच्या मदतीनेच शक्य आहेत."

व्हेनिसच्या प्रतिनिधीगृहामधील कामकाजाच्या १६ जून १४८९ रोजीच्या असं म्हटलं आहे की, 'ही शस्त्रास्त्रं व स्फोटकं यांच्याविना कोणत्याही राज्याचा बचाव होणं शक्य नाही, कोणाचं संरक्षण शक्य नाही आणि त्याविना शत्रूवर हल्लासुद्धा शक्य नाही'. ऑगस्टोन यांनी विविध ऐतिहासिक संदर्भांद्वारे हे नोंदवलं आहे.

ऑटोमन साम्राज्यात नायट्रिक अॅसिड आणि दारूगोळा यांचं उत्पादन

दारूगोळ्याच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या घटकांपैकी एक म्हणजे नायट्रिक अॅसिड. कोणत्याही मोठ्या साम्राज्यासाठी त्यांच्या सैन्याचं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी दारूगोळ्यासाठीच्या कच्च्या मालाची उपलब्धता महत्त्वाची होती.

ऑगस्टोन यांनी लिहिल्यानुसार, ऑटोमन साम्राज्य त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत नायट्रिक अॅसिडच्या उत्पादनामध्ये स्वावलंबी होतं. साम्राज्यातील विविध भागांमध्ये यासाठी काही प्रकल्प सुरू करण्यात आले होते, या प्रकल्पाची जबाबदारी उमराव वर्गाकडे किंवा सरकारी सैनिकांच्या हातात होती.

ऑटोमन साम्राज्य

फोटो स्रोत, THEOPHILOS HATZIMIHAIL

काही ठिकाणी नायट्रिक अॅसिडचं उत्पादन शेकडो गावकऱ्यांकडे सोपवण्यात आलं होतं. या कामाचा मोबदला म्हणून त्यांना करांमध्ये सूट मिळत असे. युरोपातील साम्राज्यांमध्येसुद्धा अशा प्रकारची तजवीज करण्यात आली होती, असं ऑगस्टोन नमूद करतात.

"ऑटोमन साम्राज्य सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत अॅसिड व दारूगोळा यांच्या उत्पादनात स्वावलंबी होतं. त्यांना वर्षाकाठी सुमारे ५४० मेट्रिक टन दारूगोळा लागत असे... परंतु, दारूगोळ्याच्या उत्पादनात नायट्रिक अॅसिड हा केवळ एक घटक असतो. त्या व्यतिरिक्त सेनेच्या गरजेनुसार उत्पादन करत राहणं हे आणखी एक आव्हान असतं."

ऑटोमन साम्राज्याला स्वीडन, इंग्लंड व स्पेन यांच्याकडून दारूगोळा विकत घ्यावा लागला

ऑटोमन साम्राज्या अठराव्या शतकात बराच काळ दारूगोळ्याच्या उत्पादनात स्वावलंबी होतं, असं ऐतिहासिक दस्तावेजांवरून सिद्ध होतं. त्यांना १७६८ ते १७७४ या काळात रशियासोबत झालेल्या लढाईमध्ये पहिल्यांदा दारूगोळ्याच्या अभावामुळे अडचणींना सामोरं जावं लागलं.

"सतराव्या शतकामध्ये ऑटोमन राज्यात ७६१-१०३७ मेट्रिक टन दारूगोळा तयार केला जात असे, परंतु अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात हे प्रमाण कमी होऊन १६९ मेट्रिक टनांपर्यंत आलं."

ऑटोमन साम्राज्याला १७७०च्या दशकात गरजेच्या ५० टक्के दारूगोळा युरोपातून आयात करावा लागला, असं ऑगस्टोन यांनी विविध ऐतिहासिक संदर्भांद्वारे नोंदवलं आहे. १७७८ साली स्वीडनकडून ८४,६०० किलो दारूगोळा विकत घेण्यात आला. त्यानंतर १७८२ साली अशाच प्रकारे ९५,४८५ किलो दारूगोळा आणण्यात आला. १७८३ साली ३९,१९८ किलो दारूगोळा इंग्लंडवरून आणण्यात आला. त्याच वर्षी १,३३,३८६ किलो अशी दारूगोळ्याची सर्वाधिक आयात ऑटोमन साम्राज्याने स्पेनकडून केली."

या घडामोडींची माहिती सुलतान तिसरे सलीम (१७८९-१८०७) यांच्यापर्यंत पोचली, तेव्हा त्यांनी यावर उपाय करण्याची घोषणा केली. जलविद्युत मार्गाने काम करणाऱ्या कारखान्यांची स्थापना, हा यातील एक उपाय होता. त्यानुसार दारूगोळ्यांच्या कारखान्यांसोबत पाण्याचे तलाव तयार करण्यात आले, जेणेकरून आग लागलीच तर ती तत्काळ बुजवता यावी.

अठराव्या शतकाअखेरीला एक ऑटोमन सैनिक महमूद आफंदी म्हणाले, "आता आम्ही परदेशी दारूगोळ्यावर विसंबून नाही. आमची कोठारं आता भरलेली आहेत आणि लष्करी मोहिमांसाठीसुद्धा आता आमच्याकडे दारूगोळ्याचा साठा आहे, किंबहुना आता आम्ही निर्यातसुद्धा सुरू केली आहे."

ऑटोमन साम्राज्य व दारूगोळा

"सर्वसाधारणतः युरोपातील व मध्यपूर्वेतील प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ऑटोमन साम्राज्याने स्फोटक शस्त्रास्त्रं तयार करण्यात आणि त्यांच्या वापरामध्ये, तसंच त्यासाठी समर्पित पथकं सुरू करण्यामध्ये अग्रक्रम मिळवला होता."

ऑटोमन साम्राज्य शस्त्रास्त्रांच्या नवीन तंत्रज्ञानासाठी युरोपीय तज्ज्ञांवर अवलंबून होतं, असं ऑगस्टोन म्हणतात. त्या काळी विविध धर्मांचे विद्वान वेगवेगळ्या साम्राज्यांचा दौरा सर्रास करत असत आणि त्यातील मुस्लीम-ख्रिस्ती भेदाला अवाजवी महत्त्व देता कामा नये, असं त्यांना वाटतं.

"सध्या सभ्यतांमधील संघर्षांचा (क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स) सिद्धान्त चलनात आहे, पण पंधराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत युरोपात आणि ऑटोमन साम्राज्यामध्ये दिसणाऱ्या आंतरसांस्कृतिक संबंधांना समजून घेण्यासाठी हा सिद्धान्त उपयोगी नाही."

मग ऑटोमन साम्राज्यासमोरच्या अडचणी कुठून सुरू झाल्या?

काही शतकं लाखो चौरस किलोमीटरांवर पसरलेल्या प्रदेशावर आणि युद्धभूमीवर वर्चस्व प्रस्थापित केलेल्या ऑटोमन साम्राज्यासमोरच्या अडचणी कुठून सुरू झाल्या? याचं साधं सरळ असं काही उत्तर नाही आणि कोणाही इतिहासकाराने अजून याबद्दल निःसंदिग्ध निर्वाळा दिलेला नाही.

'गन्स फॉर द सुलतान' या पुस्तकामध्ये ऑगस्टोन यांनी विविध इतिहसाकारांच्या विधानांचा समावेश केला आहे. त्यांच्या मते, आर्थिक परिस्थितीमधील बदल या अडचणींना मुख्यत्वे कारणीभूत होते. भूमध्य समुद्री प्रदेशामध्ये आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे इतकं मोठं उत्पादनाचं क्षेत्र टिकवून ठेवणं अवघड झालं होतं, असं ऑगस्टोन म्हणतात.

ऑटोमन साम्राज्य

या काळात युरोपात मोठ्या प्रमाणात आर्थिक व प्रशासकीय परिभाषेचा वापर झाला होता. विज्ञान व वित्तपुरवठा याबाबतीत युरोप खूपच पुढे निघून गेला होता.

"ऑटोमन साम्राज्य व युरोप यांच्यातील लढ्याने रूप बदललं, त्यामागे या स्थित्यंतरांची भूमिका मोठी होती. १५२६ ते १६८३ या काळात युरोपात दोन मोठी युद्ध झाली. त्या वेळी सुलतानाचं लष्कर मुख्यत्वे वेढ्यांमध्ये व्यग्र होतं."

अवघड आर्थिक परिस्थितीमध्ये, अठराव्या शतकात रशियाविरोधात झालेलं युद्ध ऑटोमन साम्राज्याला महागात पडलं.

या काळात इस्ताम्बूलमधील शाही तोफखान्याच्या ओतशाळेत काय परिस्थिती होती? 'गन्स ऑफ द सुलतान'मध्ये म्हटल्यानुसार, या ओतशाळेमध्ये अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत शेकडो तोफा बनवण्याचं सामर्थ्य होतं. या तोफांचं एकूण वजन दोन लाख किलोपर्यंत होतं. परंतु, दारूगोळ्याचं उत्पादन ही खरी समस्या होती. सोळाव्या-सतराव्या शतकांच्या तुलनेत आता दारूगोळ्याचं उत्पादन १५-३० टक्क्यांनी कमी झालं होतं.

ऑटोमन लष्करामध्ये शिस्त व तंत्रकुशलतेचाही अभाव निर्माण झाला होता, असं ऑगस्टोन युरोपीय व ऑटोमन तज्ज्ञांच्या दाखला देऊन म्हणतात.

ऑटोमन राज्यकर्त्यांना या उणिवांबद्दल माहिती नव्हती का? त्यांनी या उणिवा दूर करण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? या संदर्भात १७३४ सालातील एक तुर्की दस्तावेजाचा आधार घेऊन ऑगस्टोन यांनी या संदर्भात उहापोह केला आहे. नवीन व्यवस्थेसाठीच्या परिभाषेचाही उल्लेख ते करतात.

या बदलांमुळे 'सामाजिक रचना' धोक्यात येईल, असं वाटत असल्याने ऑटोमन राज्यकर्ते यासाठी तयार नव्हते. १७८७ ते १७९३ या काळात रशियासोबतच्या लढाईत अपयश आल्यानंतर त्यांनी असा प्रयत्न केला, तोवर बराच उशीर झाला होता.

नवीन आदर्श सेना उभारण्याची इच्छा राखणारे ऑटोमन साम्राज्याचे अठ्ठाविसावे सुलतान तिसरे सलीम (१७८९-१८०७) यांना या प्रयत्नाची किंमत स्वतःचा प्राण गमावून मोजावी लागली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)