ऑटोमन : तेव्हा इस्तंबूलच्या रस्त्यांवर त्यांची अंत्ययात्रा पाहून नागरीक हादरून गेले होते...

ऑटोमन साम्राज्य, इतिहास

फोटो स्रोत, DEA / A. DAGLI ORTI / GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, ऑटोमन साम्राज्य
    • Author, असद अली
    • Role, बीबीसी उर्दू

ऑटोमन साम्राज्य हे अनेक शतकांपर्यंत टिकलेलं एक मोठं साम्राज्य होतं. त्यांनी युरोप, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेच्या मोठ्या भागावर राज्य केलं आणि त्याचे दूरगामी परिणाम झाले.

ऑटोमन साम्राज्याच्या काळातील विविधं पात्रं ही सध्या टीव्ही शो आणि सिरिजचे विषय बनलेली आहेत. त्यापैकीच एक सीरिज पहिल्या सुल्तान अहमद आणि विशेषतः त्याची पत्नी कोसेम सुल्तान यांच्या जीवनावर आधारित आहे.

या सीरिजमध्ये सुल्तान अहमद यांच्यावर त्यांच्या आजूबाजूला असलेले लोक आणि साम्राज्यातील वरिष्ठांकडून किंवा उच्च पदांवरील व्यक्तींकडून छोट्या भावांची हत्या करण्यासाठी दबाव आणला गेल्याचं दाखवण्यात आलं आहे.

जागतिक इतिहासात अनेक साम्राज्यांमध्ये भाऊ-भाऊ, पिता-पुत्र आणि इतर नातेवाईकांमध्ये सत्तेसाठी हत्या आणि युद्धं झाल्याची उदाहरणं पाहायला मिळतात. ऑटोमन साम्राज्यात अशी कोणती उदाहरणं आहेत? याची सुरुवात करुयात सुल्तान अहमद पहिले यांचे पिता सुल्तान मेहमत तिसरे गादीवर बसल्यापासून.

1595 मधला एक दिवस होता. ऑटोमन साम्राज्याचा प्रचंड विस्तार झाला होता. या दिवशी त्या काळातील सुपर पॉवर असलेली सत्ता सुल्तान मुराद तिसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मेहमतला मिळाली. ते सुल्तान मेहमत तिसरे बनले.

पण हा दिवस नव्या सुल्तानांच्या सत्ता मिळवण्यापेक्षाही याठिकाणच्या 19 राजकुमारांच्या हत्यांसाठी इतिहासात अधिक प्रसिद्ध आहे.

सुल्तान मेहमत तिसरे यांच्या भावांच्या हत्या करण्यात आल्या होत्या. या साम्राज्यात त्याकाळी प्रचिलत असलेल्या भावांच्या हत्येच्या शाही परंपरेनुसार, नवे सुल्तान इस्तानबूलच्या गादीवर बसताच एकापाठोपाठ एक त्या सर्वांना गळा दाबून ठार करण्यात आलं होतं.

ऑटोमन साम्राज्यावर लिहिण्यात आलेल्या 'लॉर्ड ऑफ द होरायजन्स' पुस्तकात लेखक जेसन गुडविन यांनी विविध स्रोतांच्या आधारे शहजाद्यांच्या मृत्यूचं वर्णन केलं आहे.

"शहजाद्यांना एका पाठोपाठ सुल्तानांसमोर आणण्यात आलं. त्यांच्यापैकी वयानं सर्वात मोठा आणि सुंदर तसंच पिळदार शरीर असलेल्या शहजाद्यानं सुल्तानांना विनंती केली. तुम्ही माझे भाऊ आणि आता माझ्या पित्यासमान आहात. माझा अशाप्रकारे अंत करू नका, असं त्यांनी म्हटलं. सुल्तान यांनाही वाईट वाटत होतं, पण ते एकही शब्द बोलले नाहीत," असं त्यांनी लिहिलं आहे.

इस्तंबूलच्या रस्त्यांवरून या अंत्ययात्रा जाताना पाहून, नागरिकही हादरून गेले होते.

सुल्तान मुराद तिसरे यांच्या अंत्ययात्रेच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या 19 राजपुत्रांच्या अंत्ययात्रा निघाल्या. या अंत्ययात्रांमध्ये सुल्तान मुराद तिसरे यांच्या अंत्ययात्रेच्या तुलनेत दुप्पट लोक बाहेर पडले होते आणि प्रत्येकाच्या डोळ्यात हे दृश्य पाहून अश्रू तरळले होते.

इतिहासकार लेस्ली पी. पेयर्स यांनी त्यांच्या 'इम्पिरियल हरम: वुमन अँड सोव्हरेनिटी इन द ऑटोमन एम्पायर' मध्ये त्या काळात तयार करण्यात आलेल्या एका रिपोर्टद्वारे याचा संदर्भ दिला आहे.

नऊ शहजाद्यांचा मृत्यू

आता 1595 च्या 21 वर्षे मागच्या इतिहासात डोकावलं असता सुल्तान मेहमत तिसरे यांचे पिता सुल्तान मुराद तिसरे यांच्या सत्तेचा पहिला दिवसही यापेक्षा वेगळा नव्हता असं लक्षात येतं. त्यांनाही अशाच कठीण निर्णयाचा सामना करावा लागला होता. सुल्तान मुराद यांचे वडील ऑटोमन साम्राज्याचे 11वे सुल्तान सलीम दुसरे यांचा मृत्यू 1574 मध्ये ते 50 वर्षांचे असताना झाला होता. (याच वर्षी उस्मानिया साम्राज्यानं उत्तर आफ्रिकेत ट्यूनिसवरही विजय मिळवला होता.)

त्यावेळी सत्ता त्यांचे सर्वात मोठे पुत्र मुराद तिसरे यांना मिळाली होती. ते त्यांच्यानंतरच्या भावांपेक्षा किमान 20 वर्षांनी मोठे होते. त्यामुळं त्यांच्या सत्तेला काही धोका नव्हता हे स्पष्ट होतं. मात्र, "तरीही त्यांनी सिंहासनासाठी सर्व भावांची हत्या केली आणि त्यांना वडिलांबरोबर दफन केलं," असं फिंकल यांनी लिहिलं आहे.

ऑटोमन साम्राज्य, इतिहास

फोटो स्रोत, TIM GRAHAM / GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, ऑटोमन साम्राज्य

इतिहासकार कॅरलाइन फिंकल यांनी त्यांच्या 'उस्मान का ख्वाब: उस्मानिया सल्तनत की कहानी 1300-1923' या पुस्तकामध्ये सुल्तान सलीम दुसरे यांचे ज्यू वैद्य डोमिनिको हीरोसोलिमितानो यांच्या संदर्भानं शहजाद्यांच्या मृत्यूचं वर्णन केलं आहे.

"अत्यंत दयाळू सुल्तान यांना रक्तपात आवडत नव्हता. त्यांनी अठरा तास वाट पाहिली. यादरम्यान ते गादीवरही बसले नाही, किंवा शहरात सत्ता स्वीकारल्याचं जाहीरही केलं नाही. यादरम्यान ते त्यांच्या नऊ भावांना वाचवण्याच्या पद्धतींवर विचार करत होते. उस्मानिया साम्राज्यातील कायदा मोडला जाईल या भीतीनं अखेर त्यांनी रडत-रडतच त्याच्या कर्मचाऱ्यांना (खास या कामासाठी तयार केले मूकबधीर कर्मचारी) शहजाद्यांचा गळा दाबून मारण्यासाठी पाठवलं. या कामासाठी त्यांनी त्यांच्या हातानं म्होरक्याला नऊ रुमाल दिले होते," असं त्यांनी लिहिलं आहे.

"कोणताही नवा सुल्तान सत्ता स्वीकारत असताना साम्राज्यात निर्माण होणारी अराजकता टाळण्यासाठी काय किंमत मोजावी लागली, याचा अंदाज मुराद आणि मेहमत यांच्या भावांच्या लहान-लहान कबरींवरून येतो."

शाही परंपरेमागची पार्श्वभूमी

अनेक राजपुत्र किंवा राजकन्या यांच्या मृत्यूबाबत महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या हत्या बंडखोरी किंवा एखाद्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून केलेल्या नव्हत्या. उलट त्यापैकी काही तर चूक करण्याएवढे मोठेही नव्हते.

या सर्वांची हत्या करण्यासाठी जबाबदार असलेला कायदा किंवा परंपरेची पायाभरणी ही, जळपास 100 वर्षांपूर्वी 15व्या शतकातच सुल्तान मेहमत दुसरे यांच्या काळात झाली होती. त्यांनी 1481 मध्ये त्यांच्या मृत्यूच्या काही वर्षांपूर्वी आदेश दिला होता. त्यानुसार नवीन सुल्तान भावांची हत्या करू शकत होता.

ऑटोमन साम्राज्य, इतिहास

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुलतान बायजीद

सुल्तान मेहमत दुसरे यांनी त्यांच्या वारसदाराचं नाव जाहीर केलेलं नव्हतं. पण मृत्यूच्या आधी काही वर्षांपूर्वी त्यांनी पहिल्या वारसदाराबाबत मतं व्यक्त केली होती. माझा जो मुलगा सुल्तान होईल तो सर्व काही योग्यच करेल. साम्राज्याच्या भल्यासाठी त्यानं इतरांना मारलं तर ते योग्यच ठरेल, असं त्यांनी म्हटलं होतं. फिंकल यांच्या पुस्तकात हा उल्लेख आहे.

तुर्कस्तानातील इतिहास आणि कायदेतज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर अक्रम बोरा अकंजे यांनीही एका लेखात या परंपरेबाबत लिहिलं आहे. "सुल्तान मेहमत दुसरे यांच्या शब्दांत सांगायचं झाल्यास हा कायदा 'जगाच्या व्यवस्थे'च्या भल्यासाठी केलेला होता. तसंच उलेमांचांही याला पाठिंबा होता, असं सुल्तान यांचं मत होतं.

डॉक्टर अक्रम यांचा हा लेख तुर्कस्तानातील 'रोजनामा सुबाह' वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाला होता.

"भावांच्या हत्येचा कायदा हा ऑटोमन साम्राज्याच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त विषयांपैकी एक आहे, यात काही शंका नाही. साम्राज्याच्या इतिहासात अनेकवेळा अशा घटना घडल्या. त्यापैकी बहुतांश घटना योग्यच समजल्या गेल्या होत्या. मात्र काही हत्या अशाही होत्या, ज्या चूक असल्याचं म्हटलं गेलं आणि त्यावर टीकाही झाली," असं डॉक्टर अकंजे लिहितात.

कोणत्याही शहजाद्याला मारण्यासाठी त्यानं काही चूक करायलाच हवी याची गरज नव्हती. अनेकदा केवळ भविष्यात त्यानं बंडखोरी करू नये या कारणामुळं त्यांची हत्या योग्य असल्याचं म्हटलं गेलं.

मात्र, सुल्तान मेहमत दुसरे यांना या कायद्याची आवश्यकता का भासली. हे जाणून घेण्यासाठी एका घटनेची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी ऑटोमन साम्राज्याच्या इतिहासात आणखी जवळपास 70 वर्षे मागं जावं लागेल. जुलै 1402 मध्ये इंकराच्या जवळ उस्मानी बादशाह सुल्तान बायजीद आणि सुल्तान तैमूर (तैमूर लंग) यांच्यात एक मोठं युद्ध झालं.

तैमूर लंग आणि ऑटोमन साम्राज्य

तैमूर लंग घरून युद्धाच्या मोहिमेवर निघाल्यानंतर 30 वर्षांच्यानंतर चीन आणि इराणमार्गे अनातोलिया (आजतं तुर्कस्तान) मध्ये उस्मानी सुल्तानांच्या परिसरात पोहोचले, असं कॅरलाइन फिंकल लिहितात.

तैमूर लंग स्वतःला चंगेझ खानचा वारसदार समजत होते. त्यामुळंच अनातोलिया सल्जूक मंगोल भागांवर त्यांचा हक्क होता, असं त्यांना वाटत होतं. त्यांनी अनातोलिया या विविध राजवटी (त्याकाळी उस्मानिया साम्राज्यान नसलेल्या) मध्ये असलेलया मतभेदाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र उस्मानियाचे सुल्तान बायजीद यांची नजरही त्याच राजवटींवर होती, असं फिंकल सांगतात.

ऑटोमन साम्राज्य, इतिहास

फोटो स्रोत, DEA / A. DAGLI ORTI/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, सुलतान मुराद

त्याचा परिणाम म्हणजे तैमूर लंग आणि बायजीद यांचे सैन्य 28 जुलै 1402 ला इंकराच्या जवळ समोरा-समोर आले. या युद्धात सुल्तान बायजीद यांचा पराभव झाला आणि त्यानंतर ते फार काळ जिवंत राहिले नाहीत. पण त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अनेक मतं-मतांतरं असल्याचं फिंकल सांगतात.

आजच्या काळाचा संदर्भ पाहता महत्त्वाची बाब म्हणजे, यामुळं ऑटोमन साम्राज्याचा कठीण काळ सुरू झाला. पुढची 20 वर्षे ऑटोमन साम्राज्याला गृहयुद्धामुळं प्रचंड नुकसान सहन करावं लागलं.

बायजीद पहिले यांच्या चारही मुलांचे हजारो समर्थक होते आणि ते अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात लढत राहिले, असं डॉक्टर अकंजे यांनी लिहिलं आहे.

गृह युद्धाच्या अखेरीस सुल्तानांचा सर्वात लहान मुलगा असलेले मेहमत पहिले हे भावांना पराभूत करून गादीवर बसले आणि 1413 मध्ये उस्मानिया साम्राज्याचे एकमेव वारसदार बनले.

सुल्तान मेहमत पहिले यांना ऑटोमन साम्राज्याच्या त्यांच्या वडिलांच्या म्हणजे सुल्तान बायजीद यांच्या काळात ज्या सीमा होत्या, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करावे लागले.

या दरम्यान नवे सुल्तान आणि तैमूर लंग (तेव्हा मृत्यू झालेले) यांचे पुत्र शाहरुख यांच्यात पत्रांद्वारे झालेल्या चर्चेतून एक रंजक बाब समोर आली. ती आजच्या विषयावर प्रकाश टाकणारी आहे. शाहरुख यांनी 1416 मध्ये सुल्तान मेहमत पहिले यांना एक पत्र लिहिलं आणि भावांची हत्या करण्यास विरोध केला. त्यावर सुल्तान यांनी त्यांना "एका देशात दोन बादशाह राहू शकत नाहीत. आम्हाला घेरलेले शत्रू हे कामय संधीच्या शोधात असतात," असं उत्तर पाठवल्याचं फिंकल लिहितात.

याठिकाणी महत्त्वाची बाब म्हणजे, सुल्तान बायदीज हे स्वतः भावांची हत्या करून गादीवर बसले होते. 1389 मध्ये ऑटोमन साम्राज्याचे तिसरे सुल्तान मुराह पहिले हे सर्बियाच्या विरोधात युद्धात मारले गेले. त्यावेळी राजपुत्र असलेल्या बायजीद यांनी भावांची हत्या करून सत्ता मिळवली.

बायजीद यांच्या हस्ते त्यांचा भाऊ शहजादा याकूब याची हत्या ही, 'त्यांच्या उस्मानी कुटुंबातील नोंद असलेली भावाची पहिली हत्या होती,' असं फिंकल यांनी म्हटलं आहे.

पण युद्धाच्या मैदानात वडिलांचा मृत्यू झाल्याचं समजताच त्यांनी ही हत्या केली होती, की त्यानंतर काही महिन्यांनी हे मात्र स्पष्ट नसल्याचं फिंकल म्हणतात. त्याचं कारण म्हणजे उस्मानी साम्राज्यानं ते युद्ध जिंकलं होतं आणि सर्बिया त्यांच्या अधिपत्याखालची राजवट बनली होती.

भावांना मारण्याची परंपरा आणि तुर्कस्तानच्या वारसदाराचा नियम

सुरुवातीला ऑटोमन साम्राज्यात सत्ता हा कौटुंबिक विषय असायचा. त्यात भाऊ, काका, काकांची मुलं आणि अनेकदा महिला नातेवाईकही हिस्सेदार असायच्या.

सत्तेवर केवळ मोठ्या मुलाचा हक्क असण्याच्या जगभरातील नियमापेक्षा ही स्थिती वेगळी होती, असं तुर्कस्तानातील वारसदारांच्या परंपरेबाबत जेसन गुडविन यांनी त्यांच्या 'लॉर्ड ऑफ द होरायजन्स' मध्ये लिहिलं आहे.

ऑटोमन साम्राज्य, इतिहास

फोटो स्रोत, FRANK BIENEWALD / GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, महाल

ऑटोमन सुल्तानांना अनेक शतकांमध्ये कदाचित त्यांची एक परंपरा बदलता आली नाही, असं पेयर्स लिहितात. "उस्मानी कुटुंबानं सत्ता चालवण्याचा नियम कधीही सोडला नाही. त्यानुसार शक्यता कितीही कमी असली तरी, प्रत्येक शहजादा हा गादीवर बसण्यायोग्य असायचा," असं त्या लिहितात.

"वारसा हक्क पूर्णपणे मोठ्या भावाचा असतो आणि लहान भाऊ त्यासाठी धोका नसतो, हा युरोपातील कायदा होता. पण तुर्कस्तानातील प्रत्येक मुलगा कुटुंबाच्या साम्राज्याचा वारस असतो, या विचाराची तो जागा घेऊ शकला नाही, हेच सुल्तान मुराद आणि त्यांचा पुत्र मेहमतनं केलेल्या भावांच्या हत्येवरून सिद्ध होतं"

अशा परिस्थितीत भावानं सुल्तानांच्या विरोधात विद्रोह करायलाच हवा हे गरजेचं नव्हतं. पण साम्राज्यातील शक्तीशाली भाग हे सुल्तानांवरच्या नाराजीमुळं दुसऱ्या शहजाद्याला सुल्तान बनवण्याचा प्रयत्न करू लागायचे.

डॉक्टर अक्रम अकंजे यांनी त्यांच्या लेखामध्ये ऑस्ट्रियाच्या ओगियर गुस्लिन डी बिस्बेक या राजदुतांच्या प्रतिक्रियेचा उल्लेख केला आहे. सुल्तान सुलेमान पहिले यांच्या काळात ते त्याठिकाणी उपस्थित होते.

"ऑटोमन साम्राज्याच्या सुल्तानाचा पुत्र असणं ही काही सुदैवाची बाब नाही. कारण एक सुल्तान बनतो, त्यावेळी इतरांसाठी मृत्यू समोर उभा असतो. सुल्तानांचे भाऊ जिवंत असतील तर सैन्याचा तोराच बदललेला असतो. सुल्तानांनी त्यांचं ऐकलं नाही तर ते सुल्तानाच्या भावालाही आम्ही गादीवर बसवू शकतो, असे संकेत देत असतात."

हत्येची परंपरा थांबली कशी?

शाही कुटुंबांमध्ये भावांच्या हत्या करण्याच्या परंपरेविषयी नाराजी वाढत चालली होती.

"सुरुवातीला सत्तेतील एकता कामय राहण्यासाठी ही परंपरा स्वीकारण्यात आली. त्यामुळं सुल्तानांना कोणत्याही आव्हानांचा सामना करावा लागत नव्हता."

ऑटोमन साम्राज्य, इतिहास

फोटो स्रोत, CHRIS MCGRATH / GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, ऑटोमन साम्राज्य

ऑटोमन साम्राज्याचा विस्तार होत होता, त्यावेळी सुल्तान स्वतः दीर्घकाळासाठी राजधानीपासून दूर मोहीमेवर जायचे. लोकांना त्यावेळी ही परंपरा कदाचित योग्य वाटत असेल. मात्र, "सुल्तान सुलेमानच्या काळानंतर कमी वयांची आणि अगदी मांडीवर खेळणारी मुलं, या परंपरेमुळं मारली जाऊ लागली. त्यातही राजधानीतच जास्त काळ राहणाऱ्या आणि फार कमी वेळा मोहिमांवर जाणाऱ्या सुल्तानांना वाचवण्यासाठी त्यांना मारलं जात होतं. 1574 पर्यंत तर इस्तानबूलच्या जनतेनं शहजाद्यांच्या हत्येचं हे नाट्य पाहिलंही नव्हतं," असं त्यांनी लिहिलं आहे.

"एखाद्या नव्या सुल्तानासाठी सर्व भावांची एकाच वेळी हत्या करणं, महालातून एकाच वेळी निघणाऱ्या अंत्ययात्रा आणि त्यात काही अगदी चिमुकल्यांचे मृतदेह पाहून, लोकांना हे सर्व जुन्या काळातील असल्याचं वाटलं असावं," असं पेयर्स म्हणतात.

त्यांनी त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख करताना भावांच्या हत्येच्या या परंपरेच्या विविध पैलुंवर सविस्तर चर्चा केली आहे.

मेहमत तिसरे यांच्यानंतर सुल्तान अहमद पहिले हे गादीवर बसले. पण त्यांनी दबाव असूनही भावांची हत्या केली नाही. मात्र ही परंपरा त्यावेळी पूर्णपणे संपुष्टात आली नव्हती.

सुल्तान अहमद पहिले यांच्या सात मुलांपैकी चार मुलं हे गादीवर बसणाऱ्या उस्मान दुसरे आणि सुल्तान मुराद चौथे या दोन मुलांच्या आदेशावरून मारले गेले होते, हे इतिहासावरून लक्षात येतं.

सुल्तान अहमद पहिले यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या जागी गादीवर त्यांचा भाऊ बसला. "सुल्तानांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाने त्यांची जागी घेण्याची ही पहिलीच वेळ होती," असं डॉक्टर अक्रम यांनी लिहिलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)