चीन : वेश्या व्यवसाय ते सागरी चाच्यांची महाराणी बनणारी महिला

फोटो स्रोत, UNKNOWN
एखाद्या साम्राज्यानं इतर देशांमध्ये जाऊन त्याठिकाणच्या साम्राज्याला पराभूत केल्याच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत. मात्र, आज आपण 200 वर्षांपूर्वीच्या एका अशा महिला सागरी दरोडेखोराबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांच्याकडं 1800 पेक्षा अधिक जहाजं होती.
या महिलेनं जीवनाची सुरुवात चीनच्या सागरी भागामध्ये देहव्यापार करत केली होती. मात्र नंतर त्या समुद्रात पोर्तुगाल आणि चीनच्या सैनिकांसाठी काळ ठरल्या होत्या.
या महिला झेंग यी साओ, शी यँग आणि चिंग नावाने प्रसिद्ध झाल्या.
हिंसा, निर्घृण शिक्षा आणि देहव्यापार यामुळं त्या चर्चेत आल्या. 1844 पर्यंत त्या जीवंत होत्या. पकडलेल्या लोकांना त्या अत्यंत क्रूर अशा शिक्षा देत होत्या.
चिंग शी यांचा जन्म 1775 मध्ये शिनहुईच्या ग्वांगडोंगमध्ये झाला होता. त्यांचे नातेवाईक किंवा कौटुंबिक इतिहासाबाबत मात्र इतिहासकारांना माहिती मिळू शकली नाही. मात्र त्यांच्या एकूण जीवनाला इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळालं आहे.
18 व्या शतकात समुद्रातील जहाजांवर आणि व्यापारात केवळ पुरुषांचा सहभाग असायचा. तर बेटांवर थांबलेली जहाजं आणि किनाऱ्यावर नांगर टाकून उभी असलेली जहाजं, याठिकाणी वेश्याव्यवसाय ही अगदी सर्वसामान्य बाब होती.
इतिहासकारांच्या मते चिंग शी या वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीच सेक्स वर्कर बनल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
त्या काळात झेंग यी हेदेखील सागरी दरोडेखोर (सागरी चाचे) होते आणि ते चिंग तसंच ग्वेन आन साम्राज्यांच्या विरोधात लढत होते.
व्हिएतनामच्या सूर्यवंशी राजांच्या वारसांच्या समर्थनात ते लढत होते. त्यांचे नातेवाईक असलेले झेंग की त्या काळातील सागरी चाच्यांचे प्रमुख होते.
चीन, पोर्तुगाल आणि फ्रान्सच्या लष्करांचं वर्चस्व संपवण्यासाठी सागरी चाच्यांनी आपसांत समन्वय राहावा म्हणून एका संघटनेची स्थापना केली.
सागरी चाच्याशी लग्न
एका हल्ल्याच्या दरम्यान झेंग यी यांची भेट चिंग शी यांच्याशी झाली. दोघं एकमेकांवर प्रेम करू लागले आणि त्यांनी 1801 मध्ये लग्न केलं.
झेंग यी यांनी मिळालेल्या संपत्तीमध्ये अर्धा वाटा देण्याचं आश्वासन चिंग शी यांना दिलं. त्यांना हा प्रस्ताव आवडला आणि त्यांनी लगेचच लग्नासाठी होकार दिला. लग्न झालं तेव्हा त्याचं वय 26 वर्षे होतं.
त्यांच्या लग्नानंतर वर्षभरातच झेंग यी यांचे नातेवाईक झेंग की यांना ग्वेन साम्राज्याच्या लष्करानं पकडलं. व्हिएतनामच्या सीमेजवळ जियांगपिंगमध्ये त्यांना पकडलं आणि तिथंच त्यांची हत्या करण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
या संधीचा फायदा उचलत झेंग यी यांनी झेंग की यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या सर्व चाच्यांचा पाठिंबा मिळवला आणि त्यांचे नेते बनले.
झेंग यी यांनी एका मच्छिमार कुटुंबातील मुलगा झांग बाओ साइ ला दत्तक घेतलं होतं. तो केवळ 15 वर्षांचा असताना 1798 मध्ये त्याचं अपहरण करून सागरी चाच्यांच्या ताब्यात देण्यात आलं होतं.
झांग बाओ हे हल्ल्यांच्या दरम्यान वडिलांची मदत करत होते.
झेंग यी यांना चीनच्या सागराच्या हद्दीत सक्रिय असलेले सर्व सागरी चाचे एका झेंड्याखाली आणायचे होते. पोर्तुगाली, चिनी, ब्रिटिश आणि फ्रान्सच्या लष्कराचा सामना करण्यासाठी त्यांच्या मनात हा विचार होता.
सागरी चाच्यांच्या नेत्या 'चिंग शी'
सागरी चाच्यांची एकजूट करण्यात चिंग शी यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी सागरी चाच्यांच्या नेत्यांशी चर्चा केली. देह व्यापार करत असतानाचे त्यांचे संबंधही कामी आले.
झेंग आणि चिंग यांच्या प्रयत्नांमुळं 1805 मध्ये चीनच्या समुद्रात सक्रिय असलेले सर्व सागरी चाचे एकत्र आले. त्यांची विभागणी सहा वेग-वेगळ्या रंगांच्या झेंड्यांनुसार करण्यात आली होती. त्यात, लाल, काळा, निळा, पांढरा, पिवळा आणि जांभळा या रंगांचा समावेश होता.
या चाच्यांनी समुद्राचा भाग वाटून घेतला होता. ते सगळे झेंग यी यांच्या नेतृत्वात लढायला तयार झाले होते.

फोटो स्रोत, Getty Images
19व्या शतकाच्या सुरुवातीला झेंग यी यांची शक्ती वाढली होती. ते सागरी चाच्यांचे शक्तीशाली नेते बनले. त्यांच्याबरोबर 70 हजारांपेक्षा अधिक चाचे आणि 1200 पेक्षा अधिक जहाजं होती. त्यांच्या या शक्तीमागं चिंग शी यांचा हात होता.
लाल झेंडे असलेल्या जहाजांचा गट झेंग यी आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा गट त्यांचा मुलगा बाओच्या नेतृत्वात होता.
या दरम्यानच चिंग शीनं दोन मुलांना जन्म दिला. 1803 मध्ये झेंग यिंगशी आणि 1807 मध्ये झेंग शियोंगशी यांना. मात्र काही इतिहासकारांच्या मते त्यांनी कधीही मुलं जन्माला घातली नाहीत.
दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर काही दिवसांतच झेंग यी यांचं निधन झालं, असं सांगितलं जातं. त्यावेळी ते 42 वर्षांचे होते. चाच्यांचं नेतृत्व इतर कोणाच्या हातात जाता कामा नये, अशी चिंग शी यांची इच्छा होती. त्यामुळं दत्तक घेतलेला मुलगा झांग बाओच्या मदतीनं त्यांनी समुद्रातील ही सत्ता काबीज केली.
चिंग शी यांचे अवैध संबंध
मात्र सागरी चाच्यांच्या स्वयंघोषित कायद्यानुसार महिलेला नेता बनण्याची परवानगी मिळत नव्हती. जहाजावर महिलांची उपस्थिती असल्यास वाईट काळ येतो, असं तेव्हा मानलं जात होतं. त्यामुळं चिंग शी यांनी झांग बाओला नेता बनवलं. हळू हळू त्यांनी झांग बाओला त्यांच्या हातातली बाहुली बनवलं होतं.
काही ऐतिहासिक सूत्रांनी चिंग शी यांचे बाओ बरोबरही अनैतिक संबंध होते असा दावा केला आहे. मात्र ते सिद्ध झालेलं नाही.
झांग बाओ केवळ नावाचे नेते होते. खरी शक्ती चिंग शी यांच्या हातीच होती. सागरी चाच्यांच्या या गटामध्ये लष्करासारखी शिस्त होती. आदेशाचं पालन करणं अनिवार्य होतं आणि अवहेलना केल्यास कठोर शिक्षा दिला जात होती.
क्रूर शिक्षा द्यायच्या
एखाद्या चाच्यानं किनाऱ्याच्या भागात महिलेबरोबर गैरवर्तन केलं तर त्याचे कान कापले जात होते. त्याला विवस्त्र करुन धिंड काढली जायची आणि इतर चाच्यांसमोर त्याला मारलं जात होतं.
लुटलेल्या मालासाठी एक गोदाम होतं. त्याठिकाणी लुटलेलं सर्वकाही जमा करण्यापूर्वी त्याची यादी करणं अनिवार्य होतं. लुटणाऱ्या चाच्यांना लुटलेल्या 10 पैकी दोन गोष्टी दिल्या जात होत्या. पण एखाद्यानं चोरी केली किंवा लुटलेला माल गोळा केला तर त्याची हत्या केली जात होती.

फोटो स्रोत, Alamy
चाचे एखादं गाव लुटण्यासाठी गेले तर त्याठिकाणी ते महिलांना नुकसान पोहोचवणार नाही किंवा त्यांचा बलात्कार करणार नाही, यावर एकमत झालेलं होतं. तसंच पकडलेल्या महिलांच्या संख्यांची नोंद ठेवली जात होती आणि त्यांच्याबरोबर गैरवर्तन करणाऱ्यांना फाशी दिली जात होती.
हे तीन नियम किंग राजवंशाचे अधिकारी युआन योंगलून यांनी सागरी दरोडेखोरांच्या संघटनेसाठी तयार केले होते. काही इतिहासकारांच्या मते हे नियम झांग बाओ यांनी तयार केले होते. नंतर अनुवादाच्या चुकीमुळं ते चिंग शी यांचे असल्याचं म्हटलं गेलं.
सागरी युद्ध आणि आक्रमक हल्ले
चिंग शी यांच्या हातचं बाहुलं असलेल्या झांग बाओनं 1808 मध्ये पर्ल नदीच्या किनाऱ्यांवरील गावं लुटण्यासाठी हुमेनमधील जनरल लिन गुओलियांग यांच्या जहाजांवर हल्ला केला. तोपर्यंत सागरी चाच्यांनी चीनच्या युद्धनौकांवर हल्ला केलेला नव्हता. या हल्ल्यात चीनच्या 35 युद्धनौका नष्ट झाल्या.
त्यानंतर सागरी चाच्यांनी हुमेनमध्ये वीयुआन बेटाच्या पूर्व भागावर हल्ला केला. लेफ्टनंट कर्नल लीन फा यांचा त्यात पराभव झाला. या दोन हल्ल्यांनी पर्ल नदीमध्ये सागरी चाच्यांचा मार्ग मोकळा केला होता.
त्या काळात लष्कराच्या विरोधात लढताना चिंग शी यांना त्यांचा गट हा एक अजेय सेना किंवा अजेय शक्ती आहे, असा विचार करत होत्या.
1809 मध्ये किंग साम्राज्याच्या विभागीय लष्कराचे नेते सुन क्वानमउ यांनी 100 लढाऊ जाहाजांच्या ताफ्यासह दावानशान बेटाजवळ सागली डाकुंच्या एका गटाला घेराव घातला. डाकुंनी चिंग शी यांना आधीच आप्तकालीन संदेश पाठवला होता.
त्यामुळं लाल आणि पांढऱ्या झेंड्यांखालील गटांच्या चाच्यांनी एकत्रितपणे चीनच्या जहाजांवर हलला केला आणि त्यामुळं सून क्वानमउ यांना माघार घ्यावी लागली.
या हल्ल्यादरम्यान पांढरा झेंडा असलेल्या गटाचे नेते लियांग मारले गेले. त्यांच्या गटातील सर्व जहाजंही नष्ट झाली. तर चीनची 25 जहाजं उद्ध्वस्त झाली.
पांढऱ्या झेंड्याखालील गटाला झालेल्या नुकसानीच्या रागातून झांग बाओच्या नेतृत्वातील लाल आणि काळे झेंडे असलेल्या गटांनी पर्ल नदीच्या आसपास असलेली सर्व जहाजं नष्ट केली.
जुलै ते सप्टेंबर दरम्यान 10 हजारांपेक्षा अधिक लोक मारले गेले. तर पर्ल नदीच्या आसपास असलेले सुमारे 2,000 नागरिकही मारले गेले. त्यांनी गावं उद्ध्वस्त करत तिथं प्रचंड लूट केली आणि शेकडो ग्रामस्थांना पकडलं. चिंग शीनं 500 जहाजांच्या ताफ्यासह या मोहिमेवर नजर ठेवली होती.
त्याकाळी मकाऊवर पोर्तुगालचं साम्राज्य होतं. त्यामुळं सागरी चाच्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंग साम्राज्यानं त्यांच्याकडे मदत मागितली होती. सागरी चाच्यांनी आधीच तिमोरच्या पोर्तुगाली गव्हर्नरच्या ताब्यातील भागावर कब्जा केला होता. या घटनेमुळं संतापलेले पोर्तुगाली हे बदला घेण्यासाठी योग्य वेळेची वाटच पाहत होते.

फोटो स्रोत, Getty Images
या दरम्यान त्यांना, चिंग शी जहाजांच्या दुरुस्तीसाठी तुंग-चुंगला आल्याचं समजलं तेव्हा त्यांना घेराव घातला. सून क्वानमउच्या नेतृत्वात 93 जहाजांनी या विजयात त्यांना मदत केली. हे चाचे फ्रान्सच्या सागरी व्यवसायासाठीही धोका होते. त्यामुळं फ्रान्सनेही या लढाईत मदत केली.
दोन आठवडे चाललेल्या या लढाईमध्ये पोर्तुगालींनी एक जहाज गमावलं होतं. त्यामुळं सून क्वानमउ यांनी त्यांच्याच जहाजांना आग लावून त्यानं दरोडेखोरांच्या जहाजांना धडक द्यायला सुरुवात केली. 42 पेक्षा अधिक धगधगती जहाजं चाच्यांच्या जहाजांच्या दिशेनं पाठवण्यात आली मात्र जोरदार हवेमुळं जहाजांची दिशा बदलली त्यामुळं त्यांचीच जहाजं नष्टं झाली.
चिंग शी यांची जहाजं उध्वस्त तर झाली नाहीत, मात्र 43 सागरी चाचे मारले गेले. या लढाईला चीनच्या इतिहासात "वाघाच्या तोंडाची लढाई" म्हटलं जातं.
शरण येणाऱ्यांना नौदलात नोकरी
काळ्या झेंड्याच्या गटाचं नेतृत्व अशलेल्या गुओ पोडाई यांना या लढ्यात जीव देणं हा मूर्खपणा असल्याची जाणीव झाली. त्यामुळं त्यांनी चिंग शी आणि झांग बाओला सहकार्य करण्यास नकार दिला.
पोडाई यांनी जानेवारी 1810 मध्ये लियांगगुआंगच्या व्हाइसरॉयसमोर शरणागती पत्करी. त्या मोबदल्यात त्यांना सब लेफ्टनंट पद देण्यात आलं. लष्करात सहभागी होताच त्यांनी दरोडेखोरांना मिळणारं भोजन, इंधन, शस्त्र आणि रसदीबाबत विस्तारानं माहिती दिली. त्यानंतर सागरी चाच्यांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा पुरवठा बंद करण्यात आला.
मात्र, सागरी चाच्यांच्या विरोधात युद्ध पुकारणं हानिकारक असल्याचं किंग साम्राज्याच्या लक्षात आलं. त्यामुळं त्यांनी चर्चा करण्याचा निर्णय केला. चिंग शी यांनाही हा प्रस्ताव मान्य करावा लागला, कारण त्यांची क्षमताही कमी होत चालली होती. बाई लिंग यांनी या चर्चेमध्ये नेतृत्व केलं.
20 एप्रिल 1810 ला झांग बाओ आणि चिंग शी यांनी 17,000 पेक्षा अधिक सागरी चाचे, 226 युद्ध जहाजं, 1300 तोफा आणि 2,700 शस्त्रांसह शरणागती स्वीकारली. किंग साम्राज्यानं झांग बाओला 20-30 जहाजांचा लेफ्टनंट बनवलं.
दत्तक घेतलेल्या मुलाशी विवाह
चिंग शी यांनी सरकारकडं दत्तक घेतलेला मुलगा झांग बाओबरोबर विवाह करण्याची परवानगी मागितली. काही महिन्यांमध्येच शीयर यांच्या नेतृत्वातील निळ्या झेंड्याखालील गटालाही पराभवाचा सामना करावा लागला.
चिंग शी आणि झांग बाओ यांनी झांग युलिन नावाचा एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. 1822 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी झांग बाओचा मृत्यू झाला. चिंग शी ग्वांगडोंगला परत गेल्या. त्याठिकाणी त्यांनी एक जुगाराचा अड्डा आणि वेश्याव्यवसायासाठी एक कोठा सुरू केला.
अनेक साम्राज्य आणि लष्करांसाठी वाईट स्वप्न ठरलेल्या चिंग शी यांचा 69 वर्षांच्या असताना झोपेतच मृत्यू झाला.
चिंग शी यांचं जीवन म्हणजे एका अशा वेश्येची कथा आहे, ज्यात सत्तेची भूक, जिद्द, युद्धाचं धोरण, कौशल्य आणि विश्वासघात या सर्वांचा समावेश आहे. अनेक इतिहासकारांच्या मते, त्यांच्या कथेतून मिळणारा संदेश म्हणजे, एक महिलादेखील इतिहासामध्ये निर्णायक वळण आणू शकते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








